Get it on Google Play
Download on the App Store

भाग १

कौरव पांडवांचे बालपण संपल्यावर त्यांच्या शिक्षणाचे काम कृपाचार्यांकडे होते. द्रोणाचार्य हे कृपाचार्याच्या बहिणीचे पति. द्रॉणाचार्य व पांचालांचा राजा द्रुपद हे एकाच गुरूपाशी शिकले व बाळपणी त्यांची अर्थातच मैत्री होती. द्रोण दरिद्री राहिला, द्रुपद राज्यावर आला. द्रोणाने दारिद्र्यावर उपाय म्हणून द्रुपदाची गाठ घेतली व मैत्रीची आठवण दिली पण द्रुपदाने ती झिडकारली व आता तुझीमाझी बरोबरी कशी होणार असे म्हणून अपमान केला. रागावून द्रोण निघाला व उत्तम शिष्य मिळवून त्याना शिकवून त्याच्याकडून द्रुपदाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने भटकत असतां हस्तिनापुरात आला. भीष्माने त्याची लायकी जाणून त्याला सन्मानाने ठेवून घेतले व कौरव-पांडवाना धनुर्विद्या शिकवण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले. त्यामुळे पांडव व द्रोण यांचे मूळ नाते गुरु-शिष्याचे.
द्रोण हा खरा धनुर्वेदाचा आचार्य. तो काही मल्लविद्येचा तज्ञ नव्हे. कौरव-पांडवाना व त्यांचेबरोबर आपला पुत्र अश्व्त्थामा यालाहि त्याने धनुर्विद्या शिकवली. सर्व शिष्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे ती आत्मसात केली. अर्जुन आणि अश्वत्थामा यांनी बरोबरीने उत्तम यश मिळविले. भीम, युधिष्ठिर, नकुल सहदेव एकादी पायरी खाली असले तरी नगण्य खासच नव्हते. दुर्योधन दुःशासन कदाचित आणखी एक पायरी खालीं असावे पण तेहि नगण्य नव्हतेच. द्रोण मल्लविद्या तज्ञ नव्हता. भीम, दुर्योधन, दुःशासन यानी आपल्या आवडीप्रमाणे ते ज्ञान इतरांकडून मिळवले.
कर्णाचा उल्लेख कोठेकोठे द्रोणशिष्य असा आढळतो. मला ते मान्य नाही. कर्ण कोरव-पांडवांपेक्षा ८-१० वर्षानी मोठा होता तव्हा द्रोण हस्तिनापुराला येण्यापूर्वीच तो बाहेर पडून प्रथम इतर कोणा गुरूपाशी व नंतर परशुरामापाशी शिकला असला पाहिजे. कर्णाने द्रोणाला गुरु म्हणून कधीच कोणताहि मान दिलेला दिसत नाही याचेहि कारण गुरुशिष्याचे नातेच नव्हते. कौरव-पांडवांचे शिक्षण संपल्यावर कौशल्यप्रदर्शनाचा कार्यक्रम झाला तेव्हा सर्व कार्यक्रम उरकल्यावर कर्ण उपटसुंभासारखा पुढे आला, त्याने अर्जुनाचे सर्व धनुर्विद्याप्रयोग स्वत;हि केले आणि मग त्याला, अचानक, द्वंद्वाचे आव्हानहि दिले. त्यावेळी ‘तूं कोण?’ असा प्रष्न कृपाचार्याना त्याला विचारावा लागला यावरूनहि तो आधीपासून हस्तिनापुरात द्रोणापाशी शिकत असणे शक्य नाही हेच दिसते.
शिक्षण संपल्यावर गुरुदक्षिणा म्हणून कौरव-पांडवानी द्रुपदाशी लढून त्याला पकडून आणावे असे द्रोणाने म्हटले. कां कोण जाणे पण कौरवानी प्रथम स्वतंत्रपणे द्रुपदाशी युद्ध केले पण द्रुपदाने त्याना दाद दिली नाही. मग पांडवानी द्रुपदाचा पराभव करून त्याला द्रोणासमोर उभे केले. द्रोणाने द्रुपदाचे अर्धे राज्य घेतले असे म्हटले आहे पण ते नावापुरतेच असावे, तेथे राज्य करण्यासाठी द्रोण वा अश्वत्थामा काही गेले नाहीत! अपमानाचा बदला घेतला एवढेच. या काळात पांडव साहजिकच द्रोणाच्या मर्जीतले झाले होते.
द्रुपदाच्या पराभवानंतर द्रोणाचे हस्तिनापुरातील कार्य संपले होते.पण भीष्माने काही त्याना निरोप दिला नाही व द्रोणहि हस्तिनापुर सोडून कोठे गेला नाही. त्याने शिष्याना शिकवण्याचे काम चालू ठेवले होते काय हे महाभारतात स्पष्ट केलेले नाही.