Get it on Google Play
Download on the App Store

भाग ३

पांडव जिवंत आहेत आणि ते आता द्रुपदाचे जावई झाले आहेत हे कळल्यावर भीष्मालाहि जाग आली. त्याने पांडवाना हस्तिनाअपुराला बोलावून घेतले आणि राज्याचा वाटा दिला. मात्र हस्तिनापुरात न राहता खांडववन जाळून नवीन राजधानी बनवण्यास सांगितले. हस्तिनापुरात धृतराष्ट्र व दुर्योधन यांचेच राज्य राहिले. भीष्म, द्रोण, विदुर हेहि हस्तिनापुरातच राहिले. पांडवानी कृष्णाच्या मदतीने खांडववन जाळून इंद्रप्रस्थ ही नवीन राजधानी वसवली. तेथे त्यांचा उत्कर्ष झाला. कालांतराने युधिष्ठिराने राजसूय यज्ञ योजिला. जरासंध वध केला आणि इतर राजांची संमति यज्ञाला मिळवली.यज्ञ पार पडल्यावर झालेल्या समारंभाला कौरव उपस्थित होते. भीष्महि होता. द्रोणाचा उल्लेख नाही पण तोहि असणारच. शिशुपालाने कृष्णाच्या अग्रपूजेला विरोध केला, भीष्माचाहि अद्वातद्वा बोलून अपमान केला. अखेर कृष्णाने त्याला मारले. द्रोणाने पांडवाना विरोध केला नाही पण त्यांच्या बाजूने काही केल्याचाहि उल्लेख नाही. त्याने पांडवांच्या वाढत्या बळाची नोंद घेतली असणारच.
दुर्योधनाला पांडवांचा उत्कर्ष सहन झाला नाही. शकुनीच्या सल्ल्याने त्याने द्यूताचा बेत आखला व बापाची संमति मिळवली. पुढील अनर्थ एकट्या विदुरालाच जाणवला. युधिष्ठिर व पांडव आल्यावर अखेरच्या क्षणी आपल्याला शकुनिबरोबर खेळायचे आहे हे त्याला कळले. युधिष्ठिर आणी शकुनी यांच्यात द्यूत झाले तर काय होईल हे उघड होते पण भीष्मानेहि ते थांबवण्याची आज्ञा दिली नाही. भीष्म स्वस्थ बसल्यावर द्रोणाने काही करण्याचा प्रष्नच नव्हता.
अपेक्षेप्रमाणे युधिष्ठिर अनेक पण लागोपाठ हरला. भावांना आणि स्वतःला पणाला लावून हरल्यावर द्रौपदीला पणाला लावणे, मग तिचा भयानक अपमान व छळ हे सर्व होत असताना भीष्मानेहि ‘तूं दासी झालीस कीं नाही हे मला सांगतां येत नाही’ असा विचित्र पवित्रा घेतला! द्रोणाने आपल्या एकेकाळच्या मित्राच्या मुलीवर ओढवलेल्या या प्रसंगीं काय केले? काही नाही! त्याला आनंद झाला असेल असे म्हणवत नाही.
अखेर धृतराष्ट्रानेच पुढील अनर्थ जाणून, पांडव व द्रौपदी याना सन्मानपूर्वक मुक्त करून, ‘झाले गेले विसरून जा’ असे म्हणून परत जाण्यास सांगितले. झालेल्या घोर अपमानांचा बदला घेण्याचा आज ना उद्या पांडव प्रयत्न करतीलच या धास्तीने दुर्योधन व कौरवाना घेरले. भीष्म आपली बाजू घेईल अशी त्याना खात्री नव्हती. त्यानी द्रोणाला साकडे घातले. त्याना चार कठोर शब्दहि न सुनवता द्रोणाने बेलाशक त्याना मदतीचे आश्वासन दिले असे महाभारत म्हणते! अविश्वसनीय पण खरे आहे!