Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

द्यूत व अनुद्यूत

युधिष्टिर शकुनीशी द्यूत खेळला व पणांसाठी धन दुर्योधनाने दिले. ही विचित्र व्यवस्था युधिष्ठिराने फारशी तक्रार न करता स्वीकारली. काही करून त्याला द्यूत खेळायचेच होते! तो फार बेफामपणे खेळला. फार थोड्या वेळात तो सर्व वैभव गमावून बसला. याबद्दल बलरामाने त्याला दोषी ठरवले. नळराजा व त्याचा भाऊ पुष्कर यांचे द्यूत हे आणखी एक गाजलेले द्यूत. त्यांत सर्वस्व गमावण्यासाठी नळराजाला काही महिने लागले!कौरवांनी पांडवांचा व द्रौपदीचा नाना प्रकारे अपमान व छळ करून राजसूय यद्न्यापासून त्यांच्या मनात डाचत असलेले वैषम्य धुवून काढले! आपले पुत्र जिंकत असल्याचा आनंद उपभोगणाऱ्या धृतराष्ट्राने अखेर द्रौपदीला वर देऊन पांडवांना दास्यातून मुक्त करून द्यूताचा व्यावहारिक परिणाम सर्व पुसून टाकला. दुर्योधनाने त्याला हरकत घेतली नाही. धृतराष्ट्राच्या अंतिम आदेशाप्रमाणे पांडव व द्रौपदी इंद्रप्रस्थाला परत निघालीं. झालेल्या अपमानांचा बदला घेण्यासाठी पांडव लगेच पांचालांच्या व यादवांच्या मदतीने चालून येतील अशी भीति कौरवांना निर्माण झाली. मी तुमच्या बाजूने उभा राहीन असे स्पष्ट आश्वासन द्रोणाने दिले. तरीहि युद्ध टाळणेच श्रेयस्कर होते. त्यासाठी अनुद्यूताची कल्पना पुढे आली. धृतराष्ट्राने ती स्वीकारली व पांडवाना परतीच्या वाटेवरूनच परत बोलावले गेले.
पुन्हा द्यूताला बसताना ’आतातरी आपण जिंकू अशी मला आशा वाटली होती’ असे युधिष्टिर वनवासात नंतर द्रौपदीजवळ म्हणाला! युद्ध टळले तर युधिष्टिरालाहि हवे होते. त्याला कर्णाची धास्ती होती. भीष्मद्रोण आपलीच बाजू घेतील याची मुळीच खात्री नव्हती आणि केवळ भीम-अर्जुन यांच्या बळावर जिंकण्याची खात्री नव्हती. कौरवाना तयारीला, इतर राजे आपल्या बाजूला वळवण्याला वेळ हवा होता. अनुद्यूताच्या पणामुळे कोणताही पक्ष जिंकला तरी युद्ध तेरा वर्षे टळणार होते! पांडव जिंकले तर कौरवांपैकी कोणकोण वनात जाणार होते याचा खुलासा कोणी विचारलाच नाही. आपण हरू अशी शंकाही कौरवाना आली नाही. पांडव हरले तर मात्र त्यांचेबरोबर द्रौपदीनेहि वनात जावयाचे होते! कारण ती स्वस्थ बसली नसती, तिने पांचाल-यादवांच्या मदतीने कौरवांवर युद्ध लादले असते. अपेक्षेप्रमाणे युधिष्टिर हरला त्यामुळे हा प्रष्नच उद्भवला नाही. पांडव हरून वनात गेले तर परत आल्यावर त्याना राज्य परत द्यावयाचे नाहीच असा दुर्योधनाचा ठाम बेत होता व तो त्याने साथीदारांपाशी बोलूनहि दाखवला होता. (सभापर्व अ. ७४/श्लोक २१-२३).
एक महत्वाची गोष्ट म्हणजे द्यूत-अनुद्यूत कोणत्या तिथीला झाले याचा काहीहि उल्लेख महाभारतात नाही! महिनाहि दिलेला नाही. अनुद्यूतानंतर पांडव लगेचच वनात गेले. तेरा वर्षे त्याच तिथीला पुरी व्हावयाची असल्यामुळे तिथिचा उल्लेखच नाही ही नवलाची गोष्ट आहे. वनवासाची बारा व अद्न्यातवासाचे एक वर्ष सौरमानाने मोजावयाचे की चांद्रमानाने याची चर्चा झाली नाही. सर्व व्यवहार चांद्रमानाने चालत असल्यामुळे हा विषय निघाला नसणार! सौरमानाने वर्षे कशी मोजावयाची याचा खुलासा अर्थातच कोणी विचारला नाही वा कोणी केला नाही! महाभारतात इतरत्र तिथि, वार, महिना, नक्षत्र यांचे विपुल उल्लेख पाहता या महत्वाच्या घटनेची तिथि कां सांगितलेली नाही हे एक कोडेच म्हटले पाहिजे!