Android app on Google Play

 

पाचशे साक्षीदार

एका लबाड सावकाराने एका शेतकर्‍याचे झोपडीवजा घर भाडयाने घेतले. पंधरावीस वर्षे त्याने ते आपल्या नोकरांना रहाण्यासाठी वापरले व त्याचे त्या शेतकर्‍याला भाडेही दिले. पण पुढे त्या शेतकर्‍याला भाडे दयायचे बंद केले व ते घर आपलेच आहे, असे तो म्हणू लागला. हा व्यवहार विश्वासावर झाल्याने, त्या शेतकर्‍यापाशी लेखी पुरावा नव्हता. तरीही त्याने ते घर आपल्याला मिळावे म्हणून त्या सावकाराविरुध्द न्यायालयात दावा केला.

न्यायालयात दावा सुनावणीला निघण्याच्या आदल्या दिवशी रात्री तो लुच्चा सावकार पाचशे रुपयांची थैली घेऊन न्यायमुर्तीकडे गेला. त्यांना म्हणाला, 'साहेब ! ती झोपडी जरी त्या शेतकर्‍याची असली, तरी मी त्याला तिचं गेली वीस वर्षे भाडं दिलेलं आहे. ती जर माझ्या मालकीची झाली, तर ती पाडून मी तिच्या जागी माझ्या दुसर्‍या मुलासाठी बंगला बांधीन. तेव्हा हे पाचशे रुपये घ्या आणि उद्या न्यायालयात माझ्या बाजूनं निकाल द्या.' त्या न्यायाधीशाने काहीएक न बोलता ती पाचशे रुपयांची थैली घेतली.

सावकार मोठया खुषीत आपल्या घरी निघून गेला.दुसर्‍या दिवशी न्यायालयात दावा सुनावणीला निघाला असता न्यायमूर्तींनी त्या सावकाराला विचारले, ' ईश्वराला स्मरून सांगा की, ती झोपडी खरी कुणाची आहे? कारण या शेतकर्‍यांच म्हणणं असं आहे की, ती त्याची आहे.'

सावकार ईश्वराची शपथ घेऊन म्हणाला, 'साहेब ! ती झोपडी माझीच होती आणि आजही माझीच आहे. म्हणून तर ती माझ्या ताब्यात आहे. या गावातले एक दोनच नव्हे, तर शंभर साक्षीदार ती झोपडी माझी आहे, सांगण्यासाठी मी न्यायालयात उभे करु शकेन.'न्यायमुर्तींनी त्या शेतकर्‍याला विचारलं, 'काय रे बाबा, ती झोपडी तुझी आहे, हे सिध्द करणारा एखादा पुरावा आहे का तुझ्यापाशी ? निदान 'ती झोपडी तुझी आहे.' असं सांगणारा, या गावातला एकादा साक्षीदार तरी तू इथे आणू शकशील का?'

दु:खी स्वरात शेतकरी म्हणाला, 'नाही साहेब. सावकार श्रीमंत असल्याने, जेव्हा त्याने त्याच्या गडी माणसांना रहाण्यासाठी ती झोपडी माझ्याकडे मागितली, तेव्हा तो माझी गरीबाची झोपडी गडप करणार नाही अशा विश्वासाने मी ती त्याच्याकडून काहीएक लिहून न घेता त्याच्या स्वाधीन केली. गेली बरीच वर्षे त्याने मला त्या झोपडीचे भाडेही दिले. पण जेव्हा त्याने भाडे देण्यास नकार दिला व ती झोपडी आपलीच असल्याचे सांगू लागला, तेव्हा मला न्यायालयात यावे लागले.

पैसा व दरारा यांच्या जोरावर सावकार शंभरच नव्हे तर पाचशे साक्षीदारसुध्दा त्याच्या बाजूने उभे करील, पण मज गरीबाची बाजू घेऊन, या सावकाराला दुखविण्याचं धारिष्ट या गावात कोण करील ?'सावकार म्हणाला, 'ऎकलतं ना साहेब, किती खोटं बोलतो आहे हा ? ती झोपडी याचे आहे असं सांगणारा एकही लेखी पुरावा याच्यापाशी नाही, आणि एकही साक्षीदार हा इथे आणू शकत नाही, तेव्हा ती झोपडी माझी आहे, हे आपल्याला पटले ना ?'न्यायमुर्ती सावकाराला म्हणाले, 'तुझी बाजू सत्याची आहे, असं सांगणारे शंभर साक्षीदार तू माझ्यापुढे आणायला तयार आहेस, पण ती झोपडी या शेतकर्‍याची आहे असं सांगणारे पाचशे साक्षीदार अगोदरच माझ्याकडे आलेले आहेत.'याप्रमाणे बोलून व आदल्या दिवशी सावकाराने लाच म्हणून दिलेले पाचशे रुपये टेबलावर ठेवून, न्यायमुर्ती त्याला म्हणाले, ' ती झोपडी त्या शेतकर्‍याची असूनही ती गिळंकृत करण्यासाठी काल तू माझ्या घरी आणून लाचेखातर मला दिलेले हे पाचशे रुपये या शेतकऱ्याची बाजू न्यायाची आहे, असं ठणकून सांगणारे पाचशे साक्षीदार आहेत. तेव्हा तू आज संध्याकाळपर्यंत ती झोपडी या शेतकऱ्याला द्यावीस . तू मला लाच देण्याचा प्रयत्न केलास म्हणून तू सरकारात १००० रुपये दंड भरावा, आणि लाच म्हणून तू मला देऊ केलेले हे पाचशे रुपये तू या शेतकर्‍याला त्या झोपडीची डागडुजी करण्यासाठी द्यावे, असा मी निर्णय देत आहे.'