युगंधाराची प्रतिज्ञा
उदयन वत्स देशाचा राजा होता. त्याला हत्तीच्या शिकारीचा अतिशय नाद होता. एकदां तो शिकारीसाठी विन्ध्य पर्वतावर गेला होता. त्यावेळी त्याचा मंत्री युगंधर याला त्याच्या हेरांनी येऊन सांगितले की प्रद्योत राजाने नागवनांत एक मायावी हत्ती करून ठेवला आहे आणि त्यात काही सैनिकांना बसविले आहे. त्या हत्तीचा आकार रंग सर्व विचित्रच आहे. त्या हत्तीबरोबर इतर साधे हत्ती हि आहेत. उदयन राजाला पकडण्यासाठीच प्रद्योत राजाने हे कारस्थान रचले आहे. असें हि त्यांनी सांगितले. ही गोष्ट राजाला कळविण्यासाठी युगंधरानें सालक नांवाच्या एका दूताला एक चिट्ठी दिली व म्हणाला,
"महाराज उद्या वेणुवनांतून नागवनांत जाण्यासाठी निघतील. निघण्यापूर्वी ही बातमी त्यांना मिळाली पाहिजे. कसे तरी करून महाराजांना पकडावे म्हणून प्रद्योतने हा डाव टाकला आहे. लवकर जा.”
युगंधर दूताला निरोप देत होता तेवढ्यांत महाराज उदयनचा संरक्षक हंसक तेथे आला. त्याच्या कडून युगंधरला कळले की महाराज आदल्या दिवशीच काही शिकारी व नोकर यांच्या बरोबर एका पाऊल वाटेने नागवनांत पोहोचले आहेत. हा मार्ग जवळचा होता तरी फार धोक्याचा होता. हिंस्त्र पशु त्या वाटेने नेहमी वावरत असत. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर ती पार करून महाराज महागम्भीर पर्वतावर गेले. तेथे एका डबक्यांत काही हत्ती चिखल अंगावर उडवून घेत असलेले दिसले. उदयन राजा ते दृश्य पाहाण्यात गर्क झाला होता, इतक्यांत एका सैनिकाने सांगितले की,
“तेथून दोन मैलांवर एक विचित्र हत्ती आहे. त्याचे दांत व नखे सोडून सर्व अंग निळ्या रंगाचे आहे. तो तेथील सागवानाच्या जंगलांत हिंडत आहे.” राजाचा संरक्षक पुढे म्हणाला.
राजाला तें खरेंच वाटले आणि त्या सैनिकानें जणुं गजश्रेष्ठ कुळातील हत्ती पाहिले आहे, असे समजून त्याला बक्षीस म्हणून सोन्याची कंठी दिली. नंतर राजा आपल्या नोकरांना व शिकाऱ्यांना तेथेच थांबण्यास सांगून एकटाच हत्तीच्या शोधार्थ निघाला. तो वीणेच्या संगीताने हत्तीला वश करून आणण्यासाठी आपली वीणा घेऊन गेला.
उदयन राजा एका घोड्यावर बसून गेला. त्याच्या मागून बीस निवडक शिपाई त्याच्या रक्षणार्थ म्हणून थांबले. दोन मैल गेल्यावर खरोखरच तेथे त्याला तो विचित्र हत्ती दिसला. राजाला पाहतांच प्रद्योतनें उदयनला व त्याच्या लोकांना घेरलें. उदयन चांगला योद्धा होता. त्याचे नोकर सुद्धा तयार होते. ते सर्व संध्याकाळपर्यंत लढत राहिले. शेवटी दमलेला उदयन मूर्छा येऊन पडला. तेव्हा त्याला प्रद्योतनें पकडलें.
हंसक म्हणाला, “मी सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे. राजाला बऱ्याच जखमा झाल्या होत्या. त्याला पालखीत घालुन प्रद्योत उज्जयिनीला घेऊन गेला. आम्ही मूठभर लोकांच्या मदतीने त्यांचे रक्षण होणे शक्य नव्हते म्हणून मी वृत्त कळविण्यासाठी येथपर्यंत पळत आलो."
वृत्त ऐकतांच अंतःपुरांतील सर्व स्त्रिया रडू लागल्या. त्यांचा आक्रोश ऐकून युगंधराने प्रतिज्ञा केली.
तो म्हणाला, "मी राजाला सोडवून आणलें नाही तर नांवाचा युगंधर नाही.”
त्याच वेळी आठ ब्राह्मण जेवत होते त्यांतील एका अर्धवट ब्राम्हण म्हणाला, “आपण माझा वेष धारण करावा म्हणजे ब्राह्मणाला कुणी वेशीवर अड्वित नाही, आपल्याला कोणत्याही राज्यात अडवले जाणार नाहीं असे पातक कुणीही करणार नाही.”
युगंधराने त्या ब्राम्हणाचे कपडे चढविले आणि वेडयाचे सोंग घेऊन तो घराबाहेर पडला. विदूष वसंतक भिकारी झाला आणि रुपयंत मंत्री बौद्ध श्रमणाचा वेश करुन त्याच्या बरोबर निघाले. सारा लवाजमा उज्जयनीत कात्यायिनी मंदिरांत होता. एक दिवस वसंतकानें येऊन सांगितले की,
“आपल्या राजाच्या सर्व जखमा भरल्या आहेत. आतां तो नित्यनियमाने अंघोळ व नित्यकर्मे करूं लागला आहे. राजा प्रद्योताने त्याची फार चांगली व्यवस्था ठेवली आहे.”
"आतां उगीच दिवस घालविण्यांत अर्थ नाही. उद्यांच राजाची सुटका करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करु, नलगिरि हत्तीच्या संबंधी सर्व बातमी मी काढली आहे. त्याला कुठे बांधतात, काय खायला घालतात आंघोळीला कोठे नेतात. कोठे निजवितात वगैरे सर्व माहिती मी आणली आहे. हत्तींना आगीची भीति वाटते.”
पुढे तो सांगू लागला, “हत्तींना आगीची भीती आहे म्हणून उद्या गजशाळेला आग लावली की सर्व हत्ती घाबरून सैरावैरा पळू लागतील. त्यांना आणखी विधरविण्यासाठी देवळांतून मोठमोठ्याने ढोल ढमारे बाजवू. गांवांत हत्तींचा गोंधळ माजला की तेव्हां आपण राजाची सुटका करु”
उदयन ज्या वीणेच्या नादानें हत्तींना वश करायचा, ती 'घोषवती' वीणा सुद्धा आता सेवकांनी आणली आणि राजा प्रद्योताच्या स्वाधीन केली. त्याने ती वीणा आपल्या मुलीला दिली.
एक दिवस राणी सहज राजाला म्हणाली, “वासवदत्तासाठी इतक्या राजांच्या मागण्या आल्या, त्यांनी आपापले दूत पाठविले. परंतु या वत्स देशाच्या राजानें कोणास हि पाठविलें नाही, पाहिलेत...!"
“तो मोठा घमेंडखोर आहे. आपण भरत वंशाचे आहोत, वेदविद्येत पारंगत आहोत.” या वादविवादांचा काहीही फरक उदयनला पडला नाही...! त्याने वासवदत्तेशी लग्न करण्याचे मनात ठरवले होते.
सरते शेवटी राजा उदयननें वासवदत्तेला पळवून आणल्यावर त्या दोघांचे लग्न झाले. काही दिवस आनंदोत्सवांत गेले. दोघे जणु काही साऱ्या जगाला विसरली होती. राजाचे लक्ष विलासांत गुंतले. राजाची वृत्ती विलासी झाली म्हणजे राज्यावर संकट ओढवणारच. तेंच राजा उदयनच्या वत्सराज्याच्या वाटणीस आले. अरुणी नावाच्या एका महत्वाकांक्षी व्यक्तीने राजा उदयनच्या वत्सराज्याचा एक एक भाग करून बराच भाग बळकावला. नंतर त्याने राजधानी कौशाम्बी नगरावर पण हल्ला केला. उदयनचे राजधानीचे महत्वाचे राज्य अरुणीने गिळंकृत केलें ते आता परत कसे मिळविता येईल? या विषयी दरबारात विचार विनिमय झाला. त्यांत सर्वांचे मत असे पडले की मगध राजाची मदत घेतली, तरच राजा उदयनचे वत्सराज्य परत मिळू शकेल. पण ती मदत मिळणार कशी?
यावर सगळ्यांना फक्त एकच उपाय. तो म्हणजे दोन्ही राज्यांचा संबंध जोडणे. मगध देशाचा राजा दर्शक ह्याची एक बहीण होती. उदयनने जर तिच्याशी लग्न केलें तरच त्याची मदत मिळेल. पण वासवदत्ता आहे, तो पर्यंत उदयन दुसरें लग्न करणार नाही, हे सर्वांना माहीत होते. ती असे पर्यंत दर्शक राजा सुद्धा आपली बहीण उदयनला द्यावयास तयार नव्हता. यावर तोड म्हणून त्यांनी एक नाटक रचण्याचे ठरविले. यांत यौगन्धराय तर होताच, वासवदत्तेने सुद्धा भाग घेतला होता. एकदां राजा उदयन शिकारीला गेला होता. तो आपल्या वीणेच्या नादावर हत्तींना गुंगवण्यांत गर्क झाला होता. त्याच वेळी त्याचे दोघे मंत्री धांवत येत असलेले त्याला दिसले.
ते म्हणाले, "अचानक शिबिराला आग लागली. महाराणी वासवदत्ता आंत होत्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी यौगन्धराय आंत गेला. परंतु दोघे हि शिबिराबाहेर येऊ शकले नाहींत.”
राजा घाईघाईनेंच शिबिराकडे आला. तेथे येऊन पाहातो तो खरोखरच त्याला वासवदत्ता आणि यौगन्धराय दिसले नाहीत. त्याला फार दुःख झालें. वासवदत्तेच्या विरहाने तो जवळ जवळ वेडा झाला. इकडे यौगन्धरायाने साधूचा वेश घेतला व वासवदत्ताने ब्राह्मण स्त्रीचा. वत्सराज राजधानीत येतांच ती दोघं बाहेर पडली व सरळ मगध राज्याच्या राजधानीत राजवाड्याच्या बाहेरील आश्रमांत येऊन पोहोचली. त्याच वेळी राजाची बहीण पद्मावती आश्रमाच्या पाहाणीस आली होती. त्या दोघांना फार आनंद झाला. आपले काम आतां फत्ते होणार याची त्यांना खात्री बाटली. पद्मावतीने आश्रमांतील स्त्रियांची विचारपूस केली. ही संधि पाहुन यौगन्धराय पुढे आला.
युगंधराय म्हणाला, "माझी एक प्रार्थना आहे. ही माझी बहीण आहे. हिचा पति विदेशी गेला आहे. म्हणून माझी अशी विनंति आहे की हिला मी परत येईपर्यंत राजकुमारीने आपल्या सेवेशी ठेवून घ्यावें."
राजकुमारीने ही गोष्ट मान्य केली. ह्याच वेळी लावणकलाकडून एक विद्यार्थी आला. तो राजगृहाचाच राहणारा होता. परंतु वेदाध्ययनासाठी तो लावणकला गेला होता. त्याने शिबिराला आग लागून त्यात वासवदत्ता, यौगन्धराय वगैरे जळून गेल्याचे सांगितले.
तो म्हणाला, "उदयन राजा शिकार सोडून परत आला व आपल्या बायकोचे दागिने छातीशी धरून ढसढसा रडला. अग्नीत उडी घेऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न करून पाहिला. पण सर्वांनी त्यांना अडविले. महाराज जवळ जवळ बेशुद्धच झाले.”
विद्यार्थी हें वर्तमान सांगत असता वासवदत्तेच्या डोळ्यांतून टिपें गळू लागली. सर्वांना वाटले की ती फारच हळव्या मनाची आहे. जेव्हां त्या विद्यार्थ्याने सांगितले की मंत्र्यांनी नानाविध उपचार केले आणि आतां त्यांची प्रकृति ठीक आहे तेव्हा सर्वांना हायसे वाटले. पद्मावतीनें हि एक दीर्घ सुस्कारा सोडून आपली सहानुभूति दर्शविली. अशा प्रकारें यौगन्धराय वासवदत्ताला पद्मावतीच्या स्वाधीन करून निघून गेला.
एकदां कामानिमित्त उदयन राजगृहाच्या बाजूला आला होता. दर्शक राजाने त्याचे तेज, रूप व तारुण्य पाहिले तेव्हा त्याला वाटले की हा पद्मावतीसाठी अगदी योग्य वर आहे. त्या प्रमाणे त्याने आपली इच्छा उदयनला सांगितली. त्याने हि विरोध न करतां कबूल केले. झाले, त्या दोघांचे लग्न ठरलें. जसजसा लग्नाचा दिवस जवळ जवळ येऊ लागला तस तशी वासवदत्ताची परिस्थिति फार विचित्र होऊ लागली. ती शक्यतोवर एकांतांत राहू लागली. लग्नाच्या दिवशी तर तिचा आपल्यावरील ताबाच जणू गेला, ती दूर बागेत एका झाडाखाली जाऊन बसली. पण गंमत पहा, तेथे सुद्धा एक दासी येऊन पोहोचली. तिने बरीचशी फुले तिच्या पुढे ठेवून नवऱ्यामुलीसाठी सुंदर गजरा आणि हार करून देण्यास सांगितले.
आपल्या मनांतील चलबिचल ती कोणास सांगणार...! तिने थरथरत्या हाताने ती माळ ओवून दिली. तीच माळ पद्मावतीने लग्नाच्या वेळी उदयनच्या गळ्यांत घातली. एकदां पद्मावती, वासवदता व त्यांची एक सखी बागेत बसून गप्पा मारीत होत्या. तेव्हां वासवदत्तेनें पद्मावतीचे उदयनवर किती प्रेम आहे हे आजमावण्याचा प्रयत्न केला. गप्पा मारत होती.
तेंव्हा पद्मावती म्हणाली, "तुम्ही साल गडे, पण खरेंच सांगते. किनई हे जवळ नसले ना की मला अगदी एकटं एकटं वाटतं. त्यांनी सारखं डोळ्या समोर असावं असं वाटतं. वासवदत्ता तरी त्यांच्यावर असं प्रेम करीत असेल का? असाच विचार माझ्या मनांत येतो."
"तिचे प्रेम निराळेच होते. त्याची कशाला तुलना." वासवदत्ताच्या तोंडून शब्द निघून गेले.
"अवन्तिके, तुला ग काय ते माहीत ?" पद्मावतीने विचारले.
वासवदत्ता थोडी घुटमळली. परंतु स्वतःला सावरून घेतले.
ती म्हणाली, “म्हणजे काय..? तिचे उदयन महाराजांवर अतिशय प्रेम होते म्हणूनच नाही का ती घर सोडून त्यांच्या बरोबर निघून गेली."
नंतर पद्मावती म्हणाली, "खरोखरच वासवदत्तेला विसरले नाहीत वत्सराज. मी एक दिवस वीणा वाजवीत होते. तर त्यांना तिची आठवण होऊन दीर्घ उसासा सोडून ते अंतरिक्षांकडे पहात बसले."
हे ऐकून वासवदत्ताला धन्यता वाटली. त्याच वेळी उदयन व वसंतक पद्मावतीला शोधीत उद्यानांत आले. वासवदत्ता बरोबर असल्याने पद्मावतीला पतीची भेट घेण्याचे साहस झाले नाही. ती जवळच असलेल्या कुंज कुटिरांत शिरली. तिच्याबरोबर तिच्या सखी हि होत्या. वसन्तक तिला शोधण्यासाठी गेला. पण एका सखीचा धक्का एका मधमाशांच्या पोळ्याला लागल्यामुळे तो तेथूनच परतला. नंतर ते दोघे हि एका उद्यानात बसून गप्पा मारूं लागले.
वसन्तक विदूषकच होता. त्याने मोठ्या ऐटीत राजाची परवानगी घेऊन प्रश्न विचारला.
वसंतक म्हणाला, "पद्मावती व वासवदत्ता यांत आपली जास्त लाडकी राणी कोणती?"
राजानें वसंतकला काहीच उत्तर दिले नाही. त्यावरून पद्मावतीने ताडलेच, पण वसंतकनें हि राजाच्या तोंडून वदविले. तें ऐकल्यावर तर शंकाच राहिली नाही.
"आतां तरी महाराजांनी असे म्हणावें का?" एक दासी म्हणाली.
“अग त्यांत वाईट काय आहे. ते गुणवती वासवदत्तेला विसरूं शकले नाहीत. ही तर कौतुकाची गोष्ट आहे.” पद्मावती म्हणाली.
"किती थोर मन आहे तुमचं...!” वासवदत्ता म्हणाली.
नंतर पद्मावतीला राजाकडे पाठवून ती दुसरीकडे निघून गेली. काही दिवस अशाच तऱ्हेने विलासांत गेले. एके दिवशी मात्र पद्मावतीचे डोके फार दुखू लागले. तिने आपल्या अवंतिका नांवाच्या दासीला बोलावून आणण्यास सांगितले, म्हणजे ती गोष्टी सांगून तिची करमणूक करील. दुसऱ्या दासीने ही बातमी राजाला सांगितली.
निरोप कळतांच उदयन वसंतकाबरोबर तेथे गेला. परंतु त्या महालांत पद्मावती अजून आलेली नव्हती. उदयन पलंगावर आडवा झाला आणि वसंतकाला करमणुकीसाठी गोष्ट सांगावयास सांगितले. गोष्ट ऐकता ऐका राजाला झोप लागली, म्हणून वसंतक निघून गेला. निरोप मिळतांच वासवदत्ता हि तेथे आली. तेथे उजेडासाठी फक्त एक पणती जळत होती. त्या उजेडांत तिला पलंगावर कोणी तरी निजलेले दिसले. तिला वाटलें पद्मावतीच निजली आहे.
"बिचारी पद्मावती, का एकटीला सोडून सर्व जणी कशा निघून गेल्या?" असे म्हणत ती जवळ गेली.
हळूच पलंगावर पसली. त्याच वेळी उदयन स्वप्नांत ओरडला,
“वासवदत्ता! वासवदत्ता!!"
"हे तर वत्सराज आहेत. पद्मावती नाही."
ती मनाशीच पुटपुटली, "अग बाई..! मला यांनी पाहिले तर नाही ना? यौगन्धरायाची सारी युक्ति फुकट जाईल.”
पण तेथे कोणी नसल्याने ती निघून गेली नाही. आपल्या पतीकडे पहात तेथेच उभी राहिली, उदयन स्वप्नांत काही बरळत होता. याची उत्तरें तिने दिली. पलंगाबाहेर आलेला त्याचा हात नीट पलंगावर सरकविला आणि आता कदाचित त्याची झोप मोडेल असे वाटून ती तेथून निघून गेली.
त्याच वेळी उदयन उठला व वासवदत्तेकडे पाहून तिला हाक मारली. पण ती थांबली नाही. तो उठून वासवदत्तेच्या मागे धांवला. पण झोपेत असल्याने त्याला दरवाज्याची चौकट लागली. तेव्हा आपण स्वप्न पहात असल्याचे त्याला कळलें. राजाचा आवाज ऐकून वसंतक धांवत आला.
राजाने सांगितलेली हकीगत ऐकून म्हणाला, "अहो, तें सर्व स्वप्नच होतें."
त्याच सुमारास उदयनचा मंत्री रूमणवंत सेना गोळा करून अरुणीशी युद्ध करण्याच्या तयारीने आला. दर्शक राजानें हि आपली सेना सज्ज करून उदयनच्या मदतीला पाठविण्याचे ठरविले. उदयनला निरोप कळतांच तो युद्धाच्या तयारीसाठी निघून गेला. ठरल्याप्रमाणे युद्ध झाले. उदयनचा जय होऊन त्याचे गेलेले राज्य त्याला परत मिळाले. एवढेच काय पण योगायोग असा की त्याची वीणा 'घोषवती' ती देखील त्याला परत मिळाली. ती नर्मदा नदीच्या कांठी पडलेली कोणाला तरी मिळाली. तो ती वाजवीत कौशिम्बिच्या राजवाड्याजवळून जात असतां उदयनने तिचा आवाज ओळखला. तेव्हां त्याला वासवदत्ताची आठवण झाली. तिचा विरह त्याला असह्य झाला. त्याच वेळी प्रद्योत राजानें वासवदत्ता व उदयन ह्यांची चित्रे पाठविली. ती चित्रे ठेवूनच प्रद्योतने आपल्या कन्येचे लग्न लावले होते. वासवदत्ताचे चित्र पाहतांच पद्मावतीने अवन्तिकेला ओळखलें.
तिने विचारले "वासवदत्तेत आणि ह्या चित्रांत काहीं साम्य आहे?"
"हे वासवदत्तेचेच चित्र आहे." तो म्हणाला.
“होय का? मग ह्या चित्रासारखीच एक स्त्री येथे आहे."