संग्रह १ ते २५
१.
फुगडी खेळतां खेळतां जमीन झाली काळी
माझ्याशी फुगडी खेळते लेकुरवाळी
२.
लाही बाई लाही साळीची लाही
मुक्यानं फुगडी खेळणं शोभत नाही
३.
गणपतीच्या मागे उंदराची पिल्लं
सगुणा म्हणते तींच माझी मुलं
४.पैंजण बाई पैंजण छुमछुम पैंजण
माझ्याशी फुगडी खेळते बुटबैंगण
५.
खार बाई खार लोणच्याचा खार
माझ्याशी फुगडी खेळते नाजुक नार
६.
आपण दोघी मैत्रिणी गळां घालूं वेढा
गोड गोड बोलुं आपण साखरपेढा
७.
बारा वाजले एक वाजला समोर पडली आहेत उष्टी
नवरा आणि बायको बसून करताहेत गोष्टी.
८.
तुझी माझी फुगडी किलवर ग
संभाळ अपुले बिलवर ग
९.
आपण दोघी मैत्रिणी गळां घालूं मिठी
गोड गोड बोलूं आपण साखरपिठी
१०.
नमस्कार करतें आशीर्वाद द्या
लहान आहे सासूबाई संभाळून घ्या
११.
फुगडी फुलेदार भाऊ शिलेदार
नणंदा मोकाणी जावा कोल्हाटिणी.
१२.
हरबर्याचं घाटं माज्या फुगडीला दाटं
फुगडी पापा तेलणी चांफा,
सईची साडी राहिली घरीं,
बाप सोनारा नथ घडू दे,
नथीचा जोड सवती बोल,
सवत कां बोल ना,
यील मेल्या सांगीन त्येला, तुला ग मार दियाला,
बकर कापीन गांवाला, हरीख माज्या जीवाला
१३.
घोडा घोडा एकीचा एकीचा
पेठकरणी लेकीचा,लेकीचा
१४.
अशी लेक गोरी,गोरी
हळ्द लावा थोडी, थोडी
हळदीचा उंडा, उंडा
रेशमाचा गोंडा, गोंडा
गोंड्यात होती काडी, काडी
काडीत होता रुपाया, रुपाया
भाऊ माझा शिपाया , शिपाया.
१५.
शिळ्या चुलीत चाफा चाफा
नाव ठेवा गोपा, गोपा
गोपा गेला ताकाला ताकाला
विंचू लावला नाकाला
विंचवाची झाली गुळवणी गुळवणी
त्यांत माझी मिळवणी मिळवणी
मिळवणीचा रहाट ग रहाट ग
कोल्हापूरची पेठ ग पेठ ग
पेठेला लागल्या शेंगा शेंगा
अशी शेंग गोड ग गोड ग
जिभेला उठला फोड ग फोड ग
फोड कांही फुटेना फुटेना
घरचा मामा उठेना उठेना
घरचा मामा खैस ग खैस ग
त्यान घेतली म्हैस ग म्हैस ग
१६.
अरंडयावर करंडा करंडयावर मोर
माझ्यासंग फुगडी खेळती चंद्राची कोर
१७.
ओवा बाई ओवा रानोमळ ओवा
माझ्यासंग फुगडि खेळतो गणपतिबुवा
१८.
आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या अट्टीच्या
साडया नेसू पट्टीच्या पट्टीच्या
१९.
खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे
तुझी माझी फुगडी गरगर फिरे
२०.
आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या
हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या
२१.
चहा बाई चहा गवती चहा
माय लेकीच्या फुगडया पहा
२२
पहा तर पहा उठून जा
आमच्या फुगडीला जागा द्या
२३.
अक्कण माती चिक्कण माती पाय घसरला
प्रेमाचा नवरा् शेला आणायला विसरला
२४.
इकडून आली तार तिकडून तार
भामाचा नवरा मामलेदार.
२५.
तुझ्या घरी माझ्या घरी आहे बिंदली सरी
फुगडी खेळताना बाई नको तालीवारी