Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

* सामर्थ्य 2

आपल्या गोष्टींतील जो सर्प आहे, त्याने प्रथम अनेक वर्षे तपश्चर्या केली; त्या काळात तो आपली शक्ती वाढवीत होता. त्यावेळेस दुसर्‍या गोष्टीकडे त्याचे लक्ष नव्हते. शक्तीची एकान्तिका उपासना करून आधी त्याने ती आपलीशी केली. शक्ती मिळविल्यानंतर ती कह्यात ठेवावयास लागणारी दुसरी खरी शक्ती-तीही त्याने जीवनात दाखविली. प्रत्येक माणसाने या नागाप्रमाणे व्हावे. आधी शक्ती मिळवावी व ती कह्यांतही राखावी. “नायमात्मा बलहीनेन लभ्य: । बलमुपास्व” असे आपले तत्त्वज्ञान आहे. आपले तत्तवज्ञान भ्याडाचे व दुबळ्यांचे नाही; ते शूरांचे व वीरांचे आहे. आपले वर्तन असे प्रखर व तेजस्वी पाहिजे की आपल्या देखत अशुचि व अमंगळ असे काही करावयास कोणाची छाती होता कामा नये. नागाच्या सामर्थ्याची चुणूक कुणाला कळायलाच हवी असेल, तर नाग दंशही करील. लौकर शहाणे न व्हाल तर दंशाने शहाणपण शिकवावे लागेल. परंतु मारलेला डंख, केलेला प्रहार, घातलेला घाव- यात सूडबुध्दी असू नये. ही सावधगिरीची सूचना असावी. ज्या मानाने स्वसामर्थ्याची जाणीव, त्या मानाने फणा वर उचलणे. अत्यंत सामर्थ्यवान् व्यक्ती अत्यंत शांत राहते. पावसाची मुसळधार पडत असली तरी पर्वत कापत नाही, खचत नाही. तो शांतपणे उभा राहतो. ज्याच्याजवळ पुष्कळ बळ, तो अधिक काळपर्यंत सहन करतो. परंतु त्याच्या सहनशक्तीलाही सीमा असते. दोरी फार ताणली की तुटावयाची. श्रीकृष्णाने शिशुपालाचे सहस्त्र अपराध माफ केले. परंतु सहस्त्र अपराध होताच त्याचे डोके त्याने उडविले. ऋषी सहन करतो. परंतु एकदा का संतापला म्हणजे  “शापेनाsपि शरेणाsपि” भस्म करावयास उभा राहतो.

मुलाला शिक्षा करण्याच्या बाबतीत वर सांगितलेले सर्व काही दिसून येते. मुलाला ताडन करण्यात आईबापांच्या मनात सूडबुध्दी नसते; त्या मारण्याच्या कृत्यात त्यांची आसक्ती नसते, त्यात आत्मा नसतो; अलिप्त व अनासक्त राहून केलेली जी शिक्षा, साक्षी म्हणून राहून केलेले जे शासन त्याचाच तो परिणाम होतो. रागारागाने, दातओठ खाऊन केलेली शिक्षा अपराध्यांच्या मनात तिरस्कार उत्पन्न करते. ध्येयाचा उपमर्द झाल्याची ज्याला जाणीव आहे, ध्येयच्युती झाल्यामुळे ज्याच्या हृदयाला वेदना होत आहेत, अशा माणसाकडून ध्येयच्युती करणार्‍याला जे शासन केले जाते, ते शासन त्या अपराध्याला दुखविते व रडविते, परंतु त्याचबरोबर सुधारतेही.

शक्तीच्या पाठीमागच्या विचारांची ज्याला नीट कल्पना आहे, तोच शक्ती चांगल्या रीतीने वापरू शकेल. शक्ती ही जगाला सांभाळण्यासाठी आहे, ध्येयाचे रक्षण करण्यासाठी आहे. चंदनाच्या वृक्षाला सर्प विळखा घालून बसतो व तोडावयास येणार्‍यावर फुत्कार करतो. त्याप्रमाणे आपल्या राष्ट्राची जी ध्येये- त्या ध्येयांभोवती आपली शक्तिसर्पिणी वेढे घालून जागरूक अशी राहिली पाहिजे. शक्तीचा उपयोग शक्तीला लगाम घालून करावयाचा असतो. शक्तीबरोबर आपण वाहून जावयाचे नाही. अग्नीने लोखंड लाल होते, परंतु लोण्याप्रमाणे लगेच वितळून जात नाही. आपण भावनावश होऊन शक्तीबरोबर वितळून जाता कामा नये. हुशार सारथ्याने कह्यात ठेवलेल्या घोड्याप्रमाणे आपली शक्ती असली पाहिजे. घोड्याला लगाम घालता येतो, म्हणून घोड्याची किंमत आहे. संयम हेच खरे सामर्थ्य. सामर्थ्याला ताब्यात ठेवण्यातच खरे बळ आहे; हीच खरी प्रभुता. ज्याला धैर्य नाही, ज्याच्याजवळ शौर्य नाही, त्याला कोणी मान देत नाही; त्याप्रमाणेच संयमहीन रेड्याच्या शक्तीलाही कोणी मान देत नाही. ज्याच्या कृत्यांवर विचाराचा ताबा नाही, ज्याची कृत्ये विकाराच्या ताब्यात गेलेली आहेत, अशाला मान मिळत नाही.

परंतु सामर्थ्य असेल तर संयम. आधी बळ मिळवा व मग ते बळ संयमित करा. आपला धर्म हा बलवंतांचा, संयमी बलवंतांचा आहे. शक्तीची उपासना करा, परंतु ती शक्ती शिवाच्या आज्ञेत राहणारी हवी. शक्तियुक्त शिव व शिवयुक्त शक्ती हे आपले राष्ट्रीय ध्येय आहे. जेथे संयमशील शक्ती आहे, तेथे मंगल असा शिव नांदणारच. आमच्या मते माणसाचे पहिले कर्तव्य शक्तिशाली होणे हे आहे. आपण केवळ जवळ असल्यानेच दीन व अनाथांस सुरक्षितता वाटेल, आपण केवळ जवळ आहोत एवढ्यानेच दुबळ्यांच्या वाटेस कोणी जाणार नाही- असे बलशाली व प्रभावशाली जीवन आपले झाले पाहिजे. आपला असा दरारा सर्वत्र बसला पाहिजे. असे जीवन ज्याला साधले, असे जीवन ज्याला मिळाले, तोच खरा जगला. त्याने मनुष्यजन्मात येऊन पुष्कळच मिळविले यात शंका नाही.

राष्ट्रीय हिंदुधर्म

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
धर्म 1
धर्म 2
धर्म 3
हिंदुधर्माची श्रेष्ठता 1
हिंदुधर्माची श्रेष्ठता 2
हिंदुधर्माची श्रेष्ठता 3
हिंदुधर्म व संघटना 1
हिंदुधर्म व संघटना 2
हिंदुधर्म व संघटना 3
त्यागवृत्ती 1
त्यागवृत्ती 2
त्यागवृत्ती 3
त्यागवृत्ती 4
माणसांप्रमाणे वागा 1
माणसांप्रमाणे वागा 2
तळमळ 1
तळमळ 2
* सामर्थ्य 1
* सामर्थ्य 2
खरी महत्वकांक्षा 1
खरी महत्वकांक्षा 2
खरी महत्वकांक्षा 3
खरी महत्वकांक्षा 4
चारित्र्य 1
चारित्र्य 2
विवेक 1
विवेक 2
पात्रता 1
पात्रता 2
पात्रता 3
आत्म-प्रौढी 1
आत्म-प्रौढी 2
आत्म-प्रौढी 3
अनुभव 1
अनुभव 2
कर्मद्वारा साक्षात्कार 1
कर्मद्वारा साक्षात्कार 2
श्रध्देचे सामर्थ्य 1
श्रध्देचे सामर्थ्य 2
कमळ व भ्रमर 1
कमळ व भ्रमर 2
कमळ व भ्रमर 3
कमळ व भ्रमर 4
विचारांचा विकास 1
विचारांचा विकास 2
राष्ट्रीय धर्म 1
राष्ट्रीय धर्म 2
राष्ट्रीय धर्म 3
राष्ट्रीय धर्म 4
जबाबदारी 1
जबाबदारी 2
जबाबदारी 3
जबाबदारी 4
जबाबदारी 5
जबाबदारी 6
ध्येय 1
ध्येय 2
ध्येय 3
ध्येय 4
मृत्यूवर विजय 1
मृत्यूवर विजय 2
मृत्यूवर विजय 3
भूत व भविष्य 1
भूत व भविष्य 2
प्रपंच व परमार्थ 1
प्रपंच व परमार्थ 2
प्रपंच व परमार्थ 3