अकल्पित
नाशिकच्या प्राईम लोकेशनवर असलेल्या कलाकार आर्ट गैलरी मध्ये कलाप्रेमी लोकांची झुंबड उडाली होती. मॉडर्न आर्ट च्या ह्या जागतिक कला संमेलनात जगभरातील अनेक नामवंत चित्रकारांची चित्रे प्रदर्शनासाठी उपलब्ध होती. उपस्थित असलेल्या कलासक्त रसिकांमध्ये कॉलेजच्या मुलांचा एक ग्रुप सुद्धा तेथे हजर होता.
शेफालीला मॉडर्न आर्ट मधले शष्प काही समजत नव्हते किंबहुना मॉडर्न आर्ट कशाशी खातात याचा तिला गंधही नव्हता. प्रदर्शनातील प्रत्येक चित्र तिला ‘उलट्या जिलबी’ प्रमाणे वाटत होते. पण काय करणार ती तिच्या कॉलेजच्या मित्र मंडळींच्या ग्रुप बरोबर आली होती त्यामुळे त्यांच्याबरोबर तिची फरफट अनिवार्य होती.
परंतु सर्व चित्रांपैकी एका चित्रावर तिची नजर पडली आणि ती जागच्या जागीच थबकली. कोण जाणे त्या चित्रात अशी कोणती विशेष गोष्ट होती? वरवर पाहता त्या चित्रामध्ये काहीही नव्हते. सध्या प्लेन कॅनव्हासवर एका माणसाची आकृती चितारली होती. त्याच्यामागे एक फळझाड होते आणि तो माणूस त्या झाडाचे फळ तोडण्याचा प्रयत्न करत होता. तो पुरुष इतका देखणा दिसत होता शेफाली त्या चित्राकडे एकटक पाहत इतकी मग्न झाली होती कि तिची मित्रमंडळी कधी पुढे निघून गेली ते तिला लक्षातच आलं नाही.
इतक्यात अचानक तिकडे अंधार पसरला कारण आर्ट गैलरीमधील वीज गेली होती अचानक शेफालीच्या दृष्टीस पडले कि त्या चित्रात असलेली ती मानवी आकृती अचानक जिवंत झाली होती.
“ ये मी तुझीच वाट पाहत होतो.” त्या चित्रातील तो माणूस अचानक बोलू लागला होता.
“क...कोण आहेस तू?” शेफालीने घाबरत घाबरत विचारले.
“घाबरू नकोस. माझ्या जवळ ये. मी तुझा प्रियकर आहे ,माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे.”
असे म्हणून तो चित्रातला माणूस आपल्या बाहुपाशात येण्याची तिला विनंती करू लागला. शेफाली घाबरून मागे सरकू पाहत होती पण तिचे पाय जणू काही एकाच जागी रोवले गेले होते.
आणि बघता बघता त्या चित्रातील व्यक्तीने शेफालीला आपल्या मिठीत जखडून घेतले. त्या दोघांच्या मधील भिंती अचानक कोसळून गेल्या. एक भयंकर वादळ सुटले. त्याने शेफालीला आपल्या विळख्यात घेतले होते. काही वेळाने ते वादळ शांत झाले तोपर्यंत शेफाली बेशुद्ध पडली होती.
जेव्हा शेफाली भानावर आली तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये एका सफेद बिछान्यावर होती. तिच्या कॉलेजचा संपूर्ण ग्रुप तिच्या चहू बाजूनी घोळका करून उभा होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर शेफालीसाठी वाटणारी काळजी स्पष्ट दिसून येत होती. शेफालीने डोळे उघडलेले पाहून तिच्या सर्व मित्र मैत्रिणींच्या जीवात जीव आला.
“ शेफाली, बरी आहेस न?” देवदत्त ने विचारले.
“हो पण...” शेफाली..
“ तू प्रदर्शनात चित्र बघताना अचानक बेशुद्ध होऊन पडलीस. म्हणून आम्ही तुला इकडे हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो. Thank god तू आता बरी आहेस.” प्रणव म्हणाला.
“ म्हणजे मी बेशुद्धावस्थेत स्वप्न पाहत होते...” शेफालीच्या तोंडून अस्फुट उद्गार बाहेर पडले.
पण हि फक्त स्वप्नांची सुरुवात होती. त्या दिवसानंतर तिला रोज अशी स्वप्न पडू लागली. प्रत्येक स्वप्नात तिला तीच मानवाकृती दिसत असे आणि तो माणूस तिला कवेत घेऊन प्रेमाच्या गोष्टी तिच्याशी करत असे.
“तुझ्या गर्भात माझ्या प्रेमाचे प्रतिक आकार घेत आहे..” एक दिवस तो तिला म्हणाला.
“अय्या...होका...मला कसं नाही माहित?” शेफालीने मस्करीच्या सुरात विचारले.
“ मी खरं बोलतोय...” तो फारच गंभीरपणे म्हणाला.
आणि शेफाली त्या स्वप्नातून खडबडून जागी झाली. तिने तिचा फोन चेक केला. तिचा सगळ्यात जवळचा मित्र देवदत्तने तिच्या whatsapp वर मेसेज केला होता.
“संध्याकाळी...मिसळ खायला जाऊया का?”
“हो...चालेल..” शेफालीने लाजत लाजत रिप्लाय टाईप केला.
“ संध्याकाळी तुला स्कूटर वरून पिक करतो मग स्तंभाजवळ जाऊ आपल्या नेहमीच्या ठिकाणी....” देवदत्तचा लगेच रिप्लाय आला.
शेफाली देवदत्त ला आवडत असे पण तो हे तिला कधी बोलला नव्हता. पण शेफालीला हि गोष्ट चांगलीच ठाऊक होती. तसे त्या दोघांना त्यांच्या ग्रुपमध्ये एकमेकांच्या नावाने चिडवत असत. त्या दोघानाही ते खूप आवडत असे म्हणून दोघे चिडवल्यावर फक्त गालातल्या गालात हसत.
“ काय झालं शेफाली? टेन्शन मध्ये दिसतेस..?” मिसळीवर रसाळ लिंबाची फोड पिळत पिळत देवदत्तने प्रश्न केला.
“टेन्शन नाहीरे.... पण मी एका अडचणीत सापडल्ये?” शेफाली
“ कसली अडचण..?”
“आजकाल मला रोज एकच विचित्र स्वप्न पडतय....” असे म्हणून शेफालीने त्याला स्वप्नात घडलेली गोष्ट सविस्तरपणे सांगितली.
“ मला असं वाटतंय कि त्या प्रदर्शनात पाहिलेल्या चित्राने तुझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. हि एक मानसिक अवस्था आहे जर एखादी गोष्ट आपल्या मनावर खूप प्रभाव पाडत असेल तर ती गोष्ट आपल्याला वारंवार स्वप्नात दिसू लागते.”
“ हो हे शक्य आहे. पण अरे त्या चित्रात असं काहीच खास नव्हतं ज्यामुळे तिचा माझ्या मनावर खोलवर परिणाम होईल.
“ असं आवश्यक नाही...एखादी गोष्ट आपल्या मनावर प्रभाव टाकेल त्यात काही खास असायलाच हवं. तू बरेचदा पाहिलं आसशील कि आपल्याला रील वर व्हायरल झालेलं गाणं बरेच वेळा गुणगुणावस वाटतं. एक्चुली ते गाणं फालतू असतं पण ते एकदम आपल्या डोक्यात जाऊन बसतं आणि मग हळूहळू आपल्या नकळत आपण ते गुणगुणायला लागतो.” देवदत्त
“ तसं नाही रे ते वेगळं...ते चित्र आणि ते वारंवार पडणारे स्वप्न हीच माझ्यासाठी सर्वात मोठी अडचण बनले आहे. असं वाटतय मी दुहेरी आयुष्य जगत्ये.” शेफाली.
“ मला वाटतं आपण एखाद्या चांगल्या सायकोलॉजिस्टला भेटूया...” देवदत्त म्हणाला.
“ म्हणजे देव, तुला असं वाटतय कि मला वेड लागलंय?” शेफालीने हलकेच देवदत्तच्या खांद्यावर फटका दिला.
“ अगं... मी असं म्हणालो का?” देवदत्त
“ मला वाटतं तू बरोबर बोलतोयस....” असे म्हणून शेफालीने दोन्ही हातानी आपलं डोकं पकडलं..
“काय झालं...?” देवदत्त घाबरला
“ मला चक्कर येत्ये..” शेफाली म्हणाली तिचा बोलताना तोल जात होता.
“असं वाटतंय कि त्या स्वप्नामुळे तुझी तब्ब्येत ढासळली आहे. चल आपण डॉक्टरांना भेटूया.” देवदत्तने तिचा हात धरून तिला आधार दिला.
जवळच असलेल्या संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये तो तिला घेऊन गेला.
डॉक्टर गोस्वामी शेफालीची नाडीपरीक्षा करत होते.
“ एक्स्क्यूज मी....” असं म्हणून त्यांनी देवदत्तला एकांतात बोलावले. “ आता तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्ही बाबा होणार आहात. तुमची पत्नी तीन महिन्यांची गरोदर आहे.” डॉक्टर
“काय?..” देवदत्तला काय बोलावे हे कळेनासे झाले होते.परंतु त्याचे शेफालीवर जीवापाड प्रेम होते म्हणून तो तेव्हा काहीच बोलला नाही.
“ अजून एक महत्वाची गोष्ट अशी कि यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे.” डॉक्टर म्हणाले.
आता देवदत्त पुरता घाबरला होता.
“ हे बघा, त्यांची प्रकृती गंभीर आहे. तुम्ही त्यांचे पती आहात म्हणून मी तुम्हाला काही पथ्य सांगणार आहे त्याची तुम्ही नीट काळजी घेतलीत तर बरे होईल.” डॉक्टर
हे सगळं नीट ऐकून घेतल्यानंतर देवदत्त भानावर आला. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि तो म्हणाला...
“माफ करा डॉक्टर परंतु शेफाली आणि मी पतीपत्नी नाही आहोत. हे कसे शक्य आहे?”
“ओह. सॉरी माझा गैरसमज झाला. परंतु शेफाली ३ महिन्यांची गरोदर आहे हे निश्चित.” डॉक्टर
इतक्यात शेफाली देखील चेकअप रूम मधून बाहेर आली होती. तिने डॉक्टर गोस्वामी यांचे म्हणणे ऐकले आणि ती जवळपास किंचाळलीच ..
“ नाही...हे शक्य नाही.”
हि बातमी ऐकून शेफालीच्या ग्रुपमध्ये चर्चांना उधाण आलं.
“ लग्नाआधीच गरोदर?...मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके पोचलेले असाल.” समीप सिगरेटचा झुरका घेत म्हणाला.
“ हे बघ समीप तुला वाटतंय तसं काही नाहीये.” देवदत्त नाराजीच्या सुरात म्हणाला.
आता प्रकरण हमरीतुमरी वर येणार हे लक्षात येताच स्नेहल मध्ये पडली.
“ओके ओके ....भांडू नका..नक्कीच तिच्याबरोबर काहीतरी अघटीत घडले असेल.मी आणि शेफाली बेस्ट फ्रेंड्स आहोत जर तिच्या बाबतीत काही चुकीचं घडलं असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं”
“ मग दोनच शक्यता असू शकतात. एकतर डॉक्टरांचे निदान चुकीचं आहे किंवा काहीतरी चमत्कार घडला आहे.” समीपने सिगरेटचा शेवटचा झुरका घेतला आणि उरलेलं थोटूक पायाखाली विझवले.
“ अरे पण आजकाल वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान इतकं प्रगत झालंय त्यात चमत्कार वगैरे थोतांड कोण मानत नाही.” स्नेहल म्हणाली
आणि अशाप्रकारे ती चर्चा निष्फळच ठरली.
...........
“ तुझ्या पोटात जो गर्भ वाढतोय तो माझाच आहे.” शेफाली स्वप्नात त्या व्यक्तीचा आवाज ऐकत होती.
“तू जे काही सांगतोयस त्यावर मी कसा काय विश्वास ठेवू? आणि तू मला स्वप्नात जे काही सांगतोयस ते माझ्या खऱ्या आयुष्यात कसे घडू शकते?” शेफाली स्वप्न पाहत होती हे तिला चांगलेच लक्षात होते.
“विश्वास तर तुला ठेवावाच लागेल. आता नाही तर मग अपत्य जन्माला आले कि नक्की विश्वास ठेवशील.” तो
“ अरे यार, पण तू कोण आहेस? आणि का त्रास देतोयस मला?” शेफाली वैतागून गेली.
“मी कुठे त्रास देतोय? मी तर तुझ्यावर प्रेम करतो. माझी तर अशी इच्छा आहे कि तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि आपल्या अपत्याचा जन्म झाल्यावर मीच त्याचं पालनपोषण करेन. तुला कोणतीही चिंता करायची आवश्यकता नाही.”
“तू कसं पालनपोषण करणार आहेस? नेहमी तर स्वप्नातच भेटतोस मला...” शेफालीने तिची खंत व्यक्त केली.
“हो, पण मी काय करू माझा नाईलाज आहे कि मी या जगात तुला प्रत्यक्ष भेटू शकत नाही.” तो उदासपणे म्हणाला
“ कसला नाईलाज..?” शेफाली
“ आपल्या दोघांमध्ये असलेल्या मितींच्या फरकामुळे मी तुमच्या जगात येऊन कायमचा राहू शकत नाही.” तो
“ म्हणजे? मला काहीच समजत नाहीये....”
“ हे संपूर्ण विश्व सात मिती म्हणजे डायमेन्शनचे बनलेले आहे. यातील चार मिती म्हणजे डायमेन्शन तुम्हाला व्यवस्थित माहित आहेत. लांबी, रुंदी, खोली आणि काल या चार मिती.” तो.
“ हो आम्हाला कॉलेज मध्ये या चारही डायमेन्शन बद्दल एक चाप्टर होता.” शेफाली म्हणाली.
“ तुमच्या आसपास राहणारे सगळे प्राणी या चारही डायमेन्शन द्वारे निर्माण झालेले आहेत आणि तुम्ही सर्व त्या मितींचा अनुभव घेत असता. त्यातील एखाद्या मितीला जरी धक्का लागला तरी संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.” तो
“ अच्छा...पण हे सगळं तू मला का सांगतोयस?” शेफाली गोंधळून गेली होती.
“ मी हे तुला सांगतोय कारण तुझे ज्या चार डायमेन्शन मध्ये अस्तित्व आहे त्या चारही डायमेन्शन मध्ये माझे अस्तित्व नाही.” तो
“ मग कोणत्या डायमेन्शन मध्ये आहे?” शेफाली
“ आमचे अस्तित्व उर्वरित तीन मितींमध्ये आहे. त्यामुळे मी तुला प्रत्यक्षात भेटू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जसे 2D मध्ये चित्र फक्त दिसू शकतात परंतु प्रत्यक्षात त्यांना स्पर्श करता येत नाही.” तो म्हणाला.
“जर तू मला प्रत्यक्षात भेटू शकत नाहीस मग माझ्या पोटात तुझा गर्भ कसा काय वाढू शकतो. कारण तो तर या पृथ्वीवरील चार डायमेन्शन मध्ये जगणार जीव आहे.” त्याने शेफालीचे म्हणणे ऐकले आणि तो पुढे बोलू लागला.
“ हे बघ शेफाली, जर एखादे अस्तित्व दोन निरनिराळ्या मितींच्या एकत्रीकरणाने निर्माण होत असेल तर त्याचे अस्तित्व कमी मितींच्या समूहात गणना केली जाते. गणिताच्या या नियमानुसार माझे अपत्य या जन्माला जगात येणार आहे. आणि त्याच्या शरीरामार्फत मी या जगत प्रवेश करू शकेन.” तो म्हणाला
शेफाली आता मात्र पूर्णपणे विचारमग्न झाली, “ मी किती कमनशिबी आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी आई होणार आहे याचा आनंद मी माझ्या प्रियजनांसोबत साजरा करू शकत नाही. हा काय खेळ मांडला आहेस? ”
“ शेफाली अगं त्या दिवशी तू आर्ट गैलरी मध्ये दिसलीस आणि पाहता क्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलो. वास्तविक आमच्या जगात तुमच्या जगातील व्यक्तींशी संपर्क साधणे बेकायदेशीर आहे. तरीही ती जोखीम पत्करली आणि त्या चित्राच्या रूपाने तुझ्यासमोर आलो.” तो
“ म्हणजे तुला तुझे स्वत:चे असे स्थूल शरीर किंवा रूप नाहीये?” शेफालीने आश्चर्याने विचारले.
“ आमच्या जगात कोणाचाही निश्चित असा आकार नसतो. आम्ही लोकांच्या समोर प्रकट होण्यासाठी हवं तो आकार धारण करू शकतो.” तो म्हणाला.
इतक्यात त्याची नजर एका ठिकाणी खिळली तो चळचळ कापत होता. त्याचा चेहरा पिवळा पडला होता.
“काय झालं?” त्याची हि अवस्था पाहून शेफालीने विचारले.
त्याने एका ठिकाणी इशारा केला तेव्हा शेफालीला दिसले कि एका चित्रातील झाडावर दोन माश्या बसलेल्या होत्या.
“ या तर माश्या आहेत. त्यांना पाहून इतकं घाबरायला काय झालं?”शेफाली.
“ शेफाली, या माश्या नाहीयेत, यातील एक पोलीस आहे.”
“ एक माशी पोलीस आहे?...” शेफाली जोरजोरात हसू लागली.
इतक्यात त्या दोन्ही माश्यांचा आकार हळू हळू मोठा होऊ लागला. काही वेळातच त्यांचा आकार माणसाइतका झाला. शेफालीला दिसले त्यातील एक माशी त्या चित्रातील व्यक्तीला रागाने बघत होती.
“ तर तुझे दुसऱ्या जगात येऊन हे धंदे चालले आहेत? तू आपल्या जगातील कायद्याचे उल्लंघन केले आहेस. तुला काय शिक्षा द्यावी? सांग.” ती माशी मराठीत बोलत होती.
“माफ करा साहेब. माझी चूक झाली.”
“ हि चूक नाहीये. हा गुन्हा आहे. दंडनीय गुन्हा. तू दुसऱ्या जगातील स्त्री बरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केलेस आणि आपल्या जगाचे रहस्य देखील तिला सांगितलेस. या गुन्ह्याची शिक्षा आहे मृत्युदंड!” असे म्हणून त्या माशीने दुसऱ्या माशीला इशारा केला.
दुसरी माशी पुढे पुढे गेली आणि त्या माशीने त्या चित्रातील व्यक्तीला आपल्या नांगीत जखडून घ्यायला सुरुवात केली. तो व्यक्ती जीवाच्या आकांताने ओरडत होता परंतु त्याचे काही एक ऐकून घेतले गेले नाही. काही क्षणातच त्या माशीने ते संपूर्ण चित्र गिळून टाकले.
आता पोलीस माशी शेफाली कडे वळली.
“तू आमच्या जगातील प्राणी नाहीस त्यामुळे तुला शासन करण्याचा मला अधिकार नाही. ” त्या माशीने पुन्हा लहान रूप धारण केले आणि ती लुप्त झाली.
दुसऱ्या दिवशी देवदत्त आणि शेफाली तिच्या घराजवळील बागेत एका बाकावर बसले होते.
“ तू मला इकडे का बोलावलं आहेस देव?” बराच वेळेची शांतता भंग करणारा प्रश्न शेफालीने केला.
“ शेफाली, मला तुला काही तरी सांगायचं आहे.” देवदत्त तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता.
“ का काही विशेष?” शेफाली
“ हो शेफाली...तुझ्या पोटात जो गर्भ वाढतोय त्याचा बाप मी आहे...” देवदत्त
“ देव, या स्वप्नांमुळे आधीच वैतागले आहे त्यात तुला मस्करी सुचत्ये?”
“ मी मस्करी नाही करत.” देवदत्त गंभीर चेहरा करून बोलत होता. “ मी खूप दिवस झाले तुला हि गोष्ट सांगीन म्हणत होतो परंतु मला हिम्मतच होत नव्हती.”
“ अरे पण हे सगळं कसं शक्य आहे?”
“ शेफाली आज मी तुला सगळं काही खरं खरं सांगून टाकायचं असं ठरवलं आहे. आर्ट गैलरी मधील चित्रांचे प्रदर्शन पाहण्याआधी ठीक एक दहा पंधरा दिवस आधी जेव्हा तू माझ्या रूमवर आली होतीस तेव्हा तुझं डोकं दुखत होतं. आठवतंय का?” देव
“ हो...” शेफाली.
“ ते डोकं दुखायचं कारण मी तुला दिलेलं डेरी मिल्क होतं. त्यात मी गुंगीचं औषध मिक्स केलं होतं. त्यामुळे तुला गुंगी आली आणि तू झोपलीस तेव्हा मी तुझा पूर्ण उपभोग घेतला. मला तेव्हा काय झालं होतं ते कळलच नाही माझ्या डोक्यात कोणता सैतान आला होता कोण जाणे. मी तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागलो. ” देवदत्त सांगत होता.
हे सगळं ऐकून शेफालीने एक दीर्घ श्वास घेतला.
“ तू मूर्ख आहेस का देव? तुला जर माझ्याकडून तेच हवं होतं तर मग तू मला सांगितलं का नाहीस?”
“ सॉरी माझं चुकलं पण तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे कि मागे एकदा वैद्यकीय चाचणी मध्ये चेक केलं होतं तेव्हा कळलं होतं कि माझा स्पर्म काउंट खूपच कमी आहे त्यामुळे मी बाप बनू शकत नाही. पण त्या दिवसानंतर तू गरोदर झालीस त्यामुळे पहिले मी घाबरलो पण मला आनंद सुद्धा झाला. आपण लग्न करूया का?” देव
“ पण देव....” शेफाली
“....प्लीज शेफाली आता नाही म्हणून नकोस. माझं चुकलं..माझी चूक सुधारण्याची मला संधी दे..”
शेफालीबरोबर जे काही घडलं होतं ते तिच्या व्यतिरिक्त कोणालाही माहित नव्हतं. तिनेही पुढे त्याची कोणाकडेही वाच्यता केली नाही.
शेफालीने एक खूप मोठे रहस्य आपल्या मनात लपवून ठेवले होते तिला वाटत होते कि देवदत्तला खरंच काही माहित नाही. परंतु देवदत्त बाप बनू शकत नव्हता हेही तितकेच खरे होते. त्याने तिच्याशी लग्न करायची इच्छा व्यक्त करून त्याचे शेफालीवरील प्रेम सिद्ध केले होते.
पुढे दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्या दोघांचे लग्न पार पडले. आणि लग्नानंतर केवळ सात महिन्यातच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. तो मुलगा अगदी त्या चित्रातील व्यक्तीसारखा दिसत होता. त्या चित्रातील व्यक्तीचा या जगात प्रवेश झाला होता. असे अनेक दुसऱ्या जगतातील जीव आपल्या जगत चंचू प्रवेश करू शकतात. सावध रहा.