पाताळलोक
टीप : कथा, स्थाने आणि पात्रें पूर्णपणे काल्पनिक आहेत.
नोकरी गेल्यानंतर विश्वनाथ आणि प्रेरणा ह्यांचे जीवन अचानक बदलले. मुलगी कॉलेज मध्ये जायला लागली होती आणि त्यामुळे खर्च सुद्धा वाढला होता. त्यामुळे त्यांनी दोघांनी आपला पुण्यातील फ्लॅट विकायचा ठरवला आणि कोंकणातील एका हायवे लगतच्या गांवातील एक जुने घर विश्वनाथला वडिलोपार्जित हिश्यातून आले होते तिथे शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. विश्वनाथ ने सुद्धा नोकरी ऐवजी रिमोट कॉन्ट्रॅक्ट कामे घ्यायचे ठरवले होते. प्रेरणा शहर सोडून गांवात जायचे म्हणून अतिशय दुःखी होती पण गोवा जवळच असल्याने तिथे आपण येत जात राहू असे तिने मनाला समजावले.
कोंकणातील गांव नागवाडी गोवा मुंबई हायवे वर होते. तसे गाडीने जाताना लक्षांत सुद्धा येणार नाही असे. एक पेट्रोल पम्प त्याच्या बाजूला एक खानावळ, एक सरकारी दवाखाना आणि दोन भुसारी सामानाची दुकाने. पेट्रोल पम्प च्या मागून एक रस्ता आंत जायचा त्याच्या दुतर्फा अनेक घरे. प्रत्येक घराच्या मागे नारळ आणि पोफळीची बाग, मध्ये मध्ये आंबे, फणस अशी झाडे. कोंकणातील प्रत्येक गांवात एक ग्रामदेवता असतेच. पण नागवाडी त्याला अपवाद. संपूर्ण नागवाडीत एकही मंदिर किंवा चर्च वगैरे नव्हते. ह्याचे कारण तसे कुणालाच ठाऊक नव्हते. ग्रामपंचायतीकडून उजव्या वळणावर पोस्ट हाफिस होते जे फक्त आठवड्यातून १ दिवस चालू असायचे. पोस्ट हाफिसाच्या मागून एक कच्चा रस्ता काजूच्या झाडांच्या मधून आंत गेला होता. तिथे एक विहीर होती आणि विहिरीच्या साधणार ३० मीटर वर एक छोटेसे घर. हेच विश्वनाथचे नवीन घर होते.
विश्वनाथची टाटा गाडी रस्त्यावरून घराच्या दिशेने जात होती तेंव्हा का कुणास ठाऊक पण प्रेरणाला अनेक लोक आपल्याला पाहत आहेत असे वाटले. घर अनेक वर्षे बंद असल्याने पूर्णपणे घाण झाले होते. विश्वनाथने आणि प्रेरणेने ते अगदी साफ केले. झाडू व्हॅक्युम सर्व त्यांनी बरोबर घेतलेच होते. पण विश्वनाथ आणि प्रेरणा आली आहेत म्हटल्यावर बुलेट वरून सरपंच सुद्धा आले. अहो तुम्ही कशाला मेहनत घेताय एव्हडी ? त्यांनी फोन करून ३-४ पोरे गोळा केली. म्हणता म्हणता घर अगदी आरशा प्रमाणे साफ होत गेले. मग देशपांडे काकू येऊन दोघांना खायला देऊन गेल्या बरोबर त्यांचे डिंकू हे मांजर सुद्धा होते. डॉक्टर साहेब सुद्धा येऊन ओळख करून गेले. विश्वनाथ "घेतो" म्हटल्यावर डॉक्टर साहेबानी त्याला गाडीतून एक चांगली भली मोठी स्कॉच ची महागडी बाटली भेट म्हणून दिली. डॉक्टर साहेबांचा गाडींत त्यांचा रुबाबदार गोल्डन रिट्रीवर कुत्रा बसला होता. सुलोचना आणि लक्ष्मी ह्या दोन्ही बाईंनी येऊन प्रेरणांची वासपूस करून गेल्या. सुलोचना आणि लक्ष्मी ह्यांचे जवळ जवळ सर्व आयुष्य इथेच गेले होते. सुलोचना CA होती आणि लक्ष्मी डेंटिस्ट तरी सुद्धा दोघी ह्याच गांवात राहत होत्या. सरपंचानी कुणाकडून एक जनरेटर सुद्धा पाठवून विजेची व्यवस्था केली होती.
संध्याकाळी प्रेरणा आणि विश्वनाथ थकून आडवे झाले तेंव्हा दोघांनाही आश्चर्य वाटले कि वरून पाहता अतिशय मागास असा वाटणारा हा गांव बराच सुखवस्तू आहे. प्रत्येकाच्या घरातं AC, गाडी वगैरे होती. बहुतेक व्यक्ती सुशिक्षित आणि अतिशय मितभाषी होत्या. सरपंच तर म्हणे दशके बिनविरोध निवडून येत होते. तरी सुद्धा कुणी काय व्यवसाय करत होते हे दिसत येत नव्हते.
"कोंकणी माणसाचा पाहुणचार तो हाच का ?" असा प्रश्न दोघांच्या मनात पडला.
'विश्वनाथ, एक गोष्ट नोटीस केलीस का ?' प्रेरणेने त्याला विचारले.
'काय ती ?'
'इथे संपूर्ण गांवांत एकही लहान मूल दिसले नाही. पण लोकांना मुले आहेत, सगळी कुठे ना कुठे बाहेरगावी आहेत.'
'हो कि. शाळा सुद्धा दिसली नाही. पण काय आहे, हे गांव आहेत आम्ही पुण्या मुंबईची माणसे आम्हाला हे ग्रामीण जीवन विचित्र वाटणारच. पण हि माणसे साधी आहेत.'
प्रेरणेने डोके हलवले पण तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होतीच.
बघता बघता दिवस गेले. विश्वनाथ ने बऱ्याच लोकांशी मैत्री केली होती. डॉक्टर कारखानीस, सरपंच येवले, पम्प वाले देसाई अशी अनेक मंडळी आता घरचीच बनली होती.
अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात पण ह्यांच्या बाबतीत मात्र तसे नाही घडले. आठवडे गेले तरी सर्वच नागवाडीतील मंडळी प्रेमळ, मितभाषी आणि अत्यंत विनम्र वागत होती. इतक्या गोड स्वभावाने विश्वनाथ आणि प्रेरणेलाच अवघडल्यासारखे वाटत होते.
शेवट प्रेरणेने देशपांडे काकूंना खाजगीत प्रश्न विचारलाच. गांवात विशेष आर्थिक व्यवहार नसताना सर्व मंडळी इतकी श्रीमंत कशी आणि स्वभावांतील हा गोडवा कसा येतो ?
देशपांडे काकूंनी स्मित केले. त्यांची मांजर दिंकू त्यांच्या पायाला चाटत होती. प्रेरणेने त्या मांजराच्या डोक्यावर हात लावायचा प्रयत्न केला पण त्याने झट करून प्रेरणावर पंजा उगारला. त्याच्या धारधार पंज्यानी प्रेरणांच्या गोऱ्या मनगटावर तीन खोल ओरखडे उमटले. प्रेरणाने घाबरून हात मागे घेतला. देशपांडे काकूंनी मांजराला प्रेमळ भाषेंत दटावले. प्रेरणाला मलम पट्टी हवी काय विचारले पण तिने ते हसण्यावारी नेले.
"तुम्ही दोघेही गांवात आला तेंव्हा तुम्ही जास्त काळ टिकणार नाही असे वाटले होते पण आता तू आमच्यातीलच एक झाल्याने तुला आम्ही सत्य काय ते सांगू शकतो. पण त्याआधी हे सत्य जाणून घेतल्यास त्याचे परिणाम सुद्धा आहेत हे लक्षांत ठेव".
प्रेरणेची उत्सुकता ताणली होती त्यामुळे तिने होकार दिला.
"कोंकण प्रदेश हा भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्राकडून प्राप्त केला असे म्हणतात. नागवाडी हे त्या काळांतील एक समुद्रांतील बेट होते. ह्या बेटावर आमच्या पूर्वजांनी म्हणजे ऋषी मुनींनीएका शक्तीला कैद करून ठेवले होते. हि शक्ती अमानवीय, अगम्य आणि कदाचित कालातीत असावी. आता हे बेट कोंकण प्रदेशाचा भाग असले तरी ती शक्ती मात्र इथेच आहे."
प्रेरणा ऐकत होती. आता असल्या गोष्टींना तिने कधी भीक घातली नसती पण देशपांडे काकू कडून तिला प्रचंड प्रेम मिळाले असल्याने ती आदराने ऐकत होती.
"ये मी तुला दाखवते. तुला सर्व प्रश्नाची उत्तरे दिसतील".
देशपांडे काकूं आणि प्रेरणा चालू लागली, ग्रामपंचायतीकडून उजवे वळण घेतले कि जी अनेक घरे लागतात ती सर्व त्यांनी पार केली आणि नंतर एक ओहोळ आला. त्यावरील टुमदार लाकडी पूल पार केल्यावर पुढे एक नारळांची बाग आणि त्याच्याही पुढे गेल्यावर एक कुंपण ज्याच्या आंत एक टेकडी सदृश भाग होता. जास्त मोठा नाही साधारण २० बाय २० मीटर असावा. काकूंनी प्रेरणाला इतके चालवून जास्तच दमवले होते. पण त्या टेकडीच्या जवळ पोचल्यानंतर मात्र प्रेरणेची हृदयाची धडधड फारच वाढली, एक भय वाटू लागले. तरी सुद्धा ती धीर करून विसर चढली. इथे एक काळी दगडी विहीर होती, पायऱ्यांची. खाली अंधार.
"घाबरू नकोस, आंत ये. " देशपांडे काकू तिच्यापेक्षा किमान ३० वर्षांनी मोठ्या असल्या तरी आंत चपळाईने गेल्या. त्यांच्या हातांत त्यांची मांजर डिंकू होती. मांजरीला सुद्धा भय वाटला पण काकूला नाही.
विहिरीच्या खाली पाणी नव्हते, होते तर एक शिळा. काळीभोर शिळा.
"जगांत सर्वत्र जिथे जिथे उल्का पडल्या तिथे इथे लोकांनी त्याला देव किंवा शक्ती मानले. पण त्या सर्व शिळा होत्या. जी शिळा वाटली तरी नाही. हि सजीव आहे. " असे म्हणून काकूंनी शिळेला हाथ लावला.
प्रेरणेने सुद्धा कुतूहलाने हात लावला. दगडाप्रमाणे ती कठोर नव्हती. उलट थंडगार आणि कोमल होती, आणि इतकेच नव्हे तर कुणा थंड रक्ताच्या जिवंत प्राण्याला हात लावल्याप्रमाणे तिला वाटत होते. त्यापेक्षा सुद्धा आश्चर्य म्हणजे ती मऊ वाटत होती. स्पर्श असा वाटत होता कि चिकट अश्या काळ्याभोर ऑइल ला हात लागला पण हात उचलला तर मात्र हाताला काहीही चिकटत नव्हते.
"काकू, हे सर्व मला अतिशय गूढ वाटत आहे. पण ह्या शिळेचा आणि गांवातील प्रेमळ लोकांचा काय संबंध ?" प्रेरणेने विचारले.
"संबंध सोपा आहे. ही शिळा म्हणजे एक सुप्त शक्ती आहे. खरे कुणालाच ठाऊक नसले तरी आम्हाला स्वप्ने पडली त्यावरून असे वाटते कि एक दुसऱ्या विश्वांतून हि शिळा म्हणजे एक अंडे इथे अवतरित झाले. ह्याच्या आंत एक अमानवीय शक्ती निद्रा अवस्थेंत आहे. आणि तिची शक्ती इतकी आहे कि निद्रावस्थेतून सुद्धा ती नागवाडीतील सर्व व्यक्तींच्या मनावर प्रचंड परिणाम करते. "
"मला एक सांग, विश्वनाथ आणि तू इथे येऊन इतके दिवस झाले. अजून पर्यंत तुम्ही किती वेळा भांडला ? पुण्यात तुम्ही किती वेळा भांडायचा ?" काकूंच्या ह्या प्रश्नावर प्रेरणा खरोखर विचारात पडली. खरेच अजून नवराबायको म्हणून ते जराही भांडले नव्हते. मुलांत भांडावे असे त्यांना वाटलेच नव्हते. हे खरेच अगम्य होते.
"तर प्रेरणा, कितीही निष्ठुर माणूस एका अर्भकाच्या सानिध्यात थोडा तरी मऊ होतोच. उत्क्रांतीनेच आम्हाला तसे बनवले आहे. पण हि शिळा एक वैश्विक शक्तीचे बीज आहे असे समज हिच्या सान्निध्यांत सर्वच व्यक्ती अश्या मऊ होतात."
"काकू, मग हे चांगले आहेच ना ? अश्या शक्तीला कैद का बरे केले ? " प्रेरणेने विचारले.
"हि शक्ती सुप्त असली तरी भुकेली आहे. तिला इतर लोकांच्या भावनेवर ताव मारायला आवडते. आणि ज्या लोकांना हे रहस्य उलगडते ते लोक ह्या रहस्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्यानून विविध समस्या निर्माण होतात".
"तुम्ही काय म्हणता हे मला समजले नाही. "- प्रेरणा .
"प्रेरणा, ह्या गांवात कुणीही खरा व्यवसाय असा करत नाही. आम्हाला पाहिजे तितके पैसे आणि इतर गोष्टी वाट्टेल तेंव्हा मिळतात. त्याला हीच शिळा कारणीभूत आहे. "
"सर्व जुन्या मंत्र तंत्रांचा नियम आहे, काही मोठे मंत्र शक्तीने साध्य करायचे असेल तर तसाच मोबदला दिला पाहिजे, किंबहुना निसर्गच तो मोबदला जबरदस्तीने घेतो. ह्या शिळेचा सुद्धा तोच नियम आहे. ह्या शिळेला तुला वेदनेचे समर्पण करावे लागते. ते तू केलेस तर हि शिळा तुला तितकेच मोठे बक्षीस देते. ह्यातून तुला पैसे, आरोग्य आणि इतर सर्व प्रकारचे वैभव मिळत जाते."
"काकू ते कसे ?" प्रेरणा नवलाने ऐकत होती.
"नागवाडीत राहताना तुला प्रचंड दुःख झाले तर हि शिळा तुला तात्काळ काही ना काही बक्षीस देईल. म्हणजे डॉक्टर साहेबांची पत्नी एका दुर्घटनेत दिल्लीला वारली. त्याच दिवशी डॉक्टर साहेबांचा मधुमेह अचानक गायब झाला आणि त्यांचे आफ्रिकेतील एक काका वरून त्यांची कोट्यवधींची वडिलोपार्जित संपत्ती त्यांना मिळाली".
"काकू, पण हा योगायोग असू शकतो ना ? " प्रेरणा हे मानायला तयार नव्हती.
"एक घटना नक्की. पण प्रेरणे मी ह्या भागांत मागील १५० वर्षां पासून राहत आहे. मी ह्याच मार्गाने माझे आयुष्य वाढवले आहे. इथून गेलेलं रस्ते, देशासह स्वातंत्र्य, वीज, मोबाईल हे सर्व बदल मी पहिले आहेत. माझी ३ मुले विदेशांत गेली आणि वारली, दुसरा मुलगा गेला तेंव्हा मी अचानक ३० वर्षांनी तरुण झाले. तिसरा गेला तेंव्हा मला ३ कोटींची लॉटरी लागली." काकूंच्या बोलण्यात खिन्नता होती.
प्रेरणेच्या मनात आता भय निर्माण झाला होता. तरी सुद्धा आणखीन विचारावे म्हणून तिने काकूला विचारले.
"समजा मी ह्या शिळेचा फोटो काढला किंवा व्हिडिओ काढला आणि इतरांना पाठवला, मग कुतूहल पूर्वक इथे पर्यटक येऊ लागले तर ? मग काही लोक मुद्दाम प्रयोग करू लागले तर ? मग ह्या शक्तीचे रहस्य सर्वाना समजणार नाही का ? "
"अगदी बरोबर प्रेरणा. तू तसे नक्कीच करू शकतेस पण तू नागवाडीत जो पर्यंत आहे तो पर्यंत तुझ्या मनावर ह्या शक्तीचा प्रचंड प्रभाव आहे. जो पर्यंत प्रभाव आहे तो पर्यंत तू असे काही करूच शकत नाही. खरे नाही वाटत तर प्रयत्न कर. आणि समजा तू केलेच तरी सुद्धा जी व्यक्ती इथे येईल त्या व्यक्तीला सुद्धा इथे यावेसे वाटणार नाही. कारण संपूर्ण गावावर ह्या शक्तीचे प्रभुत्व आहे. विश्वनाथ आणि तू सुद्धा इथे आलात ते कदाचित योगायोग असेल म्हणून पण मी तुला इथे घेऊन आले ते स्वयंप्रेरणेने नाही तर बहुतेक करून ह्याच शक्तीच्या प्रभावाखाली."
काकू नी मग दिंकूला उचलले प्रेरणा त्या नखरेल पण क्युट मांजराला पाहत होती. आणि पाहता पाहता काकूंनी आपल्याच हातानी काडकरून मांजराची मान मोडली. मांजरीच्या तोंडून एक छोटासा आवाज आला पण क्षणार्धांत त्या मांजरीचे प्राण गेले. प्रेरणांच्या तोंडातून मात्र भयंकर किंचाळी आली. कोमल हृदयाची आणि प्रेमळ अशी देशपान्डे काकू असे काही भयंकर कृत्य करेल असे तिला वाटले सुद्धा नव्हते. पण का ? असा प्रश्न तिच्या मनात आलाच.
"डेंकू माझा जीव कि प्राण होता, ३ वर्षे मी त्याला पोटच्या पोरा प्रमाणे वाढवला. त्याचा बळी देणे माझ्या साठी प्रचंड वेदनादायक होते. आणि त्याच वेदनेने ह्या शक्तीला तृप्ती मिळते. प्रेरणेने हात त्या शिळेला लावला आणि ती शिळा अचानक गरम झाली. तिला जवळ जवळ चटकाच बसला. देशपांडे काकूंनी मांजराचे ते मृत शरीर त्या शिळेवर ठेवले आणि त्या शिळेने सुद्धा त्याला गिळंकृत केले.
"पण इतके वर्षांत अश्या वारंवार वेदनादायक गोष्टी केल्या कि मानवी मनाला त्याची सवय होते. त्याला वेदना वाटत नाही. मन सवयीने कठोर होते. आणि त्यामुळे मिळणारे बक्षिसे सुद्धा कमी होते. एके काळी अश्या प्रकारच्या पशु हत्येने मला किमान १० वर्षे आयुष्य लाभल्याचे. आता फार तर काही दिवस आयुष्याचे परत मिळाल्या सारखे वाटतात आणि काही हजार रुपये आपोआप मिळतात."
भांबावलेली प्रेरणा काकू साठी थांबलीच नाही, तिने भराभर पायऱ्या काढल्या आणि ती भराभर घाईत चालू लागली. हे सर्व विश्वनाथला सांगितले तर त्याला खरे सुद्धा वाटणार नाही. आणि काकू तरी खरे बोलत होती का ? लोकं आपल्याशी चांगले अश्यासाठी तर वागत नसावेत कि ह्यांच्या बद्दल मनात प्रेम निर्माण व्हावे ? आणि मग आम्हालाच ठार मारावे ? काकू १५० वर्षांच्या असाव्यात तर डॉक्टर, सरपंच, सुलोचना इत्यादी मंडळी आणखीन जुन्या सुद्धा असू शकतात.
प्रेरणा घरी आली तेंव्हा तिला धाप लागली होती. विश्वनाथ सुद्धा घरी होता. "कुठे गेली होतीस अग ?" त्याने विचारले. "देशपांडे काकू सोबत चालायला गेली होते" तिने सांगितले. ती बेडरूम मध्ये गेली. विश्वनाथला हे सांगायचे का? आणि तो हसला तर ?
काही गोष्टी अतींद्रिय वाटल्या तरी गांवातील श्रीमंत मंडळी, सर्वांचे आपापले कुत्रे किंवा इतर पशु, गूढ वागणे आणि देशपांडे काकूंनी केलेली पशु हत्या हे सर्व नजरेआड करून भागणार नव्हते. तिने आपल्या टेबल वर पहिले. तिथे एक मग ठेवला होता. त्यांची मुलगी अनघा हिने ३ वर्षाची असताना आपल्या हाताने क्ले पासून बनवला होता. तिच्या साठी खूप प्रिय होता. प्रेरणांचा हात थरथरला. आणि तरी सुद्धा तिने धीर करून त्याला ढकलले, तो लवंडून खाली पडला आणि फुटला. फुटताच तिला प्रचंड दुःख वाटले. अनघाला आणि विश्वनाथला कळले तर त्यांना किती वाईट वाटेल असे तिला वाटले. त्याच वेळी विश्वनाथचा फोन वाजला. तिने वाकून अश्रुपूर्ण डोळ्यांनी कपचे तुकडे गोळा केले आणि व्यवस्थित ठेवले. काही क्षण ती सुन्न मानले त्या कृत्याकडे पाहत होतीच इतक्यांत विश्वनाथ धावत आंत आला.
"प्रेरणा, डार्लिंग, तुझा विश्वास बसणार नाही मी काय सांगेन त्यावर. मला ना माझ्या बॉस चा फोन आला मला कामावरून काढणे हे चुकीचे होते असे म्हणे CEO ला स्वतःला वाटले. त्याने मला फोन करून माफी तर मागितलीच पण वरून मला पुढील दहा वर्षांचा पगार तो एकदम देणार आहे. नुकसान भरपाई म्हणून. आम्हाला आता काम सुद्धा करायची गरज नाही. ह्या काळांत आणि असे काही हळू शकते ह्यावर विश्वासच बसत नाही प्रेरणा. हा काही तरी चमत्कार आहे". त्याने प्रेरणाला म्हटले .
प्रेरणा अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिली.
त्या रात्री प्रेरणा झोपी गेली तेंव्हा तिला स्वप्न पडले. ती एका विचित्र शहरांत होती. तिथे सर्व इमारती काळ्या शिळेच्या होत्या,रस्ते सुद्धा काळे नि इमारती सुद्धा काळ्या. इतर कुठलाही रंग दिसत नव्हता. इमारतींना काही ठिकाणीच खिडक्या होत्या त्यांत आग असावी असे वाटत होते पण त्याच्या काळ्या सावळ्या सर्वत्र फेर धरून नाचत असाव्या असे वाटत होते. ती एके प्रशस्त अश्या रस्त्यावर चालत होती. आकाश असे तिथे नव्हतेच. जणू काही रात्र होती आणि काळे ढग सर्वत्र होते आणि कुठे कुठे वीज कडाडायची.
ती चालत होती आणि जणू कोणी तिला ओढून नेत होता. कितीही वेळ चालली तरी तिला इतर कुणी व्यक्ती किंवा दुसरा रंग दिसला नाही. बराच वेळ ती त्या शहरांत फिरत होती. जेंव्हा तिला जाग आली तेंव्हा सकाळ झाली होती. तिला तरुण वाटत होते. सगळे सुरळीत झाले होते. विश्वनाथला पैसे मिळाले म्हणजे तिला सुद्धा पैसे मिळाल्या सारखेच होते. रात्री काही तरी स्वप्न पडले होते ह्याची अंधुकशी आठवण तिला होती पण नक्की काय दिसले होते हे आठवत नव्हते.
"डार्लिंग, मी काय म्हणतो. " विश्वनाथने सकाळीच तिला म्हटले.
"आम्ही पुण्याहून इथे आलो हा मोठा निर्णय होता, पण आता आम्हाला प्रचंड पैसे सापडले आहेत कि नाही ? मग इथेच राहायचे कि इथून जायचे ? तुला काय वाटते ? "
नागवाडीतून जाणे हेच प्रेरणाला कसेसेच वाटले, पोटांतून एक विचित्र घृणा आणि भय निर्माण झाले. तिला रडू कोसळले. विश्वनाथला काहीच समजेना. मग त्याने सुद्धा विषय टाळला.
आर्थिक चणचण संपल्याने विश्वनाथ आणि प्रेरणाला कसलीच चिंता नव्हती. उलट त्यांनी अनघाला आणखीन पैसे पाठवले. विदेशांत शिकण्यासाठी तिला परावृत्त केले. प्रेरणा वारंवार त्या गूढ शिले विषयी विचार करत होती, दररोज तिला तेच स्वप्न पडे. हि शिला कदाचित एकादी परग्रहवासी संस्कृतीची तर नसेल ? त्या शिळेचा प्रभाव तिच्या मनावर होता हे मात्र नक्की. तिने पुन्हा काही अघटित करून पाहण्याचा विचार केला पण तिच्या मनात एक संतुष्टी होती त्यामुळे तिने तसे काहीच केले नाही.
एका रात्री मात्र तिच्या स्वप्नात बदल घडला. त्या निर्जन अंधकार मय अश्या शहरातून फिरताना एक काळी सावली तिथे आली. किमान ८ फूट उंच, काळीभोर, तिला आकृती होती पण चेहेरा असा नव्हता.
"प्रेरणा ... " त्या सावलीने तिला हाक मारली आणि ती थरारून उठली.
पुढल्या दिवशी पुन्हा तीच सावली तिच्या पुढे आली. ह्यावेळी मात्र त्या सावलीने आपला हात पुढे काढला आणि प्रेरणेने तो पकडला.
"आपण कोण आहात ? हे काय आहे ? " तिने विचारले ?
"अनेक शेकडो वर्षांतून चुकून कुणी तरी इथे पोचतो." त्या सावलीने म्हटले.
"आम्ही कुणीच नाही आहोत, आणि हे काहीही नाही. तू मानवी आहेस ना ? तिथे असणे/नसणे ह्या गोष्टी आहेत पण इथे तसे काहीच नाही" ती सावली तिच्या बाजूनेच चालत होती.
प्रेरणा गोंधळली. ती काली सावली दुष्ट वाटत नव्हती. ती नरकांत नव्हती. ते भूत नव्हते. त्याच्या आवाजाला एक विशेष गूढत्व होते जे शब्दांत सांगणे अवघड होते.
इतक्या वेळ प्रेरणा तिथे रस्त्यावर फिरत होती. अचानक तिला वाटले कि आपण इमारतीत कधीही गेलो नाही. त्यामुळे तिने आपली पावले एका जवळच्या इमारतीत वळवली. ती काली सावली सुद्धा तिच्या सोबत आली. इमारतीचे बांधकाम भक्कम किल्ल्या प्रमाणे होते. दगड त्या गूढ शिले प्रमाणेच होते फक्त कमी चिकट.
"पृथ्वीवर मी होते तिथे सुद्धा असाच दगड होता होत्या त्याच शिलेमुळे मी आत्ता इथे आहे ना ?" तिने त्या सावलीला विचारले.
"प्रेरणा, तुझ्याच भाषेंत सांगायचे तर तू इथेही आहेस आणि तिथेही, तू इथे नाहीस आणि तिथेही".
प्रेरणा वैतागली. "ह्या संभाषणाला काय अर्थ आहे ? हे स्वप्न आहे का ? आणि तू आहेस तरी कोण ?" तिने वैतागून म्हटले.
"अस्तित्व हीच संकल्पना तुझ्या मानवी मनातून निर्माण झाली आहे प्रेरणा. तू इथे आहेस असे जे म्हणते तसे काहीच नाही कारण असणे हि संकल्पना तुझ्या मनात आहे, प्रत्यक्षांत नाही. तू आणि मी ह्या संकल्पना सुद्धा तुझ्याच मनात आहेत प्रत्यक्षांत मी हि नाही अन तू हि नाही. "
"तू जे हे अनुभवत आहे असे तुला वाटते ना, त्याला काहींनी पाताळलोक म्हटले आहे."
शेवटी त्याच्या तोंडून एक ओळखीचा शब्द ऐकून तिला बरे वाटले पण क्षणभरच. "पण पाताळांत नाग असतात, इतर विविध प्रकारचे राक्षस असतात असे ऐकले होते ते ? " तिने त्या इमारतीचा भल्या मोठ्या खोलीतून चालत जात विचारले.
ती सावली पुन्हा बोलली. "नाही तसे नाही. पाताळलोक म्हणजे एक महा प्रचंड पोकळी आहे. पोकळी हा तुझा शब्द पण मी तुला समजावण्यासाठी वापरत आहे. मानवी शरीरांत ज्या प्रमाणे स्वप्ने हि संकल्पना असते, स्वप्नांत मानव काहीही करू शकतो पण स्वप्नातील सर्वच गोष्टीवर नियंत्रण नसते. त्याच प्रकारे हि अनादी पोकळी जी आहे त्यातून सुद्धा निर्मितीसदृश्य गोष्टी होतात. तुला वाटते कि तू आहेस, पण प्रत्यक्षांत तू नाहीस, ह्या पोकळीने निर्माण केलेला एक खेळ आहे. ज्या प्रमाणे तू स्वप्न पहाटेस त्या प्रमाणे ह्या पातळलोकने तुला पहिले आहे.
"म्हणजे मी सध्या स्वप्नात जे पाहत आहे ते प्रत्यक्षांत सत्य आहे ? आणि माझे जीवन असत्य ? "
"सत्य असत्य असे काही नाही, कारण अस्तित्व हीच गोष्ट नाही. "
"आणि ती शिला जी पृथ्वीवर आहे ? "
"मला ठाऊक नाही. स्वप्नात तू काहीही पाहू शकतेस ना त्याच प्रमाणे पाताळाने पृथ्वीवर काही तरी ठेवले असेल ज्याच्या द्वारे तू इथे पोचलीस".
प्रेरणा आता एका अतिशय भव्य अश्या पटांगणात पोचली, इमारतीच्या आंत हे पटांगण होते. हजारो लोक मावू शकतील असे.
"हे काय आहे ? " तिने विचारले.
पाताळलोक हे अतिप्रचंड आहे. इथे तुले जे काही दिसत आहे ते नक्की काय आहे हे कदाचित तुलाच ठाऊक असेल कारण तू, तुझे पूर्वीचे जन्म किंवा इतर काही गोष्टी ह्यावर हे आधारित आहे.
"मग एक सांग, वेदना आणि ती शिला ह्यांचा संबंध का ? शिला लोकांना खरोखरच पैसे, आयुष्य देते का ? "
"प्रेरणा, हे सर्व पाहून पैसे आणि अस्तित्व ह्याला काही अर्थ आहे असे तुला खरेच अजूनही वाटते का ? ज्या प्रमाणे मी तुला सांगितले कि तुझे संपूर्ण अस्तित्व हे पाताळलोकांचे एक स्वप्न असल्याप्रमाणे आहे त्यामुळे तुला पृथ्वी, विश्वनाथ आणि तुझ्या इतर ज्या आठवणी आहेत ते सुद्धा स्वप्नच आहे आणि त्यातील सर्व पात्रे आणि घटना ह्या सुद्धा स्वप्नच आहेत. "
प्रेरणा विचारांत पडली. जगांतील विविध ज्ञानी लोकांनी संपूर्ण मानवी समाज म्हणजे एक 'सिम्युलेशन' आहे असे म्हटले होते हे तिने वाचले होते पण ते हे अश्या प्रकारे तिच्या समोर येईल ह्याची अजिबात कल्पना तिला नव्हती.
"प्रेरणा.. प्रेरणा ... " विश्वनाथ तिला हलवून उठत होता.
"अग हि कसली झोप ? किती उठवले तुला? " विश्वनाथ त्राग्याने आणि तेढ्या चिंतेने बोलत होता.
"अरे सॉरी ते स्वप्न होते ... "
"अनघा कधीची पोचली. मम्मी अजून कशी झोपली आहे विचारत आहे." त्याने म्हटले.
"अनघा ? नागवाडीत ? ती इथे कशी पोचली ? " प्रेरणा गोंधळून विचारत होती.
"नाग.. काय ? अग काय बरळते आहेस ? तो चित्रपट वगैरे नको बघूस रात्रीचा नेटफ्लिक्स वर म्हणून हजार वेळा सांगितले आहेस. आम्हाला जायचे आहे ना बाहेर ब्रेकफास्ट साठी आता ? तयार हो पटकन." असे म्हणून विश्वनाथ गेला.
अनघाने डोळे चोळले. ती पुण्यात होती. तिच्या फ्लॅटवर. काही गोष्टी अंधुकश्या आठवत होत्या. तिने गुगल मॅप काढून नागवाडी शोधले. तास कुठलाच गांव गोवा मुंबई हायवे जवळ नव्हता.
"काय बाई मला पण स्वप्ने पडतात. " असा विचार करून ती उठली तोच तिच्या हातांत चुरचुरले. तिने मनगट पहिले तर तिथे तीन चांगले खोल ओरखडे लागले होते. "हे कुठे काय झाले ? तिला आठवले नाही." ती उठून अनघाला भेटायला गेली.