Get it on Google Play
Download on the App Store

किष्किंधा कांड - भाग ६

वानरसमाजाचे प्रमुख किष्किंधेत जमल्यावर, सुग्रीवाने त्याना दिशा वाटून देऊन सीतेचा तपास करण्यासाठी सर्वत्र पाठवले. सीतेला रावणाने नेले आहे हे खरेतर माहीत होते तरीहि सर्व दिशा धुंडाळण्याचे ठरले याचे कारण बहुधा असे कीं रावणाने सीतेला लंकेलाच नेले कीं इतर कोठे याबद्दल खात्री नव्हती. बहुधा खुद्द लंका कोठे आहे व तेथे कसे पोचायचे याचीहि खात्रीलायक माहिती वानरसमाजाला नसावी. राम-लक्ष्मणांना तर ती नव्हतीच. सर्वत्र शोध घेण्याची व्यवस्था केली तरी खुद्द सुग्रीवपुत्र अंगद व हनुमान यांच्या नेतृत्वाखालील समुदाय दक्षिण दिशेला पाठवला गेला तेव्हां लंका त्याच बाजूला कोठेतरी असावी असा तर्क झाला असावा. सर्व वानरप्रमुखांना एक महिन्याची मुदत दिलेली होती.
सुग्रीवाने वानरप्रमुखांना त्यांच्या वाट्याच्या दिशेला कोणता भूप्रदेश लागेल याचे सविस्तर वर्णन ऐकविले. ते वाच्यार्थाने घेतले तर काहीच अर्थबोध होत नाही. त्यामुळे ते काल्पनिक वाटते. रामायणकाळी सर्व भारतदेशाच्या भौगोलिक स्वरूपाचे यथार्थ ज्ञान असणे असंभवच म्हटले पाहिजे.
अंगद व हनुमान यांच्या पुढारीपणाखाली गेलेल्या वानरसमुदायाच्या खडतर प्रवासाचेहि सविस्तर वर्णन केलेले आहे तेहि लाक्षणिक अर्थानेच घ्यावे लागते.
महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व कष्ट सोसूनहि सीतेचा ठावठिकाणा न लागल्यामुळे अंगद व इतर वानर फार निराश झाले. आपण हात हलवीत परत गेलो तर सुग्रीवाचा कोप होईल या भीतीने अंगद व इतरानी असा विचार मनात आणला कीं आपण परत जाऊंच नये! त्यावर हनुमानाने समजावून सांगितले कीं ’तुम्ही परत गेलां नाही तरी सुग्रीवापासून तुम्ही कसे वांचाल? तुम्हाला शोधून काढून तो तुम्हाला कठोर शिक्षा केल्यावांचून राहणार नाही. तेव्हां धीर धरून प्रयत्न चालू ठेवलेच पाहिजेत.’
पुढील प्रवासामध्ये वानरगण एका मोठ्या गुहेत अडकले व मग त्या गुहेच्या स्वामिनीच्या कृपेनेच त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला असे वर्णन आहे. किष्किंधेपासून पूर्व किनार्‍यापर्यंत अशी कोणती पर्वताची ओळ व प्रचंड गुहा त्यांना आड आली असेल याचा काहीहि तर्क करतां येत नाही. त्यामुळे ही वर्णने ’काव्य’ म्हणून सोडून देणे भाग आहे. अखेर या वानरगणाची गाठ जटायूचा भाऊ संपाति याचेशी पडली व त्याचेकडून त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली कीं लंका समोर दिसणार्‍या समुद्रापलिकडे आहे व सीता लंकेतच आहे. संपाति हा गृध्र होता व त्याच्या दीर्घ व तीक्ष्ण दृष्टीमुळे त्याला हे सर्व प्रत्यक्ष दिसत होते असे रामायण म्हणते. हे सर्व लाक्षणिक अर्थानेच घेतले पाहिजे. या भागात समुद्रतीरावर असणार्‍या मानवसमाजाला लंकेत घडणार्‍या घटनांची काही माहिती असणे सयुक्तिक वाटते व संपाति त्यांच्या संपर्कात असावा असे मानता येईल.
वानर समाज समुद्रतीरावर पोंचला व आतां समुद्र ओलांडून कसे जाणार याची चर्चा सुरू झाली. सर्व प्रमुख वानरांनी आपले बळ (वय झाल्यामुळे) पुरे पडणार नाही असे म्हटल्यामुळे शेवटी अंगद कीं हनुमान एवढाच पर्याय उरला तेव्हां अंगद हा युवराज व समर्थ असला तरी वयाने व अनुभवाने लहान म्हणून हे काम हनुमानानेच अंगावर घेतले. सीतेच्या शोधासाठी निघताना हनुमानाने रामाकडून खुणेची अंगठी मागून घेतली होती, इतर दिशांना गेलेल्या समुदायपुढार्‍यांनी तसे केलेले नव्हते. तेव्हां दक्षिण हीच तपासाची महत्वाची दिशा आहे हे सर्वांनी ओळखलेले होते असे दिसते.
हनुमानाने समुद्र ओलांडण्यासाठी ’उड्डाण’ केले असे रामायण म्हणते. ते वाच्यार्थाने घेतले तर प्रष्नच उरत नाही. तर्क करावयाचा तर त्या काळी भारत व लंका याना जोडणारी एक उंचवट्यांची रांग समुद्रात आज आहे तशीच पण आजच्यापेक्षा जास्त वर असली पाहिजे व या छोट्यामोठ्या बेटांच्या रागेचा उपयोग करून, काही पोहून, काही उड्या मारून, धावून, चालून हनुमान लंकेला पोचला असला पाहिजे. मात्र ते सोपे खासच नव्हते. त्याकाळी होड्या होत्या काय? असणार कारण रामाने गंगा नदी गुहकाच्या नौकेवरूनच पार केली होती. मात्र गंगा वेगळी आणि समुद्र वेगळा! पण कठीण कां होईना पण समुद्र ओलांडण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे कारण खुद्द रावण व त्याचे सैन्य, भारतात ये-जा करतच होते! या प्रष्नाचा उलगडा होणे कठीण आहे तेव्हां तो वाचकांच्या कल्पनाशक्तीवरच सोडणे आवश्यक आहे.
किष्किंधाकांडाची येथे अखेर होते.