Get it on Google Play
Download on the App Store

अभिमन्युवध - भाग २

पहिल्या दिवशी अर्जुन त्रिगर्त सैन्याशी लढण्यात बराच काल व्यग्र राहिला. हे संशप्तक सैन्य हे एक जरासे धुसर प्रकरण आहे. युद्धाच्या पहिल्या दिवसापासून यांनी आव्हान दिले कीं अर्जुन त्यांच्याशी लढत बसे. अठरा अध्याय गीता ऐकून देखील अर्जुन पितामह भीष्म वा गुरु द्रोण यांच्याशी अटीतटीने लढण्यास कधीच उत्सुक नसे. तो आपला संशप्तकांशी लढत राही! अगदी पांडवांच्या इतर वीराना भीष्म वा द्रोण झेपेनासे झाले म्हणजे त्याला पुढे व्हावेच लागे. कृष्णही त्याला तसे करू देत होता असें दिसते. या द्रोणपर्वातीलप्रथम दिवशीही दिवस अखेर द्रोणाचा हल्ला परतवण्यासाठी अर्जुनाला संशप्तकांचा नाद सोडून देऊन द्रोणाशी सामना करावा लागला. मात्र द्रोणालाही युधिष्ठिराला पकडण्यात यश आले नाही. दुर्योधनाने नाराजी व्यक्त केल्यावर द्रोणाने पुन्हा निक्षून सांगितले कीं अर्जुन प्रतिकार करत असताना युधिष्ठिराला पकडणे मला जमणार नाही तेव्हां त्याला दिवसभर अडकवून ठेवा. मग पुन्हा त्रिगर्तराज सुशर्मा, त्याचे भाऊ व इतर त्रिगर्त वीरांनी हे आव्हान स्वीकारले व आम्ही पडेल ती किंमत देऊन उद्यां दिवसभर अर्जुनाला व्यग्र ठेवूं असे दुर्योधनाला आश्वासन दिले. त्याप्रमाणे युद्धाच्या बाराव्या दिवशी अर्जुन युधिष्ठिराच्या रक्षणाचे काम सत्यजित नावाच्या द्रुपदपुत्रावर सोपवून त्रिगर्तांशी लढायला गेला. वास्तविक, सत्यजित हा कोणी सात्यकी वा धृष्टद्युम्न यांच्यासारखा महावीर नव्हता. तेव्हां ही व्यवस्था पुरेशी नव्हती. पण याबद्दल युधिष्ठिर, इतर पांडव वा कृष्ण यांनी नाराजी व्यक्त केली नाही. बहुधा वेळ आलीच तर नेहेमीप्रमाणे आपण त्रिगर्ताना सोडून परत येऊं असे अर्जुनाला वाटले असावे. मात्र हा सर्व दिवस त्रिगर्तानी अर्जुनाला सोडले नाही. अर्जुनाने त्यांची अपरिमित हानि केली. अनेकाना मारले. या युद्धाचे रसभरित वर्णन व्यासानी केले आहे. मात्र इकडे बिचारा सत्यजित द्रोणापुढे काही न चालून अखेर मारला गेलाच. दिवसभर प्रयत्न करून द्रोणालाहि युधिष्ठिराला पकडता आले नाहीच कारण इतर पांडवपक्षाच्या वीरानी प्रखर प्रतिकार केला. दिवसाच्या उत्तरभागात कौरवपक्षाचा एक योद्धा भगद्त्त हा पांडवांना फार भारी पडूं लागला व कोणालाही आवरेना त्यामुले अखेरीस, द्रोण बाजूलाच राहून, अर्जुनाला भगदत्ताचाच प्रतिकार करण्यासाठी धाव घ्यावी लागली. अर्जुनाने भगदत्ताला मारेपर्यंत दिवस मावळला व दुर्योधन व द्रोण यांचा युधिष्ठिराला पकडण्याचा मुख्य बेत असफलच राहिला. दुर्योधनाने नाराजी व्यक्त केल्यावर द्रोणाने पुन्हा तेच कारण सांगितले कीं अर्जुन असताना जमणार नाही.