Get it on Google Play
Download on the App Store

जन्म -बालपण 3

मुलानें निरुद्योगी बसण्यापेक्षां कांही तरी त्यानें करावें असें जोशिया यांस सदोदित वाटे. तो म्हणे ''The devil tempts all other men, but idle man tempt the devil - ''(सैतान सर्वास मोह पाडतो, परंतु आळशी लोक सैतानास मोहवितात, आपल्याकडे ओडून घेतात). बेंजामिन यास तर बापाचें काम आवडत नसे. तो मनांत रडत बसे व मोठया कष्टानें, मिनतवारीनें तें काम करीत होता. तरी पण तसेच दिवस चालले होते.

या वेळेस बेंजामिनच्या हातून एक विशेष गोष्ट घडली. बेंजामिन व त्याचे मित्र एक पाणथळ ठिकाणी गेलें. ते तेथें मासे पकडण्यासाठीं गेले हाते. चिखलांतून त्यांस पुढें जावें लागें. ''या चिखलांत जर पुष्कळसें दगड आणून टाकिले व बांधासारखें केले तर काय मजा होईल! ''असें बेंजामिन आपल्या सोबत्यांस म्हणाला. बेंजामिनची कल्पना सर्वास आवडली. परंतु ते म्हणाले ''दगड कोठून आणावयाचे? ''बेंजामिन हा नीट निरीक्षण वगैरे करणारा मुलगा होता. या पाणथळाशेजारी एक गृहस्थ बंगला बांधणार होता. तेथें दगडाचा ढीग पडला होता. गुप्तपणें तेथें जाऊन सर्व दगड तेथें आपण आणून टाकूं असें बेंजामिननें सुचविलें, ''दुस-यांचें दगड घेणें हें चांगलें नाहीं ''असें कांहीजण म्हणाले. बेंजामिन म्हणाला ''दगड घेणें ही कांहीं चोरी नाहीं. जगांत दगड तर वाटेल तितके असतात.''शेवटीं तसें करण्याचें ठरलें. तीं सर्व मुलें रात्र पडण्याच्या जरा आधीं तेथें आली व एकमेकांच्या मदतीनें हें काम त्यांनीं केलें आणि चिखलांत दगडांचा धक्का बांधून झाला.

दुस-या दिवशीं सायंकाळीं बेंजामिन आपल्या बापास बायबल वाचून दाखतीत होता. मध्येंच बापानें विचारलें 'बेन, काल सायंकाळीं तूं कोठें होतास? ' एखादी सुरी भोंसकल्याप्रमाणें बेंजामिन यास झालें.''आम्हीं त्या तळयाकाठीं गेलों होतों. ''तो म्हणाला. ''कशासाठीं ? ''आणि तेथें जाऊन काय काय केलेंस ? ''बापानें विचारलें. ''आम्ही मासे पकडण्यासाठीं गेलो होतों; आम्ही दगडांचा एक बांध घातला ''बेंजामिननें उत्तर दिलें. ''ते दगड कोठून आणलेत ? ''बापाचा सरळ प्रश्र आला. बेंजामिन म्हणाला ''शेजारच्याराशीमधून. '' ''ही चोरी नव्हे का ? ''बापानें विचारिलें, बेंजामिन धीर धरून म्हणाला ''दगड चोरणें ही मला कांहीं चोरी वाटत नाहीं. ''''तर मग गुप्तपणें दगड टाकण्यासाठीं कां गेला ? वाईट गोष्ट मनुष्य गुप्तपणें करू इच्छितो ''या बापाच्या प्रश्नावर बेंजामिन यास उत्तर देतां आलें नाहीं. तो विरमला व ओशाळला. थोडया वेळानें तो पित्यास म्हणाला ''बाबा, अत:पर मी कधीं अशी गोष्ट करणार नाहीं. जोशियाने बेनला क्षमा केली.

बेंजामिन फ्रँकलिन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
प्रस्तावना 1 थोडा पूर्व इतिहास 1 जन्म -बालपण 1 जन्म -बालपण 2 जन्म -बालपण 3 आरंभीचे उद्योग 1 आरंभीचे उद्योग 2 आरंभीचे उद्योग 3 आरंभीचे उद्योग 4 फिलाडेल्फिया येथील हकीगत 1 फिलाडेल्फिया येथील हकीगत 2 फिलाडेल्फिया येथील हकीगत 3 फिलाडेल्फिया येथील हकीगत 4 इंग्लंडला प्रयाण 1 इंग्लंडला प्रयाण 2 स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 1 स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 2 स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 3 प्रयत्नांत यश:सिद्धि 1 प्रयत्नांत यश:सिद्धि 2 सार्वजनिक कामगिरी 1 सार्वजनिक कामगिरी 2 शास्त्रीय कामगिरी 1 शास्त्रीय कामगिरी 2 राजकीय कामगिरी 1 राजकीय कामगिरी 2 * अंत व उपसंहार 1 * अंत व उपसंहार 2