Get it on Google Play
Download on the App Store

प्रतिमा

महाराज दशरथानें श्री रामचंद्राच्या राज्याभिषेकाचा दिवस निश्चित ठरविला. अयोध्या नगरी आनंद सागरांत बुडून गेली. अयोध्यावासी उत्साहाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. सिंहासन तयार झाले. छत्र चामर तयार झाले. सुवर्ण कलश तयार झाले. अशा या मंगल प्रसंगी लोकरंजनार्थ अभिनय कलावंतांना नाट्य प्रयोग करण्याची आज्ञा दिली होती.

अवदातिका नांवाच्या सीतेच्या एका दासीन रेवा देवीजवळ अशोक वृक्षाची एक शाखा मागितली. रेखादेवी ही अभिनेत्यांची वेशभूषा करणारी होती. तिने अवदातिकेला फांदी देण्याचे नाकारले. याचा तिला राग आला व तिनें वेशभूषा सामग्रीतील वल्कलाची चोरी केली. तिने ही चोरी गमती खातरच केली होती तरी खऱ्या चोरीप्रमाणेच तिला भय वाटत होते. तिची ती परिस्थिति सीतेने ओळखली.

सीता म्हणाली "जा, ही वल्कलें परत देऊन ये."

तेवढ्यात तिला वाटले की आपण वल्कलें नेसून पाहावी. म्हणून ती नेसली सुद्धा. अवदातिकेने सीतेसमोर आरसा आणून ठेविला.

"मी आरसा आणावयास गेलें होतें तेव्हां कोणाच्या तरी राज्याभिषेकाची गोष्ट माझ्या कानावर पडली. कोण राजा होणार आहे कोण जाणे." ती म्हणाली.

"मामंजींची प्रकृति तर चांगली आहे ना?" सीतेनें चिंतातूर होऊन विचारले.

"महाराजांची प्रकृति उत्तम आहे आणि त्यांनीच राज्याभिषेक ठरविला आहे." एका दासीने सांगितले.

इतक्यांत राजवाड्यांत मंगलवाद्यांचा ध्वनि ऐकू आला. सर्व जणी आनंदाने घाई गडबडीने श्रृंगार करूं लागल्या. इतक्यांत वाद्ये बंद झाली.

"हे काय? राज्याभिषेक रद्द झाला की काय..! हो, पुष्कळ वेळां एखादें कार्य करण्याचे ठरते आणि रहित होते." सीता म्हणाली.

इतक्यांत एका दासीने येऊन सांगितले की राज्याभिषेकानंतर महाराज वनवासी होणार आहेत.

"म्हणजे हे अभिषेकाचे पाणी अश्रू धुण्यासाठी आहे वाटते?" सीताने विचारले

श्री रामचंद्र मांडवांत आले. चौरंगावर बसले. मंगलवाद्ये वाजू लागली. पुरोहित मुनि श्रेष्ठ मंत्रोच्चार करून अभिषेक करण्यास आरंभ करणार एवढयात महाराज दशरथानें रामाला बोलाविलें. रामाला समजले की, मंथरेच्या कारस्थानामुळे माझा राज्याभिषेक थांबला आहे. त्याला ह्या गोष्टीचा फार आनंद झाला. आपल्या शिरावरील ओझें कमी झाले असे, त्याला वाटले. ही सर्व हकीकत रामाने सीतेला सांगितली. नंतर सीतेला वल्कलें नेसलेली पाहून तो म्हणाला

"तुझ्याप्रमाणे वल्कलें धारण करण्याची इच्छा आहे."

म्हणून सीतेने एका दासीला वल्कलें आणण्यासाठी पाठविलें होते. कैकेयीच्या महालांतून हाहा काराचा शब्द ऐकू आला. सर्वजण घाबरली. तोच एका दासीने सांगितले की, “कैकेयीने रामाला राज्य न देतां भरताला देण्यासाठी हट्ट केला व महाराज दशरथ मूर्छित झाले आहेत.”

लक्ष्मण तेथेच होता. तो रागाने म्हणाला, "त्या कैकेयीला मी आत्तांच्या आत्ता मारून टाकतो."

“शांत हो लक्ष्मणा..! अरे, राज्यलोभाने मातापित्यांची हत्या करणार काय तूं..?" रामाने त्याला विचारले.

“मला राज्य न मिळाल्याचा राग नाहीं आला दादा..! मला राग आला तो कैकेयी... तुला चौदा वर्षे वनवासास पाठविणार आहे त्याचा आला आहे...!" लक्षण नतमस्तक होऊन म्हणाला.

“म्हणूनच महाराज मूर्छित झाले असतील." असे म्हणून रामाने सीतेजवळ वल्कलें मागितली आणि रानांत जाण्यासाठी सिद्ध झाला.

ते पाहून सीतेनें हि त्याच्याबरोबर वनांत जाण्याचा हट्ट धरला. शेवटी रामाने लक्ष्मणाला सीतेची बाजू समजून घालण्यास सांगितले. पण झाले उलटेच. 

"वहिनीचे म्हणणे ठीक तर आहे." असें म्हणून लक्ष्मण वल्कलें रामाच्या अंगावर घालुन त्याला म्हणाला,

"तूं आपल्या सर्व वस्तूंतील अर्ध्या वस्तू मला देतोस. मग ह्या वल्कलांतील अर्धी वल्कलें मला कां नाहीं दिलीस?"

रामाने त्याची समजूत घालण्याची कामगिरी सीतेला दिली. तिने समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु लक्ष्मणानें कांहीं ऐकले नाही, तो हि रामाबरोबर वनांत जाण्यास निघाला. त्यानें हि वल्कलें परिधान केली. त्या नंतर राम, लक्ष्मण, सीता तिघे हि वनांत जाण्यास निघाली. राजपथावरून जात असताना त्यांच्या दर्शनासाठी नगरवासी जमा झाले. ते चाललेच होते की द्वारपालाने लगबगीने येऊन सांगितले की जरा थांबा महाराज येत आहेत.

“वनवासींना कोणास भेटण्याची काहीं जरूर नाही." असे लक्ष्मणाने सांगितले.

रामाला हि तसेंच वाटल्यावरून तो हि लक्ष्मण सीतेसह पुढे निघाला. हे तिथे वनांत जाण्यास निघालेले ऐकून दशरथाला फार दुःख झाले. कौसल्या व सुमित्रेने त्याला धीर देण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु जेव्हा सुमंताने सांगितले की राम, लक्ष्मण व सीता वनांत गेली तेव्हा तर त्याचें देहभान गेल्यासारखे झाले.

“सुमंता भरताला बोलाव." तो म्हणाला.

“हे रामा..! अहो राम, सीता, लक्ष्मणा मी जातो आता." असे म्हणत त्याने प्राण सोडले.

अयोध्येच्या जवळच प्रतिमाशाळा होती. तेथे मृत राजांच्या मूर्ति ठेविल्या जात असत. दशरथ राजाच्या मृत्यूनंतर त्याची मूर्ति हि तेथें ठेविण्यात आली होती. दर्शनासाठी महाराण्या तेथे येत असल्याने त्यांना सजविले होते. भरत मामाच्या घरून येणार म्हणून शत्रुघ्ननाने एका दूताला अयोध्येच्या वेशीवर त्याला भेटण्यासाठी पाठविले होते. भरत येतांच दूताने सांगितले की गांवांतील वयोवृद्धांनी कृत्तिका नक्षत्र उलटल्यावर आणि रोहिणी लागल्यावर नगरीत प्रवेश करण्यास सांगितले आहे. भरत थांबला. अयोध्येतील काही हि हकीगत त्याला माहीत नव्हती. वेळ घालविण्यासाठी त्याने इकडे तिकडे हिंडून पाहिले. त्याला दूर अंतरावर झाडांच्या आड एक गृह दिसले. ती प्रतिमाशाळाच होती. भरताला त्याविषयी काहीं एक माहीत नव्हते. त्याला वाटले एकादें देऊळ असेल. म्हणून तो तिकडे गेला. आंत शिरून पाहिले तर तेथे कोणी हि नव्हते. फक्त सजवलेल्या चार मूर्ति त्याला दिसल्या. असतील कोणा देवाच्या म्हणून त्याने त्यांना दुरूनच नमस्कार केला. इतक्यांत तेथील व्यवस्थापक पुढे आला.

म्हणाला, "या मूर्ती देवांच्या नसून मृत राजांच्या आहेत.”

नंतर त्याने भरताला त्या मूर्तीची माहिती सांगितली. पहिल्याने त्याने राजा दिलीपाची मूर्ती दाखवून त्याच्या पराक्रमाचें, मोठेपणाचे वर्णन केले. नंतर रघुराजाची मूर्ति दाखवून त्याचे वर्णन केले. त्यानंतर राजा याच्या मूर्तीचा हि परिचय करून दिला. त्याच्या जवळच असलेली. चौथी मूर्ति पाहून मरताला धक्का बसला. तो हतबुद्ध उभा राहिला. त्याने पहिल्या तीन प्रतिमांच्या संबंधी पुनःपुन्हां प्रश्न केले आणि शेवटी धीर करून म्हणाला,

"काय...! येथे जिवंत राजांच्या मूर्ती सुद्धा ठेवल्या जातात?"

"नाही फक्त मृत महाराजांच्याच प्रतिमा येथे ठेविल्या जातात." व्यवस्थापकानें सांगितले.

"थांबा, ह्या चौथ्या मूर्ती विषयीं सुद्धा माहिती करून घ्या. ही महाराज दशरथाची प्रतिमा आहे. त्यांनी आपल्या प्रिय पत्नीच्या सुखासाठी आपले प्राण त्यागिले."

"हाय....!!" असे म्हणता म्हणता भरताला मूर्छा आली.

तेव्हांच व्यवस्थापकाला कळले की हा राजकुमार भरत आहे. त्याने त्याची मूर्छा घालविण्यासाठी प्रयत्न केला. भरत शुद्धीवर आल्यावर त्याने पित्याविषयी सर्व माहिती विचारली. तेव्हां राम, लक्ष्मण आणि सीता वनांत गेल्याचें हि त्याला समजले, त्यामुळे पुन्हां तो मूच्छित झाला.

त्याच वेळी कौसल्या, सुमित्रा, कैकेयी आपल्या दासींच्याबरोबर तेथे येऊन पोहोचल्या. सुमन्तपण त्यांच्या बरोबर होता.

भरताची मूर्छा दूर झाल्यावर त्याने डोळे उघडले. तोच नाटकांतील दृश्याप्रमाणे त्याच्या तिघी माता त्याच्यासमोर त्याला दिसल्या. त्यांना पाहातांच झटकन उठून त्याने कौसल्या व सुमित्रेला नमस्कार केला. परंतु कैकेयीला नमस्कार करण्याऐवजी दोष देऊ लागला. भरताने केलेल्या आरोपाकडे दुर्लक्ष केलं. 

ती म्हणाली, "बाळा, काय केलें रे मी. चल लवकर. तुला राज्याभिषेक करण्यासाठी महा मुनि वशिष्ठ तुझी वाट पाहात आहेत."

“या महाराणीचा राज्याभिषेक करा. मला अयोध्येला जावयाचे नाही. जेथे राम तेथे माझी अयोध्या.” सुमन्ताकडे पाहून भरत गरजला.

त्यानंतर सुमन्ताला घेऊन भरत चित्रकूटावर केला. तेथे त्याला रामाची पर्णकुटी दिसली. त्याने सुमन्ताला पुढे पाठविलें.

भरत म्हणाला, "रामाला सांगा की लोभी कैकेयीचा लाडका मुलगा भरत आला आहे."

"वडील माणसाची निंदा करणे बरें नाही.” सुमन्त म्हणाला.

"ठीक आहे." असे म्हणून भरत स्वत:च ओरडला, "क्रूर कृतघ्न, असभ्य, धूर्त असली तरी एक भावूक व्यक्ति आली आहे."

तो आवाज ऐकून राम म्हणाला, "अगदी वडिलांच्या आवाजाप्रमाणे आवाज आहे. कोणी मित्र बंधु आले असले पाहिजेत. लक्ष्मणा, जा बरें पाहून ये कोण आले आहेत ते...!"

लक्ष्मणाने पाहून भरत आल्याचे सांगितले. सीता त्याला सामोरी जाऊन आंत घेऊन आली. तेथे रामानें भरताला आलिंगन केले, त्या ठिकाणी भरताने रामाबरोबर वनांत राहाण्याची इच्छा प्रकट केली. परंतु रामाने त्याचे म्हणणे ऐकले नाही.

तो म्हणाला, "तुला काय वाटते? अहंकार, भय, अथवा वेडेपणाने मी येथे आलों आहे..! तर तसे अजिबात नाही मी वडिलांच्या आज्ञेवरून आलो आहे. तूं हि वडिलांच्या आज्ञेचें पालन कर."

भरतानें तें कबूल केले नाही. शेवटी रामाच्या आग्रहावरून तो म्हणाला,

"जर तूं वनवासांतून आल्यावर आपले राज्य घेणार असशील तर मी फक्त तोपर्यंत प्रजा पालन करीन. राज्याभिषेक माझा नाही. तुझ्या पादुकांचा होईल."

त्याला रामानें सम्मति दिली. आणि आपल्या पादुका भरताला देऊन त्याला अयोध्येस परत पाठवून दिले.

एक दिवस राम व सीता आपल्या पर्णकुटींत बसून दशरथ राजाच्या श्राद्धासंबंधी बोलत होते. त्याच वेळी रावण संन्याशाच्या वेशाने आला.

रावण म्हणाला, “कोण आहे आंत? मी अतिथि आलों आहे."

खरे म्हणजे रावणाचा भाऊ ‘खर’ याला रामाने मारले होते. त्याचा सूड घेण्यासाठी म्हणून तो आला होता. त्या साठी तो सीतेला पळवून नेणार होता. रामाने त्याला आत बोलाविले. आदर सत्कार केला.

राम म्हणाला, "महर्षि, श्राद्धाला काय काय पाहिजे?"

रावणाने सांगितले, “गवतांत दुर्वा, बीजामध्ये तीळ, दाण्यामध्ये उडीद, प्राण्यामध्ये गाय किंवा सांबर किंवा कांचनमृग. ह्या वस्तू मुख्य आहेत. परंतु कांचनमृग हिमालयांत असतात आणि गंगेचे पाणी पितात.”

इतक्यांत रामाला दूरवर एक सोन्याचे हरण दिसले. त्याला पकडून आणण्यासाठी रामाने लक्ष्मणाला पाठवावें असें ठरविले. पण त्यावेळी लक्ष्मण कांहीं महामुनींच्या भेटी घेण्यासाठी गेला होता. म्हणून स्वतः रामालाच त्याला पकडण्यासाठी जावे लागले. रामानें नेम धरून बाण मारला. परंतु पाहता पाहतां बाण चुकवून हरण झाडीत निघून गेले. रामाला बाहेर गेलेला पाहून रावणानें आपले खरें रूप दाखवून सीतेला पळवून नेले.

सीतेनें खूप आरडा ओरडा केला. ऋषि मुनींना हांका मारल्या. पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाही. थोडे दूर गेल्यावर जटायूने सीतेचा आवाज ऐकला आणि तो रावणाशी युद्ध करण्यासाठी पुढे आला. थोडा वेळ झटापट झाली पण रावणाने त्याचे पंख उखडून फेकून दिले आणि आपली वाट धरली.

इकडे अयोध्येमध्ये भरताला मधून मधून वनांतील वर्तमान समजत असे. राम लक्ष्मणांनी सुग्रीवाशी मैत्री केली आणि वालीला मारले, ही गोष्ट त्याला ठाऊक होती. त्याच प्रमाणे आता सीताहरणाची गोष्ट सुद्धा त्याला समजली होती. ही बातमी ऐकतांच त्याला दुःख झाले आणि राग हि आला. त्या भरांत तो कैकयीकडे गेला आणि म्हणाला,

"एक आनंदाची बातमी आहे रामाकडून आलेली. तुझ्यासाठी रामाने वनवास पत्करला आणि आता एकाकी जीवन. कारण सीतेचे अपहरण झाले आहे. तुझ्या सारखी स्त्री घरांत असल्यामुळे सीतेसारख्या स्त्रीला घरास मुकावे लागले."

भरताचे हे असले बोलणे कैकयीला फार वेळ सहन झाले नाही.

ती म्हणाली, “महाराज दशरथांना पुत्र वियोगाचा शाप होता आणि तो माझ्याकडून सिद्ध व्हावा याच साठीचा हा अठ्ठहास होता, तो झाला."

"मग माझा वनवास का नाही मागितलास?" भरताने विचारले.

"तूं नेहमी दूरदूरच राहात होतास." कैकयी म्हणाली.

"मग चौदा वर्षांचाच कशाला वनवास मागून घेतलास?” भरताने विचारले

“मी खरे म्हणजे चौदा दिवसच म्हणणार होते पण तोडांतून एकदम वर्षेच आले आणि एकदां तोडांतून गेलेला शब्द मार्ग कसा घ्यावयाचा?" कैकयी खेदाने म्हणाली.

"तुझे तरी काय चूक आई..! आई, मी तुला उगीचच काही काही बोललों. क्षमा कर मला.” भरत म्हणाला.

काही दिवस गेले. वर्षे लोटली. एक दिवस, आश्रमांतील लोकांना समजले की राम-रावणाचे युद्ध झाले. रामाने रावणास मारले. सीतेला कैदेतून सोडविले. बिभीषणास लंकेचे राज्य दिले व आतां राम लवकरच सीता, लक्ष्मण आणि बिभीषणाला बरोबर घेऊन येणार आहे.

युद्ध संपल्यावर राम सीता, लक्ष्मण, बिभीषण वगैरेसह आश्रमात पोहोचले. तेथील लोकांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केलें. त्यांना भेटण्यासाठी अयोध्येहून भरत आपल्या तिन्ही मातांना घेऊन आला होता. तेथून ती सर्व मंडळी पुष्पक विमानांतून अयोध्येस गेली.

तेथे मोठ्या थाटाने रामाचा राज्याभिषेक झाला. आणि सर्वत्र आनंदी आनंद नांदू लागला.

प्रतिमा

कथाकार
Chapters
प्रतिमा