Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

संग्रह ३

५०

सरलं दळन सरलं कशी म्हनुं

हाईती पाठचं लक्षुमणूं

५१

सरलं दळन सरलं म्हनुं कशी

सासर-माहेर भरल्या दोन राशी

५२

सरलं दळन उरलं मूठापसा

सखी जायाची दूरदेशा

५३

सरलं दळन, माझं उरलं पाच पसं

देवाईनं दिलं भासं

५४

सरलं दळन उअरलं कुठं ठेवु

बळदाला शिडया उंच लावु

५५

सरलं दळन उअरलं कुठं ठेवुं

शिधा वामनाला देऊ

५६

सरलं दळन, पीठ घातले वाण्याला

औंख जात्याच्या धन्याला

५७

सरलं दळण, सुप झाडूनी एकीकडे

माहेरीं सासरी राज्य़ मागते दुहीकडे

५८

सरलं दळण,सोन्याच्या हातानं

माझ्या भाग्यवानाच्या जात्यानं

५९

सरलं दळण, गीताच्या छंदामंदी

इठुदेव माझं ल्यालं अबीर गंधामंदी

६०

सरलं दळण, सुप झाडूनी उभं केल

चित्त बयाच्या गावा गेलं

६१

सरलं दळण, माझं उरलं शेर तीन

हात लाविला सईबाई गरतीनं

६२

सरलं दळण मी आणिक घेते घेते

माझ्या चंद्राला ओव्या गाते

६३

सरलं दळण, माझ्या मुखीची सरेना

नऊ लक्ष ओवी माझ्या गोताला पुरेना

६४

सरलं दळण, उरलं मूठपसा

हात जोडून नमस्कार परळीवरच्या रामदासा

६५

दळनाची पाटी अखंड जात्यावरी

अंबाबाईचं नवरात्र माझ्या घरी

६६

कांडप कांडीते अनारशाचं पीठ

दिवाळीच्या दिशी बंधुजी येती नीट

६७

कांडप कांडीते, सकाळच्या वेळी

करूं आज गूळपोळी

६८

कांडप कांडीते तांदूळ आंबेमोर

ज्येवनार ल्येक न्हानथोर

६९

कांडप कांडीते डाळ कांडते मुगाची

जोडी बैसली जेवाया, बापल्येक दोघाची

७०

कांडप कांडीते खीर करीते गव्हाची

जेवायाला जोडी येणार भावाची

७१

कांडप कांडीते कशाचा वास आला

लवंगा वेलदोडे मी ग कुटते मसाला

७२

दळपाकांडपाला न्हाई मी डगमगले

बया माझ्या मालनीच्या कुशीला जलमले

७३

दळपकांडापाला न्हाई कुनाला हार गेले

दूध वाघिनी तुझं प्याले

७४

दळपाकांडपानं, दुखती माझं दंड

बयाच्या जीवावर सुखवासी माझा पिंड