Get it on Google Play
Download on the App Store

शिशिरकुमार घोष 16

आपला सर्व व्यूह ढांसळला याची अ‍ॅश्लेला लाज वाटली. अ‍ॅश्लेसाहेब भाबडया स्वभावाचे असल्यामुळें आपल्या कांही बंगाली मित्रांजवळ म्हणाले, 'जर एका आठवडयाचा उशीर संपादकांनी लाविला असता तर जबरदस्त जामीन घेतल्याशिवाय मी त्यांस सोडलें नसतें. कायदा देशी भाषेंतील वर्तमानपत्राची गळचेपी करण्याकरितां होता. इंग्रजी भाषेंतील वृतपत्रांची यामुळे मुस्कटदाबी करितां येईना. अशा रितीने या खेडवळ बहादुरानें बंगालच्या अधिका-यास नामोहरम केलें.

मागासलेल्या हिंदुस्थानांत वृतपत्रांच्या इतिहासात या प्रसंगास तोड नाहीं. शिशिरकुमार घोषांची देशाच्या चारी कोप-यांत वाहवा होंऊ लागली. सर्व देशांत एक प्रकारची खळबळ उडून गेली. जो तो म्हणूं लागला. 'शाबास'.

शिशिरबाबू हे स्वतंत्र बाण्याचे व तडफदार लेखक होते. वाटेल त्या  लीला करु पाहणा-या गो-यास त्यांच्या पत्राचा वाचक असे. त्याप्रमाणेंच युक्तमार्गच्युत होणा-या आपल्या बांधवांवरही कोरडे ओढण्यास ते कमी करीत नसत रस्त्यासंबंधी ‘Road Cess’ कांही कर बसविण्याच्या वेळेस त्यांनी कसून विरोध केला. जमीनदारांचा अभिमान बाळगणा-यांनी या बिलाची तरफदारी केली होती. ज्यावेळेस प्राप्तीवरील कर बसविण्याची वेळ आली त्यावेळी पुष्कळ स्नेहांची मनें न्यायासाठी  त्यांना दुखवावी लागली. हा कर न्याययुक्त आहे असें त्यांस वाटलें व  त्यांनी त्याला आपला टेकू दिला. त्यांनी केलेल्या गोष्टी युक्त होत्या हा प्रश्न जरी क्षणभर बाजूस ठेविला. तरी त्यांचा दृढविश्वास व निश्चय ही किती अचल राहात असत हें पाहिलें म्हणजे त्यांची स्तुति करावी असेंच वाटतें.

त्यांची देशहिताचा सर्व बाजूंनी विचार करण्याची पध्दती फार व्यापक होती. पत्रिका सुरु केल्यापासून जनहिताच्या संबंधी त्यांनी निरनिराळया विषयांवर इतकें लिहिलें आहे की, ते लेख एकत्र केले तर किती तरी ग्रंथ होतील. जो जो विषय हाती घेतील त्याचा सर्व बाजूंनी विचार करावयाचा, त्याची छाननी इतकी करावयाची की, बोलून सोय नाही. कोणचीही गोष्ट ते अर्धवट लिहावयाचे नाहींत. ते सतत ठोठावीत राहतील, आणि शेवटी दार उघडलेंच पाहिजे प्रत्येक वस्तूंचे संपूर्ण चित्र ते रेखाटित यामुळें सर्वांस त्या चित्राकडे पाहून विचार कारता येई. पत्रिकेमधील त्यांचे लिखाण म्हणजे नानाप्रकारच्या माहितीचा  सागर आहे. तात्कलिक इतिहासलेखकास येथें भरपूर मालमसाला मिळेल.