Get it on Google Play
Download on the App Store

भाग 2

भाग 2

"तुम्ही असे करू शकत नाही. संध्याकाळी पाच वाजेनंतर आतमध्ये खूप धोका आहे! ज्यांनी ज्यांनी पाच वाजेनंतर तिथे जाण्याचा प्रयत्न केला ते आत गेले खरे, पण ते कधीही परत आले नाहीत."

"आम्ही नक्की जाणार. हे होईल ते होईल. एकदा आत जाऊन बघायचे आहे!"

त्या अद्भुत कथेने सर्वजण इतके प्रभावीत आणि प्रेरित झाले होते की आता आत जाण्यासाठी खूपच उत्सुक झालेले होते.

"तुम्ही ऐकणारच नसाल तर...!", शिवराज म्हणाला.

"तर काय?", अमर.

"तर मी पण तुमच्या सोबत येतो!", हसत हसत शिवराज त्यांना म्हणाला.

सर्वजण हसायला लागले. पण करण आणि स्वरा यांनी शंकेने एकमेकांकडे पाहिले.

शिवराज म्हणाला, "कारण, मलाही लहानपणापासून या गोष्टी ऐकून उत्सुकता आहे. म्हटलं चला, तुम्हा लोकांसोबत मलाही शोध घेता येईल! मात्र तुमच्या प्लॅनमध्ये थोडा बदल करावा लागेल."

"तो कोणता?"

"आपण सर्वजण एकत्र नाही तर दोन दोन जण मिळून एकच वेळेस गुहेमध्ये शोध मोहीम हाती घ्यायची! अवकाश गुहेत तर प्रवेश वर्जित आहे. त्यामुळे चार गुहा, आठजण! आणि हो, पाच वाजेनंतर प्रत्येक गुहेच्या आत जिथे जिथे प्रतिबंधित क्षेत्र आहे, तिथूनच आपल्याला शोध मोहीम हाती घ्यायची आहे!"

ते दहाही जण उद्याच्या साहसासाठी सज्ज झाले. क्लाराने आपले सामान बॅगमध्ये भरले आणि ते सर्वजण, करण आणि मित्र राहत असलेल्या झोपडीकडे चंद्रप्रकाशात चालायला लागले. परंतु त्यांच्या मनात शंका दाटून आली की शिवराज ज्याची फक्त अजय सोबत आज जुजबी ओळख आहे त्याला आपल्या सोबत घेण्यात धोका तर नाही ना? पण त्याला घेण्याचा एक फायदा होता की तो तेथील स्थानिक होता, त्यामुळे त्याची चांगली मदत होणार होती. आणि त्याला नाही म्हटले असते तर करण आणि मित्रांचा प्लॅन शिवराजला माहिती झाल्याने तो इतरांना सांगण्याचा आणि प्लॅनमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकला असता. त्यापेक्षा त्याला सोबत घेतलेले बरे, पुढचे पुढे बघता येईल असा विचार करण व त्याच्या मित्रांनी हळू बोलत बोलत केला जेव्हा शिवराज त्यांच्या मागून बऱ्याच अंतरावर कंदील घेऊन चालत होता.

पवनला रस्तोगी काकांचा फोन आला. आम्ही सर्वजण ठीक आहोत, असे त्याने सांगितले.

झोपडीत रात्री अजय हळूच सर्वांना उठवत झोपडीच्या बाहेर घेऊन आला. शिवराज बाजूला गाढ झोपलेला होता.

त्याने सर्वांना सावध केले, "हे बघा! हा शिवराज जरी माझ्या ओळखीचा असला तरी मला वाटते आपण सर्वांनी एकत्रच शोध मोहीम हाती घ्यावी. वेगवेगळे नको. वेगवेगळे जाण्यात धोका आहे!"

"मला तर आता वाटायला लागले आहे की हा खजिन्याचा प्लॅन कॅन्सल करा. कशाला उगाच नसत्या फंदात पडायचे?", मीनाने आपली शंका सांगितली.

"प्लॅन कॅन्सल नको, पण तुकड्यांनी जाण्यापेक्षा एकत्र जाणे हे मात्र योग्य राहील! आपण तसे सकाळी शिवराजला सांगू!", अजय म्हणाला.

"आपण म्हणजे तू सांग! तुझे ऐकेल तो!", करण म्हणाला.

"ठीक आहे!", अजय म्हणाला.

सकाळ उजाडली. सर्वांनी काळजीपूर्वक तयारी केली. आपापल्या बॅगमध्ये आवश्यक ते सर्व साहित्य त्यांनी घेतले. अजयने बाजूला नेऊन शिवराजला, सर्वांनी एकत्र जाणे कसे योग्य होईल ते समजावून सांगितले. वेळ लागेल तर चालेल पण सर्वजण एकत्र राहतील हे केव्हाही चांगले! आधी त्याने ऐकले नाही पण शेवटी तो तयार झाला. अजयने त्याला हेही बजावले की तो गावकऱ्यांना ह्या मोहिमेबद्दल काहीही सांगणार नाही. सगळे मिळून असेही ठरले की काहीही झाले तरी रात्री 9 वाजेच्या आत परत झोपडीकडे परत जायचे. करण आपली पार्क केलेली गाडी व्यवस्थित आहे की नाही ते बघून आला. शिवराज सकाळी एक तास त्याच्या गावात जाऊन आला. अनोखे साहस करण्यासाठी ते आता सज्ज झाले. खजिना नाही सापडला तरी गुहेतील प्रतिबंधित क्षेत्रात नेमके काय आहे ते तरी आज कळेल असे म्हणून सर्व सज्ज झाले.

त्यांना सर्वांना शिवराज कडून कळले की, प्रत्येक गुहेचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे ज्या त्या तत्त्वाच्या गुहेमध्ये आत मधल्या दगडी भिंतीवर थोड्या थोड्या अंतरांवर त्या त्या तत्त्वाचे चिन्ह कोरलेले होते. ते कोणी मानवांनी कोरलेले नसून आधीपासून जेव्हा या गुहा तयार झाल्या तेव्हापासून ते आपोआप तयार झालेले होते.

शिवराज हा धोतर, बंडी अशा गावकऱ्यांच्या वेशात होता, क्लाराने आकाशी कलरचा बटनांचा शर्ट आणि गडद निळी जीन्स तर इतरांनी आपापल्या आवडीचे पोशाख केले होते जसे मीनाने साडी घातली होती फक्त आज कलर वेगळा म्हणजे सोनेरी होता, करणचा नारिंगी कुर्ता आणि स्वराने पिवळा टीशर्ट आणि मिनी स्कर्ट, पवनने डार्क जांभळा शर्ट आणि क्रीम कलर पँट, अमरने हाफ बाहीचा बारीक चेक्सचा डार्क पिवळा शर्ट आणि प्लेन व्हाईट पँट, तर अजयने नेहमीप्रमाणे खादी कपडे घातले होते.

सर्वांनी गणपती बापपाचे नामस्मरण करून आपल्या साहसाला सुरुवात केली. सकाळी सर्वांनी चारही गुहा पर्यटक बघतात तशा बघून घेतल्या. कुठे कुठे प्रतिबंधित क्षेत्र आहे ते पाहून घेतले. माहिती देण्यासाठी शिवराज सोबत होताच. चार वाजले तसे सर्वजण पुन्हा अग्नि गुहेत शिरले आणि पाच वाजेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्राजवळ पोहोचले. तिथपर्यंत मोबाईलची थोडी थोडी रेंज येत होती. चालून चालून ते सर्वजण थकले होते. संपूर्ण गुहेत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, कारण सर्व गुहा इतक्या लांब लांब आणि खोल होत्या की ते शक्य सुद्धा नव्हते. पावणे पाच वाजले. अलार्म वाजला. सुरक्षा रक्षक सर्वांना बाहेर काढू लागले, मात्र हे आठही जण दोन दोनच्या जोडीने वेगवेगळ्या खडकांच्या मागे लपले. कडेकपारीत दडून बसले. इतर सर्व पर्यटक हळू हळू निघून गेले. गुहेतील सर्व कृत्रिम लाइट्स बंद करण्यात आले. अनेक शिटया मारून गार्डस निघून गेले. गुहेचे मुख्य लोखंडी गेट बंद केले गेले. आता अग्नि गुहेत फक्त ते आठ जण होते. आपापल्या लपलेल्या ठिकाणाहून ते सर्व बाहेर आले. अजयने हेडलॅम्प घातला आणि चालू केला. त्या प्रकाशात ते सर्वजण प्रतिबंधित क्षेत्र लिहिलेल्या ठिकाणाकडे चालू लागले. तिथे मोठा दगड होता. सर्वानी जोर लावला पण तो दगड सरकत नव्हता. दगडाच्या वरच्या बाजूने खूप उंचीवर मात्र एक छोटीशी फट किंवा जागा होती जिथून एक वेळेस एक माणूस आत शिरू शकत होता.

आजूबाजूचे मोठे दगड उचलून त्यांनी ते एकमेकांवर ठेवले आणि त्या दगडांचा पायऱ्यांसारखा उपयोग करून एक एक जण वरच्या बाजूला चढायला लागले. आधी क्लारा, मग मीना, स्वरा आणि त्यांच्या पाठोपाठ शिवराज आणि इतर सर्वजण चढले. हळूच त्या फटीतून क्लाराने आत मध्ये आपली बॅग फेकली आणि मग स्वतः उडी मारली. धप्प असा आवाज आला. पलीकडचा भाग इकडच्या भागापेक्षा बराचसा खोल वाटत होता. हळूहळू सर्व जणांनी आतमध्ये उडी टाकली. बॅग सहित आतमध्ये शिरणे शक्य नसल्याने आधी बॅग टाकण्यात आल्या. अजयने हेडलॅम्प आणि तसेच इतर दोघा तिघांनी हातात टॉर्च ठेवल्याने बरे झाले अन्यथा आत आतमध्ये ठार अंधार होता. शिवराजकडे स्वत:चा कंदील होता. तो साधा कंदील नसून खाण कामगार वापरतात तो डेव्ही लॅम्प होता. त्यात एक विशेष जाळी असते जी ज्योतीला वेढते. जेव्हा ऑक्सीजन पातळी कमी होते, तेव्हा लॅम्पची ज्योत मंदावते किंवा विझते. जर ज्योत मंदावली किंवा विझली तर, त्वरित गुफेतील बाहेर पडावे, कारण ऑक्सीजन पातळी कमी असल्याचे किंवा इतर काही काही धोकादायक वायू तिथे उपस्थित असल्याचे त्यावरून समजते.

सर्व जण अंदाज घेत घेत, एकमेकांना धीर देत पुढे चालू लागले. पायाखाली अस्थिर जमीन होती, काही ठिकाणी वाट ओलसर होती, त्यामुळे रस्ता निसरडा होता. अजयचा पाय घसरला पण तो पडता पडता वाचला कारण त्याचा हात मीनाने पकडला. त्याने थॅंक्स म्हटले आणि मीना लाजली. तिने त्याचा हात सोडला. ते सर्वजण पुढे जाऊ लागले तशी आर्द्रता वाढत गेली.

"एक मिनिट, एक मिनिट, काहीतरी आवाज आला!" असे म्हणून शिवराजने मागे वळून पहिले तर ज्या फटीतून ते सर्व आत आले ती बंद झाली होती. सर्वजण घाबरले. पण शिवराजने हिम्मत दिली, "हरकत नाही! हा मार्ग बंद झाला तरी दूसरा मार्ग कुठेतरी असेल तिथून बाहेर निघू!"

सर्वांना धीर आला. एक सांप सरसरत सर्वांच्या बाजूने गुहेच्या भिंतीवरून निघून गेला, त्याकडे अजय बघत वाळू लागला तर हेड लॅम्प च्या प्रकाशात सर्वांना तो साप एका भिंतीला टेकून बसलेल्या एका हाडांच्या सापळ्यावरून जातांना दिसला. तो साप कवटीतून बाहेर निघतांना कवटीच्या दातांची हालचाल झाली आणि ती कवटी कडकट्ट कडकट्ट अशी दात वाजवत हसत असल्याचा भास झाला. मीना किंकाळली आणि अजयला घट्ट बिलगली. करण दचकला आणि स्वर त्याला चिडवून हसू लागली. इतर जण घाबरून थोडे बाजूला झाले. साप वरच्या बाजूला कुठेतरी निघून गेला. क्लारा त्या सापाकडे एकटक बघत होती.

ते पुढे चालू लागले. गुहेच्या वर कुणीतरी डायनॉसोर सारखा भव्य प्राणी चालत असल्यासारखा आवाज आला यांनो गुहेला हादरे बसू लागले!

"अरे कसला आवाज हा? आणि कसले हादरे बसताहेत गुहेला! वर भूकंप झाला की काय?" करण.

"आणि आपण असे कुठपर्यंत चालायचे? मोबाईलचा पण सिग्नल आता गेला!", अमर.

"बापरे. कधी नाही एवढी भीती मला आज वाटते आहे. आपण परत जायचे का?" स्वरा.

"परतीचा दरवाजा बंद झाला आहे. आता फक्त पुढे चालत राहावे हेच बरे!" पवन.

"घाबरू नका सर्वजण! चालत रहा!" शिवराज.

"तेच म्हणतो मी!", मीनाला बाहू पाशातून दूर करत अजय म्हणाला.

"हो. आपण चालत राहायला हवे. मार्ग सापडेल!", मीना.

"कम ऑन! लेट्स गो. फॉलो मी!" क्लारा.

गुहेचे हादरे आता बंद झाले.

सर्वांच्या बोलण्याचा आणि आवाजाचा प्रतिध्वनि ऐकू येत होता. काही वेळाने सर्वजण शांत चालत असतांना अचानक हास्याचा प्रतिध्वनि ऐकू आला. त्यांच्यापैकी कुणी तर हसले नव्हते! मग आवाज कोठून आला? सर्वजण मनातून घाबरले पण कुणी तसे काही दाखवले नाही! गुहेतील अंधार गडद इतका होता की फक्त टॉर्च आणि लॅम्प पुरेसे नव्हते.

चालतांना मध्येच कोळयाचे जाळे तोंडाला चिटकत होते, ते बाजूला करावे लागत होते.

एक वटवाघूळ उडत अजयच्या तोंडावर झेपावले, त्याला हाताने फटकरून हाकलण्याच्या नादात त्याच्या डोक्यावरचा हेडलॅम्प निसटून दूर जाऊन खाली पडला. वटवाघूळ निघून गेले आणि कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसले. सर्वात मागे पवन चालत होता, तो म्हणाला, "मी आणतो तुझा लॅम्प परत. तेवढ्यासाठी मागे येऊ नको!"

आता अंधार आणखी गडद झाला. इतर टॉर्चच्या प्रकाशात ते चालू लागले.

आणखी किती पुढे चालायचे हा एक मोठा प्रश्नच होता. ते चालतच राहिले.

हेडलॅम्प उचलायला पवन मागच्या बाजूला एका कोपऱ्यात गेला आणि तो घेण्यासाठी खाली वाकला तर त्याला गुहेच्या भिंतीला लाकडाच्या दरवाज्यासारखे काहीतरी जाणवले. त्याने सहज ढकलून पहिले तर त्याचा हात उघडलेल्या दरवाज्याच्या आतमध्ये ओढला गेला आणि तो अनंत पोकळीत गेल्यासारखा हवेत तरंगून वेगाने एका दिशेने हातातल्या हेडलॅम्प सहित ओढला जाऊ लागला. बऱ्याच वेळाने त्याला जाणवले की, तो एका अंधाऱ्या मैदानात उभा आहे, त्याच्या डोक्याला हेडलॅम्प लावलेला आहे आणि आजूबाजूला दगडी भिंतींमध्ये अनंत लाकडी दरवाजे आहेत.

"हे मी कुठे आलो?" पवन घाबरला, "मी माझ्या मित्रांकडे कसा परत जाऊ?"

"वेळ वाया न घालवता कोणत्यातरी एक दरवाजात जाऊन बघतो!", असे म्हणून त्याने उजवीकडे एका दरवाज्यात प्रवेश केला.

तिथे त्याला हेडलॅम्पच्या उजेडात एक दृश्य दिसले.

समोर सुदर्शन चक्रामुळे तुकडे झालेले राहू केतू संतापलेले दिसत होते. त्यांनी एकत्र बसून भगवान शिवाची आराधना सुरु केली. बरीच वर्षे निघून गेली. भगवान शिव प्रसन्न झाले. राहू केतूनी त्यांना वरदान मागितले, "या पंचपालक परिसरात आमचे राज्य राहू द्या. जरी आम्हाला पंच महाभूत नियंत्रक मिळाले नाही तरी हे पाच तुकडे आमचे! तसेच आम्हाला अमृत नाही मिळाले तरीही समुद्र मंथनातून मिळलेला सर्व खजिना पाहिजे. आम्ही या पाच पर्वताखाली यांचे एक स्वतंत्र नागलोक स्थापन करू ज्याचे नाव असेल "राहू केतू नागलोक" आणि तो खजिना तिथे ठेऊ! जर कुणी ते पाच तत्वाचे गोळे आणि हा खजिना आमच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना जीवंत सोडणार नाही!"

भगवान शंकर तथास्तु म्हणाले आणि अंतर्धान पावण्यापूर्वी म्हणाले, "ठीक आहे,. पण जोपर्यंत हे पांच तत्वचे गोळे सुरक्षित आहेत तोपर्यंतच हा खजिना तुमचं राहील. एकदा का या पाच तत्वा पैकी एक जरी गोळा कुणी हस्तगत केला, की तुमचा खजिना पण सुरक्षित राहणार नाही! तेव्हा पंचतत्व गोळे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील. पण तुम्ही सर्व नाग कुणाला विनाकारण त्रास देणार नाही याचे मला वचन द्या"

राहू केतू दोघांनी तसे वचन दिले.

आपल्या निवासस्थानी श्रीविष्णू भगवान शंकरांना म्हणाले, "आपण फारच भोळे आहात, शिवजी! भक्तांना लगेच वरदान देऊन टाकता"

भगवान शंकर म्हणाले, "भक्तांच्या प्रार्थनेला मला हाक द्यावीच लागते आणि भक्त असले वरदान माझ्याकडून मागून घेतात. मी ते देतोही पण त्यात मी अशी मेख ठेवतो की भक्त उन्मत्त झाला आणि त्याने वरदान वाईट कामासाठी वापरले तर त्याचा विनाश निश्चित असतो!"

श्री विष्णू म्हणाले, "मी समजलो! आपली महिमा अगाध आहे, शिवजी!"

राहू केतू कडे आकाशातून खजिन्याचा वर्षाव झाला. त्यांनी आपल्या अंकित असलेल्या सापांच्या सर्व प्रकारांना आणि नागराजांना बोलावून घेतले. मग दोघांनी "राहू केतू नागलोक" पाच पर्वतांच्या खाली स्थापन केला. तिथे कालांतराने भव्य नागलोकचे निर्माण झाले. सगळीकडे नागकन्या, नाग कुमार दिसू लागले.

भगवान शिव पार्वतीला सांगत होते, "कर्कोटक नावाचा एक नाग होता, जो शक्तिशाली आणि बुद्धिमान होता. एके दिवशी, राजा परीक्षितला नाग लोकातल्या एका नागाने (तक्षक) दंश करून मारले होते. राजा परीक्षितचा पुत्र, जनमेजय, या घटनेने दुःखी आणि क्रोधित झाला आणि त्याने नाग यज्ञ आयोजित केला. या यज्ञात नागांचा संहार केला जात होता. कर्कोटकाला यज्ञातून वाचवण्यासाठी इंद्राने त्याला सांगितले की तो इतर कोणाही नागांच्या यज्ञात जाऊ नये. कर्कोटकाने इंद्राच्या सल्ल्याचा स्वीकार केला आणि जंगलात निघून गेला. कर्कोटक नागाने तपश्चर्या केली आणि माझ्या उपासनेत लीन झाला. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मी त्याला वरदान दिले की त्याच्या स्पर्शाने कोणत्याही वस्तूवर विषाचा प्रभाव होईल. या शक्तीने कर्कोटक आणखी शक्तिशाली झाला. त्याने आपल्या रक्तपासून अति विषारी अशी कर्कोटकी नागिन तयार केली. तिला राहू केतू यांनी त्यांच्या नागलोकाची राणी जाहीर केले! पुढे पुढे याला कर्कोटकी नागलोक असे नाव पडले. कर्कोटकी राहू केतू यांच्या अंकित होती!"

पार्वती देवी म्हणाल्या, "पण ते पाच तत्वांचे गोळे कुठे आहेत, नाथ?"

महादेव म्हणाले, "ते पाच गोळे त्या पाचही पर्वतांच्या मध्ये असलेल्या सहाव्या पर्वताच्या खाली असलेल्या गुहेत, एका तळ्यात मध्यभागी तरंगत असणाऱ्या पाच माश्यांच्या पोटात आहेत! ते तळे कर्कोटकी हिने विषारी केले आहे! पण जो कुणी त्या मध्यभागच्या सहाव्या पर्वताच्या टोकावर असलेल्या माझ्या मंदिराच्या घंटेतील जिभेच्या टोकावरील फुगीर भागात लपलेल्या नीलमणीचा स्पर्श त्या पाण्याला करेल, तेव्हा ते विषारी तळे निर्मल, विषरहित आणि स्वच्छ होईल आणि मग त्यातून कुणीही ते पंच तत्व गोल हस्तगत करू शकेल! त्यानंतर कर्कोटकी नागलोकाचा विनाश निश्चित आहे. त्यांनी पृथ्वीवरील मानवांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे! ही नीलमण्याची गोष्ट राहू केतू, कर्कोटकी किंवा त्यांच्या नागलोकतील कुणाला माहिती नाही!"

"पण मग नाथ, त्या मण्याबद्दल इतर कुणाला कसे आणि कधी माहिती होईल?"

"तू चिंता करू नकोस, पार्वती! वेळ आली की सर्व योग जुळून येतील!"

आता समोर अंधार होता. फक्त हेडलॅम्पचा प्रकाश होता. पवनने ओळखले की, हे सगळे लाकडी दरवाजे म्हणजे काळ नियंत्रण करणाऱ्या अवकाश गुहेचे भाग आहेत आणि अवकाश गुहेचे वेगवेगळ्या काळात जाणारे दरवाजे हे इतर चार गुहांच्या प्रतिबंधित क्षेत्रात उघडतात. म्हणजे मला आता लवकर माझ्या मित्रांकडे गेले पाहिजे आणि हे सर्व सांगितले पाहिजे!

अंदाजे एका दरवाजातून तो आत शिरला. मात्र तिथे त्याला वेगळे दृश्य दिसले.

कर्कोटकी समोर एक नागकन्या बसली होती. तिला कर्कोटकी सूचना देत होती, "चांगले झाले तू हेरगिरी करून सूचना आणलीस की ते पाच जण खजिना शोधायला आलेत. आता तू स्त्री रूपात त्यांच्या मध्ये सामील हो आणि त्यांना तुझ्या मागे आपल्या नाग लोकांत घेऊन ये! इथे आपण सर्वांना खतम करून टाकू!"

कर्कोटकी बाजूला झाली तेव्हा पवनला त्या नागकन्येचा चेहरा स्पष्ट दिसला. ती दुसरी तिसरी कोणी नसून क्लारा होती!

म्हणजे क्लारा सर्वांची दिशाभूल करायला आली होती तर! लवकर मित्रांकडे जाऊन त्यांना अलर्ट करणे भाग आहे. सगळे रहस्य तर कळले पण मित्रांकडे जायचे कसे?

आता पुन्हा सर्व मित्र ज्या गुहेत प्रवास करत आहेत त्या जागेवर त्याच काळात पुन्हा जायचे तर कोणता दरवाजा निवडायचा हे त्याला कळत नव्हते. सर्व दरवाजे थोड्या थोड्या वेळाने आपोआप आपली जागा बदलत होते. दरवाजांच्या वर्तुळामागे, आणखी काही दरवाजे, त्यामागे आणखी काही दरवाजे अशी अनंत वर्तुळे होती. प्रत्येक दरवाजा वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणारा होता.

पवनने हनुमानाचे मनोभावे स्मरण केले. तो हनुमानाचा भक्त होता. हनुमान भगवान शंकरांचाच एक अवतार!

शेवटी एका उजव्या बाजूला असलेल्या दरवाज्यात तो शिरला. ती पृथ्वी तत्त्वाच्या पर्वतामधली गुहाच होती. ठिकठिकाणी गुहेच्या भिंतीवर पृथ्वी तत्वाचे चिन्ह काढलेले होते. हेड लॅम्प च्या प्रकाशात तो पुढे पुढे जात राहिला. बरं झालं तर चालत राहिल्यावर त्याला भूक लागली. पाठीवर असलेल्या बॅगमध्ये असलेले थोडे ड्रायफ्रूट त्याने खाल्ले. सोबत बाटलीतील ऑरेंज ज्यूस प्यायला. त्यामुळे थोडी तरतरी आली. तो पुढे जात राहिला. सगळीकडे काळोख. बाहेरचे जग वेगवेगळे आणि ह्या गुहेमध्ये हा काळोख वेगळा. हा काळच वेगळा.

एके ठिकाणी त्याला एक ओबडधोबड अर्धा उघडलेला दगडी दरवाजा दिसला. त्या दरवाज्याच्या आत एक खोली होती. तिथे अंधारात कोणती तरी मानवी आकृती काहीतरी हातात घेऊन बघत होती. उत्सुकतेने पवनने त्या खोलीत प्रवेश केला आणि पुढे पुढे जाऊ लागला आणि त्या पाठमोऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर ठेवला. त्या व्यक्तीच्या हातात टॉर्च होता. तो खाली पडला. त्या व्यक्तीने मागे वळून पहिले आणि पवनच्या हेड लॅम्पचा प्रकाश त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पडला. तो अजय होता, ती खोली म्हणजे शस्त्रागार होती आणि अजय खूप घाबरलेला होता.

पवनने विचारले,"तू इथे कसा काय आलास?"

अजयने तोच प्रश्न त्यालाही केला, "अरे तू इथे काय करतोयस?"

"अरे तुझा हेड लॅम्प उचलायला मी वाकलो तेव्हा कुठल्यातरी वेगळ्या काळात वेगळ्या ठिकाणी येऊन पोहोचलो. मला या सर्व खजिन्याचे रहस्य माहीत झाले आहे. आणि बाकी सर्वजण कुठे आहेत?"

"अरे गडबड झाली आहे. घात झाला. सांगतो तुला सगळं. तू दिसला नाहीस त्यामुळे आम्ही तुला शोधत तिथेच थांबलो. आम्हाला काळजी वाटायला लागली. सर्वजण तुला हाक मारायला लागलो. क्लारा मात्र शांत होती. आणि तुला माहित आहे का, ती क्लारा एक नागकन्या आहे असे शिवराज म्हणाला. कारण त्याला तशी लक्षणे काल रात्री आपण टेन्ट मध्ये बोलत बसलो होतो तेव्हा दिसली. त्याने नागाचे रूपांतर क्लारामध्ये होताना रात्री पाहिले होते. म्हणूनच तो आपल्यात सामील झाला. आपली मदत करण्यासाठी. त्याने गुहेत क्लाराचे वागणे अधिकाधिक संशयास्पद वाटल्याने आणि ती आमची काहीतरी दिशाभूल करते असे असा संशय बळावल्याने आज आमच्या समोर क्लाराचे सत्य जाहीर केले तेव्हा तिचे डोळे लाल झाले, ती अर्धी साप आणि अर्धी मनुष्य बनली आणि तिने त्याच्यावर हल्ला केला. स्वरा आणि मीना शिवराजला वाचवायला म्हणून क्लाराला मागे खेचू लागल्या तेव्हा तिने दोघींना जोरात ढकलले. मी एक बाजूला पडलेला दगड उचलून क्लाराकडे फेकणार तेवढ्यात माझा पाय घसरून मी एका लाकडी दरवाजातून वेगळ्याच ठिकाणी आलो. तिच ही जागा. हे शस्त्र घर सापडले म्हणून मी दोन-चार शस्त्र उचलले. पण बघतो तर काय मला परत देण्याचा रस्ता सापडेना. तेवढ्यात तू आलास!"

"अरे हे ठिकाणच वेगळे नाही तर हा काळ सुद्धा वेगळा आहे!", असे म्हणून पवनने अजयला आपल्या सोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्याने बघितलेले सर्व दृश्य सांगितले, सर्व रहस्य सांगितले.

"बापरे किती आश्चर्यकारक आणि अद्भुत आहे हे सगळे! पण आता मला कळले की नीलमणी कुठे आहे... हा हा हा", अजय जोरात हसायला लागला आणि त्याचे रूपांतर क्लारामध्ये झाले.

"मी अजय नाही. मी क्लारा आहे. नागकन्या. कुणाचेही रूप घेऊ शकते! मी तुला जी कहाणी सांगितली त्यात अजय नाही तर मी दरवाज्यातून पडते. तू गायब झालास तेव्हा मला खात्री झाली होती की तू कोणत्यातरी काळ दरवाज्यातून कुठेतरी पडला असशील. मला तुला शोधायला मला यायचेच होते पण तेवढ्यात शिवराजने मी नागकन्या असल्याचे सर्वांना सांगितले आणि मी दरवाज्यातून पडले. वेगवेगळ्या काळ दरवाज्यातून तुझा पाठलाग करत करत मी इथपर्यंत आले! कर्कोटकीला शंका होतीच की नागलोक नष्ट करण्यासाठी भगवान शंकर यांनी काहीतरी उपाय केलेला आहे. आम्हा कुणा नागाला मात्र तो कधीही कळू शकणार नव्हता. कारण काही ठराविक दरवाज्यामध्ये आम्ही नाग लोकांपैकी कुणीही जाऊ शकत नाही हे मला माहीत होते. गेलेच तर नाग भस्म होतात. पण तू मात्र जाऊ शकशील हा अंदाज मला आला होता. तो खरा ठरला आणि तुला तो उपाय कळला. तुझ्याकडून मला कळला. आता तो नीलमणी मी मिळवणार आणि नष्ट करून टाकणार! आणि आता तुझा खेळ मी इथेच खलास करते!"

असे म्हणून क्लारा पवनकडे साप रुपात वेगाने झेपावली, पण पवनने डोळे मिटून हनुमान वडवानल स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. पवनने वर्तमानकाळाचे द्वार कोणते ते कळावे अशी प्रार्थना हनुमानाला केली आणि डोळे उघडून तो क्लाराला हुलकावणी देत गोलाकार फिरून बघू लागला. त्या सर्व गोल गोल फिरणाऱ्या अनंत वर्तुळातील दरवाजांमध्ये तिसऱ्या वर्तुळातील एका दरवाजावर पवनला हनुमानाची सावली आणि त्या सावलीच्या आजूबाजूला प्रखर प्रकाश दिसला.

"तेच द्वार त्या वर्तमानकाळाचे असावे ज्यातून मी आलो. हनुमानाने मला मार्ग दाखवला. तसे पहिले तर प्रत्येक द्वार हे कुणासाठी तरी वर्तमानकालच आहे. किती अद्भुत आहे हे काळाचे जग आणि भगवान शंकर स्वत: या सगळ्या क्लिष्ट काळरेषा हँडल करतात! बापरे!", असा विचार करून तो वेगाने त्या दरवाज्याकडे पळायला लागला.

कमरेपासून वर स्त्री आणि उरलेला भाग नागाची शेपटी अशा रुपात क्लारा हवेत त्याचा पाठलाग करू लागली. पवन तिला सारखी हुलकावणी देत होता. पहिले वर्तुळ पार करून दुसऱ्या वर्तुळात, तो पोहोचला. त्याचा पाठलाग करता करता ती नागकन्या चुकून दुसऱ्या स्तरातील वर्तुळामधल्या एका दरवाज्यात अनिच्छेने वेगामुळे फेकली गेली.

पवनने तिसऱ्या वर्तुळातील हनुमानाची सावली असलेला दरवाजा पकडला आणि त्यात उडी मारली. तो पुन्हा त्याच जागेवर आणि त्याच काळात पोहोचला जिथे तो अजयचा हेड लॅम्प उचलायला खाली वाकला होता. तो त्याने उचलला आणि अजयला हळूच मागे बोलावले. अजय त्याच्याकडे मागे गेला. अजयला चूप राहण्याची खूण करत भराभर त्याने अजयला हळूच सर्व अनुभव आणि कहाणी सांगितली. अजयचा सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता.

नंतर पुढे पवन म्हणाला, "आता आपण पुढची घटना घडण्याची वाट बघू. जोपर्यंत शिवराज आणि क्लारा यांच्यात लढाई होत नाही तोपर्यंत आपण शांत राहू आणि मग एकदा का क्लारा दरवाजातून पडली की सर्वांना आपण ही कहाणी सांगू आणि तिथून कसेही करून बाहेर पडू. मग लगेच आपण मंदिरातील घंटेतून नीलमणी घेऊ आणि तळ्यातून ते पंचतत्व गोल हस्तगत करू. पण ती क्लारा त्या दरवाजांचे रहस्य जाणते. ती कसेही करून काळ प्रवास करत करत आपल्या आधी मंदिरात पोचायला नको म्हणजे झालं!"


* * *