Get it on Google Play
Download on the App Store

पेशव्यांचा नवरात्रोत्सव

मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते, त्यामुळे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतरही सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा होई. पेशव्यांनीही पुणे येथील पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गोत्सव मोठ्या थाटामाटात व भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवली होती. या उत्सवासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद पेशव्यांनी केली होती, हे तत्कालीन कागदपत्रांच्या नोंदीवरून स्पष्ट होते. या नऊही दिवसांत भवानी देवतेची आराधना करून तिच्यासमोर नंदादीप प्रज्वलित करून तिला नैवेद्य दाखवून पूजा केली जाई. देवीचे भक्त म्हणून ओळखले जाणारे भुते आणि गोंधळी हे गोंधळ घालून जागर करीत.

प्रतिपदा

या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते अंबेची घटस्थापना होत असे. उपस्थित जनसमुदाय 'देवीचा उदो' अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाके.

द्वितीया

रेणुकादी चौसष्ट योगिनींची पूजा करून कस्तुरी मळवट भरून उदो करीत.

तृतीया

अंबा अष्टभुजा शिणगार करून विराजमान होत असे.

चतुर्थी

सरकारवाड्यातील व बाहेरील नागरिक निराहार उपवास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्रार्थना करीत.

पंचमी

श्रद्धेने देवीची पूजा करून लोक रात्रीचे जागरण करीत.

षष्ठी

दिवट्यांचा गोंधळ घातला जाई. काही वेळा पेशवे स्वतः कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागीत असत.

सप्‍तमी

सप्‍तशृंग गडावर पेशवे जातीने आदिमायेची पूजा बांधत असत.

अष्टमी

देवीपूजनाचे वेळी 'अष्टभुजा नारायणी देवी शेषाद्री पर्वतावर उभी देखिली' असा देखावा डोळ्यासमोर उभा आहे अशी उपस्थित लोक कल्पना करीत.

नवमी

होमहवन, जपजाप्य, षोडश पक्वान्‍नांचा देवीला नैवेद्य, ब्राह्मण-सुवासिनी भोजन आणि विडा दक्षिणा देऊन त्यांची बोळवण.

दशमी

अंबा मिरवणुकीने शिलंगणास जाई. गावाबाहेर शमीपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन अंबा मिरवणुकीने परत येई.