Get it on Google Play
Download on the App Store

ए मधल्या

द्यूतामध्ये हारल्यावर पांडव जंगलांत राहूं लागले. तेव्हां कुरुजांगल देशांतील यूप गांवाचा केशवदास नांवाचा एक ब्राह्मण आपल्या बायको व तीन मुलांसह उद्यापक नांवाच्या गांवी जाण्यास निघाला. यात्रा करता करता केशवदास जेव्हां पांडवांच्या झोपडीजवळ आला तेव्हां त्याला तेथें एक भयंकर माणूस दिसला. त्याचे पिंजारलेले केस, हिरवे हिरवे मोठे मोठे डोळे, काळा कुळकुळीत रंग, बाहेर निघालेले दांत आणि बाहेर निघालेली दगडासारखी छाती पाहून त्या सर्वांना भीति वाटली. हा भयंकर प्राणी म्हणजे घटोत्कच होता. भीमाची बायको हिडिंबा हिचा हा मुलगा. तो आपल्या आईच्या जेवणासाठी एखाद्या मनुष्याच्या शोधांत होता.

अशा वेळी त्याला केशवदासाचे कुटुंब दिसले. घटोत्कचाला पाहून सर्व भिऊन पळून जाऊं लागले.

"ब्राम्हणांनो, थांबा ! माझं ऐका."

शेजारीच पांडवांची झोपडी आहे, हे माहीत होते त्यांना. पण त्यांनी ऐकले होते की, भीमाला एकट्याला झोपडीच्या रखवालीसाठी ठेवून बाकी सर्व धौम्य ऋषींच्या आश्रमांत गेले आहेत. भीम एकटा असला तरी आमचे रक्षण करू शकेल. परंतु आमचे ओरडणे त्याला ऐकू गेले पाहिजे. या किर झाडीत आपला आवाज तरी त्याच्या झोपडीपर्यंत कोण जाणे पोहोंचेल की नाही. म्हणून गोड बोलुन घटोत्कचाला खूष केले पाहिजे, त्या शिवाय सुटका नाही. असा विचार करून ब्राम्हण म्हणाला

“बाळा, कशाला आम्हांला त्रास देतोस, जाऊं दे आम्हांला आपल्या मार्गानें."

“आपण खुशाल जा. पण आपल्या मुलांपैकी कोणा एकाला माझ्या स्वाधीन करून जा. आज माझ्या आईला नरमांस खाण्याची इच्छा झाली आहे. तिने मला त्यासाठी योग्य अशा माणसाला आणावयास सांगितले आहे.” घटोत्कच म्हणाला.

“अरे राक्षसाधमा ! मी दशग्रंथी ब्राह्मण आहे. जर तूं माझ्या मुलाला मारलेंस तर स्वर्गाचे दार तुझ्यासाठी उघडे का राहील?" केशवदासाने विचारलें.

“एकालाच देतांना असें मागेपुढे करूं लागलांत तर मी त्या पांची जणांना क्षणार्धात मारून टाकीन. काय समजलांत...!" घटोत्कच म्हणाला.

ब्राह्मणाने आपल्या बायकोला विचारले. म्हणाला,

"माझे आयुष्य बरेंच संपलें आहे. तेव्हां मला वाटते मी राक्षसाच्या स्वाधीन झालेले बरे. म्हणजे तुम्ही बाकी सर्व तरी सुखरूप राहाल."

"छे..! छे..!! भलतंच. पतीसाठी सर्वांचा त्याग करणे पत्नीचा धर्म आहे. माझे तरी आयुष्यात काय राहिले आहे..! मलाच त्या राक्षसाच्या स्वाधीन करा..!" बायको म्हणाली.

"पण माझ्या आईला म्हातारी माणसे नकोच आहेत." घटोत्कच म्हणाला.

ते ऐकून केशवदासाचे तिघे ही मुलगे त्या क्षणींच राक्षसाच्या स्वाधीन होण्यासाठी पुढे सरसावले.

“तूं सर्वांत मोठा मुलगा. आतां कर्ता सवरता झालास. तूं नको जाऊस." वडील मुलाला बापाने सांगितले.

"हा अजून लहान आहे. झाला नको बाई." असे म्हणत धाकट्याला आईनें पाठीशी घातलें.

"मी कोणाला नको आहे." मधला मुलगा म्हणाला.

"मला पाहिजे आहेस." चल माझ्याबरोबर." घटोत्कच म्हणाला.

मधल्या मुलाने आपल्या आई-वडिलांचा आणि भावांचा निरोप घेतला. नंतर तो घटोत्कचाला म्हणाला,

“मला फार तहान लागली आहे. मी पाणी पिऊन येतो."

असें सांगून तो तळ्याकडे निघाला. बराच वेळ झाला तो परत आला नाही. तेव्हां घटोत्कचानें केशवदासास त्याचे नांव विचारले. पण त्याने सांगितले नाही. म्हणून त्याने वडील मुलास विचारले. तो म्हणाला

"आम्ही त्याला “ए मधल्या” म्हणून बोलावितों."

“ए मधल्या. चल लवकर" घटोत्कचाने गर्जना केली.

त्याच्या आरोळीने सर्व जंगल दुमदुमलें. भीमाच्या कानावर हि ते शब्द गेले. तो हि कुन्तीपुत्रांत मधला होता. त्याला वाटले त्यालाच कोणी तरी बोलावीत आहे. म्हणून तोच त्या ठिकाणी आला. ज्या केशवदासाला घटोत्कचानें भयभीत करून सोडले होते त्याला पाहून भीमाला कौतुक वाटले.

घटोत्कच पुन्हां ओरडला, "ए मधल्या, चल लवकर."

"हा तुझ्यासमोर तर उभा आहे." भीम म्हणाला.

"आं! तूं सुद्धा मधलाच काय?" घटोत्कचाने विचारले.

"होय. माझ्या आईच्या मुलांत मी सुद्धा मधलाच आहे." भीम म्हणाला.

"हा भीम आसावासा वाटतो." ब्राह्मण बायकोच्या कानांत कुजबुजला. इतक्यांत ब्रामणाचा मधला मुलगा पाणी पिऊन आला.

तो म्हणाला, "हा मी आलो. चला जाऊंया. कोठे जायचे?” इकडे भीमाला ओळखून ब्राह्मणाने आपली सर्व हकीकत भीमाला सांगितली आणि आपले व आपल्या मुलाचे रक्षण करण्यास सांगितले.

केशवदासाचा वृत्तांत ऐकून भीम घटोत्कचाला दरडावून म्हणाला,

“या ब्राह्मणाला उगाच कां दुःख देतोस. दे सोडून त्याच्या मुलाला."

"मी आपल्या आईच्या आज्ञेवरून ह्याला पकडून नेत आहे. म्हणून माझ्या वडिलांनी जरी मला अडविलें तरी मी ऐकणार नाही.” घटोत्कच करारीपणाने बोलला.

आईच्या आज्ञेचाच हा परिणाम आहे. असा विचार भीमाच्या मनांत आल्याशिवाय राहिला नाही. त्याने विचारलें

"कोण आहे रे तुझी आई??”

“हिडिम्बा माझी आई आहे. आणि भीम माझा बाप आहे." घटोत्कचाने सांगितले.

म्हणूनच ह्याच्यांत माझें बळ आले आहे पण स्वभाव आईबर गेला आहे.

“सोडून दे ह्या मुलाला." तो एकदम संतापून म्हणाला.

"मी का सोडीन?" घटोत्कचाने नकार दिला.

“घेऊन जा आपल्या मुलाला." भीमानें केशवदासला सांगितले.

"जर याच्या बरोबर जायची कोणावर पाळीच आली तर मी जाईन."

“असे काय तर मग मी येथेच धरून घेऊन जातो या मुलाला. बघतो मला कोण अडवितो तें." घटोत्कच भीमाला म्हणाला.

"मीच अडवितो तुला. दुसरा कोणी कशाला?”

"तर मग चलच माझ्याबरोबर तूं." घटोत्कचाने सांगितले.

“काढतो तुझा इंगा."

"हो ! हो!! ये, चल मला जबरदस्तीने घेऊन. बघू दे तरी तुझी ताकद. जर तुझ्याच्याने ते झाले नाही तर मी आपण होऊन येतो तुझ्या बरोबर." भीम म्हणाला.

"माहीत आहे का तूं कोणाशी बोलतो आहेस तें..! जरा संभाळून बोल...!" घटोत्कचाने दरडावलें.

"माझाच मुलगा असशील आणि काय." भीम स्मित करून म्हणाला.

हे ऐकतांच घटोत्कचाचा नेहरा लाल झाला. त्याच्या तळव्याची आग मस्तकाला जाऊन पोहोचली आणि त्याचा राग पाहून भीमाला मजा वाटत होती.

भीम, "रागावू नकोस. माझ्या सारख्या वीराने तुझ्या सारख्या वीराला, पुत्र म्हटले तर त्यात काय बिघडले? जर तुला तसे वाटत असेल तर माफ कर...!"

घटोत्कच म्हणाला, "म्हणे माफ कर...! अगोदर अपमान करावयाचा व मग भिऊन माफी मागावयाची, चांगला धंदा आहे...!"

भीम म्हणाला, “भिऊन जिणं म्हणजे काय..? मला नाही बाबा माहीत. जरा मला दाखव ना तें."

घटोत्कच म्हणाला, “दाखवितों भीति तुला. घे काय शस्त्र तुला घ्यायचे असेल ते हातांत."

भीम आपला उजवा हात पसरून ह्या हाताने मी शत्रूला मारतो.

घटोत्कच, "तुला काय वाटले तूं खरोखरच भीम आहेस होय?"

भीम, "हा भीम आहे तरी कोण..? कोणी शिव आहे...! का कृष्ण? का इन्द्र? का यम?"

घटोत्कच, "ह्या सर्वांना एकत्र केले तरी सुद्धा त्याची बरोबरी होणार नाही.”

भीम, “साफ खोटें आहे. माझ्या वडिलांचा अपमान करतोस?" असे म्हणून घटोत्कचाने संतापाने एक झाड उमटले आणि भीमावर फेकले.

भीमाने सुद्धा तेवढ्याच सहजपणे तें बाजूस लोटले. त्याने एक ढोंगर उचलन फेकला तो हि भीमानें दूर फेंकून दिला. एवढ्याने काही झाले नाही म्हणून त्याने कुस्तीला ओढले भीमाला. त्यांतहि घटोत्कच हारला. नंतर त्याने भीमाला आपल्या मायाजालांत आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा हि भीमावर काही परिणाम झाला नाही.

"तूं सांगितले होतेंस ना की जबरदस्ती तुला नेलें नाही तर, तूं स्वत: माझ्याबरोबर येशील? चल तर माझ्याबरोबर.” घटोत्कच गर्वाने म्हणाला.

“दाखव रस्ता." म्हणून भीम घटोत्कचाच्या मागून चालू लागला.

ते हिडिम्बाच्या घराजवळ आले. भीमाला घरा बाहेरउभा करून घटोत्कच आईला सांगायला आंत गेला.

“आई! तुझ्या जेवणासाठी मी मनुष्य आणला आहे. तूं सांगितले होतेंस ना?"

“कसा काय आहे माणूस." आईनें विचारलें.

“आहे मनुष्यच पण त्याची शक्ति अचाट आहे. ती काही माणसाची वाटत नाहीं."

घटोत्कच म्हणाला, "असं..! वधू तरी कोण माणूस आहे तो..!"

हिडिम्बाने बाहेर येऊन पाहिले. म्हणून स्मित करून तिनें मान खाली घातली. नंतर आपल्या मुलाला म्हणाली,

“बाळा..! हे साधे मनुष्य नाहींत. आपल्याला दोघांना परमेश्वरासारखे आहेत, हे तुझे वडील आहेत." आपण लागलीच घटोकच भीमाच्या पायां पडला. आपल्या उद्दामपणाबद्दल क्षमा मागितली आणि कौरवांच्यासाठी दावा मि होण्याचे त्याने अभिवचन दिले.

"हे काय चालविलें आहेस तू, हिडिंबा..?" भीमाने विचारलें.

“तसं काही नाही. मला आपल्या दर्शनाची इच्छा झाली म्हणून मी आपल्या घटोत्कचाला एखाद्या माणसास पकडून आणण्यासाठी सांगितले. मला माहीत होते की आपण त्या माणसाचे रक्षण करण्यासाठी याल." हिडिम्बा म्हणाली.

“मला वाटले अजून तुझा राक्षसी स्वभाव गेला नाही." भीम म्हणाला.

त्या नंतर केशवदास भीमाचे आभार मानून आपल्या. बायको-मुलांसह आपल्या वाटेने निघून गेला.

भीम मात्र आपल्या बायकोचे प्रेमाचें आदरातिथ्य घेण्यासाठी तेथेच राहिला.

ए मधल्या..!

कथाकार
Chapters
ए मधल्या