Get it on Google Play
Download on the App Store

निरक्षर हव्यासी

भोज राजाच्या वेळी कधी कधी काही अक्षरशून्य ब्राह्मण कालिदासाकडे येत. त्याच्या हाता पायां पडत आणि राजाकडून आम्हाला काही दक्षिणा मिळवून या म्हणून त्याच्या पाठीस लागत. एकदा केशव शर्मा नावाचा एक ब्राह्मण कालिदासाच्या पाठीस लागला.

केशव शर्मा म्हणाला, “माझ्या घरांत खायला अन्न नाही. मुलांची केविलवाणी तोंडे बघवत नाहीत. काहीतरी करून मला राजाकडून इनाम मिळवून या."

"काय विद्या अभ्यास झाला आहे तुझा??” कालिदासाने विचारले.

पण तो काहीच शिकलेला नव्हता. तो मग काय उत्तर देणार कालिदासला..!

"ठीक आहे. मग उद्यो दरवारांत या आणि आल्याबरोबर नक्षत्रांची नांवें घ्या भराभर, तेवढे केलेत तरी काही तरी मिळवून देण्याचा प्रयत्न करीन." कालिदास म्हणाला.

दुसऱ्या दिवशी केशवशर्मा दरबारांत आला. तो आल्याबरोबर कालिदासाने उठून त्याचे स्वागत केले.

“कोण आहेत हे??" राजाने पृच्छा केली.

"एक मोठे विद्वान आहेत. अल्पभाषी आहेत." कालिदास म्हणाला.

राजा भोज उठला. मोठ्या आदराने केशव शर्माला नमस्कार केला आणि बसावयास आसन दिले.

केशव शर्मा,“अश्विनी, पुनर्वसु, रेबति, कृत्तिका” म्हणत राजाला आशीर्वाद देत आपल्या जागेवर बसला.

राजाला अर्थबोध न झाल्यामुळे आश्चर्य वाटलें.

इतक्यांत कालिदासानें “वाह वा! वाह वा..!!" करून आशीर्वादाचे कौतुक केले.

त्याचा अर्थ न समजल्या कारणाने त्याने प्रभार्थ मुद्रेनें कालिदासाकडे पाहिले. त्याबरोबर कालिदासाने एक श्लोक म्हणून दाखविला.

"||अधनी भवतु तेतु मंदुरा मन्दिरे|

बसतु ते पुनर्वसु रेवती|

पति कनिष्ट सेक्या कृत्तिका तनाब विक्रमोभव||"

पुढे त्याने अर्थ हि सांगितला,“तुझ्या अश्वाला घोड्यांनी भरलेल्या असोत. तुझ्या घरांत सुवर्णाची वृद्धि होवो. रेवती पतिचा भाऊ जो श्रीकृष्ण त्याच्या कृपेनें तुला कृत्तिका तनय कुमार स्वामीप्रमाणे पराक्रमी पुत्र रत्न लाभो.”

“हा त्याचा अर्थ ऐकून राजाला आनंद झाला. त्याने खुश होऊन केशव शर्माला बरेंच धन देऊन निरोप दिला. मऊ पाहिले की कसे कोपरांनी खणायला सुरवात करतात, त्याचे एक उदाहरण पहा.

धारा नगरीतील नागरिकांच्या तोंडून एकच गोष्ट ऐकू येऊ लागली, “कालिदासाचा गुरु गज मार्गावर बसला आहे."

ही गोष्ट भोजराजाच्या कानांवर गेली. त्याने कालिदासाला बोलावून विचारले.

भोज राजा म्हणाला, "असे ऐकिलें आहे की आपले गुरु गांवांत आले आहेत, भेटून आलांत का त्यांना?"

कालिदास राजाचा प्रश्न ऐकून जरा विचारांत पडला. पण काही तरी उत्तर तर दिलेच पाहिजे होते.

कालिदास म्हणाला, “मी हि ऐकिलें आहे. जाणार आहे त्यांच्या भेटीला."

कालिदासाला खरोखरच त्या माणसाच्या शोधार्थ जावे लागले. त्याला गाठून कालिदासाने खूप झाडले.

कालिदास त्याला म्हणाला, "तुम्ही म्हणे कालिदासाचे गुरु आहांत म्हणून सुटलांत. समजा ही गोष्ट, कालिदासाला समजली तर तो काय करील माहीत आहे?"

तो ढोंगी घाबरला, “माझा त्यांत काही दोष नाही. मी एक निरुपद्रवी ब्राह्मण आहे. विष्णु शर्माच्या आश्रयाला असतो. उपजीविकेचे काही साधन नसल्यामुळे फार संकटांत आहे मी. मला विष्णु शर्मानेच हा उपदेश दिला. त्याने सांगितले असे केल्याने तो काही तरी इनाम देववील, मी मुद्दाम कांही केले नाही."

असे म्हणून त्याने त्याचे पाय घरले. विष्णु शर्मा कालिदासाचा द्वेष करीत असे. त्याचा अपमान करण्यासाठीच त्याने ब्राम्हणाला तसे करण्यास सांगितले होते. कालिदासाने विचार केला, ठीक आहे. आपण तरी आपला अपमान का करून घ्यावा? होऊ दे या ब्राह्मणाचा फायदा.

असा विचार करून तो ब्राह्मणाला म्हणाला, "राजाला समजले आहे की कालिदासाचा गुरु आला आहे. तो जरूर तुला बोलावणे पाठवील, त्या वेळी जर तूं तोड उघडलेंस तर चांगलीच फजीती होईल आणि राजा कदाचित फांसावर सुद्धा चढवील. जर तुला काही विचारले तर तूं माझ्याकडे बोट दाखव."

कालिदास इतकें सांगून निघून गेला. कालिदासाने राजाला सांगितले की मी माझ्या गुरूला भेटून आलो. पण सध्या त्यांनी मौन व्रत धारण केले आहे. कालिदासचे गुरु म्हणजे ते किती विद्वान असले पाहिजेत ! असा विचार करून राजाने त्यांना दरबारात आणण्यासाठी पालखी पाठविली. दरबारात येतांच सर्व लोक मोठ्या उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागले.

विष्णुशर्मा मनांत म्हणत होता, “आता चांगली गम्मत होईल. त्याला आतून अगदी हास्याच्या उकाळ्या फुटत होत्या. भ्रमाचा भोपळा फुटण्याची तो अगदी वाट पहात होता. तो जेव्हां दरबारांत आला त्यावेळी ‘रावण' शब्दाच्या उत्पत्तीची चर्चा चालली होती. कोणी म्हणाले कैलास पर्वताच्या खाली दबून गेल्यामुळे तो रडला. म्हणून त्याचे नांव रावण झाले. काहींचे म्हणणे काही दुसरेंच होते. कालिदासाच्या गुरूला पाहताच राजानें गुरुकडे पनार्थ नजरेनें पाहिले आणि विचारले की,

“तुमच्या मतें 'रावण' शब्दाची व्युत्पत्ति काय असावी?”

आपल्याला गप्प बसावयाचे आहे हे तो ब्राम्हण विसरून गेला आणि एकदम 'राभण' असे म्हणाला. चुकीचा उच्चार भोजराजाच्या कानाला खटकला.

तो म्हणाला, "गुरुवर्य, आपण तो शब्द राभण कशासाठी म्हणालात...!"

पुढे ब्राम्हण काही बोलण्याच्या आंत कालिदास म्हणाला, "महाराज, आपण इतका वेळ 'रावण' हा शब्द ठीक आहे असे समजून त्याच्यावर चर्चा करीत होतो. परंतु गुरुजींचे म्हणणे आहे की 'रावणा' ऐवजी 'राभण' हा शब्द का असू नये..? आणि त्याचा हा मतितार्थ त्यांच्या शिष्याशिवाय कोणालाहि कळणे शक्य नाही."

कालिदासाने एक श्लोक म्हणून दाखविला.

||भकारः कुम्भकर्णेच,

भकारच विभीषणे,

तबोज्येष्ठ, कुलचेष्टे

ककारः किं न विद्यते?||

पुढे तो अर्थ सांगू लागला, “कुंभकर्णाच्या नांवांत 'भ' आहे विभीषणाच्या नांवांत 'भ' आहे. मग एकट्या रावणाच्या नांवांतच का नसावा! तो तर त्यांचा कुलश्रेष्ठ मोठा भाऊ आहे...!”

कालिदासाच्या या स्पष्टीकरणावर आणि अर्थावर राजा भोज खुश झाला. त्याने कालिदासाच्या गुरूला त्याच्या अगाध ज्ञानाबद्दल खूप दक्षिणा दिली आणि त्याला निरोप दिला.

निरक्षर हव्यासी

कथाकार
Chapters
निरक्षर हव्यासी