श्रीएकनाथमहाराजनमन-श्लोक
श्रीकृष्णदयार्णवरचित
श्रीएकनाथमहाराजनमन-श्लोक
श्रीमद्विठ्ठलभक्तिकारणकुळीं तो ’भानुदास’ स्वयें ।
ज्याचा आत्मज ’चक्रपाणि’ भजनें तारी जडां निश्चयें ॥
झाला त्यासि सुपुत्र ’सूर्य’ मन हें तत्पादकंजीं रमो ।
त्यापासूनि जगद्गुरु प्रगटला त्या ’एकनाथा’ नमो ॥
अधिष्ठान जें तें प्रतिष्ठान देखा । तिथें जन्मला तो गुणातीत एका ॥
तयाचेनि नामें चुके जन्मव्येथा । नमस्कार माजा गुरु एकनाथा ॥१॥
नदी दिव्य गोदातटीच्या निवासी । सदा प्रीय जो सज्जनां वैष्णवांसी ॥
जयां वर्णितां प्रेम आल्हाद चित्ता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥२॥
स्वयें भानु जो, भानु आराधियेला । तयाचे कुळीं दीपकू दिव्य झाला ॥
हरीभक्ति लावूनि तारी समस्तां । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥३॥
चरित्रें विचित्रें पवित्रें अपारें । मुढां पामरां तारिलें सूविचारें ॥
जयाचे कृपेनें समाधान चित्ता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥४॥
लिलाविग्रही सर्वही निर्मियेलें । जिवीं जीवना साधना योग्य केलें ॥
अनन्य युक्ति भक्ति जो मुक्तिदाता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥५॥
जयाची जगीं कीर्ति विस्तारलीसे । जयाचेनि नामें महादुःख नासे ।
जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥६॥
जेणें अर्चिलें द्वीजदेवांसि नेमें । जेणें तारिलें विश्व हें रामनामें ॥
सदा सेवि जो सद्गुरु मोक्षदाता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥७॥
जया नाम ना रुप ना गुण कांहीं । जया देह-वीदेहता भास नाहीं ॥
बहू तारिले हस्त ठेवूनि माथा । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥८॥
जगीं एकला सद्गुरु एकनाथु । असी बोलती सर्वही विश्व मातु ॥
जया ऊपमा हे नये एक देतां । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥९॥
कवी नायकू दायकू सौख्यराशी । महाज्ञानसिंधू असे नाम ज्यासी ॥
जयाची जगीं वर्णितां कीर्ति गातां । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥१०॥
अनंता गुणांचा नये वर्णितां हो । सदा दास तो श्मावर्णी पहा हो ॥
जयाचे मुखीं नाम रुचे समस्तां । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥११॥
महा संत साधू प्रतिष्ठानवासी । स्मरा एकनाथा पदीं मुक्तिराशी ॥
जयाचे गृहीं कृष्णजी कार्यकर्ता । नमस्कार माझा गुरु एकनाथा ॥१२॥
सद्भानुवंशीं कुलदीप-योगी । जनार्दनाचें निजसौख्य भोगी ॥
त्या एकनाथा स्मर एकभावें । होसी जगीं पावन तूं स्वभावें ॥१॥
श्रीएकनाथा घरिं आवडीनें । पाणी अणी श्रीहरि कावडीनें ॥
धोत्रें धुतो गंध उगाळुनीयां । पाणी अणी श्रीहरि गाळुनीयां ॥२॥
श्रीभानुदासा कुळिं एकनाथ । श्रीविष्णुमूर्ती उघडी कलींत ॥
दिसे जना मानव शुद्ध भोळा । वदे तुका विप्र अभंग लीला ॥३॥