Get it on Google Play
Download on the App Store

०१ प्रेमाचा साक्षात्कार १-२

शशांक व शरद हे अगदी लहानपणापासूनचे मित्र .त्यांचे ब्लॉक्स समोरासमोर पहिल्या मजल्यावर दोन बिल्डिंगमध्ये होते .एकाच्या गॅलरीत उभे राहून हाक मारली की दुसऱ्याला ऐकायला जात असे .एवढेच काय उभे राहून थोड्या मोठ्याने गप्पाही मारता येत असत .माँटेसरीत जाण्या अगोदर दोघेही एकत्र खेळले .एकाच शाळेत बालवाडीत दाखल झाले.नंतरही कॉलेजपर्यंत एकाच वर्गात एकाच शाळेत एकाच कॉलेजमध्ये त्यांचा प्रवास झाला .दोघांची मैत्री सुप्रसिद्ध होती .एकाच्या पायाला काटा टोचला तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यावे अशी त्यांची मैत्री होती .

शामली ही शशांकची लहानी बहीण .शशांक बालवाडीत गेला आणि शामलीचा जन्म झाला.त्या एवढ्याश्या शामलीकडे पाहून शशांकला आश्चर्य वाटे. त्याचप्रमाणे  शरदला ही वाटत असे.त्यावेळी शरदने आपल्या आईला विचारले की मला लहान बहिण केव्हा येणार ?त्यावर हसून त्याचे आई बाबा म्हणाले की अरे ती शामली ही तुझीच बहिण नव्हे काय ?त्यावर त्याचे समाधान झाले आणि नंतर त्याने पुन्हा तो प्रश्न विचारला नाही.तिघेही लहानपणापासून एकत्रच खेळली व वाढली.

वयाबरोबर हळूहळू प्रत्येकाचे मित्र व मैत्रिणी निरनिराळ्या होत गेल्या .तरीही या तिघांमधील मैत्री अतूट होती .शामली बारा तेरा वर्षांची झाली आणि तिची वाढ झपाट्याने होत गेली.त्याबरोबर ती बदलतही गेली .तिचा स्वभाव जास्त संकोची होत गेला.शरदला हा बदल चटकन लक्षात आला .तिची त्याच्याकडे पाहण्याची नजरही बदललेली शरदला आढळून आली .तो मात्र पूर्वी प्रमाणेच ती आपली बहिण असे समजून तिच्याशी गप्पा मारीत असे .त्याची तिच्याकडे पाहण्याची दृष्टीही तशीच होती .शरद ज्या ज्या वेळी गॅलरीत असे त्या त्या वेळी शामली गॅलरीत येऊन वाचनाचे नाटक करीत मधून मधून शरद कडे पाहात असे.ही गोष्ट शरदच्या गावीही नसे.तो ज्या ज्या वेळी स्कूटरवरून जात येत असे त्या वेळी तिची दृष्टी त्याच्यावर खिळलेली असे.शामली तिच्या नकळत आपल्यावर प्रेम करू लागली आहे हे शरदच्या गावीही नव्हते .तो पूर्वीप्रमाणेच तिच्याजवळ गप्पा मारीत असे . काय केले म्हणजे त्याला आपल्या मनातील भाव कळतील हे शामलीच्या लक्षात येत नव्हते.

(क्रमशः)

प्रभाकर  पटवर्धन   

------------------------
प्रेमाचा साक्षात्कार (भाग)२

शरदचे आपल्याकडे लक्ष नाही ही गोष्ट शामलीच्या केव्हाच लक्षात आली होती .त्याचे लक्ष आपल्याकडे कसे वेधून घ्यावे. आपल्या मनातील भाव त्याच्या पर्यंत कसा पोचवावा हे तिच्या लक्षात येत नव्हते.दोघेही भेटत असत दोघेही गप्पा मारीत असत परंतु शरदची नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहात  असे.आपली लहान बहिण या दृष्टीने तो तिच्याकडे पाहात असे.तर शामलीच्या मनांमध्ये निराळेच भावतरंग उठत असत.अशीच वर्षे चालली होती .यथावकाश शरद कॉलेज पूर्ण करून कंपनीत नोकरीला लागला होता.शामली कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होती .शामलीच्या घरात तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली .मग मात्र शामली अस्वस्थ झाली .

आता जर आपल्या मनातील भाव शरदला सांगितले नाहीत तर ते पुन्हा कधीच सांगता येणार नाहीत. जे काही करायचे ते लवकरच केले पाहिजे हे तिच्या लक्षात आले.गप्पा तर दोघेही रोजच मारीत होते.तिघेही नाटक सिनेमा यासाठी बरोबर केव्हा केव्हा जात असत . शेवटी एकदा धीर एकवटून शामलीने शरदला बाहेर बागेत फिरायला जाउ असे सुचविले.स्वाभाविक शरदने शशांकला हाक मारून बोलाविले .त्याबरोबर तिचा चेहरा पडला .सुदैवाने शशांकला काही ऑफिसचे काम घरी करायचे होते.तेव्हा त्याने तुम्ही दोघेच जा म्हणून सांगितले .शामलीने सुटकेचा नि:श्वास सोडला .शरदच्या मागे स्कूटरवर बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवून  आरामात ती निघाली .तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती .जसे शरदचे धक्के बसत होते तसे तिच्या गालावर गुलाब फुलत होते.आज आपल्या मनातील सर्व काही नि:संकोचपणे शरदला सांगून टाकायचेच असा निश्चय तिने केला .

बागेत फिरताना भेळपुरी खाताना हिरवळीवर बसताना आता सांगू आता सांगू असे तिचे सारखे चालले होते .तिला धीर होत नव्हता.हा असा कसा बुद्दू.याच्या हे कसे लक्षात येत नाही.अशा गोष्टी पुरुषाने बोलावयाच्या असतात. स्त्रीला स्वाभाविकपणे संकोच वाटतो .सुरुवात कशी करावी .असे विचार तिच्या मनात चालले होते .आपल्या घरच्यांच्या ही गोष्ट कशी लक्षात येत नाही .आपण ती त्यांना कशी लक्षात आणून द्यावी . इतके चांगले  स्थळ समोर असताना हे आपले आई बाबा अन्यत्र का बघत आहेत हेही तिला कळत नव्हते .एकदा तर तिच्या आईने तुझे कुठे काही ठरलेले नाही ना असे विचारले होते .त्यावेळी शरद बद्दल सर्व काही सांगून टाकावे असे तिला वाटले होते .परंतु शरदच्या मनात तसे काही नसेल तर काय उपयोग म्हणून ती त्यावेळी गप्प राहिली होती .तसे काही आहे किंवा तसे काही नाही असे काहीच ती बोलली नाही .ज्याअर्थी आपली मुलगी गप्प राहिली तेव्हा ती बहुधा  लाजली तसे काही नाही असे समजून आई आपल्या उद्योगाला लागली होती .

शरदच्या मनात काय आहे ते अगोदर जाणून घ्यावे नंतरच आई वडिलांना सांगावे असा तिचा विचार होता .या सर्व गोष्टी तिच्या मनात घोळत असताना शरद तिच्या मुखाकडे पाहात होता.ती किती सुंदर दिसते हे आपल्या आतापर्यंत कसे लक्षात आले नाही असा विचार त्याच्या मनात आला .

(क्रमशः)

प्रभाकर  पटवर्धन 

------------------------
प्रेमाचा साक्षात्कार (भाग)३

त्याने तिच्या दंडाला धरून हलविले व विचारले वेंधळे तुझे लक्ष कुठे आहे ?मी मगाचपासून एकटाच बडबड करीत आहे .ती दचकली व म्हणाली मी तुझाच विचार करीत आहे .तोही दचकला आणि म्हणाला हा तर मी अख्खा तुझ्या पुढे बसलो आहे.त्याच्याशी बोलायचे सोडून तू माझा  कसला विचार करीत आहेस.शामलीच्या लक्षात आले की आत्ताच नाहीतर बहुधा कधीच नाही .आज जवळजवळ वर्षभर आपण आज सांगू उद्या सांगू, त्याला आज कळेल उद्या कळेल म्हणून वाट पाहात आहोत.संधी शोधत आहोत.हल्ली आपल्या घरात लग्नाची नुसती चर्चा चालली आहे. उद्या गोष्टी पुढच्या थराला जातील नंतर आपण काही बोललो तर आई स्वाभाविकपणे विचारील की मी तुला स्पष्टपणे अगोदर विचारले होते त्यावेळी तू का बोलली नाहीस .त्यावेळी खाली मान घालण्याशिवाय आपल्याजवळ काहीही पर्याय  नसेल .एवढे सर्व विचार क्षणार्धात तिच्या मनात येऊन गेले .ती स्पष्टपणे बोलली की मी तुझ्याकडे भाऊ म्हणून पाहात नाही .

हे ऐकून शरद चमकला .गेली काही वर्षे ती भाऊबीज व रक्षाबंधन काही ना काही कारणाने टाळते हेही त्याच्या  प्रकर्षाने लक्षात आले.तरीही त्याने विचारले की तुला नक्की काय म्हणायचे आहे .तिने तिच्या मनातील भाव त्याला जसा जमेल तसा सांगितला .तिचेअडखळत बोलणे, तिचे मधून मधून लाजणे,तिचे मधूनमधून थांबणे,तिचे मधून मधून शब्द निवडण्यासाठी थांबणे,तिचे खाली मान घालणे ,तिचे मधून मधून त्याच्या चेहऱ्यावरील भाव निरखणे,त्याला बरेच काही सांगून गेले होते .

तिला वाटले होते तसे त्याने तिचे बोलणे धुडकावून लावले नाही.तो विचारात पडला .जिच्याकडे लहानपणापासून बहीण म्हणून पाहिले मोकळेपणाने बहीण म्हणून भाऊबीज रक्षाबंधन इत्यादी सण केले तिच्याकडेच आता अशा नजरेने पाहणे त्याला कसेतरीच वाटू लागले .केवळ आपल्याला काय वाटते एवढेच नव्हे तर तिचे आई वडील काय म्हणतील, तिचा भाऊ काय म्हणेल ,हा त्यांचा विश्वासघात तर नाही ना, लोक, शेजारी पाजारी, नातेवाईक, कॉलनीतील लोक ,काय म्हणतील असे अनेक विचार त्यांच्या मनात चमकून गेले .लहानपणापासून अत्यंत मोकळेपणाने जो तिच्याशी बोलत होता.  आता आपल्या मनातील भाव तिला कसे सांगावेत याचा त्याला अचंबा पडला .तिने विचारले मी तुला आवडत नाही का ?त्यावर तो म्हणाला असे कसे होईल मला तर तू लहानपणापासून आवडतेस.फक्त अशा दृष्टीने मी तुझ्याकडे अजूनपर्यंत केव्हाच पाहिले नव्हते .तू सुंदर आहेस. तू सद्गुणी आहेस. तू कुणाचाही संसार चांगला करशील .याची मला खात्री आहे . 

त्यावर ती म्हणाली असे जर आहे तर मग तशा दृष्टीने माझ्याकडे पाहा. मी तर कित्येक वर्षे तुझ्याकडे तशा दृष्टीने पाहात आहे .तुझ्या आज लक्षात येईल. तुझ्या उद्या लक्षात येईल. म्हणून मी केव्हाची वाट पाहात आहे .

आपल्या मनातील भाव तिला कसे सांगावे यासाठी तो शब्दांची जुळवाजुळव करू लागला .नंतर त्याने आई वडील तिचा भाऊ इतर काय म्हणतील असे विचार मांडले .हा तिच्या भावाचा त्याच्या मित्राचा तिच्या कुटुंबाचा विश्वासघात तर ठरणार नाही ना असेही तो म्हणाला .

त्यावर ती हसून म्हणाली खरे म्हणजे या गोष्टी पुरुषाने  बोलावयाच्या असतात .पण तू हा असा बुद्दू असल्यामुळे तुला काहीच न कळल्यामुळे मला लाज सोडून हे सर्व सांगावे लागले.माझ्या घरात माझ्या लग्नाची बोलणी चालली आहेत .गोष्टी पुढच्या थराला गेल्या की मग काही करणे बोलणे सांगणे कठीण होइल .जे काही करायचे ते आत्ताच केली पाहिजे .आपल्याला निर्णय लवकर घेतला पाहिजे .

त्याला पटकन काही उत्तर देता येईना .तो एवढेच म्हणाला की मी आज रात्रभर विचार करतो आणि उद्या तुला उत्तर देतो .

(क्रमशः)

प्रभाकर  पटवर्धन 

------------------------
प्रेमाचा साक्षात्कार (भाग)४ 

ती म्हणाली तुझा होकार असेल तर मी माझ्या आई वडिलांजवळ स्पष्टपणे बोलेन.तुला काहीही करावे लागणार नाही.मला आईने तुझे कुठे काही नाही ना असे विचारले होते .मला तुझा कल माहीत नसल्यामुळे मी काहीही बोलले नाही .विचार कर आणि मला उद्या सांग .हे सर्व उलटे होत आहे .

त्यावर तो हसून म्हणाला की हल्ली स्त्री पुरुष समानतेचा काळ आहे .पुरुषांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे कोणी सांगितले .तू पुढाकार घेतला याचे मला काहीही वैषम्य वाटले नाही .तू जास्त आगाऊ आहेस असेही मला वाटले नाही .मी अगदी लहानपणापासून तुला ओळखतो .तुझ्यासारखी बायको जर मला मिळाली तर मी मला भाग्यवान समजेन .तुझ्या सारखी परंतु तू कि काय ते मला माहित नाही .मी पुन्हा सांगतो की त्या दृष्टीने मी तुझ्याकडे कधीच पाहिले नाही .

ती रात्र त्याने तळमळत घालविली.त्याने नीट विचार केल्यावर त्याच्या असे लक्षात आले की ती त्याला खरेच आवडते.पण मित्राचा विश्वासघात होईल की काय असा संभ्रम त्याला वाटत होता.आपल्या आई वडिलांना काय सांगावे असाही प्रश्न  त्याला पडला होता. 

शेवटी त्याने असे ठरविले की सर्व काही तिच्यावर सोडून द्यावे .जर तिचे आई वडील तिचा भाऊ हो म्हणत असेल तर आपली हरकत नाही .तिला हेही सांगावे की ती मला खरेच पहिल्यापासून आवडत होती .फक्त लोक काय म्हणतील? तिच्या भावाला काय वाटेल? तिचे आई वडील काय म्हणतील?त्यांचा विश्वासघात केला असे तर होणार नाही ना? म्हणून तो काही न बोलता शांत होता .असे बोलणे ऐकून तिला बरे वाटेल .त्याने आपल्या मनाशी विचार केला तेव्हा त्याला आपण खरोखरच तिच्यावर प्रेम करतो असे आढळून आले.ही गोष्ट आतापर्यंत आपल्या कशी लक्षात आली नाही याचेच त्याला आश्चर्य वाटत होते. 

तिलाही त्या रात्री झोप आली नाही .आपल्या प्रेमाला तो प्रतिसाद देईल का ?हा एकच विचार तिच्या मनात होता .तो आपल्यावर मनापासून प्रेम करतो हे तिला माहित होतेच.परंतु पत्नी म्हणून तो स्वीकार करील की नाही असा प्रश्न तिच्यासमोर होता .तिचे आई वडील व तिचा भाऊ काय म्हणेल हाही प्रश्न तिला सतावत होता.

सकाळ झाली  नेहमीप्रमाणे ती गॅलरीत येऊन उभी राहिली .आतुरतेने ती समोरच्या गॅलरीत पाहात होती .तिला त्याला सारखा फोन करावा किंवा मेसेज तरी करावा असे वाटत होते .ती निग्रहाने तो मोह टाळीत होती .तिने त्याला साद घातली होती .आता प्रतिसाद त्याने द्यावयाचा होता .

तेवढ्यात तो गॅलरीत आला .हात उंचावून त्याने हॅलो हाय केले .एवढ्यात तिच्या मोबाइलवर मेसेज आला .माझा होकार आहे .मी तुझ्यावर खरेच प्रेम करीत होतो परंतु मला ते माहीत नव्हते . तू तुझ्या आई वडिलांना विचार भावाची संमती घे मी माझ्या आई वडिलांना विचारतो .सर्व काही ठीक होईल अशी आशा करूया .तुझा आणि तुझाच 

( क्रमशः).

प्रभाकर  पटवर्धन