Get it on Google Play
Download on the App Store

मुलगी

पुत्र झाला म्हणूनी
साखर वाटली
पुत्र नाही कन्या झाली
शांताबाईला ॥१॥

कन्या झाली म्हणूनी
नको करु हेळसांड
गोपूबाळाच्या शेजारी
उषाताईचा पाट मांड ॥२॥

कन्या झाली म्हणुनी
नको घालू खाली मान
घडेल कन्यादान
काकारायांना ॥३॥

लेका गं परीस
लेक ती काय उणी
हिरा नव्हे हिरकरणी
उषाताई ॥४॥

लाडकी झाली लेक
घास जाईना तिच्या तोंडा
बापाशेजारी पाट मांडा
उषाताईचा ॥५॥

लाडकी झाली लेक
लाड करु मी कशाचा
चंद्रमा आकाशीचा
मागतसे ॥६॥

साठ्यांच्या दुकानी
देखीली फडकी
बापाची लाडकी
उषाताई ॥७॥

साठ्यांच्या दुकानी
उंच गझन मोलाची
बहीण भावाच्या तोलाची
उषाताई ॥८॥

कापड दुकानी
देखीली लाल साडी
बापाची झोप मोडी
उषाताई ॥९॥

आंबा मोहरला
मोहरला पानोपानी
बापाच्या कडे तान्ही
उषाताई ॥१०॥

लाडकी ग लेक
लाड मागते बापाला
माझी उषाताई
मोती मागते कापाला ॥११॥

माझ्या अंगणात
शेजीचे पाच दाजी
पायी पैंजण मैना माझी
उषाताई ॥१२॥

माझ्या अंगणात
शेजीचे पाच लाल
त्यात माझी मखमल
उषाताई ॥१३॥

माझ्या अंगणात
शेजीचे पाच पुत्र
त्यात माझी चंद्रज्योत
उषाताई ॥१४॥

माझ्या अंगणात
शेजीबाईची माणके
उषाबाई ग सारखे
एक नाही ॥१५॥

माझ्या अंगणात
सांडली दूधफेणी
जेवली उषाताई
शोभे शुक्राची चांदणई ॥१६॥

माझ्या अंगणात
ठेवली तूपपोळी
जेवीली चाफेकळी
उषाताई ॥१७॥

लांब लांब केस
मला वाटे काळा साप
अंग गोरे गोरे झाक
उषाताईचे ॥१८॥

गोर्‍या ग अंगाला
शोभती काळे केस
काळोख्या रात्रीत
शोभे चंद्रमा सुरखे ॥१९॥

लांलब लांब केस
तुझ्या केसाची पडती छाया
देत्ये चौरंग बैस न्हाया
उषाताई ॥२०॥

लांब लांब केस
वेणी येते मोगर्‍याची
फणी आणा घागर्‍यांची
उषाताईला ॥२१॥

लांब लांब केस
आईने वाढवीले
बापाने गोंडे केले
उषाताईला ॥२२॥

मोटे मोठे केस
मुठीत मावती ना
लिंबावाचून न्हाईना
उषाताई ॥२३॥

मोकळे केस ग
सोडून तू ना जाई
दृष्ट होईल तुला बाई
उषाताई ॥२४॥

गोंडीयाची वेणी
पाठीवरी लोळे
भावंडात खेळे
उषाताई ॥२५॥

पाचा पेडी वेणी
मला वाटे काळा साप
पदराखाली झाक
उषाताई ॥२६॥

घागर्‍या घुंगुर
दणाणे माझी आळी
खेळून आली चाफेकळी
उषाताई ॥२७॥

सोनाराच्या शाळे
ठिणगुल्या उडती
बिंदुल्या घडती
उषाताईला ॥२८॥

उषाताई खेळे
तुळशीच्या मागे
केवड्याला ऊन लागे
गोपूबाळाला ॥२९॥

माते माते म्हणुन
मातेच्या पाठी लागे
कुड्यांना मोती मागे
उषाताई ॥३०॥

माझ्या दारावरनं
कोण गेली परकाराची
हाती आंगठी हिर्‍याची
उषाताई ॥३१॥

झोपाळयावर बसू
हिरव्या साड्या नेसू
सारख्या बहिणी दिसू
उषाताई ॥३२॥

काचेची बांगडी
कशी भरु मी एकटी
आहे बहीण धाकुटी
माझ्या घरी ॥३३॥

काचेची बांगडी
कशी भरु मी हातात
आहे हो घरात
लहान बहीण ॥३४॥

दोघी ग बहीणी
जोडीजोडीने चालती
परकर ते हालती
रेशमाचे ॥३५॥

नदीच्या पलीकडे
हिरव्या परकराची कोण
पैंजण वाळ्यांची
माझी धाकुती बहीण ॥३६॥

लाडक्या लेकीचे
नाव ठुमक बिजली
पायी पैंजण सुंदर
ओसरीला की निजली ॥३७॥

लाडकी ग लेक
लेक उपाशी निजली
ऊठऊठ आता
साखर तुपात थिजली ॥३८॥

बाहुली बुडकुली
भिंतीशी उभी केली
खेळणार कोठे गेली
उषाताई ॥३९॥

शिंपली कुरकुली
बुरुडाला सांगणार
मैना माझी खेळणार
उषाताई ॥४०॥

तुझ्या गालांवरी
सांग कोणी ग गोंदले
फूल कोणी ग टोचले
गुलाबाचे ॥४१॥

पिकले तोंडले
तसे तुझे बाळे ओठ
भरे ना माझे पोट
पाहुनीया ॥४२॥

बापाची लाडकी
बाप म्हणे कोणी गेली
हासत दारी आली
उषाताई ॥४३॥

मुलगी वाढते
जशी चंद्रम्याची कोर
बापाला पडे घोर
अंतरंगी ॥४४॥

मुलगी वाढते
दिवसेंदिवस
घोर लागतो जिवास
बाप्पाजींच्या ॥४५॥

मुलगी वाढते
मनी चिंताही वाढवी
चिंता सतत रडवी
मायबापा ॥४६॥

बाप म्हणे लेकी
लेकी गुळाचे घागरी
लावण्यरुप तुझे
घालू कोणाचे पदरी ॥४७॥

बाप म्हणे लेकी
माझे साखरेचे पोते
तुझ्या नशिबाला
जामीन कोण होते ॥४८॥

बाप म्हणे लेकी
लाडकी होऊ नको
जाशील परघरी
वेडी माया लावू नको ॥४९॥

बाप म्हणे लेकी
तू गं धर्माची पायरी
सून सत्तेची सोयरी
वैनीबाई ॥५०॥

लेकीचे जन्मणे
जसा पानाचा पानमळा
ज्याचे त्याने नेली बया
शोषला गं तुझा गळा ॥५१॥

बाप्पाजी हो बाप्पा
लेकी फार म्हणू नका
जसा चिमणुल्यांचा थापा
उडूनी गेला ॥५२॥

सगळ्या झाल्या लेकी
शेजी म्हणे झाल्या झाल्या
बाप गं म्हणतो
दाही दिशां चिमण्या गेल्या ॥५३॥

बाळपट्टी खण
रुपयाला एक
परकराजोगी लेक
अक्काबाईंची ॥५४॥

बाळपट्टी खण
रुपयाला दोन
परकराजोगी सून
अक्काबाईला ॥५५॥

मुलगी पाहू आले
पुण्याचे पुणेकर
जरीचे परकर
घालू केले ॥५६॥

मुलगी पाहू आले
पुण्याचे वाईचे
नानाफडणवीसांचे
कारकून ॥५७॥

मुलीला पाहू आले
आधी करा चहा
मग मुलगी पाहा
उषाताई ॥५८॥

मुलगी पाहू आले
पुण्याचे पुणेकर
बिंदीपट्टा अलंकार
घालू केले ॥५९॥

मुलगी पाहू आले
काय पाहता कूडभिंती
मुलगी सुरतेचे मोती
उषाताई ॥६०॥

नवरी पाहू आले
सोपा चढून अंगणी
नवरी शुक्राची चांदणी
उषाताई ॥६१॥

नवरी पाहू आले
सोपा चढून माडी गेले
नवरी पाहून दंग झाले
उषाताईला ॥६२॥

नवरी पाहू आले
काय पाहता नवरीस
माझी लाडकी ही लेक
सोने जणू मोहरीस ॥६३॥

उषाताई गं नवरी
पुतळीचे जणू सोने
जिची सून होईल तीने
पुण्य केले ॥६४॥

उषाताई गं नवरी
कोणा भाग्यवंता द्यावी
हिर्‍याला जडवावी
हिरकणी ॥६५॥

नवरा पाहू गेले
काय पाहता वतनाला
मुलगी द्यावी रतनाला
उषाताई ॥६६॥

मुलगा पाहू येती
काय पाहता घरदार
मुलगा आहे वतनदार
गोपूबाळ ॥६७॥

मुलगा पाहू येती
अक्काबाई तुझ्या गुणा
लेकी तशा सुना
वागवीशी ॥६८॥

नवरा पाहू गेले
हुंडा द्यावा पाचशाचा
नवरा मुलगा नवसाचा
गोपूबाळ ॥६९॥

स्थळ पाहताना
नका बघू घरदार
जोडा बघ मनोहर
उषाताईला ॥७०॥

स्थळ पाहताना
नका पाहू धनबीन
एक पाहावे निदान
कुंकवाला ॥७१॥

स्थळ पाहताना
पाहा गणगोत्र कूळ
मुलगी दिल्यावर
काढू नये कुळबिळ ॥७२॥

शेरभर सोने
गोठाभर गायी
तेथे आमची उषाताई
देऊ करा ॥७३॥

ज्याच्या घरी हत्ती घोडे
ज्याच्या घरी गं पालखी
तेथे देऊ गं लाडकी
उषाताई ॥७४॥

ज्याच्या घरी हत्ती घोडे
ज्याच्या घरी कुळंबिणी
तेथे देऊ हिरकणी
उषाताई ॥७५॥

मुलीच्या रे बापा
नको भिऊ करणीला
घालू तुमच्या हरणीला
गोटतोडे ॥७६॥

मुलीच्या रे बापा
हुंडा द्या पाच गाड्या
शालूच्या पायघडया
पाहिजेत ॥७७॥

लगनाच्या बोली
बोलती पारावरी
नवरा हुंड्याचा माझ्या
घरी गोपूबाळ ॥७८॥

गृहस्थ व्याहीया
हुंडा दे पाच गायी
लेकुरवाळा व्याही
मामाराया ॥७९॥

गृहस्थ गृहस्थ
विचार करिती बाजारी
माझ्या बाप्पाजींच्या
हुंडा शेल्याच्या पदरी ॥८०॥

भिंती सारवून
वर काढावी सुखड
तुझ्या लग्नाचे पापड
उषाताई ॥८१॥

भिंती सारवून
वर काढीले नारळ
तुझ्या लग्नाचे फराळ
उषाताई ॥८२॥

भिंती सारवून
वर काढू केरेमोरे
तुझ्या लग्नाचे सोयिरे
जमताती ॥८३॥

भिंती सारवून
वर काढावा पोपट
तुझ्या लग्नाची खटपट
उषाताई ॥८४॥

भिंती सारवून
वर काढावी परात
तुझ्या लग्नाची वरात
उषाताई ॥८५॥

लगीन ठरलं
करिती केळवण
जरीचे मिळती खण
उषाताईला ॥८६॥

करा केळवण
आहे मुहूर्त समीप
आला घाईचा निरोप
मामारायांचा ॥८७॥

करु केळवण
लाडक्या भाचीला
मनात आनंदला
मामाराया ॥८८॥

ओल्या हळदीचे
वाळवण दारी
केळवण घरी
उषाताईला ॥८९॥

ओल्या हळदीचे
वाळवण घाला
केळवण तुला
उषाताई ॥९०॥

दिवसा दळू कांडू
रात्री पापडाचे
लगन तांतडीचे
उषाताईचे ॥९१॥

दिवसा दळू कांडू
रात्री पापडपीठी
धाडू लग्नचिठी
आप्पारायांना ॥९२॥

जाते घडघडे
उडदाच्या डाळी
पापडाचे दळी
अक्काबाई ॥९३॥

वाटेवरले घर
ओवीयांनी गर्जे
लगीनघर साजे
बाप्पाजींचे ॥९४॥

हळद कुटिता
मुसळे घुमती
तुला बाशिंगे शोभती
गोपूबाळा ॥९५॥

सासू - सासर्‍यांची
येऊ द्या मांडवा
हात लागू दे लाडवा
शांताताईचा ॥९६॥

सासू - सासर्‍यांच्या
बोलवा पाचजणी
नवरा आहे देवगणी
गोपूबाळ ॥९७॥

लगन उतरले
उतरले तळ्याकाठी
नवरी जडावाची पेटी
उषाताई ॥९८॥

लगन उतरले
आंबराईच्या पिंपळाखाली
नवरी पिवळ्या छत्राखाली
उषाताई ॥९९॥

मांडव घातला
पृथिवीचा मेज
लेकी कन्यादान तुझं
उषाताई ॥१००॥

मांडवाला मेढी
घालाव्या ठेंगण्या
बहिणी चिमण्या
उषाताईच्या ॥१०१॥

मांडवाला मेढी
सरशा सूत्रधारी
चुलता कारभारी
उषाताईचा ॥१०२॥

घातला मंडप
त्याला लावीयले छत्र
नवरी शोभते घरात
उषाताई ॥१०३॥

घातला मंडप
हंड्या झुंबरे लावती
तेथे झालरी सोडीती
रेशमाच्या ॥१०४॥

मंडपाला खांब
शंभर लावीले
लाल कपडे मढवीले
रातोरात ॥१०५॥

मांडव घातला
ओल्ये की हिरांचा
वैनीबाईच्या दिरांचा
पराक्रम ॥१०६॥

मांडव घातला
ओल्ये पोफळीचा
व्याही केला कोकणीचा
मामारायांनी ॥१०७॥

मांडव घातला
ओल्ये ओल्येत्यांनी
उषाताईच्या चुलत्यांनी
परी केल्या ॥१०८॥

मांडवाला मेढी
घालाव्या दुसर्‍या
बहिणी रुसल्या
गोपूबाळाच्या ॥१०९॥

खांद्यावर कुर्‍हाडी
कुठे जाता हो वर्‍हाडी
मांडवाला मेढी
चंदनाच्या ॥११०॥

घाणा भरीयेला
विडा ठेवीयेला
आधी नमीयेला
गणराज ॥१११॥

घाणा भरीयेला
खंडीच्या भाताचा
आमुच्या गोताचा
गणराय ॥११२॥

आधी मूळ धाडा
दूरी दूरीचीये
आम्हा कुळीचेये
जोगेश्वरीला ॥११३॥

आधी मूळ धाडा
घुंगराची गाडी
शालजोडीचे वर्‍हाडी
गणराय ॥११४॥

आधी मूळ धाडा
चिपळूण गावा
परशुराम देवा
आमंत्रण ॥११५॥

नागवेली बाई
आगरी तुझा वेल
कार्य मांडले घरी चल
भाईरायांच्या ॥११६॥

आहेर की आला
शेला शालू खंबायीत
चल सखी मंडपात
उषाताई ॥११७॥

आहेर की आला
माहेरीचा शेला
शेल्यावरी झेला
मोतीयांचा ॥११८॥

आहेर की आला
मोहरीची चोळी
चोळीवरी जाळी
मोतीयांची ॥११९॥

आहेर की आला
माहेरीची शाल
शालीवरी लाल
पीतांबर ॥१२०॥

आहेर की आला
माहेरीची घटी
घटीवर मुठी
मोतीयांच्या ॥१२१॥

अक्षतांनी जड झाला
उषाताई तुझा माथा
अहेर देता घेता
दमलीस ॥१२२॥

माडीखाली माडी
माडीखाली तळघर
तेथे तुझा गौरीहर
उषाताई ॥१२३॥

अष्टपुत्री कांचोळी
आजोळीची नेस
गौरीहरी बैस
उषाताई ॥१२४॥

हौसदार मोठे
कमळाबाईचे चुलते
गौरीहरी गं फुलते
नागचाफे ॥१२५॥

आणिले रुखवत
मुलीची आई उभी
उघडून पाहू दोघी
ताईबाई ॥१२६॥

आणील रुखवत
मंडपी राहू द्या
वडील मानाची येऊ द्या
ताईबाई ॥१२७॥

आणीले रुखवत
बत्तीस ताटांचे
नवर्‍येमुलीचे गोत मोठे
उषाताईचे ॥१२८॥

वाजत गाजत
आले रुखवत
भोवती मैत्र येत
गोपूबाळाचे ॥१२९॥

आले रुखवत
आता उठा घाई करा
घोडा आहे उभा दारा
शृंगारलेला ॥१३०॥

सजलेला घोडा
वर वर बसवीला
एकच घोष झाला
वाजंत्र्याचा ॥१३१॥

नवरा मुलगा
हत्तीवर उभा करा
करवलीला चुडा भरा
कमळाताईला ॥१३२॥

नवरा मुलगा
हत्तीवर चढे
दोन्ही बिदी उजेड पडे
चकचकाट ॥१३३॥

चौघडे कडाडती
उडतात बार
चालला हो वर
उषाताईचा ॥१३४॥

शिंगे वाजविती
कुणी वाजविती झांजा
मुहूर्त तिन्हीसांजा
गोरजाचा ॥१३५॥

वारापाठीमागे
मानाच्या वर्‍हाडणी
अप्सरा स्वर्गातूनी
उतरल्या ॥१३६॥

निघाल्या बायका
अपुला करुन शृंगार
पैठण्या पीतांबर
झळकती ॥१३७॥

धन्य धन्य वाटे
मनात वरुमाये
आनंद न समाये
ह्रदयात ॥१३८॥

घोडा सजलेला
घोड्याला शोभे तुरा
बसला वर हिरा
गोपूबाळ ॥१३९॥

घोडा सजलेला
त्याच्यापायी चांदी तोडा
वराच्या पायी जोडा
शोभतसे ॥१४०॥

उषाताईचा नवरा
आला रे घाटीशी
भाईराया दिवटीशी
तेल घाली ॥१४१॥

उषाताईचा नवरा
आला हो घाटीये
भरु हे पाठीये
तेलफळ ॥१४२॥

वाजत गाजत
बाळ गृहस्थाचे आले
दारात ओवाळीले
वधूमाये ॥१४३॥

तोरणाच्या दारा
कशाचे रुसणे
चीर मागते दुसरे
अक्काबाई ॥१४४॥

तोरणाच्या दारा
चिखल का झाली
वरुमाय न्हाली
वयनीबाई ॥१४५॥

बाशिंगाची कळी
लागते तोरणा
नवरा मुलगा शहाणा
गोपूबाळा ॥१४६॥

बाशिंगाची कळी
लागली अनंता
नवरा मुलगा नेणता
गोपूबाळ ॥१४७॥

पिवळे नेसली
पिवळे तिचे पाय
मुलाची वरुमाय
शांताबाई ॥१४८॥

नवर्‍या मुलाची
करवली कोण
नेसली सूर्यपान
शांताताई ॥१४९॥

चला जाऊ पाहू
मधुपर्क सोहळ्याला
कंठी देतो जावयाला
भाईराया ॥१५०॥

मधुपर्की एक
बैसलासे हिरा
तो तुझा नवरा
उषाताई ॥१५१॥

मधुपर्की एक
बैसलासे मोती
तो तुझा लक्ष्मीपती
उषाताई ॥१५२॥

वाजत गाजत
येऊ दे उभ्या बिदी
माळ घेऊन आहे उभी
उषाताई ॥१५३॥

वाजत गाजत
आले गृहस्थाचे बाळ
ऊठ सखे माळ घाल
उषाताई ॥१५४॥

वाजत गाजत
बाळ गृहस्थाचे आले
हाती धरुन त्याला नेले
बाप्पाजींनी ॥१५५॥

वाजंत्री वाजती
चला जाऊ पाहायला
वस्त्र देऊ जावयाला
अप्पाराया ॥१५६॥

लगनाच्या वेळे
भट करिती सावधान
होतसे कन्यादान
उषाताईचे ॥१५७॥

नेस गं अक्काबाई
हिरवे पाचूचे
कन्यादान गं लेकीचे
उषाताईचे ॥१५८॥

पाचा गं पेडी वेणी
मामांनी उकलीली
कन्यादाना उभी केली
उषाताई ॥१५९॥

कन्यादान करुनी
पुण्य आहे भारी
हाती आहे झारी
बाप्पाजींच्या ॥१६०॥

कन्यादान करुनी
बाप बोले पाच गायी
चुलता बोले उषाताई
अर्धे राज्य ॥१६१॥

कन्यादान करुनी
कन्या एकीकडे
पृथ्वीदान घडे
काकारायांना ॥१६२॥

कन्यादाना वेळे
कन्या उच्चारिली
बापे पाचारीली
उषाताई ॥१६३॥

मंडप भरला
जमले छोटे मोठे
लगीन होते थाटे
उषाताईचे ॥१६४॥

मंडप भरला
लागे पागोट्या पागोटे
लगीन होते थाटे
उषाताईचे ॥१६५॥

भिक्षुकांची दाटी
मांडवात झाली
लगीनाची वेळ झाली
उषाताईच्या ॥१६६॥

गोरज मुहूर्त
मुहूर्त पवित्र
उच्चारिती मंत्र
ब्रह्मवृंद ॥१६७॥

मंगल अष्टके
भटभिक्षुक म्हणती
होतसे शुभ वृष्टी
अक्षतांची ॥१६८॥

लगनाच्या वेळे
अंतरपाटाला दोरवा
मामा सरदार बोलवा
उषाताईचा ॥१६९॥

लगनाच्या वेळे
नवरी कापे दंडाभुजा
पाठीशी मामा तुझा
उषाताई ॥१७०॥

लगनाच्या वेळे
नवरी कापते दंडवत
साखर घालावी तोंडात
उषाताईच्या ॥१७१॥

लगनाच्या वेळे
नवरी कापे थरथरा
मामा येऊ दे धीर धरा
उषाताईचा ॥१७२॥

वाजंत्री वाजती
फुलती फूलबाजा
उषाताई कोणा राजा
माळ घाली ॥१७३॥

रुपयांची वाटी
बोहल्याच्या कोना
तुझ्या वराला दक्षिणा
उषाताई ॥१७४॥

वाजवा वाजवा
वाजवा झाली वेळ
घालती गळा माळ
वधूवर ॥१७५॥

कडाका उडाला
घोष जातो अंबरात
गर्दी उडे मांडवात
बाप्पाजींच्या ॥१७६॥

ताशे तडाडती
उडती किती बार
सोहळा होतो थोर
लगीनाचा ॥१७७॥

सनया सुस्वर
धिमधिम चौघडे वाजती
शिंगे जोरात फुंकती
शिंगवाले ॥१७८॥

पानसुपारीची
अत्तरफुलांची
तबके चांदीची
झळाळती ॥१७९॥

आणिती साखरा
तबकी भरभरुन
गर्दीत घुसून
वाटतात ॥१८०॥

मंत्र उच्चारिती
चाललासे होम
डोळ्या जातो धूम
उषाताईच्या ॥१८१॥

मंत्र उच्चारिती
चाललासे होम
होतसे भारी श्रम
उषाताईला ॥१८२॥

कोवळी सावळी
जशी शेवंतीची कळी
दमली भागली
उषाताई ॥१८३॥

कोवळी कोवळी
सुंदर सावळी
घामाघूम भारी झाली
उषाताई ॥१८४॥

आणिले दागिने
तबकी भरुन
शोभेल चौगुण
उषाताई ॥१८५॥

आधीच्या सोन्याची
आणि सोन्याने मढली
अत्यंत शोभली
उषाताई ॥१८६॥

हाती गोटतोडे
भाळी बिंदी बीजवर
गळा शोभे चंद्रहार
उषाताईच्या ॥१८७॥

नाकी मोठी नथ
तोंडा पडली साउली
चित्रशाळेची बाहुली
उषाताई ॥१८८॥

दूशापेट्यांखाली
कंठ्याचे बारा सर
दिल्या घरी राज्य कर
उषाताई ॥१८९॥

दूशापेट्यांखाली
तन्मणीला बारा घोस
दिल्या घरी सुखे अस
उषाताई ॥१९०॥

पिवळी नागीण
चंदन वेलीला
तसा पट्टा कमरेला
उषाताईच्या ॥१९१॥

गोंडस सुकुमार
हात चिमणे कोवळे
जड तोंड्यांनी वाकले
उषाताईचे ॥१९२॥

तोडीच्या वाकीनी
शोभती दोन्ही भुजा
फाकते तेजः प्रभा
उषाताईची ॥१९३॥

पाच पेडी वेणी
वेणीला पन्हळ
मुद राखडी सांभाळ
उषाताई ॥१९४॥

करवंदी मोत्याची
नव लाखाच्या मोलाची
कोवळ्या नाकाची
उषाताई ॥१९५॥

नक्षत्री आकाश
फुलांनी फुलवेल
भूषणी शोभेल
उषाताई ॥१९६॥

फुलांच्या गुच्छांनी
वाकतो कोवळा वेल
तशी नवरी लवेल
दागिन्यांनी ॥१९७॥

वाजत गाजत
हळदीला नेती
अंगाला लाविती
वधूवरांच्या ॥१९८॥

नवर्‍यापरीस
नवरी आहे गोरी
हळद लावा थोडी
उषाताईला ॥१९९॥

नवर्‍यापरीस
नवरी आहे काळी
आणा फुलांची हो जाळी
उषाताईला ॥२००॥

दागिन्यांनी वाके
जशी लवली गं केळ
नाजूक फुलवेल
उषाताई ॥२०१॥

नवर्‍यापरीस
नवरी उजळत
सोन्याचे तिला गोट
शोभतात ॥२०२॥

सूनमुख पाहता
मांडवी आले ऊन
शालूखाली झाका सून
उषाताई ॥२०३॥

सूनमुख पाहता
मांडवी आले ऊन
कडे घ्यावी सून
अक्काबाई ॥२०४॥

सूनमुख पाहता
मांडवी आले ऊन
उभी छाया हो करुन
आक्काबाई ॥२०५॥

वहिणीविहिणींच्या
रस्त्याबिदी झाल्या भेटी
गुलाल तुझ्या ताटी
वैनीबाई ॥२०६॥

चाल माझ्या वैनीबाई
पायघड्यांवरुन
व्याही तुला गं दुरुन
हात जोडी ॥२०७॥

पायघड्या घालिती
परटीणी जावाजावा
पायघड्यांचा मान घ्यावा
अक्काबाई ॥२०८॥

पायघड्या घालिती
परटीणी सासवासुना
पायघड्यांचा मान तुम्हा
वैनीबाई ॥२०९॥

एका छत्रीखाली
दोन वरुमाया
नणंदा भावजया
विहिणी झाल्या ॥२१०॥

वाजंत्री वाजती
सनया आलापती
बैसल्या हो पंगती
जेवावया ॥२११॥

हातातील घास
का हो हातात राहाती
सूनेला आणिती
मांडवात ॥२१२॥

बघतात सारे
बघती टकमक
नवरी लखलख
उषाताई ॥२१३॥

घेऊन ओखाणा
नवरी घास देई
हळूच वर बघे
पुन्हा मान खाली होई ॥२१४॥

घेऊन ओखाणा
नवरीला घास देई
घास पटकन तोंडी घेई
उषाताई ॥२१५॥

प्रीतीच्या जावयाला
देऊ करा ताटवाटी
बाळे सारे तुझ्यासाठी
उषाताई ॥२१६॥

चोळी शिव रे शिंप्या
मोती लाव परातीत
चोळी जाते वरातीत
उषाताईच्या ॥२१७॥

कसले हे बार
कशाचे वाजते
आता वरात निघते
उषाताईची ॥२१८॥

झोपाळयाच्या वरातीला
मोत्यांचे घोस लावू
प्रेमाचे गीत गाऊ
उषाताईला ॥२१९॥

नळे चंद्रज्योती
शेकडो लाविती
अंबारीत शोभती
वधूवर ॥२२०॥

नळे चंद्रज्योती
त्यांची झाकतसे प्रभा
वरातीसाठी निघा
लाग वेगे ॥२२१॥

नवरानवरी
बैसली पालखीत
फुले उधळित
हौसेसाठी ॥२२२॥

हत्तीच्या सोंडेवरी
शोभे मोती यांची जाळी
वर बैसली सावळी
उषाताई ॥२२३॥

नक्षत्रांसारखे
हे गं दीप झळाळती
झाल ओवाळिती
वधूवरा ॥२२४॥

हत्तीच्या सोंडेवरी
मोतियाची झाल
वर शोभे बाळ
भाग्यवंत ॥२२५॥

माहेर तुटले
सासर जोडले
नाव नवीन ठेवीले
उषाताईला ॥२२६॥

माउलीच्या डोळा
घळकन पाणी आले
नाव हो बदलीले
उषाताईचे ॥२२७॥

सासूसासर्‍यांच्या
वधूवरे पाया पडती
आशीर्वादा मिळविती
वडिलांच्या ॥२२८॥

जवळ घेउनी
बैसविती मांडी
घालतात तोंडी
साखरेला ॥२२९॥

पाठीराखी कोण
जाईल बरोबर
सांभाळील अष्टोप्रहर
उषाताईला ॥२३०॥

नको नको रडू
पाठराखणीला धाडू
आसवे नको काढू
उषाताई ॥२३१॥

नको नको रडू
पाठराखीण येईल
प्रेमे तुला समजावील
उषाताई ॥२३२॥

नको नको रडू
सत्वर तुला आणू
डोळ्या नको पाणी आणू
उषाताई ॥२३३॥

काळी कपिला गाय
आपुल्या कळपा चुकली
मला मायेने टाकीली
परदारी ॥२३४॥

काळी कपिला गाय
रेशमी तिला दावे
आंदण मला द्यावे
बाप्पाराया ॥२३५॥

नऊ मास होत्ये
मायबायेच्या उदरी
आता मी परघरी
लोक झाल्ये ॥२३६॥

नऊ मास होत्ये
मायबाईच्या पोटात
चिरेबंदी कोटात
वस्ती केली ॥२३७॥

नऊ मास होत्ये
माउलीच्या डाव्या कुशी
उणे उत्तर बोलू कशी
मायबाईला ॥२३८॥

नऊ मास होत्ये
कळकीच्या बेटा
कन्येचा जन्म खोटा
मागितला ॥२३९॥

सासरी जाताना
डोळ्यांत येते पाणी
सखा भाईराया
पुसून टाकीतो शेल्यानी ॥२४०॥

सासरी जाताना
डोळ्यांना येते पाणी
सासरी जाते तान्ही
उषाताई ॥२४१॥

सासरी जाताना
करीते फुंदफुंद
डोळे झाले लालबुंद
उषाताईचे ॥२४२॥

सासरी जाताना
डोळ्यांना येते पाणी
बाप म्हणे शहाणी
लेक माजी ॥२४३॥

सासरी निघाली
पहिल्या पहिल्याने
शब्दही भावाच्याने
बोलवेना ॥२४४॥

सासरी जाताना
उषाताई रडे
पदरी बांधी पेढे
भाईराया ॥२४५॥

सासरी जाताना
डोळ्यांना आल्या गंगा
महिन्याची बोली सांगा
बाप्पाराया ॥२४६॥

सासरी जाताना
बघते मागेपुढे
जीव गुंते आईकडे
उषाताईचा ॥२४७॥

सासरी जाताना
माय धरिते पोटाशी
तान्हे कधी गं भेटशी
उषाताई ॥२४८॥

सासरी जाताना
उषाताई मुसमुशी
शेल्याने डोळे पुशी
भाईराया ॥२४९॥

सासरी जाताना
गाडी लागली जाईला
हाका मारिते आईला
उषाताई ॥२५०॥

सासरी जाताना
गाडी लागे चढणी
ये हो म्हणे बहिणीला
भाईराया ॥२५१॥

सासरी जाताना
डोंगर आले आड
जाताना उषाताईला
मागे पाहुणे येती कड ॥२५२॥

सासरी जाताना
डोळ्यांना नाही पाणी
आई म्हणे लेक शहाणी
उषाताई ॥२५३॥

घातली पदरी
पोटची मी लेक
करा देखरेख
माय म्हणे ॥२५४॥

पदरी घातला
पोटचा मी हो गोळा
भरुन येता डोळा
माय म्हणे ॥२५५॥

पोटच्या मुलीपरी
करा माझ्या हो तान्हीला
काय फार सांगू
माय म्हणे हो तुम्हाला ॥२५६॥

मायेच्या डोळ्यांना
सुटल्या शतधारा
कन्येच्या पाठीवरुन
फिरवी कापर्‍या हाताला ॥२५७॥

बाप म्हणे लेकी
साखरेचा घडा
जाशी परघरा
जीव होई थोडा थोडा ॥२५८॥

लेकीच्या रे बापा
धन्य धन्य तुझी छाती
काळजाचा घडा
देतोस परक्या हाती ॥२५९॥

लेकीच्या रे बापा
धन्य धन्य तुझे मन
काळजाचा घडा
करिशी परक्या आधीन ॥२६०॥

लेकीच्या बापाचे
धन्य धन्य हो धारिष्ट
लेक देऊनिया
केला जावई वरिष्ठ ॥२६१॥

आयुष्य चिंतिते
परक्याच्या पुत्रा
सखे तुझ्या मंगळसूत्रा
उषाताई ॥२६२॥

आयुष्य चिंतिते
परक्या मुलास
सखे तुझ्या कुंकवास
उषाताई ॥२६३॥

आयुष्य मी चिंती
परक्या ब्राह्मणा
सखी तुम्हा दोघजणां
उषाताई ॥२६४॥

आयुष्य मी चिंती
लेकी आधी जावयाला
साउलीचे सुख तुला
उषाताई ॥२६५॥

माझे हे आयुष्य
उणे करी रे गणया
घाल सखीच्या चुडेया
उषाताईच्या ॥२६६॥

होऊन लगीन
कन्या सासरी निघाली
संसाराची यात्रा
निराळी सुरु झाली ॥२६७॥

होऊन लगीन
निघाली पतिघरी
होई कावरीबावरी
उषाताई ॥२६८॥

बापाने दिल्या लेकी
जन्माच्या साठवल्या
ब्रह्मयाने दिल्या गाठी
जन्मवेरी ॥२६९॥

निघालीसे गाडी
संसार सुरुवात
सखीचे मंगळसूत्र
मंगल करो ॥२७०॥

निघालीसे गाडी
होवो संसार सुखाचा
माझ्या तान्ह्या गं बाळीचा
उषाताईचा ॥२७१॥

गाडी आड गेली
दिसेना नयनांला
माहेरच्या मंडळीच्या
पाणी लोटले डोळ्यांला ॥२७२॥

गाडी आड गेली
घंटेचा येई नाद
त्याचा ऐके पडसाद
भाईराया ॥२७३॥

गाडी आड गेली
येतो खडखड आवाज
आता भाईराया
घरी जायला रे नीघ ॥२७४॥

गाडी दूर गेली
ऐकू ना येई काही
परतती मायबाप
परते रडत भाई ॥२७५॥

लोक बोलताती
नका करु काही चिंता
लेक दिली भाग्यवंता
बाप्पाजींनी ॥२७६॥

लोक बोलताती
आता नका रडू
लेक लाडकी तुमची
आता भाग्यावर चढू ॥२७७॥

लोक समजावीती
मायबाप झाले शांत
परी आतून मनात
कढ येती ॥२७८॥

संसारी सुखात
आहे दुःख मिसळले
लगीन थाटाने करिती
परि डोळया पाणी आले ॥२७९॥

सुखामध्ये दुःख
दुःखामध्ये सुख
असे संसारी कौतुक
देवाजीचे ॥२८०॥

गणया रे देवा
कर सखीचं चांगलं
आहे सार रे मंगल
तुझे हाती ॥२८१॥