Get it on Google Play
Download on the App Store

आरोपी (प्रकरण ८)

प्रकरण ८

मदालसा हॉटेलात आल्यावर पाणिनी ने मुख्य वेट्रेस ला विचारलं, “ जेवायचंय आम्हाला, तुमच्या कडे क्षिती अलूरकर नावाची वेट्रेस आहे ना, ती ज्या टेबल वर सर्विस देते ते टेबल दयाल का?”

“तिची सगळी टेबल्स अत्ता बिझी आहेत.थांबावं लागेल तुम्हाला.अरे, तुम्ही पाणिनी पटवर्धन तर नाही ? हो तुम्ही..”

“ बरोबर.”पाणिनी म्हणाला.

“ आमच्या मालकांचे मित्र आहात तुम्ही ! ” वेटर उद्गारली.  “ काय करू मी तुमच्या साठी?  अरे हो तुम्हाला क्षिती  चं टेबल हवंय ना? काय आहे , पटवर्धन, आम्ही आमच्या वेट्रेस ला टेबल्स वाटून देतो. टेबल्स ना वेट्रेस नाही. नाहीतर काय होईल माहिती आहे? ग्राहकांची गर्दी आटोक्यातच नाही येणार.”

“ मी समजू शकतो. क्षिती ची टेबल्स रिकामी नाहीत? ” पाणिनी नं विचारलं

“ नाही, थोडया वेळेपूर्वी एक होत रिकामं पण एक माणूस आला आणि त्याने तिचंच टेबल मागून घेतलं.”

“ आम्ही थांबतो वेटिंग रूम मधे, आम्हाला कळवा, टेबल मोकळं झालं की. तिथे आम्हाला दोन लिम्का पाठव टो पर्यंत.” पाणिनी म्हणाला.

ते दोघे लिम्का चा आस्वाद घेत थांबले.पेय संपेपर्यंत त्यांना हवं असलेलं टेबल रिकामं झाल्याची सूचना लाऊड स्पीकर वरून झाली.दोघं हेड वेट्रेस ने दाखवलेल्या टेबल वर बसले.क्षिती आली. “ हेलो सर, कशा आहात मॅडम?”

ती म्हणाली आणि मेनू कार्ड हातात दिले. तुमची ऑर्डर नक्की होई पर्यंत ग्रील्ड सँडविच अनु का?

“ चालेल.”

ती गेल्यावर सौम्या पाणिनी च्या कानात म्हणाली, “ तुम्हाला वेगळं काही जाणवलं का?”

“ नाही. काय नेमकं?”

“ बूट.”

“ बुटा चं काय?”पाणिनी नं विचारलं

“ तिने आता घातलेले उंटाच्या कातडीचे, पिवळ्या चामड्याचे आहेत.तुम्हाला आठवतय, काल रात्री तिने काळ्या रंगाचे बूट घातले होते.आपण तिच्या वस्तू आणून तिला दिल्या तेव्हा ती म्हणाली होती मला की, तिचे पिवल्या रंगाचे बूट मी का नाही आणले.ते तिचे कामावर वापरायचे बूट होते.मी म्हणाले तिला की माझ्या हातून राहून गेले ते आणायचे.इतर एवढया वस्तू आणल्या पण ते विसरले. त्यावर ती म्हणाली असू दे ठीक आहे.काळे बूट आहेत माझ्याकडे.त्यावर भागवीन मी, पण ते  पिवळ्या बुटा एवढे आरामदायी नाहीत. आणि अत्ता तिच्या पायात पिवळे बूट आहेत.याचा अर्थ ती इथे कामावर हजर होण्यापूर्वी घरी गेली असावी बूट आणायला. ” सौम्या म्हणाली.

“ तसं असेल तर तिची आणि मधुरा ची भेट झाली असेल. या प्रकरणावर मोठाच परिणाम होईल या प्रसंगाचा.”पाणिनी म्हणाला.

“ तिला विचारूया?” –सौम्या

“ ती आपल्याला सांगेल याची वाट बघू आपण. ”पाणिनी म्हणाला.

दुसऱ्या टेबल वरची ऑर्डर घेऊन क्षिती त्यांच्या जवळून पुढे गेली, तेव्हा पाणिनी ने पटकन तिच्या बुटा कडे नजर टाकली.सौम्या चं निरीक्षण बरोबर होतं.

तेवढयात कनक त्यांना शोधत हॉटेलात आलेला दिसला.

“ बस कनक.जेवण झालंय?” पाणिनी नं विचारलं

“ नाही अजून.माझा अंदाज होताच तुम्ही इथे भेटाल म्हणून.”

“ काय विशेष? तपासात काही प्रगती?”

“ माझ्या माणसाचा निरोप आलंय की डेक्कन वरच्या ग्लोसी कंपनीच्या आवारात ती अंध पेन्सिल विक्रेती बसली आहे.मी त्याला सांगितलं होत की  तिच्या पायाकडे नीट लक्ष दे.टो म्हणतोय की उजव्या अंगठ्याच्या ठिकाणी फुगवटा आहे या बाईच्या.”

“ मग ही वेगळी बाई आहे. मी काल नीट पाहिलंय , मधुरा ला, तिचे पाय साधे चार चौघांसारखे आहेत.” सौम्या म्हणाली.

“कनक, चक्रधर एजन्सी कडूनच तू गाड्या भाडयाने घेतोस ना? गरज लागेल तेव्हा? ” अचानक पाणिनी नं विचारलं

“ हो गेले कित्येक वर्षं.”

“ माझ्या अशीलासाठी मी त्यांच्याच कडून एक गाडी घ्यायचं म्हणतोय.”

कनक ने मोठा उसासा टाकला. “ आपल्या अशीलासाठी स्वतःला खुनात अडकवण्या पर्यंत तुझी मजल गेल्ये, आता त्यांना गाड्या घेऊन देई पर्यंत गेल्याच आजच कळलं”

“ हे फक्त तरुण स्त्री अशील असेल तरच !” सौम्या म्हणाली.

इतक्यात क्षिती त्यांचेसाठी ग्रील्ड सँडविच घेऊन आली.  “क्षिती, मला या बरोबर तिखट ठेचा आण.” पाणिनी म्हणाला.

“ हा माझा मित्र,कनक ओजस. गुप्त हेर आहे खाजगी.आम्ही तिघेही म्हणजे मी, कनक आणि सौम्या वर्गमित्र आहोत.”

“ तुम्हाला काय आणू सर?” –क्षिती ने विचारलं.

“मला हेच आण.” कनक म्हणाला.

ती पाणिनी ने सांगितलेला ठेचा घेऊन पुन्हा आली तेव्हा पाणिनी तिला म्हणाला, “ माझ्या ओळखीत जुन्या गाड्या विकणारी एक शो रूम आहे, तुझ्या साठी मी एक जुनी गाडी घेणार आहे.रात्री अपरात्री तू त्या हॉटेल मधून नोकरीला बस ने जाने-येणे सुरक्षित नाही. तुझी गाडी असेल तर बर राहील.”

“ तुम्ही केवढं करताय माझ्यासाठी ! पण सॉरी, मला हा खर्च , गाडी घेण्याचा, नाही परवडणार ”

“ ती तुझ्या मालकीची गाडी नसेल.त्यात पूर्ण टाकी भरून पेट्रोल टाकून तुला वापरायला दिली जाईल.माझ्या कडून कर्ज आहे असे समज. तुला गाडी चालवता येते ,माझ्या अंदाजाप्रमाणे. ” पाणिनी म्हणाला.

“ हो येते, बाबा हयात असतांना आमची स्वतःची गाडी होती.  ” बोलता बोलता तिचा स्वर दाटून आला आणि ती ऑर्डर आणण्याच्या निमित्ताने आत पळाली.

“ कनक, तुझा जो माणूस ग्लोसी कंपनीच्या परिसरात त्या अंध विक्रेत्या बाई वर नजर ठेऊन आहे, तो क्षणभर सुध्दा तिला दृष्टीआड नाही ना करत? आणि तो तिच्या पायावर नजर ठेऊन आहे ना? म्हणजे एक सपाट पाय आणि एक फुगीर पाय अशा दोघी जुळ्या सारख्या आहेत म्हणून विचारतोय.” पाणिनी नं विचारलं

“ तो दुर्भीण लावूनच बसलाय. पण एकटा माणूस किती वेळ पुरा पडणार? त्याला ही कधी तरी चहा-पाण्याला, टॉयलेटला जावच लागणार. ”

“ नेमक्या त्याचं वेळी बायकांची अडला बदल झाली तर?” पाणिनी नं विचारलं

“ तेवढी जोखीम आपण घेतलीच पाहिजे, नाहीतर दोन माणसे नेमावी लागतील. क्षिती ला गाडी घेऊन देणाऱ्या  तुझ्या सारख्या गरिबाला ते परवडणार नाही.” –कनक

“ ठेव दोन माणसे कामावर. आज मी श्रीमंत झालोय. कनक ओजस नावाच्या माझ्या मित्राला बऱ्याच दिवसांनी मी खाऊ घालतोय.” पाणिनी म्हणाला.

“ अत्ता पर्यंत फक्त तुझ्या चिकण्या सेक्रेटरीला तू खायला घातलेस. त्याच्या बदल्यात सौम्या कडून काहीच मिळत नाही तुला,त्याच्या निम्या वेळा, तिला न नेता  मला खाऊ घातले असतेस तर मी आता पेक्षा जास्त  चांगले रिझल्ट दिले असते तुला.  ”-कनक

त्यांच्या गप्प चालू असे पर्यंत क्षिती ने कनक ला त्याचे ग्रील्ड सँडविच आणले. इघानी आपले खाणे पिणे संपवल्यावर कनक लगेच आपल्या कामाला निघून गेला.पाणिनी आणि सौम्या आपल्या ऑफिसला गेले.

तासाभरात कनक ची विशिष्ट प्रकारे वाजवलेली दारावरची टकटक ऐकू आली.सौम्या ने त्याला दार उघडून आत घेतले.

“ पुला खालून बरंच पाणी वाहून गेलंय पाणिनी, आपण हॉटेलात जाऊन आल्यावर.”

“ काय घडलंय?” पाणिनी नं विचारलं

“ मधुरा महाजन यांना हॉस्पिटल मधे दाखल करावं लागलंय.तब्येत अचानक बिघडल्यामुळे.”

“काय झालं नेमकं?” पाणिनी नं विचारलं

“ मध्यरात्रीच्या सुमाराला कोणीतरी तिच्या घरात घुसलं.त्या व्यक्तीच्या हातात मोठी पाच सेल ची  बॅटरी होती. त्याचा तडाखा त्याने तिला मारला.आणि बेशुद्ध केलं. अर्ध्या तासापूर्वी  साहिर घरी गेला तेव्हा त्याला कळलं आणि त्याच्या कडून पोलिसांना समजलं.म्हणजे तो तिला भेटायला गेला होता, बेल वाजवल्यावरही दार उघडलं नाही तेव्हा तो मागच्या दाराने गेला.ते उघडंच होत.त्याला संशय आला म्हणून तो आत गेला तेव्हा त्याला बेडरूम च्या दारात मधुरा बेशुद्धावस्थेत दिसली.ज्या बॅटरी ने तिला डोक्यात मारलं होत ती बॅटरी बाजूलाच पडली होती.तिची काच फुटली होती. ”

“ मधुरा जीवंत आहे ?”

“ सुदैवाने आहे, पण कोमात आहे.”

“ तुला कसं कळलं हे सगळं  कनक?”

“मी कबूल करतो पाणिनी, हॉटेलातून निघाल्यावर मी लगेच ग्लोसी कंपनीच्या परिसरात त्या अंध जुळ्या  बाई वर नजर ठेवणाऱ्या माझ्या माणसाला फोन केला, आणि त्याला विचारलं की तू त्या बाई वर नजर ठेवल्येस ना? आणि ती बाई फुगीर पायाचीच आहे ना? तो हो म्हणाला तेव्हा माझ्या मनात आलं की तुझी सूचना धुडकावून लाऊन  मी परस्पर निर्णय घेतला आणि त्या माझ्या माणसाला मी मधुराच्या घरी पाठवलं, मला पहायचं होतं की फुगीर पायाची बाई ग्लोसी कंपनीच्या आवारात असतांना मधुरा हीच  सपाट पायाची असेल तर ती घरी आहे का? म्हणजे खरंच त्या दोघी वेगळ्या आहेत की एकच आहेत.  मी माझ्या माणसाला सांगितलं की कोणीतरी विक्रेता आलंय अस भासवून तिच्या घरी जा.”

“ पण मध्यरात्रीच्या सुमाराला विक्रेता आला हे कसं पटलं असतं तिला?” पाणिनी नं विचारलं

“ त्याला सांगायला सांगितलं की  तिने दिलेली ऑर्डर पोचवायला तो आला होता. आज बऱ्याच जणांच्या ऑर्डर होत्या त्यामळे उशीर झाला. तो तिथे गेला,त्याच्या आधीच थोडा वेळ तिला अँम्ब्युलन्स मधून नेलं होतं. माझ्या माणसाने मला हे सर्व सांगितलं आणि मी लगेच इथे आलो.” –कनक.

“ एकंदरित हे प्रकरण मला वाटलं होतं त्यापेक्षा गंभीर दिसतंय.मला आधीच कळायला हवं होत ,जेव्हा रोख रकमेत तूट आली तेव्हा.... ”

अचानक पाणिनी बोलायचा थांबला.

“ मला माहीत नसलेलं काही समजलय तुला?”-कनक

“ हो.तुला माहीत नाही असं काही. आणि ते तुला माहीत व्हावं असं मला वाटत नाही. माझं अंतर्मन मला सांगतंय, कनक, की आपल्याला नजिकच्या काळात काहीतरी मोठया संकटाला तोंड द्यावं लागणार आहे.”  पाणिनी म्हणाला.

“ नेमकं काय?”-कनक

“ जाउ दे,कनक, ग्लोसी कंपनीच्या बाहेर च्या त्या पेन्सिली विक्रेतीची मुलाखत घेऊन येऊ आपण. ती तिथून  गेल्याचं तुला कळवलं नाहीये ना तुझ्या माणसाने?”

कनक ओजस ने मानेने नकार दिला.

“ चल निघूया कनक, सौम्या, तू इथेच थांब आणि आम्ही येई पर्यंत चक्रधर शो रूम ला फोन करून आज संध्याकाळी साडेसात पर्यंत गाडी हव्ये, म्हणून सांग. बुटा बद्दल कोणालाच सांगू नकोस.”  पाणिनी म्हणाला.

“ बूट? बुटाची काय भानगड आहे?” कनक ओजस ने गोंधळून विचारलं.

“ काही नाही.सांकेतिक भाषा आहे आमची.”  पाणिनी म्हणाला. आणि कनक ला घेऊन बाहेर पडला.

( प्रकरण ८ समाप्त)