३ निर्णय १-२
(ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
शामली आज प्रथमच सुबोधला घेऊन घरी येत होती .सुबोध व शामली यांची ओळख दोन वर्षांची होती .दोघेही एका प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीत काम करीत होते .सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे कंपनीचे प्रमुख उत्पादन होते .दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते .शामली जेव्हां या कंपनीत कामाला लागली तेव्हा सुबोध तिथे अगोदरच नोकरी करीत होता.शामलीला तिचे कामाचे स्वरूप समजून देण्याचे काम त्यानेच केले होते .कामाच्या निमित्ताने दोघांची रोज भेट होत असे .सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत त्यांची कामाची वेळ होती.दुपारी एक ते दोन हा लंच टाइम असे .
घरून येताना दोघेही डबा आणीत असत .कंपनीचे स्वतःचे कॅन्टीन होते .तिथेच दुपारचे जेवण सर्व घेत असत.दोघेही हळुहळू एकमेकांचा डबा शेअर करू लागले .कामामध्ये तर दोघांचे ट्युनिंग चांगले होतेच परंतु एरवीही त्यांचे ट्युनिंग छान होत असे .थोडक्यात त्यांच्या तारा चांगल्या जुळल्या होत्या .एक तार झंकारली की त्याच पद्धतीने दुसरी तार झंकारत असे.
दोघेही बरोबरच कामावर येत जात असत .सुबोधची मोटार होती तो शामलीला पिकअप करीत असे.सर्व विषयांवर दोघांच्या गप्पा होत असत . हळूहळू आपण एकमेकांना अनुरूप आहोत याचा त्यांना साक्षात्कार झाला .जीवन एकमेकांबरोबर व्यतीत करण्याच्या शपथाही त्यांनी घेतल्या .
शामली सुबोधच्या घरी एक दोनदा गेली होती.सुबोधच्या आई वडिलांना एकूण अंदाज आला होता .फक्त सुबोध केव्हा जाहीर करतो त्याची ते वाट पहात होते . गेले सहा महिने सुबोध शामलीला तू मला तुझ्या घरी घेऊन चल असा आग्रह करीत असे .काही ना काही कारण काढून शामली त्या विषयाला बगल देत असे . शामलीला सुबोधला घरी घेऊन जायची भीती वाटत असे. शामलीची आई प्रेमविवाहाच्या अगदी विरुद्ध होती.
लग्नाच्या ज्या वयात तरुण मुलगा किंवा मुलगी असते, ते वय नाजूक बावरे असते .आंतरिक प्रेमापेक्षा, आंतरिक आकर्षणापेक्षा ,आंतरिक स्पंदनांपेक्षा ,शारिरीक आकर्षण प्रभावी असते .शारिरीक आकर्षणापुढे इतर सर्व फोल ठरते .कुणीही कितीही लक्षात आणून दिले तरीही ते लक्षात येत नाही .मुलगा किंवा मुलगी विशिष्ट वातावरणात वाढलेले असतात .ज्या वयात संस्कार क्षमता जास्त असते त्या वयात संस्कार घट्ट बसलेले असतात.जर दोघांचे संस्कार भिन्न असतील तर एकमेकांशी जुळवून घेणे, जुळणे,कठीण पडते . केव्हा केव्हा अशक्य होते.
नव्याची नवलाई, नव्याचे नऊ दिवस संपून जातात.मग विचारांच्या, वर्तणुकीच्या, जेवण्याच्या खाण्याच्या ,सर्व पद्धतींच्या घर्षणाला सुरुवात होते .म्हणूनच आपण मध्यमवर्ग, कनिष्ठ वर्ग, उच्च वर्ग,अशी ढोबळ विभागणी करतो .जात धर्म प्रदेश आर्थिक स्तर शिक्षण या सर्वांचा आपल्या घडवणुकीवर कळत नकळत परिणाम होत असतो .मनुष्यांमध्ये एकप्रकारची लवचिकता आहे .बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आहे .मनुष्य प्राण्यांमध्येच काय तर सर्वच प्राण्यांमध्ये अशी क्षमता कमी जास्त प्रमाणात असते .
पुरुष आणि स्त्री विवाहानंतर एकमेकांशी जुळवून घेण्याचा स्वाभाविक प्रयत्न करतात.ही लवचिकता दोघांनीही दाखविली पाहिजे .एकानेच दुसऱ्याच्या साच्याप्रमाणे स्वतःला घडवून घ्यायचे,बदलवायचे , असा प्रसंग जर आला,तर ज्याला बदलायचे असते त्याला त्रास होतो.भिन्न सामाजिक आर्थिक प्रादेशिक संस्कृतीमुळे योग्य अयोग्य, चांगले वाईट, इष्ट अनिष्ट, ग्राह्य त्याज्य,याच्या कल्पना निरनिराळ्या असतात.खाण्या पिण्याच्या सवयी भिन्न असतात . सवयी निरनिराळ्या असतात. वर्तणुकीच्या पद्धती वेगळ्या असतात .या सगळ्यांचा अपरिहार्यपणे एकमेकांशी संघर्ष होतो.
मीच का बदलायचे? हा प्रमुख प्रश्न असतो .माझेच बरोबर कशावरून नाही?कुठल्याच प्रश्नाला उत्तर नसते . प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून प्रत्येकजण बरोबरच असतो .जर संस्कृती एक असेल तर दृष्टिकोनात भिन्नता नसते किंवा विशेष भिन्नता नसते .अश्या वेळी संघर्ष आपोआपच होत नाही .
आई वडील जेव्हा मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळ पाहतात त्यावेळी त्यांचे विचार मुलांपेक्षा तरी पक्व असतात असे समजायला हरकत नाही .ते सारासार विचार करून शेवटी निर्णय घेत असतात.
थोडक्यात प्रेमोत्तर विवाह कि विवाहोत्तर प्रेम असा हा तिढा आहे .
शामलीची आई विद्या दुसऱ्या बाजूची होती.
ती प्रेमविवाहाच्या साफ विरुद्ध होती .
कारण तिने प्रेमविवाह केला होता .त्यात तिला मोठी ठेच लागली होती.आज पंचवीस वर्षानंतर सुद्धा ती जखम वहात होती.
विद्याने त्या काळात पंचवीस वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता . दुसऱ्या जातीच्या, दुसऱ्या प्रदेशातील, दुसऱ्या भाषिक व्यक्तीशी प्रेम विवाह केला होता .आर्थिक स्तर भिन्न होता .त्या वेळी दोघांनाही आपले छान जुळेल असा आभास निर्माण झाला होता .विद्याच्या व सारंगच्या घरच्यांनी प्रखर विरोध केला होता .परस्परांमधील अनेक दोष दाखवून दिले होते .विद्या व सारंग प्रेमाने आंधळी झाली होती .वडील मंडळींचा सल्ला ऐकण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. वडील मंडळी आपल्या मीलनाच्या मार्गातील अडथळा आहे असे ती दोघे समजत होती.त्यांनी घरच्यांना धुडकावून विवाह केला .
वर्षभरातच दोघांचाही भ्रमनिरास झाला होता .विवाहापूर्वी कोर्टिंगच्या काळात,प्रेमाराधनेच्या काळात दोघेही एकमेकांना मेड फॉर इच अदर असे समजत होती. एकमेकांसाठीच आपल्याला बनविले आहे असे समजत होती .हळू हळू दोघांनाही आपण नॉट मेड फॉर इच अदर असा साक्षात्कार होऊ लागला.नव्याचे नऊ दिवस केव्हाच संपले .क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींवरून भांडणे होऊ लागली.मतभेद वाढू लागले. आदळआपट होऊ लागली. वारंवार समरप्रसंग येऊ लागले.
सारंग विद्याचा पती कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नसे . घरातील किंवा बाहेरील कोणतेही काम करायला तयार नसे.काहीही काम करीत नसे असे नाही परंतु जबाबदारीने कोणतेही काम करीत नसे .त्याला कोणत्याच गोष्टीची जबाबदारी वाटत नसे .अत्यंत बेजबाबदार असा तो मनुष्य होता . पैसा मिळविण्यात, नोकरी करण्यात, बेजबाबदारी दिसे.ही नोकरी धर ,ती नोकरी सोड ,
असे त्याचे सारखे चाललेले असे.
पैसा मिळविण्यात बेजबाबदारी, पैसा खर्च करण्यातही तशीच बेजबाबदारी होती .गरज असो नसो ,खिशाला परवडत असो नसो, एखादी वस्तू आवडली कि ती खरेदी करायची असा त्याचा खाक्या होता .मिळालेला पगार धडपणे घरी येईल,किती येईल, याची खात्री नसे.घराची सर्व जबाबदारी आर्थिक आणि इतर विद्याला उचलावी लागे.
दिवसेनदिवस सारंगचे वहाणे वाढतच चालले.घरापेक्षा तो बाहेर जास्त रमू लागला. घरी येण्याच्या त्याच्या वेळा अनिश्चित असत.केव्हा केव्हा रात्र रात्रही तो घरी उगवत नसे.हळूहळू तो व्यसनाधीन होऊ लागला .त्याची बाहेरची प्रकरणेही वाढू लागली . हळूहळू दोघेही कड्याच्या टोकावर आली .जवळ येण्यापेक्षा दूर राहण्यात दोघांनाही आनंद वाटू लागला .कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तो शहराबाहेर राहू लागला .काम ,प्रशिक्षण ,प्रेमप्रकरण, कोणत्याही कारणाने तो दुसरीकडे, अन्य शहरात,राहू लागला .
सुरुवातीच्या काळात वर्षभरात शामलीचा जन्म झाला होता.शामली गोड हसतमुख मुलगी होती.कुणालाही तिला पटकन उचलून घ्यावी असे वाटत असे .दोघांनाही बांधून ठेवणारा तो एकच धागा होता .सारंगच्या बेबंद, बेधुंद, बेफिकीर, बेजबाबदार, वर्तनामुळे हा धागा त्यांना किती काळ एकत्र बांधून ठेवू शकेल याबद्दल संदेह निर्माण होऊ लागला होता .विद्याला नोकरी सांभाळून,कुणाच्या आधाराशिवाय ही तारेवरची कसरत करणे फार कठीण जात होते.सारंगचा मदतीऐवजी तापच जास्त होता.शेवटी सारंग दुसऱ्या शहरात कायमचा निघून गेला .दोघांचाही परस्पर संमतीने घटस्फोट झाला .
संसारात दोघांनीही जुळवून घेणे महत्त्वाचे असते .दोघांमध्येही पुरेशी लवचिकता असणे आवश्यक असते .पूर्वीच्या काळी स्त्रिया नाइलाजाने, सामाजिक दडपणामुळे,आर्थिक पारतंत्र्यामुळे , जमवून घेत असत. हल्ली तशी परिस्थिती राहिलेली नाही .
स्त्रिया जास्त स्वयंनिर्भर झालेल्या आहेत .गेली वीस बावीस वर्षे विद्याने शामलीला एका विशिष्ट वातावरणात वाढविले होते.तिला वडिलांची उणीव भासू दिली नव्हती .शामलीला आईची प्रेमगाथा व दुःखांतिका माहीत होती .आईच्या मनाविरुद्ध लग्न करून शामलीला तिला पुन्हा दुःखाच्या खाईत लोटायचे नव्हते.
एकेकाळी प्रेमविवाह केलेली विद्या आता प्रेमविवाहाच्या विरूद्ध होती .
सगळेच प्रेमविवाह फसत नाहीत हे तिला कोण समजावून सांगणार?
सगळीच ठरवून केलेली लग्ने यशस्वी होतातच असे नाही हे तिला कोण सांगणार ?
एके काळी आईवडिलांविरुद्ध बंड केलेली विद्या आता मात्र शामलीने आपल्यापासून दुरावू नये ,आपल्याविरुद्ध बंड करू नये ,म्हणून अतिशय हळवी झालेली होती .
शामली विद्याचा शेवटचा आधार होता .शामलीला ती गोष्ट माहित होती.आईला दुखवून तिला काहीही करायचे नव्हते .सुबोधच्या प्रेमात तर ती आकंठ बुडाली होती .इतिहासाची पुनरावृत्ती तिला करायची नव्हती .म्हणूनच ती सुबोधला, तो आग्रह करीत असतानाही घरी घेऊन कधी गेली नव्हती.
* तिला आईला अगोदर सांगून पार्श्वभूमी तयार करायची होती.*
*आईशी बोलायला तिची जीभ रेटत नव्हती.*
*आज उद्या करता करता इतके महिने निघून गेले होते *
*आज शेवटी ती सुबोधला घेऊन घरी निघाली होती.*
(क्रमशः)
१४/२/२०२०©प्रभाकर पटवर्धन