Get it on Google Play
Download on the App Store

आई थोर तुझे उपकार

जग हे जितके चमत्कारिक आहे, तितकेच ते चमत्कारपूर्ण आहे. विधात्याने निर्माण केलेले विश्व हाच मुळी कल्पनातीत असा एक चमत्कार आहे आणि विश्वविधात्याच्या करणीवर ताण करून दाखविण्यासाठी मनुष्यांनी सुद्धा या नानारत्ना वसुंधरेला ‘अहं ब्रह्मास्मि’ या प्रत्यक्ष जाणिवेने नाना आश्चर्याणि वसुंधरा बनविण्याची शिकस्त चालविली आहे. कल्पनेच्या समुद्रमंथनातून निर्माण केलेली अनंत चमत्कारिक रत्ने माणसांनी वसुंधरेच्या या अजब अजायबखान्यात व्यवस्थित मांडून ठेविली आहेत. ती पाहिली की आपले हृदय कौतुकाने भरून येते. मनोवृत्ती विस्मयाने चकित होते आणि स्तुतीचा निदान एक तरी गोड उद्गार निघावा म्हणून जिव्हा योग्य शब्द योजनेसाठी वळवळते. पण ‘वाहवा’ एवढ्या उद्गारावरच वाक्शक्तीची मजल खुंटल्यामुळे अखेर हळहळते. आग्र्याचा ताजमहाल, मिस्र देशांतले पिरामिड, स्वच्छंद वातावराला हुकमी संदेशवाहक बनविणारा मार्कोनिग्राम किंवा बिनतारी टेलीफोन, दूरस्थ किंवा कालवश झालेल्या माणसांची भाषणे व आल्हादकारक गाणी वाटेल तेव्हा वाटेल तेथे प्रगट करणारा फोनोग्राफ, इत्यादी अनेक मनुष्यनिर्मित चमत्कारांची शाब्दिक संभावना करिताना, हृदयात उचंबळणा-या कुतूहल-लहरींचा थयथयाट व्यक्त करताना, माणसाची वाक्शक्ती ‘वाहवा’ या एकाच शब्दोच्चाराच्या उंबरठ्यावर कुंठित होते.

निसर्गनिर्मित चमत्कारांविषयीही हाच प्रकार, उदाहरणार्थ, आपण उषःकालचा चमत्कार कवीच्या काव्यमय चष्म्यांतून पहाण्याचा यत्न करू. एका विशेष चैतन्याच्या अवर्णनीय सुगंधाने ज्याचे अणुरेणू परिमळयुक्त झाले आहेत, असा प्रभातीचा प्रबोधक वातावरणाचा जलधी मंदमंद वायूच्या रहाळ्या मारीत आहे. सृष्टीदेवता त्यात जलविहार करीत आहे. इतक्यात ‘भगवान् सविता आले की काय?’ हे पाहण्यासाठी तिने आपला हसरा टवटवीत चेहरा जलपृष्ठावर काढताच दवकण तिच्या मस्तकावर मौक्तिकांचा सडा पाडीत आहेत. जलविहारामुळे भिजून चिंब झालेला सृष्टीचा केशकलाप पिळून स्वच्छ पुसण्यासाठी किरमिजी अरुणाचे रेशमी फर्द उषादासीने झटकन् पुढे करून, दाही दिशा उजणा-या तेजाचा सुगंधी विश्वंभर धूप सर्वत्र प्रसृत केला आहे. धूपाच्या घमघमाटात मग्न असताच, भगवान सूर्यनारायण आपला एकच हात पुढे करून सृष्टीच्या निटिलावर सुवर्ण कुंकुमाचा रेखीव टिळा रेखीत आहे. बोलबोलता सा-या विश्वाची नजर चुकवून देवीने भजरी सहस्ररश्मी पैठणी परिधान केली आहे. अंगावर दिसतो न दिसते असा विरळ धुक्याचा शालू पांघरला आहे.

अवघ्या तीन पावलांत सा-या त्रिभुवनाचा आक्रम करीन, या विजयाकांक्षेने फुरफुरलेले आले लालबुंद मुखबिंब भगवानजीने क्षितिजपटलाच्या वर काढताच, उत्फुल्ल सुमनदलांच्या द्वारे सृष्टी दिव्य स्मितहास्य करीत आहे. अंगावर पांघरलेला धुक्याचा शालू अलगज उडवून आलिंगनासाठी सवित्याने पसरदेले विश्वस्पर्शी विशाळ बाहू पाहून, चंडोलादि गायकगण ‘आस्ते कदम’ च्या ललका-या तारस्वरांत भिरकावीत आहेत आणि या अतिप्रसंगाचा बोभाटा सा-या विश्वात दुमदुमल्यामुळे सृष्टीदेवता विनयाच्या सात्विक मुरडणीने लाजली आहे. हा सर्व हृदयस्पर्शी चमत्कारिक देखावा पाहून मानवांच्या वाक्शक्तीने मुग्धतेच्या आड लपून आपल्या अंतस्थ कुतूहलाचे व्यक्तीकरण पाणी भरल्या डोळ्यांनी करण्यापलीकडे अधिक काय करावे बरे? मुळी विश्वविधाताच जर गूढ व अकल्पनीय, तर त्याची विश्वरंगभूमीवर उधळलेली नाना आश्चर्याणि वसुंधरा तितकीच गूढ व अवर्णनीय का असू नये? पण या वसुंधरेच्या चमत्कार-खाणीचाही गर्वपरिहार करणारा एक अद्वितीय चमत्कार आहे. चमत्कार वाटतो तो हाच की या चमत्काराचा व प्रत्येक भूतजाताचा अत्यंत निकटचा संबंध असूनसुद्धा त्या चमत्काराचा चमत्कार आम्हांला भासू नये, हे किती चमत्कारिक? खरोखर मानवी दुनिया बुद्धिमत्तेच्या चौकसपणाचा कितीही डौल मिरवो, ती फारच चमत्कारिक खरी. साता समुद्रापलीकडे दिसते, पण हाताजवळचे भासतसुद्धा नाही. याचे कारण हेच की अतिपरिचयामुळे या विश्वोत्त्र चमत्कारांची अवज्ञा होणे हा मानवी सृष्टीच्या स्वभावधर्म- स्मृतींत गुन्हा मानलेला नाही.

आग्र्याच्या लोकांना ताजमहालाच्या लोकोत्तरपणापेक्षा मुशाफरांपासून मिळणा-या कवडी दमडी भिकेचे महत्त्व फार वाटते. पंढरपूरच्या बडव्यांना किंवा काशीच्या पंड्यांना विठोबाचे किंवा विरूपाक्षाचे महत्त्व लवमात्र वाटत नाही. त्यांची सारी महत्त्वाकाक्षा यात्रेकरूंच्या गाठोड्याभोवती आशाळभूत पिशाच्चाप्रमाणे वावरत असते. गंगानदीच्या पावित्र्याच्या महिम्याने हृदयात भाविक भावनेचे मळे पिकलेले लोक गावोगावहून धाव घेत काशीला जातात. पण तेच काशीचे लोक त्याच गंगेचा उपयोग नियमित प्रातःर्विधीसाठी करतात. ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होवो वा न होवो, पण भारत काळापासून इतिहासप्रसिद्ध असलेला स्यमंतक-कोहिनीर मणी काळाने डोळे मिटण्यापूर्वी निदान एकवार डोळे भरून पहावा म्हणून आम्हा भारतवासियांची तृष्णा केवढी दांडगी! पण आमच्या पंचमजॉर्ज बादशहांना हातातल्या वॉकिंग स्टिक इतकेच त्याचे महत्त्व वाटत असावे; याचे कारण अतिपरिचय.

या प्रचंड विश्वविस्ताराला प्रकाशित करणा-या तेजोनिधी भास्करालासुद्धा ‘घटकाभर हो बाजूला’ असे सांगणारे अशोक, प्रतापसिंह, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी काय थोडेथोडके पुरुषोत्तम सूर्य आपल्यात चमकून गेले? पण आपलेपणाच्या अतिपरिचयामुळे त्यांच्या महत्त्वाचे लोकोत्तर चमत्कार त्या वेळी आपल्या विचारांना शिवलेही नाहीत. आई हा एक असा चमत्कार आहे की त्याच्या निकट परिचयामुळे त्यातील गूढ प्रेमाच्या रहस्याचे महत्त्व आम्हाला वास्तविक समजले तरी उमजत नाही, उमगले तरी सापडत नाही व भासले तरी व्यक्त करता येत नाही. आई हे दोन स्वर, ही दोन अक्षरे, हा एक सुटसुटीत शब्द सोपा दिसतो खरा, पण या दोन अक्षरांच्या इवल्याशा जागेत सारे विश्व सामाविलेले आहे. या शब्दांत एक विलक्षण जादू आहे. विश्वाच्या आदि अंताची माया या दोन अक्षरी शब्दांतच संकलित झाली आहे.

आम्ही माणसे जसजशी शहाणी होत आहोत. तसतशी आमची व एका विशिष्ट गोष्टीची फारकत होत चालली आहे. ती गोष्ट म्हटली म्हणजे, एकवाक्यता. चार शहाणी डोकी एका ठिकाणी जमली आणि त्यांचे एका गोष्टीविषयी चटकन् एकजिनशी एकमत झाले, ही बाबसुद्धा आता अघटित चमत्कारांत मोडू पाहात आहे. परंतु आई ही अशी एक चमत्कारिक बाब आहे, की तिच्या विषयी राष्ट्रभेद, देशभेद, संस्कृतिभेद, व्यक्ति भेद, वर्णभेद, इत्यादि सर्व भेदांचा समूळ छेद होऊन, आई या एकाच शब्दोच्चाराने सर्व मानवी दुनिया- नव्हे अवघे भूतजात-झटदिशी प्रेमाच्या एकतान स्थितीत एकमताने विलीन होते. आईचे प्रेम जात्याच मुळी अत्यंत मुग्ध असते. ते सर्वांना भासत असले, तरी दिसत नाही. परमेश्वराने स्त्रीजातीला बहाल केलेल्या अलौकिक स्निग्धतेच्या सत्वगुणाचा अर्क आईच्या प्रेमात आत्म्याप्रमाणे रसरसत असतो. आईचे प्रेम आईलाच ठावे, इतरांना- विशेषतः पुरुषांना त्या प्रेमाची खरी कल्पना येणे शक्य नाही. त्या दिव्य प्रेमाचे किंचित उतराई होण्यासाठी बुद्धीमान पुरुषांनी आपल्या निवडक वाक्पुष्पांची आईसाठी जरी शय्या तयार केली, किंवा मानवी विकारांचे इतर सर्व तिखट रस घटकाभर दूर झुगारून देऊन सात्विकपणाच्या मृदुल एकतानेतेने आपल्या लेखणीला आईच्या प्रेमाचे शब्दचित्र काढण्यासाठी कितीही नाचविले, तरी बुद्धिमत्तेची रसाळ ओजस्वी शाई प्यालेले ते कलम, आई एवढा एकच शब्द लिहून त्याच्यापुढे नकळत पडलेल्या पूर्णविरामात आपल्या कुंठित मतीचा पूर्णविराम स्पष्ट व्यक्त करते.

ईश्वरी प्रसादाची सनद पटकावून, कृष्ण भगवंताच्या मुरलीप्रमाणे, सा-या जगताला मोहिनी घालणारे महाकवि कितीतरी होऊन गेले. त्यांनी चंद्रसूर्याला कल्पनेच्या भरारीत हाताबोटांवर नाचविले. मेरुपर्वतांचा घुसळखांब करून शेषाच्या दोरीने अखिल महासागरांचे मंथन केले. आकाशातील तारकांना अलगज उचलून, काव्यातील नायिकेच्या डोळ्यांत बसविले. या महाकवींनी कोठे पर्वतांना व्याख्याने द्यावयास लाविली, नद्यांना गाणी गावयास भाग पाडले, गगनसंचारी मेघांना प्रणयपत्रिकांच्या चिटो-यांची नेआण करणारे दूत बनविले, तर कोठे स्वयंसंचारी वातावरणाला आकाशवाणीचे जलशे नाचविणारे तमासगीर बनविले. परंतु आजपर्यंत आईला काव्याचा विषय केला असता ‘आई थोर तुझे उपकार’ या उद्गारापलीकडे आपल्या निष्णात कल्पनेची भरारी मारण्याचे एकाही महाकवीला साधले नाही. याचे कारण हेच की, आई व आईचे प्रेम या दोन गोष्टी अत्यंत गूढ व मुग्ध असल्यामुळे नुसत्या विचक्षण मानवी कल्पनेला त्यांचे सांगोपांग आकलन होणे शक्य नसते. अशा वास्तविक स्थितीत प्रस्तुत लेखकाच्या दुबळ्या लेखणीनेही ‘आई थोर तुझे उपकार’ या सूत्राने आईला, आपल्या भारत जननीला आणि त्या दयानिधि जगन्माउलीला, कृतज्ञतेने तुडुंब भरलेल्या हृदयाला कसेबसे सावरून, साष्टांग प्रणिपात घालण्यापलीकडे अधिक काय करणे शक्य आहे. जननीजन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ।।

समग्र साहित्य

प्रबोधनकार ठाकरे
Chapters
आई थोर तुझे उपकार शिवसेना कशासाठी?