Get it on Google Play
Download on the App Store

पोफळीतल्या चेटकीणीच्या झिंज्या

आमच्या आजोबांची नोकरी दापोलीत होती. तेव्हा दापोली हे कोकणातील एक छोटेसे शहर  होते, तेव्हा आजोबांनी नोकरी करता करता पैसे साठवून साठवून सुमारे ६-७ एकर जमीन विकत घेतली होती. आजोबा तसे पुण्याचे रहिवासी होते, तिथून आले आणि कोकणात स्थायिक झाले आणि त्यानंतर वडील सुद्धा येथे राहिले आणि आमचा जन्म कोकणातच झाला.

ही घटना जवळपास ३० वर्ष जुनी आहे. आम्ही लहान होतो, गावातील काही गोष्टी आजही आम्हाला आठवतात. जसे शाळेत जाणे, गुरुजींबरोबर त्यांच्या शिकवणीत अभ्यास करणे, चुकलो कि मिळणाऱ्या छड्या. मला अजूनही आठवते, गुरुजी आम्हाला शुद्धलेखन लिहायला मुद्दाम पातळ कागद देत असत आणि पेन्सिलच्या टोकाचा दबाव पडून जर मागे अक्षर उठले किंवा कागदाला भोक पडले तर मग मात्र आमची खैर नसे

जेव्हा आम्ही गुरुजींच्या घरून अभ्यास करून आमच्या घरी परत यायचो, तेव्हा कधीकधी संध्याकाळ असे तर कधीकधी रात्र व्हायची. तेव्हा गावात वीज नव्हती. बारावीपर्यंत आम्ही फक्त कंदील, चिमण्या, पेट्रोम्याक्स आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात अभ्यास केला.

त्या वेळी आम्ही पाचसहा पाचसहा मुलांचे ग्रुप तयार करायचो आणि गुरुजींकडे शिकवणीला जायचो. परतीच्या वाटेवर आम्ही पोफळीच्या बागांमधून चिऱ्याच्या डागेवरून कंदिलाच्या प्रकाशाखाली रस्ता बघत बघत सुमारे दोन तीन किलोमीटर चालत जायचो, थोडक्यात काय तर गुरुजींच्या घरी जाणे आणि मग तिथून घरी परत येणे खूप कष्टाचे काम  होते, मला कठोर परिश्रम घेऊन शिक्षण पूर्ण करावे लागले.

मला आठवते त्या वेळी आम्ही फाजीलपणा करण्याचे कितीतरी मार्ग शोधले होते. कधीकधी आम्ही सर्वांच्या आधी गुरुजींच्या घरातून निघायचो, आम्ही तिथून पटकन बाहेर पडायचो आणि पळत पळत पुढे यायचो आणि शेजारच्या पोफळीच्या बागेत लपून बसायचो.

पोफळीत पोहचल्यावर सर्वप्रथम आम्ही आमचे कंदील वेताच्या काड्यांना सुतळीने बांधून अधांतरी टांगून लपवून ठेवायचो आणि त्या मुलांची वाट बघत बसायचो. नंतर ते गुरुजींच्या घरून निघाले कि आमच्या मागे चालत चालत पोफळीत पोहोचत असत तेव्हा ते दूर उभे असताना घाबरायचे आणि जागीच थबकायचे. कारण त्यांना पोफळीत वाऱ्याच्या झुळुकीने हलणारा अधांतरी प्रकाश ज्योत हवेत दिसायची आणि आम्ही सर्वजण लपून धडकी भरवणारे चित्रविचित्र आवाज काढायचो.

त्या पोफळीच्या बागेतल्या चेटकिणीच्या कथा प्रसिद्ध होत्या. लोक म्हणायचे की तेथे बरीच भुते राहतात, जी रात्री फिदीफिदी हसतात, लोकांना बोलवतात, मधुर आवाजात गाणी गातात. बऱ्याच लोकांनी त्यांना पाहिल्याचा दावा केला होता आणि अनेक भयानक अशा घटना घडल्याचा उल्लेख केला होता.

असे ऐकले आहे की चेटकिणी एका पोफळीच्या शेंड्यावर झोपतात आणि त्यांची वेणी खाली  लटकवतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देतात. रात्री १२ वाजल्यानंतर अनेक लोकांनी त्या वेण्यांमध्ये गुंतल्याच्या घटना कथन केल्या आहेत. आता त्या मुलांना वाटायचे की या पोफळीमध्ये अशा भयंकर घटना घडत असतात म्हणून ते भीतीपोटी कधीच तिथे येत नसत. बऱ्याच वेळा असे घडत असे की, पोफळीची बाग सुरू होते तिकडे वाटेतच ते तासंतास उभे राहून वाट पहात रडत बसत आणि उडणारी ज्योत निघून जाण्याची वाट पाहत बसत. थोडा वेळ त्यांना त्रास देऊन झाल्यानंतर, आम्ही आमचे कंदील काढून घ्यायचो आणि तिथून आपापल्या घरी निघून जायचो.

मग त्या लोकांना वाटत असे की आता धोका नाही कारण उडणाऱ्या ज्योती आता निघून गेल्या आहेत. मग ते हळूहळू रडतरडत भीतभीत पोफळीची बाग ओलांडून गावात यायचे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मजा ऐकायचो कि ते लोक कसे घरी येत होते आणि वाटेत चेटकिणीने पोफळीत कसे दिवे लावले होते आणि भीतीमुळे ते बराच वेळ घरी जाऊ शकले नाहीत.

परंतु आजही त्यांना हे रहस्य माहिती नाही की प्रत्यक्षात ती चमकणारी ज्योत नव्हती तर ते  आम्ही टांगलेले कंदील होते. ते लोक बऱ्याचदा असे बळीचा बकरा बनले आणि आम्ही त्यांना नेहमी घाबरवायचो. पण आम्ही रोज त्याच मार्गाने यायचो, आमच्यासोबत अशी कोणतीही घटना कधी घडली नाही, एक अर्थी हि खूप चांगली गोष्ट होती, की अशी कोणतीही घटना घडली नाही, अन्यथा आज हे सांगायला कदाचित आम्ही जिवंत नसतो.   

एक म्हातारे गुरव आमच्या त्या पोफळीच्या बागेत देखभालीसाठी आणि काळजी घेण्यासाठी राहत होते. त्यांना एक छोटीशी शंभर चीऱ्यांची खोली बागेतच बांधून दिली होती. प्रत्येकजण त्यांना बुवा या नावाने ओळखत असे. आम्ही देखील त्यांना बुवा म्हणायचो. ते खूपच विद्वान होते आणि जवळजवळ सर्व कार्यांमध्ये कुशल होते. ते आमच्यासाठी नारळाच्या झावळ्यांपासून अनेक प्रकारची खेळणी बनवत असत. ते अत्यंत काळजीपूर्वक दररोज पूजा करत असत. खूप मोठमोठ्या मंत्रांचा जप करताना, आम्ही त्यांना अनेक वेळा ऐकले आहे आणि विधिवत पूजा करताना पाहिले आहे. त्यांना बागकाम करण्याचीही आवड होती. संपूर्ण घराची काळजी घेणे, इतर नोकरांना योग्य काम लावून देणे आणि त्यांना काम पूर्ण करायला लावणे, संपूर्ण जमीन मालमत्तेचा हिशोब ठेवणे अशी सर्व कामे बुवा करत असत.

पण ते जे काही काम करायचे ते फक्त सूर्यास्तापर्यंतच. सूर्यास्तानंतर ते आपली खोलीही सोडत नसत, असे का हे विचारल्यावर ते म्हणत की जर ते सूर्यास्तानंतर त्याच्या खोलीतून बाहेर आले तर चेटकीण त्यांना मारून टाकेल.मग आम्ही त्यांना विनंती केली कि संपूर्ण घटना तपशीलवार सांगा. खूप आग्रह केल्यावर मग बुवांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली.

एके रात्री बुवाजी पर्ह्यावर परसाकडे जात होते. पर्ह्याकडे जाताना वाटेत परसात बरीच पोफळीची झाडे होती. रात्रीच्या वेळी पारसाकडे सहसा कोणी जात नसे. पण बुवा वाट्टेल तेव्हा जात असत. तर ते म्हणाले की, जेव्हा ते पर्ह्याच्या दिशेने जात होते, तेव्हा त्यांनी असे काहीतरी पाहिले जे काहीतरी वेगळे आणि अजब होते. पण तरीही दुर्लक्ष करून ते शौचाला बसले.

शौच पूर्ण झाल्यावर, जेव्हा ते घराच्या दिशेने परत येत होते, तेव्हा त्यांनी पोफळीच्या झाडावरून खाली लटकलेला लांब केसांचा एक झुबका पहिला. झाडावरून लटकत असलेला  जाडजुड लांब केसांचा झुबका पाहून त्यांना लगेच समजले की काही किरकोळ गोष्ट नाही.

त्यांना आधी खूप भीती वाटली पण बुवा निःसंशयपणे खूप धैर्यवान व्यक्ती आहेत हे मान्य करावेच लागेल. त्यांनी लगेच कोयता बाहेर काढला जो ते त्यांच्या कनवटीला अडकवून ठेवायचे. क्षणार्धात त्यांनी कोयत्याने लांब केसांच्या झुबक्याचे टोक कापले आणि तिथून पळ काढला. केस कोयत्याने कापताच त्यांना एक विचित्र आणि भयंकर किंचाळी ऐकू आली. त्यांच्या म्हणण्यानुसार ती किंचाळी इतकी जोरदार होती की तिच्यामुळे कानाचे पडदे फाटतील. त्यांच्या अंगावर काटा आला होता. त्यांना दरदरून घाम फुटला होतं. ते धापा टाकत टाकत घरात पळून आले आणि लगेच आत जाऊन दरवाजा बंद केला.

काही वेळाने त्यांनी ऐकले की एक बाई घराबाहेर अंगणात बसून रडत आहे आणि त्यांना वारंवार घराबाहेर येण्याची विनंती करत आहे. अनेक विनंत्यांवर ते म्हणाले, मी बाहेर येणार नाही, जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही घराच्या आत या. पण काही केल्या ती बाई घरात यायला तयार नव्हती. ते म्हणाले की, ती बाई रात्रभर बाहेर बसून राहिली आणि सकाळपर्यंत रडत होती. सकाळ होताच तिचा रडण्याचा आवाज बंद झाला.

त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी नेहमीप्रमाणे दैनंदिन काम केले. पण आता रात्री त्यांनी परसाकडे पर्ह्यावर जाणे बंद केले. कितीतरी महिने लोटले, पण ही घटना रोजच घडू लागली. आजूबाजूच्या बर्‍याच लोकांना देखील रडण्याचा आवाज ऐकू आला.

मग एक दिवस बुवांनी त्या बाईला विचारले, “तुला नक्की काय हवे आहे?”

तेव्हा ती बाई म्हणाली, “तू माझ्या वेणीच्या झिंज्या कापून तुझ्याकडे ठेवल्या आहेस, त्या मला परत दे.”

बुवा म्हणाले की, “नाही, मी ते केस तुला परत देणार नाही. कारण मला माहीत आहे की मी तुझ्या झिंज्या तुला परत दिल्या तर तू मला मारशील.”

मग त्या बाईने खूप गयावया केली आणि विनंती केली की “नाही, तू मला माझ्या झिंज्या परत दिल्यास तर मी असे काही करणार नाही, झिंज्या कापल्यामुळे माझ्या शक्ती कमी झाल्या आहेत.”

पण बुवा हुशार होत्ते. बुवांनी त्या संधीचा फायदा घेतला आणि त्या चेटकिणीकडून बरेच काम करून घ्यायला सुरुवात केली. कधी ते तिला खाडीतून बोट ओढून आणायला सांगत, कधी कधी बागेत भलामोठा खोल खताचा खड्डा खोदायला सांगत असत, तर कधी संपूर्ण पोफळीच्या बागेला विहिरीतून रहाटाने पाणी ओढून घालायला सांगत. अशी बरीच अवघड कामे अनेक महिने ती बाई करत राहिली. बुवा जी म्हणायचे की, जर तिने सर्व काम नेहमी योग्यरित्या केले, तर ते एक दिवस कधीतरी तिला झिंज्या परत देऊन टाकतील.

ही कथा ऐकल्यानंतर, आम्ही बुवाजींना सांगितले,

“हे योग्य नाही, पहिली गोष्ट म्हणजे हे करणे खूप धोकादायक आहे, दुसरे म्हणजे एखाद्याचे केस स्वत:जवळ  ठेवणे आणि त्यांना हेतुपुरस्सर राबवून घेणे आणि काम करायला लावणे साफ चुकीचे आहे.”

त्यावर ते म्हणाले “मी असे केले नसते तर तिने मला मारून टाकले असते.”

मग आम्ही त्यांना म्हणालो की  “तुम्ही एक काम का करत नाही, तुम्ही तिच्याशी करार करा आणि हे प्रकरण मिटवून टाका. असा करार जेणेकरून तिला तिच्या झिंज्या परत मिळतील आणि तुमचा जीव देखील वाचेल.”

बुवा म्हणाले की, “मी सुद्धा असाच काहीसा विचार करतोय, कारण बरीच वर्षे उलटली आहेत, हे प्रकरण आता इथे संपवणेच योग्य होईल.”

मग आम्ही ठरवलं की या कामात आम्ही देखील बुवांना साथ देऊ. तेव्हा कुठे बुवांनी त्या चेटकिणीशी करार करण्यास सहमती दर्शविली.

सर्वप्रथम आम्ही वाघजाई देवीच्या मंदिरात गेलो आणि तिथून भरपूर उदी आणली. मग आम्ही उंबरठ्यावर आणि घराच्या भिंतींवर उडीचा लेप लावला. मग आम्ही त्या रात्री तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. आणि संध्याकाळ होण्याची वाट बघत बसलो. संध्याकाळ पर्यंत आम्ही आमच्या कपाळावर आणि हातापायांवर उदी लावून घेतली. दिवस मावळून अंधार पडताच आम्ही घराच्या आत जाऊन बसलो.

थोड्या वेळाने आम्हाला रडण्याचा आवाज ऐकू आला. त्या आवाजात एक विचित्र आर्तता होती भकासपणा होता, भीती मनाच्या आत खोलवर टोचत आहे हे जाणवत होते. दरवाजाच्या छिद्रातून मी जे पाहिले त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. आमची वाचाच गेली होती. आम्ही सुन्न झालो होतो. ती स्त्री खूपच तेजस्वी दिसत होती पण त्याचवेळी तिची किळस सुद्धा येत होती. असला प्रकार अजबच होता.एखाद्याचे बीभत्स असलेले रूपही तेजस्वी असू शकते याचा प्रत्यय तेव्हा मला आला होता.

मग बुवा बाहेर गेले आणि तिच्याशी अखेरचा करार केला आणि सांगितले की, फक्त एका अटीवर ते तिच्या झिंज्या परत करू शकतात, जर ते केस घेतल्यानंतर ती चेटकीण ही जागा आणि हे गाव सोडून दूर निघून जाईल तरच. आणि असे वचन देईल की ती या ठिकाणी परत कधीही येणार नाही, पुन्हा पोफळीत दिसणार नाही किंवा इथे कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही. आणि मुख्य म्हणजे आपल्या वचनावर ठाम राहील.

भरपूर नाही हो नाही हो करून शेवटी त्या बाईने हा करार मान्य केला आणि बुवांनी तिला तिची वेणी परत दिली. मी ऐकले आहे की चेटकिणी त्यांचे वचन पाळतात. तेव्हापासून ती बाई पुन्हा त्या घराकडे आली नाही किंवा बुवांना कधी त्रास दिला नाही. आणि आता बुवांना असलं काहीच दिसत नाही किंवा रडण्याचा आवाज सुद्धा ऐकू येत नाही. त्या चेटकिणीने तिचे वचन पूर्णपणे पाळले आणि हे गाव सोडून ती कायमची निघून गेली आहे.

बुवा आता त्यांचे जीवन मजेत जगतात. तुळशीचे एक रोप त्यांनी त्यांच्या घराच्या अंगणात लावले आहे आणि बाजूला छोटे दत्ताचे मंदिरही बांधले आहे. तिथे ते नियमित पूजा वगैरे करतात. आता सूर्य मावळल्यानंतरही खोलीतून बाहेर पडायला बुवा भीत नाहीत. पूर्वीसारखे गावकऱ्यांशी मिळून मिसळून राहतात, गप्पां मारतात सगळ्यांना मदत करतात.

 

पोफळीतल्या चेटकीणीच्या झिंज्या

अक्षय मिलिंद दांडेकर
Chapters
पोफळीतल्या चेटकीणीच्या झिंज्या