Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

राष्ट्रीय धर्म 3

ख्रिस्ती धर्म विज्ञानाला पचवू शकला नाही. विज्ञानाची गोळी गिळणे ख्रिस्ती धर्माला जड गेले. हिंदुधर्माला तरी अर्वाचीन संस्कृती पचवून टाकण्याची शक्ती आहे का ? होय, आहे. कारण हिंदुधर्मातील शेकडो आचार व रूढी, नाना प्रकारच्या चाली व समजुती यांच्या पाठीमागे आकाशात जाऊन पोचणार्‍या अशा अद्वैताच्या भिंती आहेत. त्या अद्वैतास कोणतीही पध्दती, कोणतेही तत्त्व प्रयोगासाठी घेण्यास कधी हरकत वाटत नाही. अद्वैत तत्त्वज्ञान सर्वांना कवटाळणारे आहे.

घालुनि अकलेचा पवाड । व्हावे ब्रह्मांडाहुनी वाड ।
तेथे कैचे आणिले द्वाड । करटेपण ।

असे अद्वैत सांगत आहे. हिंदुस्थानातील अनेक मतमतांतरांमधून, अनेक वेदांतिक मतांमधून शंकराचार्यांचे अद्वैत हिमालयाच्या शेकडो लहानमोठ्या शिखरांतून वर चमकणार्‍या गौरीशंकराप्रमाणे तळपत आहे व शोभत आहे.लौकरच थोड्या संकुचित ध्येयाला आपणास वाहून घ्यावयाचे आहे. विश्वाला क्षणभर दूर ठेवून भारतमातेची पूजा करावयास शिकावयाचे आहे. लहानातून मोठ्याकडे जावयाचे, हा तर मूर्तिपूजेचा धडा. तो आपण शिकू या. हिंदुधर्माला सद्य:स्थितीत भारतमातेची पूजा हेच नाव देऊ या. हिंदुधर्मभारतसेवा. जुन्या-पुराण्या गोष्टींची पूजा करण्याऐवजी सामुदायिक जीवनाची पूजा आरंभावयाची; धार्मिक व्रतेवैकल्ये व नाना पूजाप्रचार यांच्याऐवजी ज्ञान, सहकार्य, संघटना यांच्यासाठी चिलखत चढवून कंबर कसावयाची. नवीन काळाला नवीन व्रत, नवीन दीक्षा. जीवनाला व्रत तर पाहिजेच. परंतु पूर्वीचीच व्रते पाहिजेत असे नाही. आपण नवीन व्रते व नवीन ध्येये पुजू लागलो म्हणून हिंदुधर्माचा पाया तर पोखरला जाणार नाही ना ?  छे: ! मुळीच नाही. कारण हजारो वर्षांपूर्वी ऋषी सांगून गेले आहेत की, एकं सत्र् । विप्रा बहुधा वदन्ति ।

एकाच परब्रह्माची सारी रूपे. एकाच सतत्त्वाला आपण निरनिराळी नावे देतो.

संध्याकाळी देवदर्शनास जाऊन घंटा वाजविण्याऐवजी एखादा मजुरांसाठी वर्ग चालविला तर ?  यज्ञकुंडे, स्थंडिले, अग्निहोत्रशाळा व होमशाळा बांधण्याऐवजी भारतमातेचे बंदे सेवक झालो तर ? देवाला पंचमहानैवेद्य व नानाभोग अर्पण करण्याऐवजी, दीनांच्या पोटातील जो प्रखर अग्नी त्यात आहुती टाकून तो शांत केला तर ? ‘सर्व खलु इदं ब्रह्म’ हे जर सत्य असेल तर हे सारे मार्ग त्या सत्यसागराकडेच जाणार असणार. देवाला फुले ओतण्याइतकेच श्रमाचे कपाळावरून निथळणारे ते निढळाचे पाणी पूज्य व पवित्र आहे. प्रामाणिक श्रम ही थोर प्रार्थना आहे. उपवासापेक्षा अध्ययन, नवीन ज्ञानार्थ धडधड यांना अधिक महत्त्व व किंमत आहे. अन्योन्यसेवा, सहकार्य व बंधुभाव यांहून थोर दुसरी पूजाच नाही. कोणत्याही समाजोपयोगी कर्मात तल्लीन होणे हे साधन व दिव्य एकत्वाचे- दिव्य अद्वैताचे दर्शन हे साध्य. कोणत्याही साधनाने जा .... काही बिघडत नाही. तद्रूप व्हा व त्याला पाहा. स्वत:ला विसर पाडणारे कोणतेही कर्म कराल, तर भवसागर तराल व परब्रह्माला पाहाल.

राष्ट्रीय हिंदुधर्म

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
धर्म 1
धर्म 2
धर्म 3
हिंदुधर्माची श्रेष्ठता 1
हिंदुधर्माची श्रेष्ठता 2
हिंदुधर्माची श्रेष्ठता 3
हिंदुधर्म व संघटना 1
हिंदुधर्म व संघटना 2
हिंदुधर्म व संघटना 3
त्यागवृत्ती 1
त्यागवृत्ती 2
त्यागवृत्ती 3
त्यागवृत्ती 4
माणसांप्रमाणे वागा 1
माणसांप्रमाणे वागा 2
तळमळ 1
तळमळ 2
* सामर्थ्य 1
* सामर्थ्य 2
खरी महत्वकांक्षा 1
खरी महत्वकांक्षा 2
खरी महत्वकांक्षा 3
खरी महत्वकांक्षा 4
चारित्र्य 1
चारित्र्य 2
विवेक 1
विवेक 2
पात्रता 1
पात्रता 2
पात्रता 3
आत्म-प्रौढी 1
आत्म-प्रौढी 2
आत्म-प्रौढी 3
अनुभव 1
अनुभव 2
कर्मद्वारा साक्षात्कार 1
कर्मद्वारा साक्षात्कार 2
श्रध्देचे सामर्थ्य 1
श्रध्देचे सामर्थ्य 2
कमळ व भ्रमर 1
कमळ व भ्रमर 2
कमळ व भ्रमर 3
कमळ व भ्रमर 4
विचारांचा विकास 1
विचारांचा विकास 2
राष्ट्रीय धर्म 1
राष्ट्रीय धर्म 2
राष्ट्रीय धर्म 3
राष्ट्रीय धर्म 4
जबाबदारी 1
जबाबदारी 2
जबाबदारी 3
जबाबदारी 4
जबाबदारी 5
जबाबदारी 6
ध्येय 1
ध्येय 2
ध्येय 3
ध्येय 4
मृत्यूवर विजय 1
मृत्यूवर विजय 2
मृत्यूवर विजय 3
भूत व भविष्य 1
भूत व भविष्य 2
प्रपंच व परमार्थ 1
प्रपंच व परमार्थ 2
प्रपंच व परमार्थ 3