Get it on Google Play
Download on the App Store

कृष्णाचे कर्णास आवाहन

कृष्णाने प्रयत्‍नांची शर्थ केली, समेट व्हावा म्हणून अनेक थोर व्यक्‍तींनी दुर्योधनाची समजूत काढली पण हटवादी व उन्मत्त दुर्योधनाने कुणाचेही ऐकले नाही. कृष्णाने ओळखले होते की दुर्योधनाची कर्णावरच भिस्त आहे व अर्जुनाच्या तोडीचा कौरवांकडे तोच एकमेव श्रेष्ठ वीर आहे. तो पांडव पक्षाला येऊन मिळावा व एकंदर सर्व चित्रच पालटावे म्हणून त्याने शिष्टाईनंतर कर्णाला आपल्या रथात घेतले व एकान्तात त्याच्याशी संवाद केला. कर्णाला त्याच्या आयुष्यात प्रथमच स्वतःचे जन्मरहस्य कळले ते ह्या भेटीत कृष्णाकडून ! भीष्म, कृष्ण व कुंती हे तिघेच रहस्य जाणत होते. पण ते आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. कर्णाला एवढेच माहीत होते की अधिरथ त्याचा धर्मपिता आहे. त्याच्या खर्‍या मातापित्यांचा तो जन्मभर शोध घेत होता. सूत म्हणून अनेकवेळा हेटाळणीला तोंड दिल्यानंतर आयुष्याच्या अखेरीस युद्धापूर्वी त्याला आपण क्षत्रिय आहोत----एवढेच नव्हे तर कुंतीपुत्र आहोत हे समजले. पांडव त्याचे भाऊ ठरत असल्याने त्याचे मन द्विधा झाले. कृष्णाने त्याला सांगितले की पांडव, यादव असे सर्व त्याचा सन्मान करतील व ज्येष्ठत्वामुळे तोच पांडवांकडून राजा होईल. आता त्याने आपल्या भावांना येऊन मिळणे हेच योग्य ठरेल.

कृष्णाचे कर्णास आवाहन

घेतसे आपुल्या रथी कृष्ण कर्णासी

तो कोण सांगण्या घेउन जात वनासी ॥धृ॥

तुजपाशी कर्णा ज्ञान शास्त्र-वेदांचे

तू शांत-मनाने जाण गूढ जन्माचे

कानीन असा तू पुत्र कुंतिचा असशी ॥१॥

मातृत्व लाभले तिला कुमारी असता

टाकिले तुला परि सापडला तू सूता

तू सूत नव्हे रे पाण्डुपुत्र तू ठरसी ॥२॥

हे सत्य कुणाला नाही अजुनी ज्ञात

काहूर मनातिल होइल तुझिया शांत

तू पांडवात ये हेच सांगणे तुजसी ॥३॥

ते पांडव घेतिल नाते हे समजून

तू ज्येष्ठ म्हणोनी देतिल तुज सन्मान

तू होशिल राजा धरुन शास्त्र-नियमासी ॥४॥

युवराज तुझा रे होइल धर्म खुषीने

तो भीम धरिल तुज राजछत्र प्रेमाने

यदुवंशज आम्ही राहू तुझ्या पाठीशी ॥५॥

ते पुत्र पाचही द्रौपदिचे, सहदेव

सौभद्र नकुलही, अंधक वृष्णि सदैव

तुज वंदन करतिल मानतील शब्दासी ॥६॥

मी करिन पांडवा, तुजवरती अभिषेक

सोहळा करु तो मोठा भव्य सुरेख

ते पाहुन होइल मोद खरा कुंतीसी ॥७॥

त्या पाच बंधुशी ऐक्य तुझे रे होता

द्रौपदी तुझीही होईल कर्णा कान्ता

हे राज्य भोगता काय नसे तुजपाशी ?॥८॥

बंधुंना मिळणे यात गैर ते काय ?

सर्वांस हिताचे - हेच असावे ध्येय

यमुनेचे पाणी शीघ्र मिळो गंगेसी ॥९॥