Get it on Google Play
Download on the App Store

अयोध्याकांड - भाग ९

आईचा धि:कार करून भरत बाहेर पडला तो कौसल्येला भेटला. तिने झाल्या गोष्टीबद्दल भरताला दोष दिला तो मात्र नाकारून ’मला काहीच माहीत नाही’ असे त्याने म्हटले. रात्र होईपर्यंत इतर कोणीच भरताला भेटले नाही. त्यामुळे तो आल्याचेहि कोणाला कळले नाही. दुसर्‍या दिवशी दशरथाच्या प्रेताचे दहन होऊन मग तेरा दिवस सर्व उत्तरक्रिया झाली. दूत केकय देशाला जाऊन मग भरत आला त्यांत १२-१३ दिवस गेले होते. त्यामुळे दशरथाच्या मृत्यूनंतर २४-२५ दिवसांनी भरताला राज्य स्वीकारण्याचा आग्रह सुरू झाला. त्याने ठाम नकार दिला. रामाला परत बोलावण्यासाठी स्वत:च त्याच्या भेटीला जाण्याचा बेत त्याने केला. भरत ससैन्य व कुटुंबीय व मंत्र्यांसह जाणार असल्यामुळे अयोध्येपासून गंगाकाठापर्यंत नवा रस्ता बनवला गेला! त्याचे खुलासेवार वर्णन केले आहे. त्यासाठी किती दिवस लागले ते सांगितलेले नाही. रामाने गंगा ओलांडली त्यानंतर सुमंत्र परत जाणे, दशरथनिधन, दूतप्रवास, भरतप्रवास, उत्तरक्रिया, प्रवास तयारी व भरताचा गंगाकाठापर्यंत प्रवास यांत एक महिन्याहून जास्त काळ गेला असे दिसते. गंगाकिनार्‍यावर भरतही गुहकालाच भेटला. त्याला प्रथम भरताच्या हेतूबद्दल शंकाच आली. पण भरताने त्याची खात्री पटवली. मग त्याने ५०० नौका जमवून सर्व लवाजम्यासकट भरताला गंगापार केले. भरत प्रयागात भारद्वाज आश्रमात जाऊन त्याना भेटला. त्यानाहि प्रथम भरताच्या ससैन्य वनात येण्याच्या हेतूबद्दल शंकाच वाटली. (एकटा लक्ष्मणच शंकेखोर नव्हे!) मात्र नंतर भरताच्या बोलण्यावरून खात्री पटून ’राम-लक्ष्मण-सीता चित्रकूटावर आहेत’ अशी माहिती त्यानी भरताला दिली. एक रात्र गंगातीरावर मुक्काम करून मग सर्वजण चित्रकूटाकडे निघाले. चित्रकूट यमुनेच्या दक्षिणेला असताना, भरताने यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. चित्रकूटाच्या उत्तरेला मंदाकिनी नदी असल्याचे वर्णन आहे. पण रामाने वा भरताने मंदाकिनी ओलांडल्याचा उल्लेख नाही. ही मंदाकिनी कोणती? हिमालयामध्ये अलकनंदा व मंदाकिनी या नद्या आहेत ती मंदाकिनी अर्थातच ही नव्हे. इतरत्र वाचावयास मिळाले व विकिमॅपियावर एक नकाशा पहावयास मिळाला त्यावरून मध्यप्रदेशात एक मंदाकिनी नावाची नदी आहे व ती अलाहाबादच्या वरच्या बाजूला काही अंतरावर यमुनेला मिळते. तिच्या आग्नेयेला चित्रकूट हे तीर्थक्षेत्र आहे व ते मंदाकिनीच्या किनारी आहे. त्यामुळे यमुना प्रयागपाशी ओलांडली तर चित्रकूटाच्या वाटेवर मंदाकिनी ओलांडावी लागणार नाही. रामायणात चित्रकूट प्रयागापासून दहा कोस दूर असल्याचे भरद्वाजानी रामाला म्हटले आहे. प्रत्यक्षात चित्रकूट प्रयागपासून १०० पेक्षा जास्त मैल, जबलपूर-अलाहाबाद रेल्वे मार्गापासून बांद्याकडे जाणार्‍या रेल्वेफाट्यावर कारवी नावाच्या स्टेशनच्या जवळ आहे. तेच रामाच्या वस्तीने पावन झालेले रामायणातील चित्रकूट असे मानले जाते. तेव्हां भरद्वाजाने रामाला सांगितलेले अंतर सपशेल चुकलेले होते असे म्हणावे लागते.
या चित्रकूटाबद्दल थोडी ऐतिहासिक माहिती सांगण्याचा मोह आवरत नाही. रघुनाथराव पेशव्याला बारभाईनी पदच्युत केले. त्याचा बाजीराव हा औरस पुत्र व अमृतराव हा आधीचा दत्तक पुत्र. सवाईमाधवरावाच्या मृत्यूनंतर यांतील कोणालाच पेशवाई मिळू नये यासाठी नाना फडणिसाने नाना प्रयत्न केले. तरी अखेर बाजीरावच पेशवा झाला. अमृतराव त्याचा कारभारी झाला व तो फार कर्तबगार आहे असे इंग्रजांचे मत होते. पण बेबनाव होऊन अखेर सालिना आठ लाखाची जहागीर देऊन त्याला इंग्रजानी वाराणसीला पाठवले. तेथेच त्याची अखेर झाली. त्याचा पुत्र विनायकराव जहागीर संभाळून होता. तो नंतर चित्रकूटाला गेला. त्याच्या संस्थानाला कारवी संस्थान म्हणत. १८५३ मध्ये तो वारला. १८५७ पर्यंत संस्थान चालले. बंडात सामील असल्याचा खोटा आळ घेऊन इंग्रजांनी संस्थान खालसा केले व कारवीची प्रचंड प्रमाणावर लूट केली