Get it on Google Play
Download on the App Store

निर्दोश

''मॅडम, तुमच्या बाबतीत काय होतं सांगू का? तुम्ही, समोरचा माणूस जे बोलतो, त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवता आणि अपेक्षेप्रमाणे घडलं नाही की नर्व्हस होता, स्वत:ला त्रास करून घेता.'' माझी ऐकेकाळची विद्यार्थिनी आणि आजची सहकारी शिक्षिका पोटतिडकीनं बोलत होती.

नेहमीप्रमाणे माझी कोणाच्यातरी बाबतीत फसगत झाली होती नि त्यापायी भला मोठा भुर्दंड भरावा लागल्यानं मी स्वत:शीच चिडचिड करीत होते. खरंच! असं का होतं? आपण प्रत्येकावरच विश्वास ठेवतो? आयुष्यात इतका संघर्ष सोसल्यावर, जगाचे टक्केटोपणे खाऊनही आपल्यात सुधारणा का होत नाही? एखाद्या गोष्टीचं कारण नक्की माहीत असूनही त्याबाबत अनभिज्ञ असण्याचा आव तर नव्हे ना हा?

त्या आमच्यापैकी कुणाच्या 'भाभी' होत्या ते नक्की आठवत नाही. पण आम्ही सगळ्याजणी त्यांना 'भाभी' म्हणत असू. त्या होत्या मराठीच, पण माहेर ‍िबलासपूरचं असल्यानं बोलायच्या हिंदी. त्यांचं बोलणं गोड, मधाळ. शब्द आर्जवी. त्यांची 'ए सुन री...' म्हणत जवळीक साधायची लकब आम्हाला फार आवडायची.

ते दिवसच तसे होते. छोट्या छोट्‍या गोष्टी आवडण्याचे, कवितांमध्ये रमण्याचे, मोठेपणक्ष 'शास्त्रज्ञ' होण्याचं स्वप्न बघण्याचे, 'मेरे मेहबूब'सारख्या चित्रपटात धो-धो रडण्याचे. त्यावेळी गणेशोत्सवात अत्रे-वरेरकरांची नाटकं व्हायची, शरद मुठेंचा 'फेरीवाला' गाजायचा.

'गंगा-यमुना डोळ्यात उभ्या का? जा मुला जा एसेस्ला बसायला' त्यांच्या विडंबन गीतानं खुलण्याचे. बुलढाण्यासारख्या लहानशा गावी एकच सभागृह तिथेच सारे कार्यक्रम व्हायचे. 'सभागृहाबाहेरच्या विहिरीजवळच्या चिंचेच्या झाडावर रात्री-अपरात्री ‍पांढर्‍या कपड्यातल्या व्यक्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या नकला करतात, अशी माहिती शाळेत कुणीतरी आणल्यामुळे आम्ही त्या बाजूला न बघता सभागृहाबाहेर पडायचो.

तडक भाभींच्या घरी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी दप्तर तिथं ठेवलेली असायची. परतल्यावर भाभी कितीतरी वेळ आम्हाला कार्यक्रमाबद्दल विचारीत राहायच्या. त्या आमच्यापेक्षा फारशा मोठ्या नसाव्यात. लग्न होऊन खूप दिवस नव्हते झालेले. दोन-अडीच वर्ष झाली असावीत. पाळण्यातलं बाळ होतं त्यांच. तेही आमच्यासाठी आकर्षणाचा विषय होतं.

'भाभी इतक्या जवळ राहून कार्यक्रम बघायला का येत नाहीत,' हा विचारही कधी मनात आला नाही. लग्न, सासुरवास, सुनेला बाहेर जाण्याची बंदी वगैरे गोष्टींशी आमचा सुतराम संबंध नव्हता. एक दिवस शाळा लवकर सुटली तशी नेहमीप्रमाणे आम्ही भाभींकडे निघालो. त्या कधीच्या, क्रोशानं विणायची बाहुली शिकविणार होत्या.

आज अनायसे वेळ आहे, शिवाय दोन दिवसांपूर्वी त्यांचा भाऊपण आला होता. त्यानं भाभींसाठी 'पिहर'हून काय काय आणलंय् तेही बघायचं होतंच. घराचं फाटक उघडून, अंगण ओलांडून आम्ही दाराशी पोहोचलो अन् तिथंच थबकलो. छपरीचं दार लोटलेलं होतं, आतून मोठमोठ्यानं बोलण्याचे आवाज येत होते. आम्ही दबकन् दाराशी उभ्या राहिलो.

''मैं सच बोल रही हूँ मांजी, मैंने नहीं लिए पैसे. मुझपर विश्वास किजिए.'' भाभी कळवळून सांगत होत्या.
''कसल सच नि काय? मग इथे रेशनसाठी काढून ठेवलेले वीस रुपये कुठे गेले? तूच तर होतीच घरी.''
''पर माँ जी मैं क्या करूंगी पैसे लेकर?''
''वा ग वा, म्हणे क्या करूंगी? दिले असतील भावाला. नाही तर आणलं असेल त्याचं काही.''
''माँ जी मैं तो बाहर भी नहीं जाती.''
''बस झालगं गं तुझं तेच रडगाणं. खोटपणा सगळा.''
पुढं काय झालं कुणास ठावूक! आम्ही आपला काढता पाय घेतला. सगळ्यांचे चेहरे गोरेमोरे झाले होते. हे सगळं आमच्यासाठी नवीन होतं. एकमेकीशी एक अक्षरही न बोलता आम्ही घरी गेलो.

नंतरचे दोन-तीन दिवस कशालाच वेळ मिळाला नाही. शाळेत प्रॅक्टिकल्स होती. तेव्हा कुणीतरी भाभींची आठवण काढली. त्यांना'प्रॅक्टिकल' या प्रकाराची भारी अत्सुकता. ''क्या करते रे तुम उबाल-उबालके! और आईना, मोमबत्ती, टांचणी. डर नही लगता तुमको बम वगैरेसे'' लॅबमध्ये काम करणे म्हणजे अॅटमबॉम्ब बनविणे अशीच त्यांची ठाम समजूत होती. आम्ही त्यांच्या खूप फिरक्या घेत असू आणि मग आठवून-आठवून हसत असू.

''ए तुला कळलं का, भाभींचं बाळ आजारी आहे.''
भाभी म्हणाली त्याला सारखा ताप येतो म्हणे.''
''कशानं असेल ग?''
''कुणास ठावूक! काकू तर म्हणतात की, भाभी खोटं बोलते पैसे चोरल्याचं कबूल करीत नाही म्हणूनच देवानं ही शिक्षा दिली.''
''अगं पण तिच्या खोटेपणाची शिक्षा बाळाला का?''
''काय की? पण भाभी सारख्या म्हणतात - बाळाला देवी टोचल्या नाहीत आणि ताप आला तेव्हा डॉक्टरकडे न जाता सासूबाईंनी त्याला बुवामहाराजांकडे नेलं म्हणूनच ताप वाढला त्याचा. मी खोटं बोलले नाही की चोरी केली नाही.''

तो विषय तिथंच थांबला. पुढेचार दिवस माझी कोणाशीच भेट झाली नाही. सोमवारी सुटी झाली होती अन् माला बरं नसल्यानं मी एक दिवस शाळेत गेले नव्हते. मनात भाभींचा विचार पिच्छा सोडत नव्हता. शेवटी सगळं आईला सांगितलं - ''एवढी देवभोळी, काल्पनिक गोष्टींना, भूतखेतांना घाबरणारी भाभी खरंच खोठ बोलली असेल का?''

''असेलही कदाचित!'' आई म्हणाली, ''अगं तिच्या माहेरची परिस्थिती नसेल चांगली, दिले असतील भावाला. होतो मोह एखाद्या वेळी. पण तिनं सांगून टाकायला पाहिजे सासूबाईंना सगळं.
चार दिवसांनी शाळेत गेले, पाहिल तास होताच सगळ्यांचा घोळका माझ्याभोवती.
''एक वाईट बातमी आहे.''

''भाभीच बाळ!'' माझ्या ओठावर थरथरले शब्द आले- ते हसरं - गोजिरं बाळ डोळ्यापुढे आलं अन् काळजाचा ठोका चुकला. ''बाळ ठीक आहे.'' ''मग'' मला धीर धरवेना. शनिवारी बाळाचा ताप खूप वाढला. शेवटी रविवारी डॉक्टरांना आणलंच. पण बाळ सीरियसच होतं. डॉक्टरांनी आशा सोडली. खूप रागावले ते उशीर केल्याबद्दल.

तेव्हा महणे भाभींनी बाळाच्या पायावर डोकं ठेवलं, म्हणाल्या, ''हाच माझा भगवान आहे. मी खोटं बोलले नसेन तर माझा बाळ बरा होईलच.'' बराच वेळ गेला अचानक बाळाचा ताप उतरू लागला. ते हातपाय हलवू लागलं. त्यानं डोळे उघडले नि रडू लागलं. 'चमत्कारच झाला' म्हणत डॉक्टरांनी भाभींना बाळाच्या पायावरून डोकं काढण्यासाठी हलवलं तर...भाभीच वारल्या होत्या. कितीतरी वेळ मी सुन्न होते. त्यानंतर पुन्हा आम्ही त्या घराकडे फिरकलोही नाही.

''मुझपर विश्वास किजिए!'' भाभींचे केविलवाणे शब्द कितीतरी दिवस कानात घुमायचे अन् मी झोपेतून दचकून जागी व्हयाचे. मन अस्वस्थ व्हायचं, जीव घाबरा व्हायचा. तेव्हापासून आजतागायत... समोरच्या व्यकतीवर अविश्वास दाखवायची हिंमत मला झाली नाही... यापुढेही होण्याची शक्यताही नाही.