Get it on Google Play
Download on the App Store

अयोध्याकांड - भाग ८

अयोध्येहून निघालेले दूत ४-५ दिवसांत कैकय देशाच्या राजधानीला पोंचले. त्यांच्या प्रवासमार्गाचे विस्तृत वर्णन केलेले आहे. प्रथम मालिनी नदी व नंतर हस्तिनापुरापाशी गंगा ओलांडली, पांचाल व कुरुजांगल देश ओलांडला असे म्हटले आहे. यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. यानंतर इतरहि नद्या, इक्षुमती व विपाशा ओलांडल्याचे वर्णन आहे व मग ते राजधानीला पोचले तिचे नाव गिरिव्रज असे दिले आहे. महाभारतातहि एक गिरिव्रज आहे. ती जरासंधाची राजधानी होती. डोंगरांनी वेष्टिलेली म्हणून तिचे नाव गिरिव्रज. पण महाभारतातील गिरिव्रज म्हणजे पाटणा अशी माझी समजूत आहे. तें हें नव्हे. गंगा सोडून इतर नद्यांचीं जुनी नावे परिचित नसल्याने हे केकय देशातील गिरिव्रज कोठे होते त्याचा नीट उलगडा होत नाही.
दूतांना आज्ञा होती कीं भरताला दशरथ मृत्यु पावल्याचें कळूं द्यावयाचे नाहीं, लगेच अयोध्येला बोलावले आहे एवढेच सांगावयाचे. निरोप मिळाल्यावर पितामहांची परवानगी घेऊन भरत लगेच मंत्र्यांसह अयोध्येस निघाला. त्याचेबरोबर अनेक भेटी, संपत्ति व सैन्य असल्यामुळे त्याला प्रवासाला वेळ लागला. शत्रुघ्न व या दोघांच्या बायका बरोबर होत्या काय? खुलासा नाही. मुळात त्या केकय देशाला गेल्याचाच कोठे उल्लेख नाही पण कित्येक वर्षे भरत आणि शत्रुघ्न केकय देशालाच होते तेव्हां सुरवातीला ते दोघे गेले तेव्हां त्या कदाचित वयाने लहान असल्याने गेल्या नसल्या तरी पुढे केव्हां तरी गेल्याच असणार. एकूण रामायणात त्या नगण्यच आहेत. या परतीच्या प्रवासाचेहि विस्तृत वर्णन आहे. मात्र त्यावरूनहि कैकेय देश कोठे होता त्याचा उलगडा होत नाही. अनेक नद्या ओलांडून भरत यमुनेपाशी आला पण यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. नंतर तो गंगा व गोमती ओलांडून अयोध्येला आला. केकय देश यमुनेच्या पश्चिमेला, दक्षिणेला कीं गंगायमुनांच्या मधल्या अंतर्वेदीत हे कळत नाही, कारण यमुना दोन्ही वेळा ओलांडलेली नाही! तेव्हां यमुनेच्या पूर्वेलाच पण बराच उत्तर भागांत असावा एवढेच म्हणतां येईल. अयोध्येजवळ आल्यावर सर्वांना मागे ठेवून भरत एकटाच अयोध्येत शिरला. या प्रवासाला आठ दिवस लागले असे म्हटले आहे. भरत सरळ पित्याच्या भवनात गेला व तेथे पिता नसल्यामुळे कैकेयीमातेच्या भवनात शिरला.
दशरथाचा मृत्यु झाला व एकहि पुत्र जवळ नसल्यामुळे त्याची उत्तरक्रियाही झाली नव्हती आणि त्यामुळे भरताला तातडीने बोलावले होते. पण त्याच्या येण्याची खबर मंत्र्यांना वा वसिष्ठाला लगेच मिळण्याची कोणतीच व्यवस्था केलेली नव्हती असे दिसते. हे जरा चमत्कारिकच वाटते. कोणालाही भरत आल्याची बातमी कळण्याआधी तो सरळ कैकेयीलाच भेटला. राम-लक्ष्मण-सीता वनात गेल्याची व पिता दशरथ मृत्यु पावल्याची हकीगत भरताला मातेकडून कळली. कैकेयी-भरत संवादाबद्दल आपणाला माहीतच आहे.त्यामुळे लिहिण्याची गरज नाही. यावेळीहि, ’दशरथाने पूर्वीच केकयनरेशाला दिलेल्या वचनाप्रमाणे तुझाच राज्यावर हक्क होता व तोच मी मागितला’ असे कैकेयी भरताला म्हणत नाही. तिला त्या वचनाबद्दल माहितीच नसावी असे स्पष्ट दिसते.