Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

पुनर्वापराचे महत्व

 एक प्राध्यापक होते. ते गावोगावी फिरून प्रबोधन करायचे. ते एका प्रदेशात गेले. तो प्रदेश इतका सुपीक नव्हता. त्यामुळे ते जेथे जातील तेथे त्यांना गरीबीचेच दर्शन होत होते. असेच एका दिवशी ते एका गावी गेले होते. तिथे त्यांनी एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट दिली. पावसाचे दिवस चालू होते. त्यामुळे तो शेतकरी जमिनीच्या मशागतीची तयारी करत होता. घरापुढील अंगणात त्याची पत्नी , मुले व तो बियाणे साफ करीत होते. प्राध्यापकांनी ते बियाणे पाहिले त्यात खूपच खडे, कचरा होता. शेतकर्याचे कुटुंब हाताने तो कचरा, खडे काढून बियाणे स्वच्छ करीत होते. हे पाहून प्राध्यापक म्हणाले ," अरे मित्र! तुम्ही हे सर्व हाताने स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ घालावीत आहात. तुमच्याकडे मोठी चाळण नाही का?" तेंव्हा शेतकरी म्हणाला,"साहेब ! आम्ही गरीब माणसे! आमच्याकडे कोठून इतके पैसे असणार चाळण विकत आणण्यासाठी !" ते ऐकून प्राध्यापक फक्त हसले, आणि त्यांनी सर्व घराभोवती एक फेरफटका मारला. त्यांना घराच्या मागे एक गंजलेला पत्रा सापडला, तेथे एके ठिकाणी ते बसले, आपल्या पिशवीतून एक टोच्या काढला. जवळच पडलेल्या एका जड दगडाच्या साह्याने त्यांनी त्या पत्र्यावर छिद्रे पाडली, बाजूला पडलेल्या लाकडाच्या ढलप्या काढल्या. पिशवीतून ४ खिळे काढले. लाकडाला पत्रा ठोकून छानपैकी चाळण तयार केली व शेतकऱ्याच्या हातात दे. प्राध्यापक म्हणाले," जुन्या गोष्टी न टाकता त्याचा पुन्हा कसा वापर करता येईल याचा विचार जर केला तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे." शेतकऱ्याने त्यांचे खूप आभार मानले.

तात्पर्य- टाकावूमधून निश्चितपणे टिकावू व उपयोगी निर्माण करता येते. त्याने आपले पैसे वाचतील.