पु ल देशपांडे आणि वसंतराव
पुल ह्यांचे संगीतप्रेम सर्वानाच ठाऊक आहे. पुण्यात पु ल संगीताच्या बैठकी बसवायचे आणि त्यांत पु ल स्वतः पेटी वाजवत गायचे. त्याशिवाय पु ल संगीत सुद्धा द्यायचे आणि गीते लिहायचे सुद्धा. त्यांच्या बाजूला वसंतराव तबला वाजवायचे.
'वसंताची गायकी पंरपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. दऱ्याखोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी.' - पु.ल. देशपांडे
उत्तम तबला वाजवणारे वसंतराव हळू हळू जाहीर पाने गाऊ लागले आणि पु ल देशपांडे पेटीवाले देशपांडे झाले आणि वसंतराव हे गायक देशपांडे झाले.
पु ल ह्यांनी आपल्या मित्राबद्दल काय लिहिले आहे पहा :
विस्तीर्ण माळावर बिजलीचे जणू काय वादळी थैमान पहात होते. वीस एक वर्षापूर्वीची मैफील. नागपुरात धन्तोलीवर बाबूरावजी देशमुखांच्या बंगल्यावरच्या दिवाणखान्यात ऎकणारेही असे एक्के जमले होते की गाणाऱ्या पुंडलिकालाही आपल्या भेटी परब्रम्ह आले आहे असे वाटावे. तबल्याला मधू ठाणेदार, सारंगीवर मधू गोळवलकर, मी पेटीच्या साथीला आणि गायक वसंत देशपांडे. आम्ही सगळेच तिशीच्या आसपास. आमच्यापैकी कोणीही आदरार्थी बहुवचनात शिरला नव्हता. समोर नाना जोग, बाबूरावजी देशमुख, दोडके, बाबूराव चिमोटे हे सारे आप्त स्वकियच. त्यामुळे दाद मिळायची ती देखील 'क्या बात है वश्या' 'वा मधू-' तशी आपुलकीचीच. कौशीकानड्यातल्या 'काहे करत मौसे बलजोरी'त वसंता घुसला होता. पांढरी चारच्या मुष्किल निघत होती की, सुरांच्या त्या अचाट आणि अत्यंत अकल्पिक स्थानावरून उठणाऱ्या फेकी ठाणेदाराच्या तुकड्यांशी झुंज घेत कुशल धनुर्धाऱ्यासारख्या समेचा केन्द्रबिन्दू वेधून जात होत्या. चिज संपली आणि मैफलीला टाळी देण्याचे भान राहिले नाही. त्या धुंद शातंतेची, त्या सन्नाट्याची दाद, हजार हातांच्या टाळ्यांच्या कडकडाटाहूनही अधिक मोलाची असते. काहीतरी अलौकिक घडताना अनुभवल्यानंतर होणारा आनंद अनिर्वचनिय असतो. त्या मौनाला शब्द शिवला तर त्या क्षणाचे पावित्र्य बिघडले. वसंताच्या गाण्याइतकाच त्या सन्नाट्याचा मजा घेत आम्ही गाणारे वाजविणारे आणि श्रोते काही सेंकद बसलो होतो.
तेव्ड्यात, वाढत्या वयाबरोबर ज्यांचा फक्त खडुसपणाच वाढत जातो अशा नमुन्याचा एका म्हाताऱ्याने आपली कवळी वाजवली. "क्या हॉं - देशपांडे - आपलं घराणं कुठल्यां-" "आमच्यापासून सुरु होणार आहे आमचं घराणं-" वसंताने ताडकन उत्तर दिलं. दिवाण-खान्यातल्या साऱ्या रसिकतेने त्या जबाबाला छप्परतोड टाळी दिली. सुरांची माधुकरी
श्रिमंत घराण्याच्या मोठेपणाच्या लोभाने अपमानित जीवन जगण्यापेक्षा आपल्या एकुलत्या एका तान्ह्या पोराला पदराखाली घेऊन स्वाभिमानासाठी खुषीचं दारिद्र्य पत्करणाऱ्या आईला वसंता त्या दिवशी खरा पुत्र शोभला. वसंताने कधी आपल्या व-हाडातल्या कमळापूरच्या वतनदार घराण्याची पिसे लावली नाहीत की संगितातल्या एकाच घराण्याच्या नावाने कान पकडले नाहीत. कुणी अन्नाची माधुकरी मागतो. वसंताने सुरांची माधुकरी मागितली. ह्या एकलव्याचे अनेक द्रोणाचार्य, नागपुरातल्या शंकररावजी सप्रेमगुर्जींनी त्याला संगिताचे प्राथमिक धडे दिले. लाहोरला आपल्या मामाच्या घरी राहत असताना आसदल्ली खां नावाच्या एका अवलिया उस्तादने सहा महिने फक्त 'मारवा' पिसून घेतला आणि म्हणाले, 'बस हो गया बेटे, यापुढलं गाणं तुला आपोआप सापडत जाईल.' सुरेशबाबूंनी अत्यंत आपुलकीने किराण घराणातल्या खुब्या सांगितल्या, अमाअली भेंडीबाजारवाले यांनी आपल्या स्वच्छंद (रोमॅंटीक) गायकीच्या तबियतीचा आणि गळ्याच्या यकूबाचा शागिर्द भेटल्याच्या आनंदात तालिम सुरू केली. दुर्दवाने वर्षदिड वर्षाच्या आत त्यांचे निधन झाले. ह्या सर्व गुरूजनांकडून वसंताने चार गोष्टी घेतल्या खऱ्या, पण त्याचा जीव मात्र गुंतला होता तो एकाच गायकाच्या स्वरजलांत. तोही असाच एक स्वयंभू गायक होता. सुरांच्या वादळांशी झुंजणारा.
अभिजात संगीत मोठ्या ताकदीने गाणारा. पण कपाळावर 'नाटकवाला' असा शिक्का बसल्यामुळे संगितातल्या शालजोडी आणि शेरवानीवाल्यांकडून उपेक्षित, वसंताचा हा खरा द्रोणाचार्य. वसंताच्या मर्मबंधात लय-सुरांची जी ठेव आहे ती ह्या गायकाची. त्या द्रोणाचार्याचे नाव दिनानाथ मंगेशकर. राज-संन्यासातल्या तुळशीसारखी सुरांच्या उसळत्या दर्यात गळा फेकायची दुर्दम्य महत्वाकांक्षा बाळगणारे दिनानाथ. स्वरसारसापेक्षा स्वरसाह्सात रंगणारे दिनानाथराव हे वसंताचे आद्य दैवत. त्याकाळी दीनानाथराव म्हणजे गोवा आणि व-हाड नागपूर ह्या सुभ्यांचे अधिपती. गोव्याचा 'दिना' व-हाड-नागपूरला दत्तक गेलेला! वसंताच्या बालमनावर पहिला संस्कार घडला तो दिनानाथांच्या गायकिचा.
हनुमंताने जन्मजात सूर्यबिम्ब खायला जावे तसा आठ-नऊ वर्षाचा वसंता एकदम 'रवि मी~' म्हणताच गायला लागला आणि व्यंकटेश थेटरात कानी पडलेल्या तान आपल्या बाल आवाजात फेकायला लागला. सप्रेमगुरूजींच्या गायन-वादन विद्दालयातले हे दोन असाधारण बाल-कलावंत. सप्रे त्यांना रागरागिण्यांच्या वागण्यासवरण्याचे कायदे सांगत होते आणि हे दोन्ही उटपटांग शार्गिद आपले गळे स्वत:च्या तबियतीने फेकत होते. त्यातला एक शिष्य वसंत देशपांडे आणि दुसरा राम चितळकर. राम सिनेमात गेला आणि सी. रामचन्द्र झाला. वसंतालाही बालपणीच सिनेमावाल्यांनी उचलले. भालजी पेंढारकरांनी रामप्रमाणे वसंतालाही हेरले आणि वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी कालियामर्दन सिनेमाच्या हिंदी आवृत्तीत वसंता 'कृष्ण' झाला. नागपूरच्या महाल भागातल्या गल्लीवाल्या आठरापगड पोरात वाढल्यामुळे त्याची मराठीपेक्षा 'टर्रेबाज नागपूरी' हिंदीशीच सलगी अधिक होती. त्याकाळी नागपुरी रईसांची आणि आवामांची भाषा नागपुरी हिंदीच होती. आजही अस्सल नागपुरी मराठी लोक रंगात आले की की तो रंग खुलवायला त्यांना मराठी तोटकी पदते. एकदम हिंदीत घुसतात. मराठीला ती 'किक्' येत नाही. आजकालच्या सरकारी हिंदीलात र 'सेक्स् अपील'च नाही. डॊळ्यांत पाणी आणणारा उखडेलपणा आणि जीवघेणी आपुलकी अशा दोन परस्परविरोधी वाटणाऱ्या प्रवृत्तीचे नागपुरी स्वभाव हे एक अजब मिश्रण होते. वसंता वाढला तो अशाच 'चल् बे साले' आणि 'अबे बैठ बे' ह्या दोन प्रवृत्तींच्या संगमातून घडाणाऱ्या वातावरणात.