Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

सेवा

गंगेच्या काठी गुरु अभेंद्र यांचा आश्रम होता. एकदा देशात भीषण दुष्काळ पडला, गुरु अभेंद्र यांनी संकटग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या तीन शिष्यांना बोलावून घेतले. व सांगितले," अशा संकटाच्या वेळी आपण पीडितांची सेवा करायला पाहिजे. तुम्ही तिघे वेगवेगळे जावून उपाशी लोकांना अन्नदान करावे." यावर शिष्य म्हणाले,"गुरुजी! आपण इतक्या लोकांना भोजन कसे काय देवू शकतो? आपल्याजवळ न अन्नाचा साठा आहे ना अन्न खरेदी करण्यासाठी धन." तेंव्हा गुरु अभेंद्र यांनी त्या तिघांना एक थाळी देत म्हणाले," हि दिव्य थाळी आहे. या थाळीजवळ तुम्ही जितके अन्न मागाल तितके ती देईल. तिन्ही शिष्य ती थाळी घेवून निघाले. दोन शिष्य एका ठिकाणी बसले, तिथून जो कोणी जाईल त्याला भोजन देत असत. परंतु तिसरा शिष्य मात्र गप्प बसला नाही तर उपाशी लोकांना शोधून शोधून भोजन नेवून देत राहिला. काही दिवसांनी तिघेही जेंव्हा आश्रमात परतले तेव्हा गुरुनी तिसऱ्या शिष्याची खूप स्तुती केली. पहिल्या दोघांना याचे आश्चर्य वाटले. ते म्हणाले,"गुरुजी! दुष्काळपीडितांची सेवा तर आम्हीपण केली आहे. मग तुम्ही तिसऱ्या शिष्याची विशेष स्तुती का करता आहात?" गुरु म्हणाले," तुम्ही दोघेहि एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अन्नदान करीत होता. असे केल्याने जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ होते त्यांना तुमची सेवा मिळाली नाही. मात्र तिसऱ्याने लोकांना जागेवर जावून भोजन दिले त्याची सेवा किंवा मदत हि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याची सेवा हि स्तुतीलायक आहे."

तात्पर्य- खरी सेवा तीच असते जी पुढे होवून केली जाते व सर्व लोकांपर्यंत पोहोचते.