Get it on Google Play
Download on the App Store

रिसायकल्ड एंड युज्ड

२०३६

DR&D, वाशी, नवीमुंबई   

ती प्रयोगशाळा एखाद्या वाचनालयाप्रमाणे शांत भासत होती. अगदी टाचणी जमिनीवर पडली तरी तिचा आवाज येईल इतपत शांत! कारण प्रत्येकाने त्यांच्या विशिष्ट असाइनमेंटवर व्यवस्थित लक्ष केंद्रित केले होते. 

डॉ. देवव्रत थलपथि आणि त्यांच्या पुरोगामी, साधनसंपन्न शास्त्रज्ञांच्या आणि विचारवंतांच्या टीमसाठी हा ३६४८  वा दिवस होता.  जवळपास गेली १० वर्ष ते या प्रोजेक्टवर काम करत होते.

डॉ. थलपथि , एके काळचे नावाजलेले प्रस्थ! एक कार्यकाळ त्यांनी मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर म्हणून गाजवला होता. परंतु त्यांना यापेक्षा अधिक काहीतरी महान साध्य करायचे होते आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आपली नोकरी सोडून दिली होती आणि ते या संशोधन कार्यांत गुंतले होते.

"मी प्रचंड विज्ञानवादी आणि वास्तववादी आहे,"

हे बोलत असताना डॉ. प्रयोगशाळेतील प्रत्येक टेबलाजवळून चालत होते.

"तुम्ही सर्वजण मानवतेसाठी माझ्या योगदानाचा अविभाज्य भाग आहात. आपण सर्व मिळून या जगात चांगला बदल घडवून आणूया ."

जेनेटिक मॅपिंग प्रणालीचे अध्वर्यू म्हणून, त्यांना वैज्ञानिक वर्तुळात नाव कमावण्याची मनापासून इच्छा होती.  गुप्तपणे अविरत केलेले संशोधन आणि प्रयोग हे मानवजातीच्या भावी पिढ्यांसाठी औदासिन्य, पक्षपात, गरिबी आणि अज्ञान यांसारख्या समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली आहे यावर त्यांचा मनापासून विश्वास होता.

त्यांनी निवडलेले सब्जेक्टस म्हणजेच व्यक्ती पराग आणि समीक्षा त्यांच्या या अशा संशोधनासाठी परिपूर्ण होते परंतु त्यांना त्यांच्या वैज्ञानिक योगदानाबद्दल पूर्णपणे माहिती नव्हती.

डॉ. थलपथि यांच्या कामाच्या अशा पद्धतींने अनेकांना अंधारात ठेवले.  त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना तोंडदेखली किंमत दिली जात होती पण डॉ. थलपथी यांना केवळ प्रोजेक्टचे परिणाम महत्त्वाचे वाटत होते होते. जर ते त्यांचे जेनेटिक मॅपिंगचे सिद्धांत आणि पद्धती सिद्ध करू शकले तर संपूर्ण जग त्यांना महान समजेल हे त्यांना ज्ञात होते.

या फाजील आत्मविश्वासामुळे ते स्वत:ला देव समजू लागले होते ज्यामुळे त्यांचे अर्धे अधिक आयुष्य वाया गेले होते.

"जेव्हा हे संशोधन पूर्ण होईल, तेव्हा मी तुम्हाला निवडल्याबद्दल तुम्ही माझे आभार मानाल...! " त्यांनी त्यांच्या टीमला सांगितले. 

त्यांच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने त्या जोडप्याच्या प्रयोगशाळेबाहेरील दिवसभराच्या विविध हालचाली दाखवल्या.  स्वच्छतेचे आणि निर्जंतुकीकरणाचे सर्व नियम उत्तम प्रकारे पाळत होते. पराग आणि समीक्षा यांना प्रयोगशाळेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा ते पुरेपूर आनंद उपभोगत होते.

सुरक्षित आणि सुकर आयुष्यासाठी ते दोघे मुंबई च्या पवईच्या पॉश एरियामध्ये स्थायिक झाले होते. परिपूर्ण कपल कसे असावे याचे ते दोघे उत्तम उदाहरण होते. समीक्षा तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या आईवडिलांच्या निधनानंतर गावची जमीन विकून तिने पवईच्या उंच बिल्डींगमध्ये ब्लॉक खरेदी केला. १५ करोड किमतीच्या ब्लॉकसाठी दीड करोड डाऊनपेमेंट समीक्षाने केला होता तर लोन चे हफ्ते पराग आणि समीक्षा दोघ मिळून फेडत होते. दोघांची एक एक अशा दोन स्वतंत्र कार सुद्धा होत्याच. अशाप्रकारे गेल्या १० वर्षांपासून दोघे अत्यंत समृद्ध आणि प्रगतीशील आयुष्य जगत होते.

आजचा रविवारचा दिवस नेहमी सारखाच प्रसन्न वाटत होता. सकाळी सकाळी त्यांच्या पूर्वाभिमुखी किचनच्या खिडकीतून कोवळी सूर्यकिरणे थेट त्यांच्या मोड्युलर किचनच्या इनबिल्ट पीएनजी बर्नर असलेल्या मार्बलच्या ओट्यावर पडली होती, ज्यामुळे तो आपोआप निर्जंतुक होत होता. डिशवॉशर त्याला फीड केलेली भांडी धुवून काढत होता. जमिनीवर त्यांचा स्वीपिंग एंड मॉपिंग रोबोट केर काढून लगेच प्रत्येक लादी स्वच्छ पुसून काढत होता.

“आजचे बाहेरचे हवामान आल्हाददायक असेल. शक्य असेल तर बाहेर फिरायला जा”

न्यूजकास्टरने कॅमेरा शहराच्या क्षितिजावर झूम इन करत करत सल्ला दिला. मुंबई चे वातावरण तसे उष्ण, पावसाळ्यात बाहेर पडणे कठीण, पण सध्या थंडीचे दिवस होते त्यामुळे असला चोंबडा सल्ला न्यूजकास्टरने न विचारता देऊन टाकला.

"हो खरंच मला वाटतं की प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या निरनिराळ्या करून त्या बाटल्यांचा पुनर्वापर करणे ही एक उत्कृष्ट कल्पना आहे"

समीक्षा ब्लूटूथ कानाला लावून मैत्रिणीशी गप्पा मारत होती. 

"यामुळे पर्यावरणाला मदत होते आणि जगात साठणारा कचरा कमी करायला मदत होते. त्यामुळे गेली १० वर्ष  मी हा खटाटोप करायला तयार झाल्ये न. काय करायचं ते घरातच आणि मग दारात नेऊन ठेवायचं ईतकच...नाही नाही बाकी काही नाही.....नाही. "  ती हसली. “मी आता डीमार्ट ला जाणार आहे...तू येतेस का? नवीन डिजिटल ट्रॉली आल्यात म्हणे तिकडे सामान आत टाकलं कि लगेच बिल दिसत वगैरे...बघायचंय मला कसंय ते...”  

सकाळचे १०  वाजून गेले होते. तरी पराग गाढ झोपला होता. उद्याला तो नेहमीप्रमाणे व्यस्त असेल. आज त्याला जास्तीच्या विश्रांतीची गरज होती. 

तसे ते दोघे नोकरीतून निवृत्त व्हायला बराच अवकाश होता. पण त्या दोघांचे स्वतंत्र आर्थिक नियोजन होते. एनपीएस, म्यूचुअल फंड, शेअर मार्केट, क्रिप्टो अशा विविध मार्गांनी गुंतवणूक देखील करत होते.

तो एक प्रतिष्ठित सॉफ्टवेअर डेव्हलपर होता आणि ती एका मोठ्या बी-स्कूल मध्ये   प्राथमिक शिक्षिका होती. ते दोघे खूप निरोगी आणि आनंदी होते. नियमित चेकअप्स आणि मेडिकल सल्ला तसेच कीटकनाशकमुक्त, खतमुक्त सेंद्रिय आहारामुळे त्यांना निरोगी राहण्यासाठी मदत होत होती.

मुलांबद्दलची त्यांची आशा मात्र पूर्ण झाली नव्हती. अनेक वर्षांपूर्वी गर्भपात झाल्यानंतर, समीक्षाने पराग ला वचन देण्यास सांगितले की ते पुन्हा प्रयत्न करणार नाहीत. हा अनुभव तिच्यासाठी खूप जास्त असह्य होता. दोघांनीही  हे मान्य केले होते  की हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

“ पराग, तू अजूनही वाढदिवसाच्या पार्टीला जायचा विचारच करतोयस का? मला वाटतं स्वानंदला तुला भेटण्याची मनापासून इच्छा आहे. एकच तर दिवस आहे ती पार्टी आणि दुपारी ३ नंतर सुरु होणारे.” समीक्षाने हॉलमधूनच विचारले.

पराग  आता झोपेतून जागा झाला होता पण तरीही बेडवर बसलेलाच होता. त्याची तब्ब्येत जरा नरम होती. 

"हो, आठवण करून दिल्याबद्दल आभार मानतो," पराग म्हणाला.  "पण अगदी मनापासून सांगायचं तर मला खरोखर जायची इच्छा नाही..." 

"पराग! जायची इच्छा का नाही? बाकी काही नसलं तर स्वानंदचा केटरर फिक्स असतो. किमान जेवण चांगलं असतंच . तुला नसेल जायचं तर जास्त वेळ थांबू नकोस पण फक्त तुझा चेहरा दाखव आणि ये."  तिने काही वैयक्तिक वस्तू गोळा करून पर्समध्ये टाकल्या आणि ओठांना लिपस्टिक लावली.

"पराग, किमान स्वत: च्या रेप्युटेशनसाठी आणि स्वानंदच्या मैत्रीसाठी तरी किमान...?... " ती पुढे म्हणाली. त्याने ऐकले पण प्रतिसाद दिला नाही आणि एक मोठा उसासा टाकला.

"ठीक आहे, मी डी मार्टला जात्ये आणि लगेच परत येणार आहे. तुला काही हव आहे का? मी तुझ्यासाठी कॉफी तयार करून ठेवली आहे." समीक्षाने तिची पर्स, कारची चावी घेतली आणि ती निघून गेली.

इतक्यात पराग ला आठवले की त्याने बर्‍याच दिवसांपासून मेलबॉक्स तपासला नव्हता. म्हणून तो झोपताना घातलेला पायजमा आणि कुर्ता घालून तसाच बाहेर पडला. मेलबॉक्स वर लावलेल्या फिंगर प्रिंट स्कॅनरवर पराग ने त्यांचा अंगठा ठेवला. मेलबॉक्स अनलॉक झाला. मेलबॉक्स त्याने उघडला जो नेहमीप्रमाणे नव्या उघडलेल्या हॉटेल्सचे मेनूकार्ड, राजकीय सभांची आमंत्रणे, बिल्डर लोकांकडून आलेले शुभेच्छा संदेश कम जाहिराती यांनी गच्च भरलेला होता. काही मोजकी कामाची पत्र आणि बिल्स होती. पण बरीचशी बिल्स आधीच ऑनलाइन भरलेली होती. 

सगळ्याबरोबर एक पिवळ्या रंगाचं बिझनेस एन्व्हलप होते ज्याच्या समोर आणि मागे अधिकृत सील दिसत होते. पराग ने बाकी सर्व कागद टाकून दिले. मेलबॉक्स लॉक केला आणि तो पुन्हा लिफ्टमध्ये शिरला.

लिफ्टने वर आल्यावर त्त्याने त्याच्या घरात प्रवेश केला. आज त्यांच्या कॉम्प्लेक्सचा  कचरा व्यवस्थापनाचा ट्रक त्यांच्या बिल्डींगमध्ये पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू उचलण्यासाठी फेऱ्या मारत होता. तो थोडा विचारात पडला.  

“या लोकांचं काही कळत नाही. रविवारी सुद्धा काम करत असतात.” तो स्वत:शीच पुटपुटला.

ते पिवळे पत्र नेमके कोणत्या कंपनी कडून आले आहे हे पराग ला ओळखता आले नाही. विचित्रच होतं जरा परतीच्या पत्त्यासाठी फक्त एक पीओ बॉक्स नंबर दिला होता.

कागदपत्रे एका अतिरिक्त लिफाफ्यात सुरक्षितपणे सीलबंद केली होती आणि वरच्या बाजूला ठळक लाल अक्षरात "कॉन्फीडेन्शियल" असे लिहिले होते. 

पराग ने ते पत्र फोडले आणि वाचायला सुरुवात केली. त्यात असे लिहिले होते.

 

प्रिय समीक्षा,

तुमच्या मानवीय अधिकारांचे कदाचित उल्लंघन झाले असावे. तुमची सर्व पुनर्वापर करण्यायोग्य सामग्री कदाचित संग्रहित केली गेली असेल आणि तिचा वापर अपारंपरिक वैद्यकीय प्रयोगांसाठी केला गेला असू शकतो.

तुमच्या निवासस्थानातून "पुनर्वापर करण्यायोग्य" साहित्य गोळा करण्यासाठी कोणत्याही संमतीची आवश्यकता नसल्यामुळे,  ते साहित्य “देवव्रत रिसर्च एंड डेव्हलपमेंट” नावाच्या शास्त्रज्ञांच्या भूमिगत गटाने वर्षानुवर्षे विविध घरांमधून विशिष्ट "बुद्धिमान जनुकांच्या प्राप्तीसाठी"  बेकायदेशीररित्या किंवा तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या नकळत गोळा केले असू शकते.

तुमच्या पुनर्वापर करण्यायोग्य कचऱ्यातून आम्ही जे जनुकीय नमुने मिळवू शकलो त्यानुसार “देवव्रत रिसर्च एंड डेव्हलपमेंट” नावाच्या शास्त्रज्ञांच्या स्थानिक गटाचा असा विश्वास आहे की "क्लोनिंग, जेनेटिक मॅपिंग आणि अत्यंत बुद्धिमान व्यक्तींची विशिष्ट जनुके वेगळे करणे या प्रक्रियेमुळे जगात आणखी बुद्धिमान, विचारवंत आणि अधिक क्षमतेची मानवी अपत्ये जन्माला घालणे शक्य होईल.

देवव्रत रिसर्च एंड डेव्हलपमेंट या कंपनीसोबत तुम्ही केलेल्या १० वर्षे मुल न होऊ देण्याच्या कराराची आज समाप्ती झाली आहे. करारानुसार या सेवेच्या बदल्यात तुमच्या तुम्ही प्रस्तुत केलेल्या बीटकॉईन वॉलेट मध्ये १ बीटकॉईन क्रेडीट केला गेला आहे.

तुमच्या आणि तुमच्या पतीच्या शरीरात निगराणीसाठी रोपण केली गेलेली अतिसूक्ष्म उपकरणे आपोआप रिमोटच्या सहाय्याने बंद केली जातील. ती यथावकाश चयापचय क्रीयेमार्फत बाहेर फेकली जातील. या दरम्यान तुम्हाला डोकेदुखी, आळस, खूप झोप येणे असे परिणाम दिसून येऊ शकतात परंतु ते परिणाम तात्पुरते असतील.     

कृपया तुमच्या पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू दाराबाहेर सोडणे आजपासून बंद करू शकता. त्या कचऱ्याचा गैरवापर झाल्यास देवव्रत रिसर्च एंड डेव्हलपमेंट हा समूह जबाबदार धरला जाऊ शकत नाही.

या दस्तऐवजावर स्वाक्षरी नव्हती फक्त आद्याक्षरे होती -DR&D.

हे पत्र म्हणजे पराग साठी एक धक्काच होता.

"पराग, मी परत आले, तू मेलबॉक्स चेक केलास का? काही विशेष? " घरात शॉपिंग बॅग आणताना समीक्षाने विचारले.

पराग ने पटकन तिच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला

"नाही."

त्याच्या डोळ्यात पाणी होते.

रिसायकल्ड एंड युज्ड

अक्षय मिलिंद दांडेकर
Chapters
रिसायकल्ड एंड युज्ड