खुज्यांचा देश
आल्पस् पर्वतावर राहाणाऱ्या खुजांच्या विषयीं आज सुद्धा कित्येक गोष्टी सांगितल्या जातात. असे म्हणतात की हे खुजे पर्वताच्या जंगलांत गुफेमध्य राहात असत. परंतु ती जागा सोडून ते दुसरीकडे कोठे तरी निघून गेले. या खुजांची उंची दोन फूट होती. फार दयाळू होते. जर कधी कोणी यांची मदत केली तर ते कधी हि विसरत नसत. ह्याचे मुख्य काम म्हणजे गुरे वळणे. या शिवाय ते वैद्यकीत फार हुशार असत. यांना खाण्यापिण्याची विशेष काळजी नसे. या लोकांचे सर्वात जास्त वैशिष्ट्य म्हणजे ह्यांच्याजवळ काही विशेष सिद्धी असत. हे खुजे मनुष्यांच्या मुलांना कोळसामेंट म्हणून आणून देत असत. ह्यांनी दिलेला कोळसा मुलें कोठे तरी ठेवीत असत आणि
दुसऱ्या दिवशी पाहिले की त्या कोळशाचे सोने झालेले आढळून येत असे. काहीं खुजे तर डोंगरावर हिरे शोधीत असत. एकदा एक खुजा उन्हाळ्यांत पर्वतावर हिरे शोधण्यासाठी म्हणून जाई. तो आपल्या बरोबर सात पिशव्या घेऊन जात असे. काही हिरे किंवा किमती दगड त्या पिशव्यांत भरी आणि कोणाशी कांहीहि न बोलतां मुकाट्याने परत जाई. तो रात्री धनगरांच्या मुलांमध्ये गप्पा मारीत बसे. त्यांना आपल्या गांवच्या विचित्र गोष्टी सांगत असे. त्यामुळे मुलें त्याच्यावर खुश असत. एक दिवस धनगराच्या मुलांना खुजांची गंमत करावीशी वाटली.
त्यांनी त्याची एक भरलेली पिशवी लांबवली आणि कोठे तरी लपवून ठेविली. संध्याकाळ होतांच खुजा परत आला. आपले सामान पाहिले. त्यांत त्याला त्याच्या पिशव्यांतील एक पिशवी नाहीशी झालेली दिसली. त्याने त्या मुलांना विचारले की
“माझी सारखांची पिशवी तुम्ही आणून देणार का मला घेऊन या म्हणता? तुम्हांला आणतां आली तर आणा.” धनगराची मुलें म्हणाली.
खुजा डोंगरावर पिशवी ठेविली होती तेथें सरळ गेला आणि आपली पिशवी घेऊन आला. त्या नंतर मात्र कोणीहि कधीहि त्याच्या वस्तूंना हात लावला नाही. हिवाळ्याचे दिवस सुरू झाले. डोंगरावर बर्फ पडू लागले. म्हणून खुजा आपल्या गांवी निघाला. तो मुलांना म्हणाला,
"मी आमच्या गावी निघालो आहे. तुमच्यापैकी कोणी येणार असाल तर चला मी त्याला त्याबद्दल एक पिशवी भरून चांदीची नाणी देईन."
सर्व मुले एकमेकांकडे पाहूं लागली. एक धनगर चांदीच्या मोहाने जाण्यास तयार झाला. तो निघाला आणि पोहोचला खुजाच्या गांवाला. त्या गांवाच्या चहूबाजूंनी तटबंदी होती. बुरुज संगमरवरी दगडाचे होते. ते पाहात त्याने नगरांत प्रवेश केला. पण आता जायचे कुठे? कारण त्या खुजाचे नांव गांव त्याला काही माहीत नव्हते. कोणीकडे जावें काय करावें त्याला सुचेना. असाच तो रस्त्यांतून भटकत चालला होता. तितक्यांत पाठीमागून कोणी तरी त्याच्या पाठीवर थाप मारली. त्याने वळून पाहिले तो एक स्वच्छ व ऐटबाज कपडे घातलेला खुजा त्याला दिसला.
त्या खुजाने धनगरांच्या मुलांची खुशाली विचारली. त्यावरून त्याने ओळखले आपल्याकडे येणारा खुजा तो हाच. नंतर तो खुजा आपल्या पाहुण्याला घरी घेऊन गेला. काय त्याचा तो वाडा..! बिचारा धनगर आश्चर्याने 'आ' वासून पाहातच राहिला. खुजाने त्याला सुग्रास जेवण वाहून संतुष्ट केले. त्यानंतर एका मऊमऊ पलंगावर त्याला विश्रांति घेण्यास सांगितले, अशा त-हेनें आनंदांत आणि ऐशारामांत दिवस जात होते.
काही दिवसांनी त्याला आपल्या घरची आठवण येऊ लागली. आई वडील बहीणभाऊ स्वप्नात दिसू लागले. खुजाने त्याच्या मनातील गोष्ट ओळखली. खुजानें ठरल्याप्रमाणे त्याला पिशवी भर चांदीची नाणी दिली व घरी पाठवून दिले.
एका खेड्यांत एक माणूस राहात असे. त्याची पिठाची गिरणी होती. त्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालत असे. तो फार लोभी होता आणि त्यांत त्याची बायको तर सदोदीत आजारी असे. एका वर्षी या भागांत मुळीच पाऊस पडला नाही. दुष्काळ पडला. लोक जिकिरीला आले. अशा वेळी डोंगरावर राहाणाऱ्या एका खुजाने त्या गिरणीवाल्याजवळ थोडे पीठ मागितले. गिरणीवाल्याने आरडाओरडा केला आणि त्या खुजाला हाकलुन दिले.
गिरणीच्या मालकाचा एक मुलगा होता. त्याला त्या खुजाची दया आली. त्याने आपल्या बापाची नजर चुकवून एका पिशवित पीठ भरून त्याला दिले. एकदां तो मुलगा आपली मेंढरे घेऊन गेला असता त्याला तो खुजा भेटला. त्याने या मुलाला आपल्या घरी जेवावयास बोलाविलें. खूप दूर गेल्यावर त्यांना झाडांत मोठे खिंडार दिसले. त्यांतून ते आंत घुसले. तेच दार होते त्या खुजाच्या घराचें. पुढे त्यांना एक गुहा लागली. आणखी पुढे गेल्यावर नंतर त्यांना समोर एक मैदान दिसले. तेथे एक मोठा मळा होता. पुष्कळसे खुजे तेथे खेळत, नाचत होते. हा मुलगा हि त्यांच्यांत जाऊन मजा करूं लागला. थोड्या वेळाने पाहातो तो एक एक करून सर्व खुजे नाहीसे झाले. फक्त त्याला बोलावणारा खुजा शिल्लक राहिला. तो खुजा त्याला एक फळ देत म्हणाला
"हे फळ आपल्या आईला खायला नेऊन दे. शिळे होऊ देऊ नकोस, व हे फळ आपल्या वडिलांना दे आणि माझी आठवण म्हणून हा मोत्याचा हार तूं आपल्याजवळ ठेव." त्याला त्या सर्व वस्तू देऊन खुजानें त्या मुलाची बोळवण केली.
इकडे मुलगा घरी आला नाही म्हणून आईबाप काळजीत होते. मेंढरें संध्याकाळी संवयीप्रमाणे घरी आली. रात्र गेली. सकाळ आली. दुसरा दिवस गेला. चार दिवस गेले. मुलगा परत आला नाही. सात दिवस झाले. सातव्या दिवशी मुलगा परतला. आई वडिलांना फार आनंद झाला. मुलाने सर्व सांगितले व आईला ते फळ खावयास दिले. आश्चर्य, त्याचा थोडासा रस पोटात जाताच तिला बरे वाई लागले. वडिलांनी आपले फळ फोडले तर त्यांतून मोठमोठे हिरे बाहेर पडले.
एकदा एका खुजाच्या बायकोचे बाळंतपण करायला एक शेतकऱ्याची बायको गेली. सर्व काम उरकुन ती जेव्हां घरी जाऊ लागली तेव्हा त्या खुजानें तिला पाव पोते कोळसे दिले. शेतकरणीला हे बक्षीस पाहून रागच आला. तरी रागारागाने ती ते तसेच घेऊन घरी आली. पोते फाटके असल्यामुळे त्यांतून कोळसे खाली पडत होते. पण तिने त्याची मुळीच पर्वा केली नाही. घरी पोहोचताच तिने ते कोळसे परसांत ओतले व लुगडें शटकू लागली. ती चकित होऊन पाहू लागली. ते सर्व कोळसे सोन्याची नाणी झालेले तिला दिसले. उलट्या पावली ती सांडलेले कोळसे वेचण्यास निघाली. परंतु तिला वाटेंत एकहि कोळसा दिसला नाही आणि सोन्याचे नाणे हि मिळाले नाही.
डोंगराळ प्रदेशांतील एका नदीकाठच्या टेकडीवर काहीं घरे होती. तेथें एक विणकर राहात असे. जे त्याला मिळे त्यावर तो सुखाने व समाधानाने राहात असे. त्याच्या घरी खुजे नेहमी येऊन बसत असत. एका वर्षी त्या नदीला भयंकर पूर आला. त्या विणकऱ्याला भीति वाटली की पाणी आपल्या घरांत शिरेल. ती आपल्या घरांतील सर्व चीजवस्तू दूर गांवांत ठेवून आला. त्याचे अनुमान खरे ठरले. त्याच्या घरात पाणी शिरलें. घरातून बाहेर पडून तो जाऊं लागला एवढयात त्याला कोणाची तरी हाक ऐकू आली. त्याने मागे वळून पाहिले तो एक खुजा त्याच्या घराच्या छपरावर उभा असलेला त्याला दिसला. त्याला सोडून विणकराला पुढे जाववेना. तो परतला. त्या खुजाला खाली उतरवलें आणि त्याला घेऊन तो सुरक्षित जागी आला.
खुजा त्याला म्हणाला,
"तूं संकटाच्या वेळी माझे प्राण वाचविले आहेस. तुझे हे उपकार मी कधी विसरणार नाही. फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी हे पिशवीभर चणे तुला देतो. तुझ्या सर्व कुटुंबाचे पोट भरेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव. ही पिशवी कधी हि रिकामी करूं नकोस. चार चणे तरी आंत ठेवीत जा."
असे सांगून त्याने आपल्या जवळची ती हरभऱ्याची पिशवी त्याला दिली. विणकर आपल्याच काळजीत होता. खुजाची ही भेट त्याला मुळीच आवडली नाही. ती रात्र त्याने आपल्या एका स्नेह्याच्या घरी काढली. दुसऱ्या दिवशी नदीचें पाणी ओसरले. त्यात त्याचे घर शाबूत असल्याचे त्याला दिसले. त्याला आनंद झाला. आपल्या बायको मुलांना घेऊन तो घरी आला. घर साफ करून ते सर्व स्वयंपाकाला लागले. त्यावेळी त्यांना ते चणे उपयोगी पडले. खुजाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी दोन दाणे पिशवीत ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी विणकऱ्याने पाहिले पुन्हां पिशवी भरलेलीच. अशा त-हेने त्याला रोज पोटभर अन्न मिळू लागले.
कापडावर मिळालेले पैसे जमा करून तो सुखाने राहू लागले. असें म्हणतात की ती पिशवी त्यांच्या जवळ काही पिढया होती. एकदा त्यांच्या घरांत नवीन स्वयंपाकीण आली. तिला ही गोष्ट माहीत नव्हती. तिने सर्व पिशवी उल्टी करून हरभरे ओतले आणि पिशवी झाडून रिकामी केली. त्यानंतर कधी पुन्हां भरली नाही.
पूर्वी आल्पस पर्वतावर खुजे राहात असत. पण तेथील लोकांना त्यांच्याविषयी साहानुभूति वाटत नसे. ते तिरस्कारच करीत. त्याचा परिणाम असा झाला की खुजांनीं तें स्थान सोडून दिले आणि कोठे नाहीसे झाले त्याचा मात्र पत्ता नाही. नाहीसे होण्याविषयी एक अशी गोष्ट सांगतात.
एकदां एक शेतकरी आपल्या शेतांत खत घालीत होता. त्याच्या मदतीला काही खुजे आले. ह्या खुजांचे कपडे नेहमी पायघोळ असत. त्यामुळे त्यांचे पाय दिसत नसत. परंतु लोक म्हणत असत की त्यांचे पाय बदकांच्या पायाप्रमाणे असतात. ही गोष्ट त्या शेतक-याने ऐकली होती. या खुजांना आपल्या इतके जवळ आलेले पाहून त्याला त्यांचे पाय पाहण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने पोतंभर चुना त्यांच्या वाटेंत पसरून ठेविला. खुजे नेहमीप्रमाणे त्याच्याशी गप्पा मारीत काम करून निघून गेले. शेतकरी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या पावलांच्या खुणा पाहण्यासाठी धांवला आणि खरोखरच बदकांची पावले उठलेली त्याला दिसली.
पण गंमत अशी की त्या दिवसापासून त्या भागांत खुजे कधी दिसलेच नाहीत.