Get it on Google Play
Download on the App Store

पाठलाग

दुर्गेश आणि अन्विता हे नवविवाहित दांपत्य काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नव्या घरात राहायला आले होते. त्यांचं नवीन दोन मजली घर नुकतंच त्यांनी शहराच्या बाहेर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी घेतलं होतं. रात्रीची वेळ होती, आणि दूरवर झाडांच्या सळसळण्याचा आवाज सोडून आजूबाजूला अगदी शांतता पसरली होती. दुर्गेशने घराच्या बाहेर एका मोटारीचा थांबण्याचा आणि दर उघडून कुणीतरी उतरण्याचा आवाज ऐकला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. दर उघडून त्याने बाहेर इकडे तिकडे जाऊन पहिले पण कुणीही दिसले नाही. तो परत आला, पण त्याच्या मनात विचित्र शंका आणि भीती आली पण त्याने ती चेहऱ्यावर दाखवली नाही. अन्विताने त्याला विचारलं, "काय झालं दुर्गेश? काहीतरी विचित्र वाटतंय का?"

"नाही, असं काही नाही. फक्त बाहेर कोणीतरी आहे की काय असं वाटलं," दुर्गेशने उत्तर दिलं.

अन्विताने त्याची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने तिने एक छानशी साडी घातली. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडून नंतर झोपून गेले.

त्या रात्री दुर्गेशला एक विचित्र स्वप्न पडलं. तो एका काळ्या मोटारीचा पायी पाठलाग करत होता. मोटारीत एक अनोळखी माणूस होता, ज्याचा चेहरा धूसर होता. दुर्गेश जागा झाला आणि त्याच्या अंगावर घाम आला होता. अन्विता त्यामुळे जागी झाली. त्याने तिला फक्त, "मला एक विचित्र स्वप्न पडलं" एवढंच सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी, त्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याबाहेर झाडाच्या एका मोठ्या पानाचा तुकडा पाहिला. उचलून पहिले तर त्यावर लिहिलेलं होतं, "ही तर फक्त सुरुवात आहे." त्याने हे अन्विताला दाखवले कारण ती मागेच उभी होती.

दुर्गेशच्या डोक्यात ते स्वप्न आणि तो पानाचा तुकडा सतत घोंघावत राहिला. अन्विता देखील अस्वस्थ होती. पण दुर्गेशला ऑफिस जाणे भाग होते कारण तो शहरातील एका "जलजीवन" या वॉटर प्यूरिफायर बनवणाऱ्या एका छोट्या कंपनीचा मालक होता. त्याला ओठांवर एक छानसा कीस देऊन तिने निरोप दिला. अन्विता गृहिणी होती पण लवकरच काहीतरी नोकरी शोधायची किंवा कालांतराने दुर्गेशच्या कंपनीत त्याला मदत करायची असे तिने ठरवले होते.

त्याच संध्याकाळी, दुर्गेश आणि अन्विता शहरात आपल्या कारने फिरायला गेले. खरेदी करून परत येतांना त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्यामागे एक काळी मोटार पाठलाग करत आहे. दुर्गेशच्या मनात ते स्वप्न पुन्हा जागं झालं. तो गाडी वेगाने चालवू लागला. त्यांनी एक छोट्या रस्त्यावर वळून मोटारीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. पण ती मोटार त्यांच्यामागेच होती.

मग दुर्गेशने कार वळवली व दोघे एका गजबजलेल्या चौकात पोहचले, तिथे लोकांची वर्दळ होती. त्यांनी थोडा वेळ तिथेच थांबण्याचं ठरवलं. ती काळी मोटार दूर एके ठिकाणी काही क्षणासाठी थांबली, आणि मग निघून गेली. भीतीमुळे त्या कारचा नंबर काय होता याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही.

दुर्गेश आणि अन्विता घरी परतले. त्यांचं मन शांत नव्हतं, पण त्यांना काय करावे काही कळत नव्हतं. रात्री ते दोघे झोपले. पण मध्यरात्री, दुर्गेशला कोणीतरी दार ठोठावण्याचा आवाज आला. अन्विता गाढ झोपलेली होती कारण तिने आज घराची साफ सफाई, घराभोवतीचे गार्डन नीटनेटके केले होते. त्यामुळे तिला जाग आलीच नाही. त्याने दरवाजा उघडला, तर बाहेर कुणीच नव्हतं. फक्त खाली पुन्हा एक पानाचा तुकडा पडला होता. त्यावर लिहिलं होतं, "तुम्ही पळून जाऊ शकत नाही."

सकाळी दुर्गेशने अन्विताला सगळं सांगितलं. त्यांनी पोलिसांना कळवलं, दोन्ही झाडाची पाने दाखवली. पोलिसानी एक दोन दिवस आसपासच्या परिसरात दिवसरात्र गस्त घातली. त्यांच्या घरासमोर पुढील दोन रात्री पहारा देणारा एक पोलिस ठेवला. तेव्हा काही घडलं नाही. तितके दिवस एक माणूस दूर असलेल्या एका घराच्या खिडकीतून दुर्बिणीने सगळीकडे लक्ष ठेऊन होता.

"पुन्हा असे काही घडले तर कॉल करा. तसे पाहिले तर हा परिसर राहण्यासाठी अगदी सुरक्षित आहे. आम्हाला आश्चर्य वाटते, तुम्हा दोघांना इथे असे अनुभव कसे काय आलेत? आसपासच्या घरांना असा काही अनुभव अजूनपर्यंत आला नाही, असे चौकशीत आम्हाला समजले. पुढच्या वेळेस गाडीचा नंबर नोट करून ठेवा म्हणजे तपास सोपा जाईल. घराच्या बाहेर सीसीटीव्ही लावून घ्या", असे सांगून पोलिस काही दिवसांनी निघून गेले.

त्या घटनांपासून दोघे मात्र सतत सतर्क राहू लागले. त्यांनी भरपूर खर्च करून घराबाहेर सीसीटीव्ही बसवले. त्यानंतर घराजवळ कुणीही येतांना दिसले नाही. मात्र बाहेर कुठेही गेले की, त्यांना कोणतीही मोटार मागे दिसल्यावर ती आपला पाठलाग तर करत नाही ना असे वाटू लागले. त्यांच्या मनावर भीतीचा पगडा घट्ट बसला होता.

दुर्गेशचे कामात मन लागेनासे झाले. अज्ञात माणसाचा पाठलाग आणि घरी एकटी असलेली अन्विता यामुळे त्याचे कामात दुर्लक्ष झाले आणि दोन परदेशी कंपनीसोबत असलेल्या डील हातातून गेल्या. त्यातच कंपनीचे चालू वर्षाचे क्वालिटी ऑडिट आता जवळ आले होते. दिवसा अन्विताजवळ तिचे आई वडील किंवा दुर्गेशचे आई वडील सध्या येऊन थांबणे काही कारणास्तव शक्य नव्हते. अर्थात त्यांना तशी विनंती करतांना या दोघांनी सध्याच्या घटनांबद्दल काहीच सांगीतले नव्हते.

एकदा दुर्गेश हा जवळच्या शहरातून एक मीटिंग अटेंड करून एकटा कारने परत येत होता. येतांना संध्याकाळ झाली. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. आवडीचे गाणे ऐकत गाडी चालवत असतांना तीच काळी मोटार त्याचा पाठलाग करत असतांना दुर्गेशला दिसली. पण काळजीपूर्वक बघितले असता लक्षात आले की त्या गाडीला नंबर प्लेट तर होती पण त्यावर नंबर लिहिलेलच नव्हता.

"भीतीच्या सावटाखाली राहण्यापेक्षा, आता जे होईल ते होईल पण मी या माणसाचा पर्दाफाश करणारच! कार थांबवून मी त्याला जाब विचारतोच आता!" असा विचार करून त्याने आपल्या गाडीचा वेग कमी केला. पण हे बघून त्या कारवाल्या माणसाने आपली काळी कार थांबवली आणि उलट्या दिशेने वळवली. दुर्गेश असे काही करेल हे त्याला अपेक्षित नव्हते. आता दुर्गेश त्या गाडीचा पाठलाग करू लागला.

काळ्या रंगाची कार चालवणाऱ्या, काळा शर्ट घातलेल्या त्या अज्ञात ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर आता चिंता स्पष्टपणे दिसत होती. लाल रंगाची दुर्गेशची कार आता हात धुवून त्या काळ्या कारचा मागे लागली.

काळी कार एका वळणावर आली त्यामुळे, तिचे टायर्स कर्कश आवाज काढू लागले. दुसरी लाल कारसुद्धा त्वरित वळली, दोन्ही कारचा वेग आता अधिकाधिक वाढत चालला. रस्त्यावर इतर कोणताच आवाज नाही, फक्त कारचे इंजिन आणि टायर्सचे आवाज ऐकू येत होते. आकाशातील चंद्रप्रकाशामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या लांब सावल्या रस्त्यांवर आणि दोन्ही मोटारींवर पडत होत्या. त्या सावल्यामधून दोन्ही कार पळत होत्या, एकमेकांचा पाठलाग करत होत्या. आकाशात चांदण्या चमकत होत्या, आणि दोन्ही कारच्या हेडलाइट्सच्या प्रकाशात रस्ता उजळत होता. दोन्ही कारच्या इंजिनाचा आवाज रात्रीच्या शांततेला भेदत होता आणि असे वाटत होते जणू काही हा पाठलाग कधीच संपणार नाही.

प्रत्येक वळणावर, प्रत्येक वाटेवर, दोन्ही कार वेगाने धावत होत्या. या खडतर पाठलागात, दोन्ही कार आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून वेगाने पुढे जात होत्या. जणू काही त्या दोन्ही कारमध्ये उत्साह संचारला होता. काळ्या कारच्या ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला आणि कार एका अरुंद रस्त्याकडे वळवली. मागची कारही लगेचच त्या रस्त्यात शिरली. एका छोट्या गावात ते दोघे शिरले.

दोन्ही कार आता एका अरुंद गल्लीतून धावत होत्या, घरांच्या भिंतीजवळून जात होत्या, भिंतींना धडकत होत्या, दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या घरांच्या खिडक्यांतून लोक ह्या रोमांचक पाठलागाकडे पाहत होते. कालांतराने दोन्ही गाड्या गावाबाहेर आल्या. टायर्समुळे रस्त्यांवरची धूळ उडत होती.

पहिल्या कारच्या ड्रायव्हरला जणू काही आता हा पाठलाग संपवायचा होता. त्याने एका पुलाकडे गाडी नेली आणि एक तीव्र वळण घेऊन, अचानक पुलाच्या खाली नदीकडे कार वळवली. पण मागची लाल कार लगेचच तिथे आली. त्यांच्या इंजिनांचा आवाज अजूनही घुमत होता. नदीचे पाणी खळाळून वाहत होते. नदीतल्या पाण्यात कार घालणे शक्य नव्हते. त्यामुळे काळ्या कारच्या ड्रायव्हरला आता काय करावे हे सुचत नव्हते. दुर्गेशपण स्टीअरिंग व्हील जवळच बसून काय करावे? गाडी पुढे न्यावी का? की गाडीतून उतरून एकदाचा सोक्षमोक्ष लावावा? तो ड्रायव्हर काही घातपात करेल का? याचा विचार तो करत होता.

तेवढ्यात त्याला अन्विताचा फोन आला. हॅंड्स फ्री स्पीकरवर अन्विताचा अस्पष्ट खरखरीत आवाज ऐकू आला कारण इथे मोबाइल सिग्नलची रेंज नीट येत नव्हती.

"दुर्गेश? तुम्ही कुठे आहात? तुम्हाला उशीर का झाला? आपल्या घरच्या लँडलाइन नंबरवर मला एक धमकीचा फोन आला! तुम्ही निघून या घरी. मला भीती वाटते!"

"काय? अगं पोलिसांना फोन केलास का? मी येतोच आहे. तुला आता सांगू शकत नाही की मी कुठे आहे ते, पण मी लवकरच परत येतो! घाबरू नकोस!", आणि सिग्नल ड्रॉप झाला. त्याने पुन्हा फोन लावला पण लागलाच नाही. अस्वस्थ होऊन त्याने स्टीअरिंग व्हीलवर हात आपटला. समोर लक्ष गेले तर काळी कार गायब होती. पुलाच्या पलीकडे जाऊन ती कार धूळ उडवत वेगाने नाहीशी झाली.

दुर्गेश घरी आला. त्याने अन्विताला धीर दिला. पाठलागाबद्दल सगळे सांगितले. तोपर्यंत पोलिस घरी येऊन तिची चौकशी करून निघून गेले होते. तो अनोळखी माणूस कोण आहे, तो पाठलाग करत आहे, हे समजत नव्हतं. याबद्दल पोलिसांना सांगणार तरी काय? गाडीला नंबर प्लेट होती पण नंबर लिहिलेला नव्हता. पण एक गोष्ट मात्र नक्की होती, दुर्गेश आणि अन्विता या संकटाला तोंड देण्यासाठी एकत्र आले होते, आणि त्यांनी ठरवलं होतं की, या पाठलागाच्या रहस्याचा खुलासा करूनच राहणार!

दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून आभार मानले आणि रात्रीच्या पाठलागाबद्दल गाडीचे वर्णन करून सांगितले. इकडे अन्विताने जवळच्या एका उपनगरात हॉस्टेलवर राहणाऱ्या तिच्या सायली नावाच्या एका मैत्रिणीला सोबत म्हणून रोज दिवसा घरी बोलावून घेतले आणि तिला घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. तिला कॉलेजला सध्या सुट्टी असल्याने ती तयार झाली.

अकरा वाजता घराच्या खिडकीची काच फुटून मोठा आवाज झाला आणि एक दगड आतमध्ये आला. कानात इयरफोन टाकून गाणे ऐकत सोफ्यावर पाय पसरून लोळलेली सायली दचकून सोफ्यावरून खाली पडली. तो दगड तिच्या जवळच्या टीपॉयवर पडला. काचेचा टीपॉय फुटला.

स्वयंपाक करता करता अन्विता गॅस बंद करून हॉलमध्ये धावत आली. बाहेर वेगाने एक गाडी घराजवळून जाण्याचा आवाज आला. अन्विताने खिडकीबाहेर पहिले आणि सायलीला हात धरून उठवले. सायलीने हेडफोन आणि मोबाइल बाजूला ठेवला.

मग अन्विताने किचनमधून मिरचीच्या पुडीची तीन पॅकेट, भाजी कापायचा चाकू आणि लाटणे हे किचन गाऊनच्या खिशात टाकले. फुटलेले काच आवरायला आता वेळ नव्हता. बाहेर दरवाजा उघडून दोघींनी पहिले असता त्यांना दिसले की, स्टिअरिंग व्हीलजवळ एका व्यक्तीला दूसरा माणूस नीट गाडी चालवू देत नव्हता. झटापटीत ती काळी कार पुढे जाऊन एका नारळाच्या झाडाला धडकली.

त्यातून दोन जण बाहेर पडले आणि पळू लागले. सायली आणि अन्विता दोघींनी एकमेकांना खूण केली. दोघी तिकडे धावल्या. त्यापैकी एक निळा शर्ट आणि गॉगल घातलेला माणूस सायलीच्या अंगावर धावून आला. सायलीने हवेत उलटा पाय फिरवून एक लाथ त्याच्या पोटात हाणली आणि म्हणाली, "मी होमगार्डचे प्रशिक्षण घेतलेले आहे, तुला काय वाटले, एकट्या दुकट्या स्त्रीया तुझे काही वाकडे करू शकणार नाहीत? कुठे आहे तो दुसरा?" तो माणूस हेलकावे खात फरशीवर पडला, उठून उभा राहीला आणि भेलकांडत पळू लागला.

तोपर्यंत अन्विता काळा शर्टवाल्या माणसाचा पाठलाग करू लागली. तो जवळच्या एक शेतात घुसला. त्याच्या मागे अन्विता पळाली. दोघांच्या मागे बऱ्याच अंतरावर निळा शर्टवाला माणूस आणि त्याच्या मागे सायली असा पाठलाग सुरु झाला. सायलीने त्याला पळत जाऊन गाठले आणि त्याची कॉलर पकडली पण पकड ढिली झाल्यामुळे तो सटकला आणि पळू लागला. जवळ पडलेली झाडाची फांदी तिने उचलली आणि त्याच्या डोक्यावर फेकून मारली, त्याच्या डोक्याला लागून ती खाली पडली. डोक्यात थोडेसे रक्त आले, त्याने डोळ्याला हात लावला आणि तशा स्थितीत पळू लागला. सायलीने चप्पल घातली होती पण अन्विता अनवाणी निघाली होती.

तो काळा शर्टवाला गुन्हेगार झाडाझुडपांच्या गर्दीत शिरला, एक क्षण थांबला, त्याने मागे पाहिले आणि मग पुढे जात राहिला. अन्विताला काटक्यांमुळे त्याचे पावलांचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते. ती थोड्या वेळासाठी श्वास घ्यायला थांबली. झुडपांच्या गर्दीत तिला सळसळ आवाज आला. तिने वेगाने लाटणे आवाजाच्या दिशेने भिरकावले. पण काही उपयोग झाला नाही. त्याने जो गॉगल लावलेला होता तो लाटणे लागून खाली झुडपांत कुठेतरी पडला. तो वेगाने पळू लागला. आता तो दृष्टीस दिसू लागला. अन्विताने आपल्या हातातील चाकू वेगाने त्याच्या पायाच्या दिशेने भिरकावला पण तो त्याच्या टाचेला स्पर्श करून बाजूच्या झाडाला जाऊन फसला.

पायात काहीही घातले नसल्याने अन्विताला तळपायला टणक खडे, माती, काटक्या टोचत होते त्यामुळे तिचा वेग मंदावत होता. तोपर्यंत तो रस्त्यात आडव्या पडलेल्या झाडाच्या मोठ्या फांदीला ओलांडून पुढे पळाला. अन्विताने मोठी उंच उडी मारली आणि त्या फांदीला ओलांडून त्याच्या जवळ जमिनीवर आडवी पडली. तिने मिरचीची पुडी उघडली आणि त्याच्या चेहऱ्याकडे लाल मिरचीची पूड भिरकावली. तो डोळे चोळू लागला पण तरीही पुढे पळाला. अन्विताने जमिनीवर आडवे पडल्या पडल्या पुढे सरकून त्याचे पाय ओढले आणि तो तोंडावर आपटला. त्याला उताणे करून त्याच्या छातीवर बसून म्हणाली, "बोल, का करतो आहेस हे सगळे?" दोन थोबाडीत ठेऊन तिने पुन्हा विचारले "बोल लवकर!"

तेवढ्यात कॉलर पकडून निळ्या शर्टवाल्यालाही ओढत ओढत सायली तिथे घेऊन आली. सायलीने तोपर्यंत दुर्गेशला फोन करून सांगितले होते. तो पोलिसांना घेऊन येतच होता.

काळा शर्टवाला सांगू लागला, "मी सुपडू आणि तो निळा शर्टवाला दगडू! आम्ही दोघे बेरोजगार म्हणून शहरात आलो. कुठे जॉब मिळाला नाही. ड्रायव्हिंग चांगली येत होती पण तरीही कुठे नोकरी मिळालीच नाही. गावात घरच्या गरिबीमुळे शिक्षण पूर्ण झाले नाही. शहरात काहीतरी काम मिळेल या आशेने इथे आलो. नंतर रस्त्यावर झोपून दिवस आणि रात्री काढल्या. एकदा दगडूचा संबंध एका गुन्हेगारी टोळीशी आला. त्याने मला पण त्यात ओढले. आम्ही छोटी मोठी गुन्ह्याची कामे करू लागलो!"

"आम्हाला कशाला त्रास देत होतात?"

आता तिथे दुर्गेशसहित पोलीस पण येऊन पोहोचले होते.

"तुमची प्रतिस्पर्धी कंपनी तुमचे दर्जेदार प्रॉडक्ट बघून द्वेष करू लागली. हेल्दी कॉम्पिटीशन करून स्वतःचा दर्जा वाढवण्याऐवजी त्यांनी तुम्हाला शह देण्यासाठी, तुम्हा दोघांवर पाळत ठेवायला, तुम्हाला भीती घालवण्यासाठी आम्हाला नेमले. आमच्या बॉसकडे भली मोठी रक्कम त्यासाठी त्यांनी दिली. बॉसने आम्हाला काम सोपवले. तुमचे मन अस्थिर करायला, तुम्हाला दोघांना, विशेष करुन दुर्गेशला घाबरवण्यासाठी आम्हाला पैसे मिळत होते, जेणेकरून कंपनीचा मालकच मनाने अस्थिर झाला की, आपोआप कंपनीची उत्पादकता घटेल. कामावर परिणाम होईल. काल मीच दुर्गेशचा कारने पाठलाग केला पण काल दुर्गेशने भीतीऐवजी हिमंत निवडली आणि थांबून उलट माझाच पाठलाग सुरु केला. त्याच्या कारचा छोटासा एक्सीडेंट करून मला पळून जायचे होते, पण तोच थांबून माझ्याकडे येऊ लागला आणि मी घाबरलो. मी काही सराईत गुन्हेगार नाही. अशा प्रकारचे हे पहिलेच काम माझ्याकडे आले होते. पण पोटासाठी मी मजबूर होतो. मी दुर्गेशला मागे मागे नदीकडे घेऊन गेलो आणि दरम्यान मी दगडूला कॉल करून अन्विताला धमकीचा फोन करायला सांगितले, जेणेकरून ती दुर्गेशला कॉल करेल आणि मला तिथून निघून जाण्याची संधी मिळेल आणि तसेच झाले. नंतर मी दगडूला हे सुद्धा सांगितले की मी उद्यापासून ही अशी कामे करणार नाही. मी हे काम सोडून पुन्हा जॉब शोधेन नाहीतर गावी निघून जाईल. कारण माझे अंतर्मन मला ही कामे करण्यापासून रोखत होते आणि काल मी हे काम सोडायचे ठरवले. पण दगडूने बॉसला सांगून मला धमकावून आजही या कामात सामील केले. हे काम सोडले तर बॉस तुला ठार मारेल अशी धमकी दगडूने मला दिली. आज तुम्हा दोघींना घाबरवण्यासाठी मला यायचे होते पण मी काम नीट करेन की नाही याची शंका आल्याने माझ्यासोबत दगडूला पाठवण्यात आले. आमच्या दोघांचे भांडण झाले. त्यातच कार झाडाला धडकली, मग आम्ही पळू लागलो."

पोलिसांनी दगडूला हातकडी बांधली. दोघांना तुरुंगवास होणार होता.

दुर्गेश म्हणाला, "सुपडू, तुला पश्र्चाताप झाला आहे, याचा आनंद आहे. तुझ्या कामाबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. तुझ्या बोलण्यावरून वाटत आहे की तू काही फार मोठे गंभीर गुन्हे केलेले नाहीत आणि तसे जर खरेच असेल तर तुरुंगवास भोगून झाल्यावर तू माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करशील? लय भारी गाडी चालवतोस राव तू! मानलं पाहिजे तुला!"

पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, "दुर्गेश, याच्या गुन्ह्यांची कुंडली शोधून मी तुम्हाला देईनच. पण तरीही, याने तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरीवर घ्यायचे की नाही हा निर्णय मी पूर्णपणे तुमच्यावर सोपवतो! माझा त्या गोष्टीला समर्थन किंवा विरोध दोन्हीही असणार नाही! या दोघांच्या बॉसची चौकशी करून तुमच्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या कोणत्या माणसाने हे काम या दोघांना दिले हे लवकरच आम्ही पुराव्यासहित शोधून तुम्हाला सांगू!"

दुर्गेश आणि पोलिसांनी, सायली आणि अन्विता यांच्या शोर्याचे कौतुक केले आणि दोघा गुन्हेगारांना पकडून पोलीस घेऊन गेले. दुर्गेश आणि अन्विता यांनी सायलीचे खूप आभार मानले आणि तिला एक सुंदर अशी भेटवस्तू दिली.

पाठलाग

Nimish Navneet Sonar
Chapters
पाठलाग