Get it on Google Play
Download on the App Store

भूमिपुत्र

अनिकेत ला जाग आली तेंव्हा सूर्य तोंडावर आला होता. प्रखर सूर्यकिरणांनी त्याचा चेहरा जणू जळत होता आणि त्याच वेळी त्याच्या इतर शरीरांत एक विचित्र थंडी पसरली होती. त्याने घाबरून आजूबाजूला पहिले. त्याच्या संपूर्ण शरीरावर चिखल होता. खरे तर तो पाण्यात होता. उथळ पाणी, जणू दलदल. संपूर्ण जागा त्याच्या ओळखीची नव्हती. नक्की आपण पाण्यात आहोत कि जमिनीवर हे सुद्धा त्याला समजत नव्हते. ह्या दलदलींत मगर वगैरे तर नसेल ? किंवा अनाकोंडा ? त्या विचाराने तो आणखीन घाबरला त्याने उठायची धडपड केली आणि त्या दलदलीत तो आणखीन रुतला. दलदलींत पाडाळतो तर जास्त हालचाल करायची नसते, त्याला आठवले. त्यांने हालचाल बंद केली. त्या दलदलींत सुद्धा काही झाडे होती. त्यातील एका झुडुपाला त्याने पकडले आणि तो वर आला. हळू हळू रांगत तो मोठ्या झाडांच्या दिशेने गेला. तिथे जमीन घट्ट होत गेली. शेवटी तो जमिनीवर पोचला. आणखीन काही चालल्यावर त्याला ओळखीची झाडे दिसले. नारळाची उंच झाडे. आणखीन थोडेच पुढे गेल्यावर पांढरी शुभ्र वाळू आणि पुढे अथांग समुद्र. 

तो धावत त्या समुद्राच्या पाशी गेला त्याच्या त्या गरम आणि खरात पाण्याने त्याने अंग धुतले. तो चिखल काढला. आणि हे सर्व झाल्यानंतर त्याच्या डोक्यांत विचार आला. अरे आपण इथे आलो तरी कसा ? त्याला अगदी काहीही आठवत नव्हते. म्हणजे त्याला आपले नाव अनिकेत आठवत होते पण त्याशिवाय आपण काय काम करतो ह्या बेट सदृश्य जागेवर आपण कसे आलो ? आपली बोट बुडाली असेल का ? मग आपण बोट वर तरी का होतो ? आपले मित्र, परिवार कोण आहेत ? 

म्हणजे काही तरी अपघात होऊन मी इथे पोचलो आणि कदाचित स्मृतिभ्रंश झाला असेल ? हेच कारण बरोबर वाटत होते. मग अश्या परिस्थितीत माणूस काय करतो ? बेटावर लोक आहेत का पाहतो, नसतील तर मग मोट्ठी आग वगैरे लावून मदत बोलावतो. आणि मासे वगैरे पकडून इथे राहण्याची व्यवस्था करतो. हे सर्व त्याला आठवत होते. पण हे कसे आठवते हे ठाऊक नव्हते. मग त्याला हळू हळू चित्रपट हि संकल्पना आठवली. पण नक्की कुठला चित्रपट आपण पहिला आहे? कुठे पहिला हे मात्र आठवत नव्हते. 

मग तो काही वेळ एका नारळाच्या झाडाखाली बसला. त्याने लक्षपूर्वक आपले कपडे पहिले. निळ्या रंगाची पॅन्ट, सफेद रंगाचा शर्ट, जणू काही नौदलाचा युनिफॉर्म. म्हणजे मी नौदलांत आहे ? त्याला काहीच आठवत नव्हते. 

आता हे बेट आहे कि मुख्य जमीन ? मुख्यतः जमीन असती तर प्रश्नच नव्हता. कुणाला तरी सांगून पोलिसांकडे जायचे आणि ते पुढे त्याच्या कुटुंबियांना शोधतील. पण कुणीच नाही तर मात्र मदत येई पर्यंत त्याला इथेच राहणे भाग होते. 

त्याने मग अंत जमिनीच्या दिशने वाटचाल केली. किनारपट्टीचा भाग जाऊन आता दलदल वाटत होती. गढूळ पाणी, कुठे कुठे जमीन, त्यांतून वर येणारी विचित्र झाडे. त्यातुंन चालणे शक्यच नव्हते, आणि दुसऱ्या बाजूला पर्वत वगैरे काही दिसत नव्हते, फक्त दलदल. त्याला प्रचंड उलटी झाली. कुठेही प्लास्टिक, ग्लास वगैरे मानवी वस्तू दिसत नव्हत्या म्हणजे कदाचित तो एखाद्या बेटावरच होता. संपूर्ण बेट फिरून पाहणे दलदलीमुळे शक्य नव्हते आणि आपणाला पोहता येते कि नाही ह्याची त्याला अजून आठवण नव्हती. 

बराच वेळ फेरफटका मारल्यानंतर त्याला एका ठिकाणी एक छोटीशी होडी दिसली. मानव निर्मित एक तरी गोष्ट दिसल्याने त्याला आनंद झाला. होडी असेल तर तिचा मालक सुद्धा इथे असू शकतो. त्यांनी त्या छोट्याश्या होडीत बैठक मारली. वल्ह त्यांत होते. त्याने मग ती होडी चालवायचा प्रयत्न केला. दलदलीत पाणी उथळ असले तरी होडी चालविण्यासाठी पुरेसे होते. बराच वेळ होडीने त्याने त्या दलदलीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याच दलदलीच्या प्रदेशांत त्याला पुढे एक छोटीशी इमारत दिसली. जणू एखादा दीपस्तंभ. 

ती इमारत पाहून त्याला थोडे घाबरल्यासारखे झाले. जुनी दगडी इमारत. त्या दलदलीत मध्येच उभी होती. होडी त्याने थांबवली आणि त्या चिखलांत पाय घालून तो त्या इमारतीकडे सरकला. त्याचे दार जुने वाटत होते. ते अलगद सरकले. त्या दगडी इमारतीत आंत गोलाकार पायऱ्या वर जात होत्या. अनिकेत त्या चढत वर गेला. सर्वत्र कोळ्यांचे जाळें, कुठे कुठे वटवाघुळे होती. समुद्राचा खारा वारा आसमंतात पसरला होता. सर्वांत वरच्या मजल्यावर एक खोली होती. टापटीप ठेवलेली, एक टेबल, भिंतीवर काही जाणत फोटो, खिडक्या मोठ्या होत्या आणि एक छोटीशी शिडी वर जात होती जी कदाचित मुख्य दीप कडे जात असावी. अचानक अनिकेत दचकला. कोपऱ्यांत एक अत्यंत कृष्णवर्णीय व्यक्ती जमिनीवर शांतपणे बसली होती. माणूस पाहून एका बाजूने अनिकेत सुखावला असला तरी त्या माणसाच्या काळेभोर रंगाला तो कदाचित घाबरला असावा. त्या माणसाने फक्त एक चड्डी सदृश्य वस्त्र धारण केले होते. त्याने अनिकेत कडे पहिले तो उठला आणि प्रचंड वेगाने काही तरी अगम्य भाषेंत बडबड करत खाली धावत गेला. अनिकेत बाजूला झाला. कदाचित तो एखादा वेडा किंवा ह्या बेटावरील आदिवासी असावा असा कयास अनिकेत ने लावला. टेबल वर एक डायरी होती. बाजूला काही पेन्स. अनिकेत ने डायरी वाचायचा प्रयत्न केला पण त्याला त्यांचा अर्थ काही कळाला नाही. त्यांत लोकांची नावे, वेळ, तारखा इत्यादी गोष्टी होता. वैयक्तिक अशी माहिती नव्हतीच. 

इतक्यांत त्याला पावलांचा आवाज ऐकू आला त्याने दाराकडे जाऊन पहिले. खालून कुणी तरी वर येत होते. तो थांबला. एक वृद्ध व्यक्ती वर आली. ८० वर्षे तरी जुनी असावी, तोंडावर सुरकुत्या, अनिकेत प्रमाणेच अंगावर कपडे. वय जास्त असले तर चेहेऱ्यावर चमक होती. 

"अनिकेत, आलास का ? " त्याने म्हट्ले. 

"आपण मला ओळखता ?" अनिकेत ने आश्चर्याने विचारले. 

"अरे न ओळखायला काय झाले ? तुम्हा सर्वाना एकच नाव तर आहे. अनिकेत. माझे नाव सुद्धा अनिकेतच आहे". 

अनिकेत गोंधळला. "म्हणजे नक्की काय ?   मी कोण आहे कुठून आलोय, मी ह्या बेटावर का ? मला काहीही आठवत का नाही आहे ? " 

बाजूला एक दुर्बीण पडली होती ती त्या वृद्ध माणसाने उचलली. अनिकेतला दिली, ह्या खिडकीतून बाहेर दूर समुद्रात बघ. अनिकेतने तसेच केले. 

वर वर शांत वाटणाऱ्या समुद्रांत खरे तर आंत एक वादळ होते. लाटा प्रचंड मोठ्या होत्या. अनिकेत ने सर्व खिडक्यांतून बाहेर पहिले सर्वत्र तेच दृश्य. साध्या  डोळयांना शांत वाटणारा समुद्र बाहेर खरे तर अत्यंत खवळलेला होता. 

"म्हणजे हे बेट चारी बाजूना एका खवळलेल्या समुद्रांत आहे ? पण ह्याचा माझ्याशी संबंध काय ? माझी बोट बुडाली का इथे ?" त्याने विचारले. 

वृद्धाने त्याला इशारा केला आणि तो पायऱ्या उतरून खाली जायला लागला. 

बाहेर अनिकेतची होडी गायब होती. चिखलातून पाय उचलत तो माणूस त्याला पुढे घेऊन गेला. दलदलींत त्याला हालचाल जाणवत होती. कदाचित एखादी मगर किंवा मोठा साप फिरत असावा असे वाटत होते. त्याने अनिकेतच्या हृदयांत प्रचंड धाकधूक होत होती. 

मग एका ठिकाणी ते थांबले. अनिकेत ने लक्षपूर्वक पहिले आधीचा तो काळभोर माणूस पुढे पाण्यात काही तरी करत होता. अनिकेत ने पुढे जाऊन पाहायचा प्रयत्न केला. पुढे जे दिसले ते पाहून तो अत्यंत घाबरला आणि वेगाने मागे यायचा प्रयत्न त्याने केला आणि त्या चिखलांत अडकून तो खाली पडला. 


"हे काय आहे ? " त्याने किंचाळून त्या वृद्ध माणसाला विचारले. पुढे पाण्यात एक मृत बालकाचे शरीर होते. तो काळा माणूस त्याला चिकाळांत आणखीन खोल गाडत होता. 

"तो सुद्धा अनिकेतच आहे" त्या वृद्ध माणसाने शांत पणे सांगितले. 

"आम्हाला कुणालाही कुटुंब नाही, बालपण नाही आणि आठवणी नाहीत. आम्ही माणूस आहोत आणि म्हणून म्हणून आम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे. पण त्या व्यतिरिक्त आम्हाला आणखी काहीही ठाऊक नाही. तू आणि मी वेगळे नाही आहोत. तू सुद्धा मीच आहे. वेगळ्या भाषेंत सांगायचे तर आम्ही क्लोन्स आहोत. " 

अनिकेत गोंधळून ऐकत होता. 

"माणूस म्हणून आम्हाला सर्वाना काही बेसिक ज्ञान आहे. पण सर्व इतिहास ठाऊक नाही. त्यामुळे आम्ही आपले अनुभव लिहून ठेवतो. एक अनिकेत मरतो तेंव्हा नवीन अनिकेत येतो. कधी कधी अनेक येतात. मग आम्ही आपले ज्ञान एकमेकांना देतो आणि प्रत्येक अनिकेत आधीच्या सर्व अनिकेत पेक्षा जास्त हुशार, ज्ञानी असावा असे आमचे प्रयत्न असतात." त्या वृद्ध व्यक्ती म्हटले. 

"पण मी इथे आलो कसा ? " अनिकेत ने विचारले. 

आम्ही भूमीपुत्र आहोत. म्हणजे ह्या चिखलांतून आमचा जन्म होतो. कदाचित ह्या चिखलांत काही विशिष्ट यंत्रे असावीत किंवा पृथ्वीचा हा गर्भ असावा. आम्ही खूप प्रयन्त केले तरी हे कोडे आम्हाला उलगडले नाही. ह्या चिखलांतून आम्ही वर येतो, कधी कधी कधी आमची वाढ होत नाही, कधी कधी आम्ही मृत जन्माला येतो. तू खूप नशीबवान आहेस कारण तू जन्माला आला तेंव्हा मी इथे जिवंत आहे त्यामुळे मी स्वतःहून तुला हे ज्ञान देऊ शकतो. नाहीतर मी मेलो असतो तर तुला स्वतःहून हे सर्व काही शोधावे लागले असते. 

"मला हे काहीच समजत नाही. मला इथे राहायला नको आहे. ह्या बेटावर मी काय करायचे ? " 

"अनिकेत आम्हाला सुद्धा ते ठाऊक नाही. कदाचित आम्ही एका वेगळ्या ग्रहावर आहोत आणि कदाचित स्त्री नसल्याने आम्ही जास्त प्रमाणात प्रजनन करू शकत नाही. किंवा पृथ्वी नष्ट झाली असावी आणि आम्ही कदाचित पृथ्वीला पुन्हा वसण्यासाठी निर्माण केलेला एखादा फेलसेफ प्रोटोकॉल. किंवा आम्ही निव्वळ सिम्युलेशन सुद्धा असू शकतो म्हणजे आम्ही एक संगणक प्रोग्रॅम आहोत. आम्हाला वाटते कि आम्ही माणूस आहोत पण प्रत्यक्षांत आम्ही कोणीही नाही. पण तुझ्या आधी जे अनिकेत आले त्यांनी सर्वानी स्वतःला भूमिपुत्र मानले." 

"म्हणजे आम्ही उद्धेशहींन आहोत ? " अनिकेत ने विचारले ? "आणि हे बेट सोडून का नाही जाऊ शकत आम्ही ?" 

"खूप अनिकेत नि प्रयत्न केले पण कुणीही परत आले नाही. एकच व्यक्ती परत आला आणि त्याच्या मते बाहेर समुद्रांत अत्यंत प्रचंड मोठे वादळ आहे आणि अनेक जहाजे आहेत ज्यावर माणूस नाही. जुने अनुभव लिहिण्यासाठी त्या खोलीत कॉट खाली एक पेटी आहे. त्यांत काही वह्या आणि काही पेन्सिल आहेत. पण त्या अत्यंत जपून वापर कारण त्या संपल्या तर आणखीन नसतील. त्यामुळे जे अनुभव अत्यावश्यक आहेत तेच लिही. " 

अनिकेत ने गोधळून मान हलवली.  "आणि हा माणूस आहे तो कोण आहे ? " त्याने त्या काळ्या माणसाकडे हाताने निर्देश केला. 

"ह्याला आम्ही फक्त सर्व्हन्ट म्हणतो. हा नक्की कोण आहे किंवा काय आहे ठाऊक नाही. सर्वांच्याच लेखनात ह्याचा उल्लेख आहे. हा इथे नेहमीपासून आहे, हा कदाचित मरत वगैरे नाही पण ह्याला जास्त बुद्धिमत्ता सुद्धा नसावी. त्याच्या वाटेला जास्त नको जाऊस तोही तुला त्रास देणार नाही, आम्ही सिम्युलेशन असलो तर हा कदाचित त्याचा अँटी व्हायरस असेल. " 

"अनिकेत तुला तुझ्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा. माझा येथील वेळ संपत आला आहे. त्यामुळे मी तुझी रजा घेतो. " असे म्हणताच त्या वृद्ध माणसाला झटका आला आणि तो पाण्यात कोसळला. आणि तो पडताच सेवकाने त्याच्यावर झडप घालून त्याला चिखलांत आंत नेले. 

अनिकेतच्या मनात काहूर माजले होते. इथे अन्न कुठून येणार ? पाणी कुठून येणार ? दिवसभर नक्की करायचे तरी काय ? ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळवायला त्याला आता संपूर्ण आयुष्य होते. तो जाड पावलांनी माघारी फिरला आणि त्या दगडी इमारतीच्या पायऱ्या चढू लागला. 

--- 

नौदल मुख्यालय. त्या आलिशान आणि प्रशस्त मिटिंग हॉल मध्ये नौदलाचे प्रमुख, डिफेन्स स्टाफ चे प्रमुख, प्रधान मंत्री आणि सुरक्षा कॅबिनेट कमिटीचे सदस्य उपस्थित होते. वाईस ऍडमिरल मृगनयनी जोशी प्रेझेन्टेशन देत होत्या. स्क्रीनवर अनिकेतचा चेहेरा होता. 

"मागील ३० वर्षे नौदलाचा हा अतिशय गोपनीय प्रकल्प लक्षद्वीप मधील भूगर्भ ८ ह्या बेटावर चालत आला आहे. ह्या दरम्यान अनेक प्रधान मंत्री बदलले, आमचे ऍडमिरलस् बदलले पण ह्या गुप्त प्रकल्पाची माहिती फक्त काहीच जणांना होती. देशांतील सर्वांत मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या, जैवशास्त्र कंपन्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांना एकत्र घेऊन आम्ही हा प्रकल्प निर्माण केला होता. आज ह्या प्रकल्पाने एक खूप महत्वाचा मैलाचा दगड ओलांडला आहे. म्हणूनच आज आम्ही काही जास्त व्यक्तींना ह्या प्रकल्पाची माहिती देत आलो आहोत. " 

"भूगर्भ ८ हा एक जैवशास्त्रिय प्रकल्प आहे. एक विशिष्ट प्रकारची बॅक्टरीया वापरून आम्ही कुठल्याही चिखलाला जणू मानवी गर्भाचे रूप देऊ शकतो. सूर्यकिरण, काही प्रथिने आणि प्राणवायू निव्वळ ह्यांचा मदतीने हा बॅक्टरीया गर्भाशयातील द्रव निर्माण करतो आणि ह्यांत फक्त काही छोटे गर्भ सोडले कि त्यांची वाढ होऊ लागते. १०००त एखादाच गर्भ वेगाने वाढून पूर्ण मानवी शरीर प्राप्त करतो. " 

"युद्धाच्या दृष्टिकोनातून तसेच मानवी भविष्याच्या दृष्टीकोणातून ह्याला खूप महत्व आहे. कारण इतर ग्रहांवर जर आपणाला मानवाला पोचवायचे असेल तर संपूर्ण माणसाला पाठविण्याऐवजी आपण भूगर्भ ८ पाठवू शकतो आणि त्या ग्रहावर आपण वाट्टेल तितके मानव निर्माण करू शकतो. शत्रूच्या देशांत सैनिक पाठविण्याची गरज नाही, योग्य ठिकाणी हा चिखल आणि काही एम्ब्रॉयो पाठविले तरी पुरेसे आहेत. "


"आणि इतकेच नाही तर ह्या चिखलाला संपूर्ण माणूस निर्माण करण्यासाठी फक्त ८ तास लागतात. त्याशिवाय ह्या माणसाला आम्ही वाट्टेल तो जेनेटिक मेकअप देऊ शकतो म्हणजे ह्या माणसाला जन्मताच आपण काही बेसिक आठवणी आणि ज्ञान देऊ शकतो. त्याला शाळेंत वगैरे जायची गरज नाही. अगदी आम्ही ऑनलाईन जाऊन आपली नवीन गाडी configure करतो त्याच प्रमाणे आम्ही ह्या माणसाचे भविष्य ठरवू शकतो. पण हे तंत्रज्ञान विकसित करायला आम्हाला बराच वेळ लागला. आम्ही अनेक प्रयोग केले आणि हजारो अनिकेत निर्माण करून शेवटी आज अनिकेत ६७०४ ने सर्वप्रथम आम्हाला हवे असलेले रिपोर्ट्स दिले त्यामुळे प्रकल्पाचा किमान हा भाग यशस्वी झाला आहे" 

वाईस ऍडमिरल जोशी ह्यांनी समोरील पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली. 

"पण हे अपेक्षित रिपोर्ट्स काय होते आणि त्याआधीच्या अनिकेत ना काय झाले ? " रक्षा मंत्री हरबक्ष सोधी ह्यांनी विचारले. 

"अनेक अनिकेत ना आधी शारीरिक समस्या होत्या. त्या हळू हळू सुधारत गेल्या अनिकेत ४००० नंतर त्यांची शरीरे ठीक असायची पण आठवणी, भावना इत्यादी प्रोग्रॅम करणे आम्हाला कठीण जात होते. अनिकेत ६१०० पर्यंत आम्ही ते सुद्धा बऱ्यापैकी साध्य केले. त्यानंतर आम्ही अनेक अनिकेत ना विविध आठवणी दिल्या. अनिकेत ६७०३ हा जन्मतःच वृद्ध म्हणून जन्माला घातला गेला होता, त्याला आम्ही अनेक आठवणी दिल्या होत्या कि ह्या बेटावर तो शेकडो वर्षांपासून आहे इत्यादी. अनिकेत ६७०४ येताच आपले ज्ञान त्याला देऊन ६७०४ ने त्याचा वारसा पुढे चालवावा हे अपेक्षित होते आणि अगदी तसेच झाले. 

अनिकेत ६७०४ शारीरिक आणि मानसिक दृष्टया अतिशय कणखर आहे. आता आणखीन अनिकेत निर्माण केले तर ते सर्व मिळून त्यांना जो काही ऑब्जेक्टिव्ह दिला जाईल तो पूर्ण करतील. " 

जोशी ह्यांनी स्पष्ट केले. 

"पण ह्या तंत्रज्ञानाचा नक्की फायदा काय ? शत्रू राष्ट्रे आम्हाला थोडीच घाबरतील ? " रक्षा सचिवांनी विचारले. हा प्रकल्प रक्षा मंत्रालयाला सुद्धा अजून पर्यंत गुप्त होता. 

"ह्या प्रकल्पाने मानवी उत्क्रांतीचा वेग वाढणार आहे. माणूस जन्माला येतो, मोठा होतो, शिक्षण घेतो, त्याचा फायदा घेऊन नवीन शोध वगैरे लावतो. आता आम्ही एक केमिकल अभियंता अनिकेत, एक सॉफ्टवेर अनिकेत आणि एक डॉक्टर अनिकेत साधारण ८ तासांत निर्माण करू शकतो. ह्यांना अनेक खोट्या आठवणी देऊन कृत्रिम फॅसिलिटीत ठेवून आम्ही त्यांना नवीन शोध लावण्यास परावृत्त करू शकतो. उद्या आम्हाला युद्धकाळांत १००० फायटर पायलट्स ची गरज भासली तर फक्त ८ तासांत आम्ही ते निर्माण करू शकतो." 

गृहमंत्री केशव मिश्रा ह्यांच्या चेहेऱ्यावर मात्र आठ्या होत्या. "ह्या गोष्टीचे नैतिक परिणाम आम्ही लक्षांत घेतले आहेत काय ? आम्ही देवाप्रमाणे ह्या लोकांचे भवितव्य ठरवत आहोत आणि त्यांना अक्षरशः गुरांप्रमाणे वागवत आहोत. हे बरोबर आहे का ? हे आंतरराष्ट्रीय समुदायाला समजले तर भारताला शरमेला सामोरे जावे लागेल ह्याचा विचार आपण केला आहे का ? " 

ऍडमिरल जोशी ह्यांनी मंद स्मित केले. 

"माननीय मंत्रीजी, आता आम्ही आणि तुम्ही सुद्धा अनिकेत प्रमाणेच असे क्लोन्स असलो तर ? तुमचे सर्व अनुभव खोटे असून तुम्ही सुद्धा जैवशास्त्रीय दृष्टया प्रोग्रॅम केलेले क्लोन असू शकता, म्हणून तुम्हाला स्वतःचे अस्तित्व मान्य नसेल का ? आम्ही अनेक मानवांची निर्मिती एका स्वार्थी हेतूने करत आहोत हे बरोबर आहे आणि त्यामुळे त्याला आपण अनैतिक म्हणून शकता पण त्या क्लोन्स च्या दृष्टीकोनांतून पहिले तर एक मूळ जन्माला घालण्यासारखेच आहे. " 

बराच काळ राजकारणी आणि रक्षा अधिकारी ह्यांनी ह्या विषयवार चर्चा केली, पण शेवटी हा शोध भारताला विश्वांतील सर्वांत मोठी ताकद बनवेल ह्यावर सर्वांचेच किमत झाल्याने त्यांनी मिटिंग संपवली. 

---- 

अँड्रोमेडा गॅलेक्सी, ग्रह फ्रा. 

त्या महाप्रचंड संगणकावर अगम्य भाषेंत असंख्य माहिती येत होती. एका बेड वर "डू" आपल्या शेवटच्या घटका मोजत होते. "सर, पृथ्वी ग्रहावर संस्कृतीने कॅटेगोरी ७ जैवशास्त्रीय उत्क्रांती पार केली आहे. आपला पुढील आदेश काय आहे ? " 

डू ह्यांच्या सेवकांनी त्यांना सांगितले. डू म्हणजे एक अतिप्रचंड दगड होता. म्हणजे इतरांसाठी दगड पण प्रत्यक्षांत त्यांना स्वतःची बुद्धिमत्ता होती, अनादी काळापासून डू संपूर्ण अस्तित्वाच्या उत्क्रांतीचे साक्षीदार होते. ते त्रिकाल ज्ञानी, सर्व ज्ञानी आणि सर्व शक्तिशाली असावेत असा काहींचा कयास होता. 

"पृथ्वी म्हणजे तोच ग्रह ना जिथे लोकांनी ह्या आधी माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून घेतली होती ? इतक्या लवकर त्यांनी पुन्हा कॅटेगोरी ७ गाठली ? " डू ह्यांना उत्तर ठाऊक होते पण त्यांनी निव्वळ सम्वाद म्हणून प्रश्न विचारला. त्यांच्या सेवकाने संगणकावर पाहून "हो, ह्यांनीच ब्रम्हज्ञान म्हणून आपली ओळख केली होती. त्यांनी ते कसे साध्य केले हे आजतागायत आम्हाला समजले नाही. पण त्यानंतर आम्ही पृथ्वीला रीसेट केले होते, त्यातून त्यांनी पुन्हा प्रगती केली आहे. " सेवकाने सांगितले. 

"राहू दे मग, पृथ्वी वासी पुढे काय करतील ह्यांची उत्सुकता मलाही आहे. "  असे म्हणून डू ह्यांनी पुन्हा तंद्री लावली. 

त्यांचा सेवकाने ते ऐकून रिसेट बटनावरील हात काढला आणि पृथ्वीला आणखीन काही दिवस जगायला मिळाले . 

 


 

भूमिपुत्र - विज्ञानकथा

Anahita
Chapters
भूमिपुत्र