छत्रपती शिवाजीराजे भोसले
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मुघल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवरायांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवरायांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवरायांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यात इ.स. १६३० मध्ये शिवरायांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवरायांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा असला तरी महाराष्ट्र शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख निश्चित केली आहे.[१]
इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ ही एक जन्मतारीख मानली जाते. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.
शहाजीराजे
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
जिजाबाई
जिजाबाई व बाल शिवाजी
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात.
मार्गदर्शक
लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरून निश्चितपणे सांगता येते.
जिजाबाईं यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीती-शास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजान्च्या भावार्थ रामायण , भारुड इ. च्या माध्यमातुन बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिङग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक .समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.[२]
मावळ प्रांत
छत्रपती शिवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला "मावळ" आणि खोऱ्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.
शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी
कान्होजी जेधे
तानाजी मालुसरे
नेताजी पालकर
बाजी पासलकर
बाजीप्रभू देशपांडे
मुरारबाजी
हंबीरराव मोहिते
पहिली स्वारी - तोरणगडावर विजय
इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
शहाजीराजांना अटक
शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्यांनी बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.
शिवाजीराजांनी मुघल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.
जावळी प्रकरण
आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
पश्चिम घाटावर नियंत्रण
इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ल्यांवर विजय मिळविला होता.