प्रकरण २
मी त्या मुलाला कसे भेटलो हे ज्योत्स्नाला समजावून सांगायला मला अर्ध्या तासाचा वेळ लागला. "अरे सुदेश! तू एखाद्या अनाथा मुलाला अशा प्रकारे रस्त्यारून घरात कसा आणू शकतोस?” ती म्हणाली. “असं करणे गुन्हा आहे. ह्युमन ट्रॅफीकिंग केल्याचा आरोप होऊ शकतो.उद्या पोलिसांची लचांड मागे लागली तर?”
हा विचार तोपर्यंत माझ्या मनात आलाच नव्हता. मी त्यावर क्षणभर विचार केला, आणि मग म्हणालो, “सध्या, मुलाला काळजीची गरज आहे. अशा हवामानात तो थंडीने मरून जाईल. प्लीज थोडा त्याचा विचार कर ना?”
"तुला त्याची इतकी काळजी का वाटते?"
“माझं मन असंच आहे, मला वाटतं,” मी म्हणालो.
कदाचित मी तिच्या गालावर केलेल्या किस मुळे म्हणा किंवा माझ्या त्या वाक्याने म्हणा ती निरुत्तर झाली. पण पुढे ती हसली आणि म्हणाली, “ठीक आहे! तू असं म्हणतोयस तर मग मी कसं नाही म्हणणार? त्याचं नाव काय?"
"त्याला त्याचे नाव आठवत नाही."
ती म्हणाली, “मग त्याला शेंद्री म्हणूया. "मी वाचत असलेल्या कादंबरीत एक शेंद्री नावाच्या गोड मुलाचं पात्र आहे."
“परफेक्ट." मी म्हणालो. ज्योत्स्ना माहेरची बेळगावची त्यामुळे तिला कन्नड साहित्य वाचण्याची आवड होती. त्यात असली कानाला विचित्र वाटणारी नावं असायची. नशीब ज्योत्स्ना हे नाव मला अगोदर माहित होतं....असो.
कडकडीत गरम पाण्याच्या आंघोळीनंतर शेंद्रीने कोमट व्हेजिटेबल सूप घेतले. आता तो जरा तरतरीत दिसत होता. त्याने ज्योत्स्नाचा जुना शर्ट घातला होता जो त्याच्या गुडघ्यापर्यंत आलेला, त्यावर नाजूक निळ्या रेषा होत्या पण त्या लक्षात येण्यासारख्या नव्हत्या एकंदरीत तो शर्ट सुद्धा पांढराच म्हणायला हरकत नाही. जेवताना पूर्ण वेळ तो खूप विनम्रपणे वागत होता आणि त्याला घरात आसरा दिल्याबद्दल त्याने अनेक वेळा आमचे आभार मानले. तशी ज्योत्स्नालाही मुलाची आवड होती आणि त्यात तिची काही चूक होती असेही नाही. तो म्हणाला, “धन्यवाद, सर आणि मॅडम. तुम्ही दोघे खूप छान आहात.”
निदान त्या एका दिवसासाठी तरी आम्ही एका परिपूर्ण कुटुंबाप्रमाणे भासत होतो. त्या नाजूक क्षणी, मी आणि ज्योत्स्ना शेंद्रीकडे प्रेमळपणे पाहत होतो आणि तो टीव्ही पाहत बसला होता. मी तिचा हात धरला. मला माहित होते की ती आमच्या मुलाबद्दल विचार करत होती जो कधीच जन्माला आला नाही, आईच्या पोटात असताना त्याची नाळ त्याच्या गळ्याला गुंडाळली जाऊन त्याचा फास तयार झाला आणि तिच्या पोटातच गुदमरून त्याचा मृत्यू झाला. जर तो जिवंत जन्माला आला असता तर कदाचित तो शेंद्री इतकाच असता.