नाथा कामत (व्यक्ती आणि वल्ली)
अविवाहीत तरूणींच्या बापांविषयी बोलताना नाथा कामताच्या जिभेवर साक्षात सरस्वती केस मोकळे सोडून, शंकराकडून रुंडमाळा उसन्या आणून गळ्यात घालून नाचते.
"त्या प्रधानांच्या निवडुंगात ही जाई फुलली आहे!" `भांगेत तुळस' ह्या मराठी वाक्र्पचारला एक तेजस्वी भावंड बहाल करीत नाथा कामत म्हणाला. मागे एकदा सरोज केरकर नावाच्या हृद्यदुखीच्या घराण्याच्या संदर्भात "बोंबलांच्या काड्यांच्या जुगड्यात केवडा आला आहे." म्हणाला होता. तिच्या बापाचा उल्लेख हिपॉपॉटेमस याखेरीज केला नाही. "बरं मी काय सांगत होतो---"
"लांडगा!" मी.
"हं. तर लांडग्याची मुलगी शरयू प्रधान!" टायचे गाठ सैल भांगातून करंगळी फिरवीत नाथाने कथा पुढे चालवली. "मी वेलकम स्टोअर्समध्ये ब्लेड्स घेतल्या. शरयूंन घेतल्या डझनभर. वेलकम स्टोअर्सचा शितू सरमळकर ठाऊक आहेच तुला!"
"मालक ना?"
"हो." पुढल्या बशीतले एक भजे चटणीत चिरडून शितू सरमळकराला चिरडल्याच्या थाटात नाथा म्हणाला. "बैल साला! ब्लेड्स हा पुरूषोपयोगी पदार्थ सोडलास तर बाकी सर्व स्त्रियोपयोगी वस्तूंचा व्यापार करणारा हा एक पाजी इसम आहे हे पार्ल्यात तरी कोणाला सांगायला नको! त्याच्या दुकानात गुलाबाच्या ताटव्यासारखं बायकांचं गिऱ्हाईक फुललेलं असतं; पण हा कोरडा ठणठणीत आहे. नाकावर शेंदुर लावतो आणि कमरेखालचा देह साबणचुऱ्याची पिशवी भरल्यासारखा अर्ध्या विजारीत कोंबून बेंबीपर्यंत उघडी पैरण घालतो."
शितू सरमळकराचे हे वर्णन खरे आहे; पण त्याचा संदर्भ कळेना. नाथा तोंडाने थैमान घालीत होता.
"त्या शित्याच्या तोंडात देवानं बुटाची जीभ घातली आहे. चेहरा वीर बभ्रुवाहनासारखा!"
"तो मरू रे! शरयूचं काय झालं सांग."
"सांगतो." चटणीत भिजलेले भजे निरखून पाहत नाथा म्हणाला, "शरयूनं आपल्या छोट्याशा पर्समधून दहाची नोट दिली. आता दहा रुपये सुटे नाहीत हे वाक्य तू शितू सरमळकराच्या जागी असतात आणि तुझ्यापुढं शरयू प्रधानसारखी जाईची कळी पिना घेत उभी असती तर कसं म्हटलं असतंस?"
नाथा कामताशी बोलताना हा एक ताप असतो. अमक्या वेळी तू काय बोलला असतास? तमक्या वेळी तू कसे उत्तर दिले असतेस? मी कसे दिले असेल? ती काय बोलली असेल? ह्याविषयीचे माझे अंदाज तो माझ्या तोंडून वदवून घेतो.
"मी आपलं सरळ म्हटलं असतं : दहा रुपये सुटे नाहीत. पैसे काय पळून जाताहेत तुमचे? आणखी काय देऊ?"
"शाबास! म्हणूनच तू शितू सरमळकर नाहीस आणि तो गेंडा स्त्रियोपयोगी स्टोअर्स चालवतो. त्या राक्षसानं ती दहाची नोट शरयूच्या अंगावर फेकली आणि सर्दी झालेल्या रेड्यासारखा त्याचा तो आवाज--- तसल्या आवाजात
तिला म्हणाला: तीन दमडीच्या वस्तू घेता आणि धाच्या नोटी काय नाचवता? शितू सरमळकर हे वाक्य शरयू प्रधानला म्हणाला--आता बोल!"
मी काय बोलणार? मी आपला सर्दी झालेल्या रेड्याचा आवाज कसा असेल ह्याचे एक ध्वनिचित्र मनाशी ऎकण्याचा प्रयत्न करीत होतो.
"बोल! गप्प का? अशा वेळी तू काय केलं असतंस?" नाथा.
"त्या सरमळकराच्या काउंटरवर मूठ आपटून त्याच्या काउंटरची काच फोडली असती---"
हे वाक्य मी आपले नाथाला बरे वाटावे म्हणून म्हटले. एरवी शितूकाका सरमळकराविषयीचे माझे मत काही इतके वाईट नाही. त्याच्या दुकानात फुलणारा गुलाबांचा ताटवा मीदेखील पाहिला आहे. त्याला त्याचे निम्मे दुकान विस्कटायला लावून शेवटी पाच नया पैशांचीदेखील वस्तू न विकत घेता जाणारी ती गुलाबे त्याचे डोके कसे फिरवीत नाहीत ह्याचेच मला नवल आहे. तीन आण्यांच्या पिनांना दहाची नोट देण्यातली गैरसोय मला पटत होती. पण समोर नाथा फकिराच्या हातातल्या धुपासारखा उसासत होता. माझ्या मुठीने सरमळकराच्या काउंटर फोडण्याच्या कल्पनेने त्याला खूपच समाधान झाले.
"बाबा रे! देअर यु आर! मी माझं अंतःकरण उघडं करून तुला ह्या साऱ्या गोष्टी सांगतो ह्याचं हेच कारण! तुझं माझं जग निराळं असलं तरी तुझी माझी वेव्हलेंग्थ जमते."
"वेव्हलेंग्थ?"
"म्हणजे माझ्या ह्रुदयात लागणारं स्टेशन तुझ्याही ह्रदयात लागू शकतं."
नाथा आता उपमांच्या शोधार्थ रेडिओ-विभागात शिरला होता. लगेच उसळून म्हणाला, "तू काच फोडली असतीस. मी त्याचं तोंड फोडलं!"
"म्हणजे मारामारी? त्या गेंड्याच्या कातडीला मी हात लावीन? मी शरयूच्या देखत बोललो त्याला..शित्या, तोंड संभाळून बोल. कोणाला बोलतो आहेस तू?"
माझी एकशे एक टक्के खात्री आहे की, शितू सरमळकराला नाथा असे काहीही बोलला नाही. एक तर शितू हा रोजच्या जेवणात ऑइलऎवजी 'क्रूड ऑइल' खाणाऱ्यांपैकी! त्याने नाथाच्या टाळक्यात पाच किलोचे वजन मारले असते. पण नाथा हे वाक्य हॉटेलात मात्र एवढ्या जोरात म्हणाला की, पलीकडच्या टेबलावरची माणसे चमकून माझ्याकडे पाहू लागली. त्यांचा उगीचच मीच 'शित्या' आहे असा गैरसमज होऊ नये म्हणून मी चटकन म्हणालो,
"असं म्हणालास तू त्या शित्याला?"
मग ती माणसे पुन्हा निमूटपणे पुढले पदार्थ गिळू लागली.
-- नाथा कामत (व्यक्ती आणि वल्ली)