Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

दंडस्थितीतील (उभ्या स्थितीतील) आसने

वृक्षासन

दंडस्थिती. प्रथम श्वास सोडणे. नंतर हळूहळू श्वास घेणे, दोन्ही बाजूंना हात वर नेऊन, नमस्कार करून, ताणून वर धरणे. स्वतः जणू अधिक उंच होण्याचा प्रयत्न करीत शरीर उभे ताणणे. टाचाही वर उचलणे. नंतर श्वसन संथ ठेवणे. आसन तोलात्मक. स्नायूवरील ताण कमी करण्याकरता उपयुक्त. साधारणतः सर्व आसनांच्या शेवटी करावे. या आसनात बहुतेक सर्व स्नायू एकाच उर्ध्वदिशेने प्रसरण पावतात.

वीरासन

दंडस्थिती. डावा पाय पुढे टाकून पाऊल जास्तीत जास्त पुढे न्यावे. नमस्काराप्रमाणे जोडलेले दोन्ही हात पुढून जास्तीत जास्त वर न्यावे. मान, पाठ मागे वाकवावी. उजवा पाय गुडघ्यात-मांडीत ताठ ठेवावा. डावा गुडघा पुढे काटकोनात यावा. हे आसन पाय बदलून दोन्ही अंगांनी करावे. पाय, कमर, पाठ उलट दिशेने वाकल्याने मलशुद्धी व रक्तपुरवठ्यास मदत होते. पोटातील स्नायूंवर ताण पडल्याने मेद कमी होण्यास मदत होते.

तिकोणासन

दंडस्थिती. डाव्या बाजूला डावा पाय जास्तीत जास्त नेऊन त्या पायाचा चवडा त्याच दिशेकडे तोंड करून ठेवावा. श्वास सोडावा. डावा गुडघा वाकवून व डावीकडे झुकून डावा हात जमिनीला लावावा. उजवा पाय ताठ ठेवावा. उजवीकडून उजवा हात उजव्या कानाला टेकून सरळ रेषेत वर वर ताणावा. हीच सर्व कृती नंतर उजवा पाय वाकवून करावी. शरीरभार वाकलेल्या पायाच्या पोटरीवर व मांडीवर आणि टेकलेल्या हातावर येतो व त्यांची कार्यक्षमता वाढते.

शीर्षासन

यांखेरीज शीर्षासन हेही योगासनांतील एक प्रमुख आसन आहे. प्रथम पुढे वाकून गुडघे जमिनीवर टेकवावे आणि दोन्ही हातांचे पंजे एकमेकांत जुळूवन हात कोपरापासून जमिनीवर ठेवलेल्या वस्त्रावर टेकावे. त्यानंतर मस्तकाच्या टाळूचा पुढचा भाग, एका मऊ फडक्याच्या घडीवर हाताच्या पंज्यांना लागून ठेवावा. त्यावेळी मनगटे डोक्याच्या दोन्ही बाजूंना येतील अशी ठेवावी. नंतर गुडघे वर उचलून हळूहळू छातीजवळ आणावे. हात आणि डोके यांच्या आधारावर पाय जमिनीपासून वर उचलावे व गुडघ्यांजवळ वाकवून मांड्यांजवळ आणावे. ही प्रथमावस्था. पाठ ताठ करून शरीराचा भार हाताच्या कोपरांवर घ्यावा. यानंतर दोन्ही पाय उचलून वर करावे व मांड्या सरळरेषेत एकमेकींजवळ स्थिर ठेवाव्यात. गुडघे सरळ न करता पाय मागे घ्यावे, ही दुसरी अवस्था. नंतर दोन्ही पाय सरळरेषेत वर ताणून ठेवावे. डोके, छाती, कमर, गुडघे, पायाचे अंगठे हे एका समरेषेत यावेत. श्वासोच्छ्वास नाकानेच संथ करावा. शरीर स्थिर राहील असे पहावे. या सर्व अवस्था क्रमाक्रमाने व आस्ते आस्ते अत्यंत सावकाश साध्य कराव्यात. हे आसन डोळ्यांचे आरोग्य, रक्तशुद्धी, उत्साह व शांत निद्रा यांसाठी करावे.

आज भारतात व जगभरही योगाभ्यासाचे शास्त्रीय स्वरूप जाणण्याचे प्रयत्न चालू आहेत. स्वामी ⇨कुवलयानंद यांनी १९२४ मध्ये लोणावळे येथे ⇨कैवल्यधाम ही संस्था स्थापन करून त्यायोगे योगविद्येच्या शास्त्रोक्त शिक्षणास चालना दिली. आसनांची संख्या ८४ पासून ते तीनशे–चारशे पर्यंत सांगितली जाते. पण ती काही मूळ व प्रमुख आसनांचीच विविध उपांगे होत.