Get it on Google Play
Download on the App Store

सोमण सरांचे भूत

जर तुम्ही १९८० ते २००० दरम्यान कल्याणच्या प्रसिद्ध सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले असेल तर तुम्हाला कदाचित त्याचा अभिमान वाटणार नाही असे होणे शक्यच नाहीं. सुभेदार वाडा हायस्कूल ही कल्याणची नावाजलेली शाळा होती.

प्रत्येक छोट्या गोष्टीवर छडी असायची. कंपासपेटी न बाळगल्याबद्दल एक छडी, वर्गात बोललो तर दोन, शाळेच्या भिंतीवर लिहिले तर चार, आणि अशा प्रकारे प्रत्येक गुन्ह्यासाठी छड्यांची संख्या वेगवेगळी निश्चित केली जात असे.

शाळेचे एक प्रचंड मोठे मैदान होते आणि सर्व बाजूंना लोखंडी व्यायामाचे साहित्य बसवलेले होते, ज्यावर मुले पाणी पिण्यासाठी किंवा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाताना एकसारखा व्यायाम करत असत. शाळेला आपल्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक प्रगल्भतेचा अभिमान होता.

संपूर्ण कल्याणात त्याकाळी कोणतीही शाळा ईतकी प्रसिद्ध नव्हती. आजकालच्या श्रीमंतांच्या मुलांच्या शाळांपेक्षा म्हणजे कॉन्व्हेंट्स पेक्षा खूप वेगळी शाळा होती. सर्व वर्गांची मुले त्यात शिकत होती आणि ती मराठी मिडीयमची सर्वोत्तम शाळा मानली जात होती.

शाळेतील मुले खेळात अव्वल होतीच तसेच आमचे येथील विद्यार्थी चित्रकलेत सुद्धा निपुण होते. कल्याणच्या सुभेदाराच्या शिवकालीन वाड्यात बालवाडी आणि प्राथमिक शाळा भरत असे तर वाड्याच्या मागच्या बाजूला हायस्कूलची भव्य वास्तू होती.

जेव्हा मी पाचवीत या शाळेत प्रवेश घेतला, तेव्हा इतर मुलांपेक्षा मी पूर्णपणे भिन्न असणे स्वाभाविक होते. एका सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा असल्याने मला पाचवीपर्यंत घरी मास्तर ठेवून शिकवले गेले.

लहान वयात शाळेत न पाठवल्यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात परिपक्वता नव्हती. इतर प्रकारच्या घरंदाज विनम्रते व्यतिरिक्त, माझ्या एकूण वागण्यात एक प्रकारची साधेपणाची आणि प्रामाणिकपणाची मानसिकता दिसून आली, जी त्या शाळेतील सत्तर टक्के मुलांना हास्यास्पद वाटत असे.

किती बरे झाले असते जर तुम्ही त्या लोकांना ओळखत असता. शाळेतील चार उंच मुलांपैकी एक होता श्रीपती. त्याच्या वडिलांची गांधी चौकात पानाची गादी होती आणि फुटबॉलमधील सेंट्रल फॉरवर्ड खेळाडू असल्याने त्यानी त्याच्या फारशी ओळख नसलेल्या घराण्याला श्रीपती हेच नाव दिले होते. एक तात्या न्हाव्याचा मुलगा होता. तात्याचे गांधी चौकातच छोटेसे सलूनचे दुकान होते. त्याच्या मुलाचे नाव सत्तू! सत्तू मुलांमध्ये खूप लोकप्रिय होता कारण नेहमी तो चांगल्या चांगल्या हेअर स्टायली करून यायचा आणि गम्मत म्हणजे केस नेहमी नीट कापलेले असल्यामुळे त्याला छड्या कधीच मिळत नसत. एक निवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या सुसंस्कृत कुटुंबातील एक मुलगा होता शौनक, जो सर्व मुलांमध्ये 'चिकना' या नावाने प्रसिद्ध होता. आणि एक होता पातकर वाण्याचा मुलगा अमेय! तो नेहमी कांजी केलेला शाळेचा पांढरा शुभ्र सदरा घालून येत असे. तो शरीराने किरकोळ होतं पण तो कबड्डीचा चाम्पियन होता. पहिल्याच दिवशी मैदानातल्या वाळूत त्या मुलांनी मला अमेयशी कुस्ती खेळायला लावून माझी परीक्षा घेतली, आणि मी जिंकलो देखील! माझ्यासारखा साधा सरळ आणि घर कोंबडा असलेल्या मुलात इतका अमुलाग्र बदल होण्याचे कारण होत्या माझ्या मातोश्री ज्या माहेरून मराठा घराण्यात जन्मलेल्या होत्या! आपल्या उपजत असलेल्या क्षात्रतेजाला अनुसरून त्यांनी फर्मानच काढले होते कि शाळेतून घरी मार खाऊन आल्यास घरी आणखी प्रसाद मिळेल.

जरी आमच्या घरात रामायण, महाभारत, दासबोध, ज्ञानेश्वरी, गीता वगैरे यांचे पठण  सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी एक तास होत असे पण इतर वेळेस मात्र घरात दिवसरात्र इंग्रजी बोलली जात असे. असे असूनही  मी अस्खलित इंग्रजी बोलता असूनही रेन आणि मार्टिनच्या प्रसिद्ध इंग्रजी व्याकरणाचा धसका घेतला होता. इयत्ता आठवीपर्यंत पेपरमध्ये व्याकरणाचे आठ प्रश्न सोडून दिले तरी मला इंग्रजीत १०० पैकी ८० गुण मिळायचे, म्हणूनच व्याकरण शिकवणारे शिक्षक माझ्या व्याकरणा बाबतच्या अनास्थेकडे फारसे लक्ष देत नसत.

व्याकरणाबाबतच्या या अनास्थेमुळेचं रेसिंग सायकलवर खूपच उंच सीटवर बसून येणारा रोहन कल्याणकर इयत्ता आठवीत माझा मित्र झाला. रोहन सुद्धा फाडफाड इंग्रजी बोलत असे पण त्यालाही व्याकरणाची विशेष आवड नव्हती. व्याकरणाचे शिक्षक जसे माझ्या कच्च्या व्याकरणाकडे दुर्लक्ष करत असत तसच त्यालाही करत असत. कारण वर्गात इंग्रजीत मी पहिला येत असे तर तो दुसरा!

पण ती एक विशेष घटना घडली नसती तर आम्ही इतके घट्ट मित्र झालोच नसतो. त्यावेळेस आमचे वर्गशिक्षक म्हणून सोमण सर कुठून तरी बदली होऊन आले. कुठून ते मला माहित नाही. शिस्तबद्ध आणि विधिवत काम करणारे कट्टर शिक्षक! त्यांचे इंग्रजी खूप पुस्तकी होते आणि आमचा इंग्रजीमध्ये चांगल्या असलेल्या संपूर्ण वर्गाला ते हास्यास्पद वाटायचे.

तरीसुद्धा, अनेक वर्षांपासून रेन एंड मार्टिनच शिकवल्यामुळे ते त्यांना तोंडपाठ होते आणि त्यांनी पहिल्याच दिवशी मोठे भाषण दिले आणि असे घोषित केले की व्याकरण फक्त इंग्रजीचाच नाही तर सर्व भाषांचा आत्मा आहे. मग माझ्यासारख्या आणि रोहन सारख्या दोनचार इंग्रजीत खूप चांगल्या असलेल्या मुलांकडे बघून त्यानी स्पष्टपणे सांगितले की जर व्याकरणाचे सखोल ज्ञान नसेल तर अस्खलित इंग्रजी बोलणे अर्थहीन आहे.

आमचे इंग्रजी व्याकरण पक्के व्हावे या निर्धाराने त्यांनी पार्सिंग आणि एनालिसिस सुरू केले. ते आमच्या वर्गातल्या फळ्यावर इंग्रजीचे एक लांब लचक वाक्य लिहायचे आणि मग वेगवेगळ्या मुलांना प्रश्न विचारून त्याचे विश्लेषण करायचे. काही म्हणा, मुलांना इंग्रजीमध्ये मास्टर बनवण्याच्या त्याच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही.

पण इंग्रजीत कमकुवत असलेल्या परंतु व्याकरणाला घोटून घोटून पक्के केलेल्या मुलांकडून अचूक उत्तरे मिळाल्यानंतर त्यांचे समाधान झाले नाही आणि एकदा त्यांनी अचानक माझ्यावर कृपादृष्टी टाकली. मी एक साधा प्रश्न विचारल्यावर उभा राहिलो, पण प्रश्न समजू शकलो नाही, मग उत्तर काय देणार?

मला कात्रीत सापडलेला पाहून तथाकथित श्रीमंत वडिलांच्या मुलांना लज्जित करावे असे वाटणाऱ्या आणि वडिलांचे पैसे आम्ही वाया घालवत आहोत याची आठवण पदोपदी करून देणाऱ्या कर्तव्यदक्ष शिक्षकाप्रमाणे असलेल्या त्यांना खूपच आनंद वाटला. येनकेन प्रकारेण मीच उत्तर द्यावे असा हट्ट करताना त्यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी मला बाकावर उभा केला.

माझे व्याकरणाचे अगाध ज्ञान मला आज कुठे घेऊन जाईल हे मला समजत नव्हते. जसजसा मी अस्वस्थ होत होतो, तसतसा त्यांचा राग आणि आनंदही वाढत होता. तो आमच्या वर्गाचा बुधवारचा शेवटचा पीरीयड होता आणि मी देवाकडे शाळा सुटल्याची घंटा वाजवण्याची प्रार्थना करत होतो. तेवढ्यात कुठूनतरी जोरात शिट्टी वाजली. पोरांना समजले, पण सोमण सरांनी असे दाखवले जणू समोरच्या झाडावर बसलेल्या पक्ष्याने शिट्टी वाजवली.

"उत्तर दिले नाहीस तर आज घरी जाऊ देणार नाही!"

जेव्हा त्यांनी हा इशारा दिला तेव्हा तीच शिट्टी अजून जोरात वाजली. एकदा सुरू झाली आणि ते सुमारे पंधरा सेकंद वाजत राहिली. आता सोमण सर चांगलेच चिडलेले दिसत होते. मुले एकमेकांकडे बघून हसायला लागली. सोमण मास्तरांनी अत्यंत गंभीरपणे विचारले-

"कोण शिट्टी वाजवत आहे?” वर्गात गंभीर वातावरण निर्माण झाले.

काही सेकंद थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा विचारले-

“वर्गात कोण शिट्टी वाजवत आहे?” अशा प्रश्नाचे उत्तर थोडीच मिळणार होते?

यावेळी त्यांनी मोठ्या आवाजात सांगितले-

"जर मी त्याला पकडले तर मी त्याला शाळेतून काढून टाकेन."

मग सोमण सरांनी शेवटच्या रांगेत सर्वात गंभीर चेहऱ्याने त्यांच्याकडे ढोंगीपणे तो मी नव्हेच अशा अविर्भावात पाहत असलेल्या सडपातळ रोहनकडे पाहिले. सर बघत आहेत हे कळताच तो उभा राहिला,

"सर, समोरच्या झाडावर पोपट बसलाय तो शिटी वाजवतोय!" संपूर्ण वर्गात हशा पिकला.

तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा वाजली आणि सगळी मुलं "हेsssss" असं म्हणत धावत बाहेर गेली.

सर्वांना समजले की रोहन शिट्टी वाजवत आहे आणि काही चांगली मुले जी त्यांची इंग्रजी सुधारण्यासाठी उत्सुक होती, त्यांनी चुगली करण्याची धमकीही दिली. परंतु प्रत्येक व्याकरणाच्या पीरीयडला रोहन अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग असल्यासारखी त्याची दणदणीत शिट्टी नियमित वाजवत असे. रोहनने मला वर्गाबाहेर सांगितले की घाबरू नकोस. जेव्हा जेव्हा सोमण तुला पार्सिंग आणि अॅनालिसिसवर प्रश्न विचारतील, तेव्हा तेव्हा मी शिटी वाजवणार.

सलग दोन बुधवारी आपली शंका व्यक्त केल्यानंतर, सोमण सरांनी स्पष्ट केले की शिट्टी वाजताच ते रोहनला बाहेर काढतील त्याने शिट्टी वाजवली असो किंवा नसो. त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर रोहनची माझी तातडीची बैठक झाली आणि रोहनला काढून टाकल्यानंतरही शिट्टी चालूच ठेवायची हा ठराव पास झाला आणि चार पाच सेकंदांनंतर ती सतत वाजत राहणे ही माझी जबाबदारी आहे.

अशा प्रकारे पुढील बुधवारची प्रतीक्षा सुरू झाली. आपल्या घोषणेनुसार, शिटी वाजताच रोहनला वर्गातून काढून टाकल्यानंतर सोमण सरांना समाधान वाटले. पण ते समाधान जास्त काळ टिकू शकले नाही.

आपल्या दप्तरात आपली पुस्तके भरून वर्गातून खाली मान घालून निघून गेल्यानंतर, रोहनने खिडकीतून हात हलवला आणि मला टाटा केले. मग वर्ग पुन्हा सुरू झाला. मग सोमण सरांनी  अत्यंत मन:पूर्वक पार्सिंगचे नियम शिकवायला सुरुवात केली.

दिवसभर अभ्यास करून थकलेली मुलं जांभया देत होती इतक्यात खरंच एक पोपट आला आणि समोरच्या झाडावर बसलाआणि जोरजोरात शिट्या वाजवू लागला. सर्व मुले जोरजोरात हसली पण सोमण सर गंभीर होते. थोडा वेळ शांत राहिल्यावर त्यांनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली आणि इतक्यात वर्गाच्या आत जोरात शिट्टी वाजली. सोमण सरांना हा अपमान सहन झाला नाही. मला माहित नाही की त्यांना कसे कळले पण त्यांनी मला वर्गातून हाकलून दिले.

मी जाता जाता म्हणालो “सर, तुम्ही आत्ताच शिटी वाजवणारा पोपट पाहिला, तरी तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात. बघा मी गेलो तरी शिट्टी वाजत राहील.”

सोमण सर संतापाने म्हणाले - "तु ही बघ. तु सुद्धा या वर्गात येतच राहशील. निकाल येऊ दे."

माझा पण आधी विश्वास बसला नाही पण सोमण सर ‘गर्जेल तो बरसेल काय’ सारख्या ढगासारखे नव्हते. १०० पैकी ८० मार्क मिळवणाऱ्या मला सोमण सरांनी मला इंग्रजीत २ मार्कांनी नापास केले. वर्गशिक्षक असल्याने भूगोल आणि गणितातही मला त्यांनी नापास करून टाकले. ज्यामुळे आठवी पास होणे अशक्य होते. मला शाळा सोडावी लागली.

मग माझ्या वडिलांच्या बदलीमुळे कल्याणही सोडावे लागले आणि मी पुढील सहा वर्षे कल्याणला परत येऊ शकलो नाही. जेव्हा सहा वर्षांनी परत आलो, तेव्हा मी ग्रेजुएट होतो आणि माझे वडील निवृत्त झाले होते. माझा नोकरीचा शोध चालू होता.

दसरा-दिवाळीच्या दिवशी 'भेटवस्तू' घेऊन मोठ्या अधिकाऱ्यांकडे न जाणे,पुढे पुढे न करणे भ्रष्टाचारात सहकार्य न करणे यामुळे वडिलांवर सर्व वरिष्ठ नाराज होते. त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता नव्हती. मोठ्या मुश्किलीने एका सहकारी पतपेढीत टेम्परवारी नोकरी मिळाली. आमच्या मैनेजर साहेबांनी मला कस्टमर केअर खिडकीवर बसवले. माझे श्रीमंती थाटाचे जीवन बदलले. कारकुनाचे आयुष्य जगू लागलो.

मधल्या कळत मोठ्या भावाने एका श्रीमंताच्या मुलीशी लग्न केले आणि वडिलांनी चांगल्या काळात घरात जे काही घेतले होते ते सर्व काही ताब्यात घेतले. तथाकथित श्रीमंत मुलीच्या आगमनानंतर घरात काय बदल होऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आली असेलच. मुलीला कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये अशी भावना घरात कायम सगळ्यांना वाटू लागली.

मुलगी बिचारी साधी होती तरी भावाची वृत्ती अशी होती की तो आपल्या पत्नीला घरतील लोकांच्या सर्व हल्ल्यांपासून आणि जाचापासून वाचवत असल्याचा आव आणत असे. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागल्या. जर ती बाहेरून आली असेल आणि हातपाय न धुता स्वयंपाक घरात आली तरी कोणीही तिला अडवण्याचे धाडस करत नव्हते. जर ती बाबांच्या अंगावर ओरडली तरी प्रत्येकजण दुर्लक्ष करत असे.

आई पहाटे चार वाजता उठून नाश्ता आणि चहा बनवायची. तीन तीनदा निरनिराळे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे पदार्थ बनवायची. खूप राबायची. तेव्हा स्वयंपाकाच्या ग्यासचा सिलेंडर तीनशे रुपये होता तोही महाग वाटत असे. वरच्या खोलीत ती स्वतःसाठी आणि तिच्या नवऱ्यासाठी स्वतंत्र अन्न साजूक तूपात शिजवायची.

एक दिवस दादा खोट्या खोट्या सहानुभूतीने म्हणाला, “या घरात कारकून बनेल असे वाटले नव्हते. जरा बरा कमवत असतास तर माझ्या मेहुणीबरोबर तुझे जुळवून दिले असते. पण तुम्ही तुमच्या वडिलांवर गेला आहात, जे समाधान हीच जीवनाची सर्वात मोठी संपत्ती मानतात. चार चौघात मिसळणे, लोकांशी संवाद साधणे आणि संपर्क स्थापित करणे म्हणजे खुशामत करणे, पुढे पुढे करणे आहे असे जो व्यक्ती मानतो त्याचे भाग्य त्याच्या वडिलांसारखेच असते. हे बघ हे घर इतके मोठे नाहीये. आपल्याला सगळ्यांना लहान पडतंय. तू नवीन घर भाड्याने घेऊन तिकडे राहू शकतोस का? "

मी सर्व काही शांतपणे ऐकून घेतले आणि मी ठरवून टाकले की मी माझ्या आई आणि वडिलांसोबत वेगळे राहीन. देवाच्या कृपेने मला मोक्याच्या जागी टिळक चौकात दोन खोल्यांचा वन रूम किचन फ्लॅट मिळाला आणि मी तिथे राहायला गेलो. तरी माझे आई-वडील आले नाहीत. बाबांची अट होती की तू लग्न कर मग आम्ही येऊ. खरं तर, आईला माझा मोठा भाऊ आयुष्यात अधिक यशस्वी वाटला, तर माझे वडील आणि तिच्या मते मी चमत्कारिक माणूस आहे.

असो, नवीन घराच्या खाली एक हॉटेल होतं. त्यामुळे खाण्यापिण्याचा काहीच प्रश्न नव्हता. लवकरच मी मोटार सायकल विकत घेतली आणि मला समाधान वाटले की मी योग्य दिशेने वाटचाल करत आहे.

एके दिवशी माझ्या वहिनीच्या वाढदिवसा निमित्त माझ्याच घरी मला जेवणाचे औपचारिक आमंत्रण मिळाले. वहिनीला देण्यायोग्य भेटवस्तू घेणे ओघाने आलेच.आयुष्यात पहिल्यांदा मी सर्वात मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानात सोन्याची वस्तू घेण्यासाठी गेलो. न जाणे किंवा कोणतीही स्वस्त भेटवस्तू देणे, दोन्ही गोष्टी शोभल्या नसत्या. अखेर माझ्या खिशाला परवडेल अशी सोन्याची अंगठी घेतली. त्यावेळेस किंमत रुपये १२०००/- इतकी होती.

जेव्हा मी पैसे देण्यासाठी काउंटरवर गेलो, तेव्हा रोहनने मला आणि मी रोहनला ओळखले. तो लगेच काउंटर वरून बाहेर आला आणि आम्ही एकमेकांची गळाभेट घेतली. दुसऱ्या माणसाला काऊंटरवर बसवून रोहन माझ्याबरोबर खाली उतरला आणि आम्ही एका जवळच्या हॉटेलमध्ये गेलो मस्तपैकी मिसळ हाणली आणि गरमगरम चहाचे घोट घेता घेता आमच्या गप्पा सुरु झाल्या. किती आठवणी काढल्या आणि मग ती शिट्टी वाजवण्याची घटनाही आलीच. रोहन म्हणाला-

"बिचारे सोमण सर! वारले रे! आपल्याला सुधारू शकलेच नाहीत...कदाचित याच धक्कामुळे खपले. मी त्यांना भेटायला गेलो होतो. तुझी खूप काळजी वाटत होती त्यांना... त्यांनी तुझ्यावर अन्याय केला ही अपराधी पणाची भावना बोलून दाखवली त्यांनी.. मी म्हणालो, 'सर, चूक आमची होती, तुम्ही तरी काय चुकीचे केले? हे तुम्हाला जसे म्हातारपणी लक्षात आले तसे आम्हाला आता तरुणपणी समजले.... बर ते जाऊ दे..तू काय करतोस सध्या.?”

पतपेढीत टेम्परवारी कारकुनी करतो हे ऐकून तो गंभीर झाला. त्याला वाईट वाटले. थोडावेळ आम्ही दोघे शांत बसलो. इतक्यात वेटर बिल घेऊन आला. मी खिशाकडे हात नेला तसा म्हणाला

“साल्या, मला श्रीमंती दाखवतोस? तू माझा पाहुणा आहेस! सोमण सर मरण पावले, म्हणून वाचलास नाहीतर तुझी तक्रार केली असती त्यांच्याकडे!”

मग आम्ही रस्त्यावर उभे राहून चांगले तासभर बोललो. तो अचानक म्हणाला- “हे बघ, अक्षय तू आणि मी आपण दोघे एकत्र मिळून एक नवीन बिझनेस सुरु करूया.”

“आणखी एक बिझनेस? कसला?” मी विचारलं

“तू म्हणशील तो...” रोहन

“अरे पण तुझे हे ज्वेलरचे दुकान आहे ना? आणि माझ्याकडे कुठे इतके भांडवल?” मी

“अरे हे माझ्या मोठ्या भावाच्या सासऱ्याचे दुकान आहे. आणि माझा मोठा भाऊ सुद्धा सोमण सरांचाच विद्यार्थी आहे. जोपर्यंत आपण एकत्र बसून शिटी वाजवत नाही न तोपर्यंत सोमण सरांचे भूत मला काही सोडेल असं मला वाटत नाही.”

रोहनचे बोलणे ऐकून मला खूप आनंद झाला. लवकरच रोहनने बोलून दाखवलेली कल्पना आम्ही सत्यात उतरवली. आता खडकपाडा सर्कल जवळ आमचा फायनांशीयल कन्सल्टंसीचा एकत्र एक बिझनेस आहे. आता आम्ही खूप छान कमावतो. सोमण सर आता जिथे कुठे असतील आमचा त्यांना अभिमान नक्की वाटत असेल. मी जो ब्लॉक भाड्याने घेतलेला तो मी आता विकत घेतला आहे. आई बाबा सुद्धा माझ्याकडेच असतात. पुढच्या महिन्यात माझं लग्न ठरलं आहे. मुलगी तीच दादाची मेहुणी!

 

लेखक: अक्षय मिलिंद दांडेकर

 

 

 

सोमण सरांचे भूत

अक्षय मिलिंद दांडेकर
Chapters
सोमण सरांचे भूत