Get it on Google Play
Download on the App Store

४ त्या रात्री मला कोण बरे भेटले

आजकाल दैवी गोष्टी घडत नाहीत असे काहीजण म्हणतात परंतु माझा अनुभव वाचल्यावर त्यांचे मत निश्चित बदलेल असा मला विश्वास आहे .त्या अनुभवातून गेल्यावर मी एवढा सुन्न झालो होतो, एवढा रोमांचित झालो होतो,कि मी एवढा भाग्यवान आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता .उगीचच न कळण्यासारखे गोलगोल लिहित बसण्यापेक्षा मी पहिल्यापासून काय झाले ते तुम्हाला सांगतो.

त्या दिवशी मला काही कामानिमित्त रत्नागिरीला जावयाचे होते .आमच्या गावाहून एसटी नसल्यामुळे दोन तीन किलोमीटरवरील गावात जाऊन तिथून एसटी पकडावी लागे.एसटी बरोबर आठ वाजता होती .आमच्या गावाहून सुमारे चाळीस  मिनिटे पावस, जिथून एसटी सुटते ,तिथे पोचेपर्यंत लागतात .मी सकाळी सात वाजता घरातून निघालो . वाटेत आमच्या गावचे एक आदरणीय गृहस्थ काकासाहेब भेटले .काकासाहेब नेहमीच जरा अघळपघळ बोलतात .मला जायचे आहे असे म्हणून चटकन तोडून जाता येत नाही .आपण जरी मला गाडी पकडायची आहे म्हणून जोर केला,तरी ते जाशील रे,असे म्हणून आपली कथा पुढे चालू ठेवतात .त्यात पंधरा मिनिटे गेली .अजूनही आठची एसटी पकडणे सहज शक्य होते .जर भरभर चालत गेले आणि उतारांवरून पळत गेले तर अर्ध्या तासात पोहोचता येते .पुढे वाटेत बैलांची एक झुंज लागली होती.दोघे एकमेकांना एवढे रेटत होते की त्यांच्या जवळून रस्त्यातून जाणे धोक्याचे होते.रस्त्यात गर्दी अर्थातच नव्हती.गर्दीच काय चिटपाखरूही नव्हते .खेडेगावातील रस्त्यांवर एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना  कुणी भेटले तर एखादे माणूस भेटते, अन्यथा सर्व शुकशुकाट असतो .रस्ता अरुंद आणि रस्त्यातच त्यांची झुंज चालू होती .झुंज सुटेपर्यंत आणखी दहा मिनिटे गेली .आता एसटी मिळणे दुरापास्त होते .लेट असेल नशिबात असेल तर मिळेल असे म्हणून मी भरभर चालत स्टॅंडवर गेलो.

एसटी निघून गेलेली होती दुसरी एसटी नऊ वाजता होती.ती एसटी पकडून रत्नागिरीत पोचेपर्यंत साडेदहा वाजून गेले होते .आता माझी सर्व कामे आटपून संध्याकाळी वेळेवर घरी परत येणे कठीण होते.तरीही मी पटापट कामे उरकत होतो . कधी नव्हे ते आज बरेच ओळखीचे लोक भेटत होते .त्यांच्याशी दोन चार शब्द बोलण्यात आणखी वेळ जात होता .माझी दंतवैद्याकडे अपॉइंटमेंट होती.जेवून मी त्यांच्याकडे गेलो .तिथे गर्दी होती .आत गेलेल्या पेशंटने बराच वेळ खाल्ला .नंतर माझे काम होऊन तिथून निघेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले .अजून दोन तीन कामे उरकेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले.

संध्याकाळची सहाची एसटी निघून गेली होती .आता शेवटची आठची एसटी मिळणे शक्य होते.रात्री सव्वानऊ साडेनऊनंतर मला एकटय़ानेच सड्यावरून कातळ तुडवीत जाणे भाग होते .रत्नागिरीला काकांकडे वस्ती करावी असा एक विचार केला.परंतु घरची मंडळी काळजी करतील.  मी रत्नागिरीला  राहिलो हे त्यांना कळविण्याचे काहीही साधन नव्हते .तेव्हा रत्नागिरीला राहण्यापेक्षा आपण आठच्या एसटीने जावे असे मी ठरविले.रस्ता पायाखालचा आहे आपल्याजवळ बॅटरी आहे हा हा म्हणता घरी पोचू असा विचार मी केला .चांदणी रात्र आहे काळजीचे कारण नाही.असाही मी  विचार केला. शेवटी हो ना,हो ना,करता करता मी आठची एसटी पकडली .दुर्दैवाने ती एसटी वाटेत बंद पडली .काही तरी खाटखूट करून ड्रायव्हरने ती सुरू केल्यावर पुढे टायर पंक्चर झाला .टायर बदलून पुढे स्टॅंडवर पोचेपर्यंत रात्रीचे साडेबारा वाजले. पावसला कुणाला तरी उठवून त्याच्याकडे वस्ती करण्यापेक्षा सरळ आपल्या  घरी जावे असे मी ठरविले .

आणि अशा प्रकारे मध्यरात्रीनंतर सड्यावरून मी एकटाच चालत घरी निघालो. निघालो तेव्हा मनात काहीही भीती नव्हती.चालत असताना मनात केव्हा भीतीचा प्रादुर्भाव  झाला ते माझे मलाच कळले नाही .सड्यावरून अशाचप्रकारे एकटे जाणाऱ्या लोकांच्या ऐकलेल्या हकीगती आठवू लागल्या .

.फलाणा असाच रात्रीचा सड्यावरून एकटा जात होता त्याला फुरसे चावले आणि तो दोन महिने अंथरुणावर पडून होता .

दुसरा एक असाच जात असताना त्याला भुलीचे झाड भेटले आणि तो रात्रभर  एकटाच वाटोळा वाटोळा सड्यावर सकाळपर्यंत भटकत होता .

तिसरा एक सड्यावरून जात असताना त्याला वाघरू भेटले सुदैवाने वाघाने त्याला काही केले नाही .

कुणाला कोल्हे भेटले. कुणाला लांडगे भेटले. कुणाला  रानडुक्कर भेटले.कुणाला भूत भेटले. एक ना दोन नाना हकीगती .मिंय्या मूठभर आणि दाढी हातभर या म्हणीप्रमाणे छोट्या गोष्टीना वावभर शेपूट जोडून कहाण्या निर्माण करण्यात  आणि घोळून घोळून त्या सांगण्यात खेडेगावातील मंडळी वाकबगार .

त्या सगळ्या कहाण्या मला आठवू लागल्या .रत्नागिरीला राहिलो असतो तर फार चांगले झाले असते असे वाटू लागले .निदान पावसला तरी एखाद्याकडे जाऊन राहायचे एवढ्या माझ्या ओळखी पण आता या विचाराचा काय उपयोग .आगे बुद्धी वाणिया व पीछे बुद्धी बामणीया या म्हणीप्रमाणे सर्व कारभार!असे करता करता मी चालतच होतो आता निम्मे वाट सरली होती.चांदण्यात झुडपांच्या सावल्या काहीतरी विचित्र आकार दाखवत होत्या.कुठेही बघितल्यावर काहीतरी विचित्र आकार दिसत होते . भरभर भरभर चालता चालता मला धाप लागली होती .समुद्राचे गार वारे अंगावर बसत असतानाही मला दरदरून  घाम फुटला होता .आता उतार लागला होता. उतारावरून धावत सुटावे आणि एकदा घर गाठावे असे वाटत होते. परंतु पाय विचारांना साथ द्यायला तयार नव्हते.

इतक्यात पाठीमागून मला कुणी तरी हाक मारली .प्रभाकर प्रभाकर अरे थांब.माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला .भीतीने पाय लटपटू लागले .झक मारली आणि या रात्री घरी जाण्याच्या फंदात पडलो असे मला वाटू लागले. एवढय़ात पाठीमागून हाक मारणारी व्यक्ती माझ्या पुढय़ात येऊन उभी राहिली .पाहतो तो ते आमच्या गावचे मला सकाळीच भेटलेले काकासाहेब होते.सकाळचाच पोषाख त्यांच्या अंगावर होता.फक्त भरीला एक दणकट काठी त्यांच्या हातात होती.कातळावर आपटल्यावर त्याचा एखादे नाणे खणकन वाजावे तसा खणकन आवाज येत होता.काकासाहेबांना भेटल्या बरोबर माझी भीती कुठच्या कुठे पळाली .घाम येणे थांबले .लटपटणारे पाय स्थिर झाले.  

अरे इतका रात्रीचा तू घरी कसा काय निघालास?रत्नागिरीला, पावसला, कुठे थांबायचे नाही का ?किती भरभर चालतोस ?मघापासून मी तुला गाठण्याचा प्रयत्न करीत आहे .तू तर धावतच सुटला आहेस.नेहमी प्रमाणे काकासाहेबांनी अघळपघळपणे फटकारले आम्ही हळूहळू उतारावर चालू लागलो .चालताना ते कातळावर काठी आपटून आवाज करीत होते .अशा आवाजाच्या लहरी सरपटणार्‍या प्राण्यांपर्यंत पोचतात आणि ते वाटेतून बाजूला होतात .यासाठी कोकणात रात्री चालताना काठी आपटत जाण्याची पद्धत आहे .त्याचप्रमाणे मुद्दाम करकर वाजणाऱ्या चपला,वहाणा, बनवून घेतल्या जातात. मी काकासाहेबांबरोबर उतारावर चालत असताना,  ते सकाळी भेटल्यापासून झालेली सर्व हकीगत सांगितली .मला निरनिराळ्या कारणांनी उशीर का झाला ते सांगितले. वाटेत उशीर का झाला तेही खुलवून खुलवून सांगितले. कुठेही न थांबता घरी जाण्याचा निर्णय का घेतला तेही सांगितले .काकांबरोबर चालताना मला आश्वस्त सुखरूप असल्यासारखे वाटत होते .ते मला बोलता ठेवून,मला सुखरूप वाटेल ,असे  पाहात होते,हे माझ्या लक्षात आले .काका एवढ्या रात्री इथे कसे काय हे माझ्या लक्षात येत नव्हते.कुणीतरी ओळखीची मोठी सोबत भेटल्याच्या आनंदात माझे तिकडे दुर्लक्ष झाले होते . तो विचार आता मनात जोरात डोकवू  लागला .

काकांना माझ्या मनातील विचार जसे काही कळतच होते त्याप्रमाणे त्यांनी मी विचारण्याअगोदर आपणहून खुलासा करण्यास सुरुवात केली .ते पावसला कुणाच्यातरी कीर्तनासाठी गेले होते.कीर्तन संपल्यावर गप्पा मारता मारता उशीर झाला .काकासाहेब रात्रीचे कुठेही बिनधास्त जातात हे सगळ्यांना माहित होते .भीती हा शब्द त्यांच्या शब्दकोषात बहुधा नसावा .गप्पा नंतर कॉफी झाली आणि काकासाहेब एकटेच घरी येण्यास निघाले .काकांचा गप्पिष्ट स्वभाव, त्यांची कीर्तन प्रवचनाची अावड, त्यांचे बिनधास्त रात्रीचे फिरणे,त्यांचा धाडसी स्वभाव,हे सर्व मला माहित असल्यामुळे ,त्यांचे असे एकटे मध्यरात्री येणे,मला कुठेच खटकले नाही .उलट ते मला त्यांच्या एकूण स्वभावाशी सुसंगत वाटले.

बोलता बोलता आमचे घर केव्हा आले ते कळलेच नाही .आमच्या घराच्या पुढे त्यांचे घर होते .मला बेड्यात (एक प्रकारचे फाटक) सोडून गुड नाइट म्हणून ते पुढे काठी वाजवीत गेले.मीही आपल्या घरी गेलो.इतका उशीर कां? म्हणून विचारता मी काकासाहेबांना सांगितलेली सर्व हकीगत पुन्हा सांगितली.कुणी सोबतीला होते का ?असे विचारता मी वडिलांना काकासाहेब बरोबर होते असे सांगितले. काकासाहेबांचा स्वभाव सर्वांना माहित असल्यामुळे त्यांचे रात्रीचे असे एकटे येणे भेटणे कुणालाही खटकले नाही .

दुसऱ्या दिवशी मी काही कारणाने काकासाहेबांच्या घरी गेलो होतो .सहज बोलता बोलता मी त्यांना कालचे कीर्तन कुणाचे होते? असे विचारले.त्यावर त्यानी कुठचे कीर्तन? कुठे होते? असे मला उलट विचारले.तुम्ही काल पावसला कीर्तनाला गेला होता ना? असे मी विचारता त्यांनी छे: मी काल रात्री घरीच होतो असे सांगितले .मला तू असे का विचारतोस ?असे विचारता मी त्यांना मला कुणीतरी पावसला कीर्तन होते असे म्हणत होते आणि कीर्तन म्हणजे तुम्ही तिथे जाणार म्हणून सहज विचारले असे म्हणून वेळ मारून नेली.

घरी येताना आणि अजूनही माझ्या मनात एकच प्रश्न आहे मला रात्री कोण भेटले?आमच्या घराच्या शेजारी आमच्या कम्पाऊंडमध्ये आमचे दत्तमंदिर आहे.आमच्या घराण्यात दत्त उपासना अनेक पिढ्या चालत आलेली आहे . "मला दत्ताने तर नाही सोबत केली ? मी इतका भाग्यवान आहे का ?आणि मी करंटा त्याला ओळखू शकलो नाही ."असे तर नसेल झाले ?की मी घाबरू नये म्हणून माझ्या मनानेच एक आकृती निर्माण करून मला अाश्वस्त केले.*मला काही कळत नाही दत्तप्रभूच खरे काय ते जाणे*.

२७/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

गूढकथा भाग २

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
१ करणी २ स्वप्न ३ भुलीचे झाड ४ त्या रात्री मला कोण बरे भेटले ५ भुताटकीचा कडा