भाग ३
रस्त्यावरील लोकांनी तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेले. दोन्ही घरचे कुटुंबीय धावून आले. ऑपरेशनमध्ये तिचे मनगट कापावे लागले. त्या ट्रकचा तपास लागला नाही किंवा मग संपत कुमारने आपले राजकीय वजन वापरून सर्व पुरावे नष्ट केले ते सुद्धा कळू शकले नाही. संपत कुमार सुटल्यानंतरच ही घटना घडली यावरून सोनालीला अंदाज आला होता की हे त्याचेच काम असणार. परंतु तिच्याकडे पुरावा नव्हता. पण हरकत नाही, "मी नव्या जोमाने आणखी उभी राहील!" असा विचार करून तिने हार मानली नाही.
तिकडे इटली देशात इसाबेलाचे आदिनाथवर प्रेम जडले होते. उद्या सकाळी इटलीहून भारतात जाण्यासाठी त्याची फ्लाईट होती त्याच्या आदल्या रात्री उशिरा इसाबेला आणि आदिनाथ यांनी एकत्र जेवण केले. नंतर घरी परतत असता कार थांबवून इसाबेलाने आदिनाथच्या ध्यानीमनी नसताना त्याच्या ओठांचा किस घ्यायला सुरुवात केली. इसाबेला बुद्धिमान आणि कलेची जाणकार तर होतीच पण ती इतकी नाजूक आणि सुंदर होती की स्वतःहून ती कुणा पुरुषास समर्पित होत असेल तर कुणीही पुरुष तिला नाही म्हणू शकला नसता. सुरुवातीला आदिनाथने विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हढ्यात आदिनाथच्या आईचा फोन आला की, सोनालीचा एक्सीडेंट झालेला आहे.
त्याने जास्त पैसे देऊन अर्जंट रात्रीची फ्लाईट बुक केली. एअरपोर्टवरून तो तिला बाय करत असताना इसाबेलाचे डोळे पाणावले होते. आदिनाथचे सोनालीवर किती प्रेम आहे याचीही तीला कल्पना आली होती.
युरोपमधून परतल्यानंतर आदिनाथला कळले की सोनालीला नकली हात बसवावा लागणार होता. त्यासाठी खूप खर्च येणार होता. पण आता आदिनाथकडे खूप पैसा आला होता. त्यामुळे त्याने नकली हात बसवण्यासाठी जितके पैसे लागतील तितके खर्च करायचे ठरवले. सोनालीला प्रोस्थेटीक मायोइलेक्ट्रिक पद्धतीने हात बसवला गेला. मेडिकल क्षेत्र इतके पुढे गेले होते की अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये सेन्सरचा अंतर्भाव असल्याने ते मेंदूच्या सूचना नकली हाताला देऊन नकली हाताची आणि बोटांची हालचाल सुद्धा सोनालीच्या नुसत्या विचारांनी कंट्रोल होऊ शकणार होती.
कालांतराने काही दिवस दोघांचे नातेवाईक त्यांच्यासोबत मुंबईला मदतीसाठी थांबून झाल्यानंतर आपापली गावी परत गेले. सोनाली पूर्ण बरी व्हायला बरेच महिने लागले. पैसा सुद्धा पाण्यासारखा खर्च झाला. विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आजारी सुट्टी घेता येत नसल्यामुळे आता सोनालीचा पगार सुद्धा बंद झाला होता. पण सर्व परिस्थिती एकट्या आदिनाथने अतिशय संयमाने हाताळली.
कालांतरांनी सोनाली पुन्हा कामावर जायला लागली. तिने नेहमी मुद्दाम तिचा नकली यांत्रिक हात ओपन ठेवला त्यावर ती कसलेच आवरण घालत नसे. हा संपतकुमार साठी एक इशाराच होता. पत्रकारांवर होणारे हल्ले ही एकीकडे चिंतेची बाब बनली होती.
आर्यन मोठा होत होता. त्याच्या शिक्षणासाठी आता पैसा लागत होता. आदिनाथ आणि सोनाली दोघेही पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाले. दोघांच्या नात्यात पुन्हा एक प्रकारचा अनामिक तणाव जाणवू लागला कारण आता त्यांच्यात शारीरिक जवळीक साधत नव्हती. एक प्रकारचा वर्णन न करता येण्याजोगा दुरावा पुन्हा दोघांत निर्माण झाला होता. कुठे चुकते आहे आणि काय चुकते आहे हे दोघांनाही नीट समजत नव्हते. एकमेकांसाठी वेळ देणं पुन्हा कठीण झालं. आर्यनच्या संगोपनात दोघांनाही असं वाटत होतं की, एकमेकांचा पाठिंबा कमी पडतोय. सोनालीने आदिनाथला विचारलं, "आपल्याला कधी वेळ मिळणार आहे का एकत्र राहायला? आर्यनलाही तुझी खूप गरज आहे."
आदिनाथने उत्तर दिलं, "माझ्या करिअरच्या या टप्प्यावर आणि आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी मला हे सगळं आवश्यक आहे. तू समजून घेशील ना?"
सोनालीने समजून घेतलं, पण तिच्या मनात ताण वाढत राहिला.
अधून मधून आदिनाथच्या युरोपच्या फेऱ्या वाढल्या. इटलीत गेल्यावर आदिनाथला कळले की, इसाबेला तिचे राहते घर सोडून दुसऱ्या शहरात निघून गेली होती. तिचा कुठेही पत्ता लागला नाही मात्र तिने आदिनाथची कला आणखी जास्त लोकांपर्यंत पोचावी याची विविध प्रकारे व्यवस्था करून ठेवली होती.
आता सोनालीकडून पूर्वीसारखे काम होत नव्हते. तसेच तिच्या न्यूज चॅनेलने सुद्धा नवीन नवीन चेहरे घ्यायला सुरुवात केली. बातम्या सांगण्यासाठी त्यांना नवीन तरुण आणि सुंदर चेहरे हवे होते. सोनालीचे आता वय वाढत होते. पूर्वीसारखा कामात उत्साह वाटेनासा झाला.
याच काळात, तंत्रज्ञानात मोठा बदल झाला. एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ने पत्रकारितेचं क्षेत्र आणि कला क्षेत्रात प्रवेश केला. एआय थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून शिल्पकला तयार होऊ लागली आणि एआय पेंटिंग आणि कार्टून सुद्धा दोन मिनिटात बनवून देऊ लागला!
सोनालीच्या न्यूज चैनलने एआयवर आधारित बातम्या तयार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मानवी पत्रकारांच्या आणि अँकरच्या गरजा कमी झाल्या. आदिनाथच्या शिल्पकला क्षेत्रातही एआयने मोठी क्रांती घडवली, ज्यामुळे कलाकृतींना पूर्वीइतकं महत्त्व राहिलं नाही. त्याच्या शिल्पांची आणि पेंटिंग्सची मागणी कमी होऊ लागली.
दोघांच्याही करिअरवर एआयचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला. शेवटी, परिस्थिती अशी झाली की, सोनालीला तिच्या कामातून माघार घ्यावी लागली कारण तिला तिचा बॉस पुन्हा फील्डवर जाऊन बातम्यांचे वार्तांकन करायला सांगायला लागला, वाढत्या वयामुळे आता तिला ते शक्य नव्हते. शेवटी तिने नोकरी सोडली आणि स्वेच्छानिवृत्ती पत्करली. पीएफचे पैसे मिळाले हा एक दिलासा होता. तोपर्यंत आर्यन जुनियर कॉलेजमध्ये शिकत होता. सुरुवातीला हे खूप कठीण गेलं. त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का बसला होता.
परंतु, या अडचणीच्या काळात, त्यांनी एकमेकांना अधिक समजून घेतलं. त्यांनी ठरवलं की, आपल्या कौशल्यांना वापरण्याचा नवीन मार्ग शोधला.
आदिनाथच्या स्टुडिओमध्ये दोघांनी ट्रेनिंग क्लासेस सुरू केले. दोघांनी आपापल्या क्षेत्राशी संबंधित ट्रेनिंग पुढील पिढीला द्यायला सुरुवात केली. यूट्यूब चैनल सुरू केले, तसेच काही पुस्तके लिहिली. त्यांना कालांतराने त्यातून बरेच उत्पन्न मिळायला लागले. आता दोघांमध्ये पुन्हा पूर्वीसारखे आकर्षण आणि शारीरिक जवळीक निर्माण झाली.
सोनालीने तिच्या लेखनाची कला वाढवायला सुरुवात केली आणि स्वतंत्र लेखिका म्हणून काम करू लागली. आदिनाथने आपली कला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून जगाला लाईव्ह दाखवायला सुरुवात केली. यासोबतच तो एक अनोखी स्पर्धा भरवायला लागला. एखादी थीम देऊन स्वतंत्रपणे वेगळ्या रूममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चित्र काढायला लावायचे. त्याच थीमवर त्याच वेळेस आदिनाथ सुद्धा वेगळ्या रूम मध्ये चित्र काढायचा. मग दोन्ही चित्रे लोकांसमोर सादर केली जायची. शेवटी माणसाने घडवलेली चित्र अगदी सरस ठरले. असे ठीक ठिकाणी तो कार्यक्रम घेऊ लागला. लोकांना एआय पेक्षा आदिनाथने काढलेले चित्र आवडायचे. लोक त्याला त्याच्या अकाऊंटवर पैसे दान करायचे! कारण कृत्रिम ते शेवटी कृत्रिमच!
जगभरातील लोकसुद्धा सुरुवातीला एआयने प्रभावित झाले, पण नव्याचे नऊ दिवस! सगळीकडेच एआय आल्याने कालांतराने लोकांचा पुन्हा ओरिजिनल आणि नॅचरल गोष्टींकडे कल वाढला. कारण कितीही आणि काहीही केले तरी मानव निर्मित तंत्रज्ञान हे भगवंताने निर्माण केलेल्या मानवाला पर्याय ठरू शकत नाही!
पण आता तर एआयने लेखन क्षेत्रातसुद्धा प्रवेश केला. परंतु हाडामासाच्या माणसाने लिहिलेले लेख आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे लिहिलेले लेख यात फरकच होता. एआयचे लेख म्हणजे आत्मा हरवेलेले शरीर!
सोनालीचे विविध सामाजिक विषयावरील लेख इंटरनेटवर खूप लोकप्रिय झाले आणि आदिनाथच्या कलाकृतींना जगभरातून पुन्हा मान्यता मिळाली. त्यांनी त्यांच्या परिस्थितीतून नवीन संधी निर्माण केल्या आणि आपल्या कुटुंबाला पुन्हा आर्थिक स्थैर्य दिलं. दरम्यान, आर्यन मोठा होऊन कॉलेजमध्ये जायला लागला होता. त्याचा कल तंत्रज्ञानकडे जास्त होता आणि कॉम्प्युटर शाखा निवडून नंतर रिसर्च करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये क्रांती करणारी एक नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज शोधून काढली. कालांतराने तो जपान या देशामध्ये सेटल झाला. तिथेच त्याने जपानी मुलीशी लग्न करून संसार थाटला. कालांतराने आर्यनने त्याच्या ओळखीने त्याच्या वडिलांसाठी जपानमधील एनिमे कार्टून बनवण्यासाठी एक वर्क फ्रॉम होम नोकरी शोधून दिली!
या जीवन प्रवासात, आदिनाथ व सोनाली दोघांनी हे शिकून घेतलं की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी, एकमेकांचा आधार आणि प्रेम कायम ठेवलं तर काहीही अशक्य नाही. त्यांनी एकमेकांच्या सोबतीने सर्व अडचणींवर आणि संकटांवर मात केली.