Get it on Google Play
Download on the App Store

अभिमन्युवध - भाग ७

दिवस मावळला. सैन्ये शिबिरात परतलीं. त्यानंतर संशप्तकांकडून कॄष्ण व अर्जुन परत आले असे महाभारत म्हणते. पांडव शिबिरात सामसूम व शोक पाहून काय झाले ते अर्जुनाने विचारले व मग नाइलाजाने युधिष्ठिराने अभिमन्यु मारला गेल्याचे अर्जुनाला सांगितले. त्याने अर्जुनाला सांगितलेली हकिगत व आधीच्या लेखात दिलेली हकीगत यात किरकोळ विसंगति दिसते. युद्धाच्या सुरवातीला पांडववीरानी संयुक्तपणे द्रोणावर हल्ला केल्याचे व तो द्रोणाने परतवून लावल्याचे युधिष्ठिर सांगत नाही. तो म्हणाला, ’मला पकडण्याचा द्रोणाने शर्थीचा प्रयत्न केला आणि त्याचाच प्रतिकार आम्हाला जड पडत होता मग सैन्याचा मुख्य चक्रव्यूह कोण तोडणार हा प्रष्न होता. नाइलाजाने ते काम अभिमन्यूवर सोपवावे लागले कारण त्यालाच ते माहीत होते. त्याने व्यूह तोडल्यावर त्याच वाटेने त्याच्या पाठोपाठ जाऊन त्याचे रक्षण करण्याचे आमचे सर्व प्रयत्न जयद्रथामुळे विफल झाले आणि अभिमन्यु एकटाच व्यूहात सापडला. मग द्रोण, कृप, अश्व्त्थामा, कर्ण, बृहत्बल व कृतवर्मा यांनी त्याला घेरले आणि अखेर दु:शासनपुत्राकडून तो मारला गेला.’
अर्जुन संशप्तकांकडे अडकलेला असो वा माझ्या शंकेप्रमाणे शिबिरातच असो, पण एक दिवस तो नसताना त्याचा पुत्र मारला गेला. अर्जुनाने, जणू, जयद्रथाला या अनर्थाला जबाबदार धरून, ’उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर अग्निकाष्टे भक्षण करीन’ अशी घोर प्रतिज्ञा अचानक केली. प्रत्यक्षात अभिमन्यूला घेरणार्‍या सहाही वीरांना सोडून (त्यातील बृहत्बलाला अभिमन्यूनेच मारले होते.) जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने कां केली हे एक जरासे कूट आहे. आपले हरदास-पुराणिक म्हणत कीं अर्जुन आणि कृष्ण रणात अभिमन्युचा शोध घेत फिरत होते व मरणासन्न अभिमन्यूने त्याना सर्व हकीगत स्वत:च सांगितली. रणात पडलेल्या अभिमन्यूला जयद्रथाने लाथ मारली हे अभिमन्यूकडून ऐकून चिडून अर्जुनाने त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. महाभारतात असें काही मुळीच नाही. थोडा विचार केल्यावर अर्जुनाच्या प्रतिज्ञेचा मला असा खुलासा सुचतो कीं कौरववीरांनी अनेकांनी मिळून एकट्या पडलेल्या अभिमन्युचा वध केला तर आतां त्या सर्वांना अर्जुनाचे हे एक निर्वाणीचे आव्हान होते कीं ‘मी जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे, ती माझ्या एकट्याच्या बळावरच विसंबून. अभिमन्यु एकटाच होता त्याला तुम्ही सर्वानी मिळून मारलेत, आता तुमच्यात बळ असेल तर सर्वांनी मिळून जयद्रथाला एकट्या माझ्यापासून वांचवा!’ पुत्राच्या मृत्यूमुळे त्याला अनिवार शोक झाला असणारच तेव्हा आता एक तर कौरववीरांचा नक्षा उतरवणे किंवा स्वत: मरून जाणेच श्रेयस्कर असे त्याला वाटणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. दुसर्‍या दिवशी काय घडले याचा विस्तृत परामर्ष मी पूर्वीच जयद्रथवध प्रकरणात घेतला आहे. तो वाचकानी अवश्य पुन्हा नजरेखालून घालावा. अनेकांनी मिळून केलेला अभिमन्यूचा वध कौरवपक्षाला फार महाग पडला व दिवस अखेर पांडवपक्षाची अंतिम विजयाकडे वाटचाल सुरू झाली एवढेच म्हणून हा विषय पुरा करतों.