आमचे निशाण
चढवू गगनि निशाण आमुचे
चढवू गगनि निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान ॥धृ०॥
निशाण आमुचे मनःक्रांतिचे
समतेचे अन् विश्वशांतिचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुख-तेज महान् ॥१॥
मूठ न सोडू जरि तुटला कर
गाऊ फासही आवळला जर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरि शिर्काण ॥२॥
साहू शस्त्रास्त्रांचा पाउस
आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगून पाषाण ॥३॥
विराटशक्ती आम्ही वामन
वाण आमुचे दलितोद्धारण
नमवू बळिचा किरीट उद्धट ठेवुनि पादत्राण ॥४॥
हिमालयासम अमुचा नेता
अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्यांच्या मृत्युंजय हे चढवू वरति निशाण ॥५॥