५ खोताची दंडेली
(यातील पात्रांचे प्रत्यक्ष व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
गोष्ट फार जुनी आहे .गेल्या शतकात ब्रिटिश राज्य होते त्या वेळची एकोणिसशेदहा सालातील गोष्ट आहे .त्यावेळी वाहतुकीच्या सोयी नव्हत्या .केवळ रेल्वे एवढीच द्रुत वाहतुकीची व्यवस्था होती. मोटारी होत्या परंतु त्या फक्त श्रीमंतांकडे होत्या.मोठ्या शहरांपुरत्या होत्या . सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या दृष्टीने मोटारीचा वापर तेव्हा नव्हता. चांगले रस्ते नव्हते कच्चे रस्ते तेही फार थोड्या प्रमाणात होते .संदेश वहनाचे साधन म्हणून खेडेगावात टपाल पोस्टमन एवढीच व्यवस्था होती.खेडेगावातून शहरात जाण्यासाठी जिल्ह्य़ाच्या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी,डोली, असल्यास जलवाहतूक, किंवा असल्यास रेल्वे, एवढेच साधन होते .बऱ्याच वेळा बरेच अंतर चालत जावे लागे .गोष्ट कोकणातील आहे त्यावेळी वाहतुकीच्या साधनांची कोकणात वानवा होती .सर्वत्र भारतात याहून विशेष वेगळी परिस्थिती होती असे नाही.
असे असूनही ब्रिटिशांचा दबदबा सर्वत्र होता .हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत व द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत काठीला सोने बांधून बिनधास्त फिरावे इतकी सुरक्षितता होती असे म्हटले जात असे .हे सर्व सांगण्याचे कारण की कोकणातील एका गावात ब्रिटिश राज्य नसल्यासारखे एक छोटेसे युद्ध झाले .त्यामध्ये मुख्यत्वे काठ्या व काही प्रमाणात कोयता कुर्हाड अशा हत्यारांचा वापर केला गेला.या बेकायदेशीर युद्धांमध्ये कायद्याचा रक्षक खोत यांनी भाग घेतला .
त्याकाळची पार्श्वभूमी लक्षात येण्यासाठी मुद्दाम थोडे परिस्थितीचे वर्णन केले आहे.
पावसाळ्याची सुरुवात होती.अजून पाऊस आला नव्हता . सकाळचे आठ वाजले होते .मळा दूरवर क्षितिजापर्यंत पसरला होता. हा मळा गावाची शान होती .त्याला सोन्याचा तुकडा म्हटले जात असे.मळ्याचा काही भाग नांगरलेला होता .काही भागात लावणीसाठी रोपे वर आली होती . साधारण चौकोनी आकाराच्या मळ्याच्या दोन बाजूंनी नदी गेली होती.मळ्याच्या काही भागातून नदीचे पात्र दिसे अन्य ठिकाणाहून केवळ मळा व नदी यांच्यामधील बांध दिसत असे
सूर्य डोंगराकडून किंचित डोकावत होता .सदू खोत आपल्या छोट्याशा सैन्यासह मळ्यामध्ये हजर होता. खोतांच्या बाजूने साठ पाउणशे लोक काठ्या लाठ्या कुर्हाडी कोयते इत्यादी घेऊन हजर होते.त्याकाळी खोत म्हणजे गावाचा राजा असे .स्फुरण येण्यासाठी आणि दहशत बसवण्यासाठी दोन ताशेही तिथे ताशेवाल्या्ंसह हजर होते .शेकोटीवर ताशा तापवला म्हणजे तो चांगला वाजतो.त्यासाठी शेकोटी पेटवलेली होती त्यावर ताशेवाले मधूनमधून ताशा तापवून त्यावर काठी मारून तो चांगला वाजतो की नाही ते पाहात होते .आता फक्त राजाभाऊ मानकर येण्याचीच सर्वजण वाट पाहात होते .ते आले नाही तर उत्तमच होते .पण आलेच तर त्यांना जन्माचा धडा शिकविण्याचा मनसुबा सदूखोताचा होता.कारण राजाभाऊ मानकर सदू खोताच्या विरुद्ध गेले होते.सदू खोत नुसते आडनावाचे खोत नव्हते तर ते खरेच त्या गावाचे खोत होते .
खोत पद्धत विशेषत्वेकरुन कोकणात होती .खोत हा ब्रिटिशांचा शासकीय अधिकारी असे. शेतकऱ्यांकडून सारा गोळा करून तो सरकारमध्ये भरण्याचे त्यांचे काम असे .त्यासाठी त्यांना काही जमीन दिलेली असे किंवा सार्यातील काही भाग ते ठेवत असत .त्यांची सावकारीही जोरात चाले .जुलूम जबरदस्तीही जबरदस्त चालत असे. सारा गोळा करण्यासाठी किंवा चावडीवर काही कारणपरत्वे लोकांना बोलवून घेण्यासाठी त्यांच्या हाताखाली दोन चार गडी सहज असत.त्यामुळे आपण ब्रिटिश सरकार असल्याच्या थाटात हे खोत गावावर अंमल गाजवत असत .
तर अशा या खोतांचा सदूभाऊ खोतांचा राजाभाऊ मानकरने अपमान केला होता.राजाभाऊंचा हा गाव नव्हता.त्यांचे अाजोळ इथे होते.आजोळचे सर्व लोक मुंबईला जाऊन स्थायिक झाले होते .लहानपणी राजाभाऊ इथे येत असत.त्यांना हा गाव फार आवडला होता .गिरणीतून लवकर निवृत्त झाल्यावर जी थोडीबहुत पुंजी मिळाली ती घेऊन ते या गावात आले .कुणा दोघाचौघांची पाच पंचवीस एकर जमीन त्यांनी विकत घेतली . ज्यांनी जमीन विकत घेतली त्यांनी खोतांकडून कर्ज काढले होते .खोत अल्प मोबदल्यात ती जमीन आपल्या घशात घालू पाहात होता .राजाभाऊंनी ती जमीन विकत घेऊन दिलेल्या पैशातून कर्जदारांनी खोताची कर्जफेड केली. खोताला ही जमीन मिळाली नाही.त्यामुळे खोताच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. त्याशिवाय राजाभाऊंनी गावात आल्यावर खोताला भेटून त्याला त्यांचा गावात स्थायिक होण्याचा मनसुबा सांगणे आवश्यक होते .खोताला जरा मान दिला असता त्यांच्या थोडे कलाने घेतले असते तर सर्व काही सुरळीत झाले असते .परंतु राजाभाऊनी परस्पर हा उद्योग केल्यामुळे सदू खोताला प्रचंड राग आला.
सदू खाोताने राजाभाऊला भेटून तू ही जमीन मला ताबडतोब वीक मी देतो ते पैसे घेऊन मुकाट्याने गावातून चालता हो.मी तुला गावात राहू देणार नाही. मी तुला जमीन कसू देणार नाही.तुला वाळीत टाकीन. असा दम दिला .खोताने जमिनीची देऊ केलेली किंमत नगण्य होती .राजाभाऊही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलेला नव्हता .मी या गावातच राहणार. मी तुझ्या नाकावर टिच्चून जमीन कसणारच.ही काही मोगलाई नाही .तू तुझ्या मनाप्रमाणे सगळे काही करू शकत नाहीस .मी कायद्याप्रमाणे जाणारा मनुष्य आहे. मी कायदेशीर जमीन विकत घेतली आहे.मी या गावात राहणारच तुला जे काही करायचे असेल ते कर.मी उद्या मळ्यात येऊन जमीन नांगरणारच म्हणून राजाभाऊने खोताला सांगितले .
खोतांच्या इभ्रतीचा प्रश्न होता .जर राजाभाऊला थांबविले नाही तर उद्या खोताचा गावात वचक राहणार नव्हता.राजाभाऊला जमीन नांगरू न देणे आणि त्याला गावातून हाकलून देणे हा खोतांच्या इभ्रतीचा इज्जतीचा प्रश्न झाला होता .त्यामुळे खोत सशस्त्र सवाद्य राजाभाऊला रोखण्यासाठी तोडण्यासाठी इथे सकाळी साडेसात वाजल्यापासून वाट पाहात होता.राजाभाऊने नांगरण्यासाठी आठचा मुहूर्त दिला होता.सगळे राजाभाऊंची वाट पाहात होते .
थोड्याच वेळात राजाभाऊ आले. तेही काही कमी नव्हते. त्यांच्याबरोबरही थोडा बहुत फौजफाटा होता .परंतु खोतांच्या फौजफाट्या पुढे आणि तयारी पुढे तो एकदम फिका होता.खोतानी एवढी धमकी दिली असली आणि एवढी तयारी केली असली तरी प्रत्यक्ष खोत आपल्याला धरून ठोकतील यांचा अंदाज राजाभाऊंना आला नाही. आणि आला असला तरी जगू किंवा मरू अशा भूमिकेमध्ये ते होते. त्यांनी त्यांचे सर्वस्व घर बांधण्यात व जमीन विकत घेण्यात घालविले होते . राजाभाऊंनी बरोबर बैल नांगर वगैरे तयारी आणली होती .त्यांनी जोत जोडले.व शेतात स्वतः नांगर धरला.कुणी गडी खोतांच्या धास्तीमुळे नांगर धरायला तयार नव्हता. इकडे खोतांनी हात वर केला. त्याबरोबर ताशा कडकडू लागला .रणभेरी वाजायला सुरुवात झाल्यावर सगळ्यांच्या अंगात स्फूरण चढले.नांगरणी राहिली बाजूला इथे छोटेसे युद्ध सुरू झाले.काठीला काठी कोयत्याला कोयता कुर्हाडीला कुऱ्हाड भिडली .थोड्याच वेळात राजाभाऊंचे सर्व सैन्य गारद झाले .एक दोन मेले आणि काही बेशुद्ध झाले तर काही पळून गेले.खुद्द राजाभाऊंना खूप मार पडला त्यांचे डोके फुटले रक्तस्राव होऊ लागला.
त्या काळात कुठचा डॉक्टर आणि कुठचा वैद्य.मुख्य म्हणजे ज्याना ज्याना मार पडला होता त्यांची पोलीस नोंद होणे आवश्यक होते .पोलिसांत अमुक माणसाने मारपीट केली.खुनाचा प्रयत्न केला.याची नोंद होणे आवश्यक होते. पुराव्यासहित तक्रार नोंदवणे आवश्यक होते.राजाभाऊंच्या माणसांनी राजाभाऊ व इतरांना दोन चार डोल्यांमध्ये ठेविले.जवळचे पोलीस ठाणे रत्नागिरीला जिल्ह्याच्या ठिकाणी होते .अंतर सुमारे पंचवीस किलोमीटर होते .ते सर्व अंतर चालत डोलीने जाणे आवश्यक होते .जेवढी जमली तेवढी मलमपट्टी करून सर्वजण रत्नागिरीच्या दिशेने पळत सुटले .नद्या वगैरे पार करून सर्व डोल्या व माणसे पोलीस चौकीमध्ये रत्नागिरीला संध्याकाळी पोहोचली.
ताबडतोब सगळ्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले.पंचनामा तक्रार इत्यादी पोलिसी उपचार पार पडले .एकूण हकिगतीवरून ब्रिटिशांचे राज्य काही काळ गावात नव्हते अशी परिस्थिती इन्स्पेक्टरना दिसून आली.त्या काळात ब्रिटिश शासनयंत्रणेत अधिकाऱ्यांना ते पसंत पडण्यासारखे नव्हते. गोऱ्या इन्स्पेक्टरच्या अधिकाराखाली एक छोटीशी पोलिसांची तुकडी गावात पाठविण्यात आली.इकडे सदुभाऊ हाणला की नाही साल्याला माझे कुणीही काहीही करू शकत नाही म्हणून मिशीला ताव देत गावात फिरत होता .पोलिसांना कळणार नाही .पंचनामा होणार नाही .राजाभाऊ वाटेतच मृत्यू पावेल .कुणीही माझ्या विरुद्ध साक्ष देणार नाही . काहीही पुरावा उपलब्ध होणार नाही .अशा भ्रमामध्ये वावरत होता.
एकदा पोलिसी खाक्या दाखविल्या बरोबर गावातील सर्व पोपटासारखे बोलू लागले .सदुभाऊंसकट पंचवीस लोकांची धरपकड झाली .साक्षी पुरावे होऊन केस हल्लीसारखी खितपत न पडता, जामीनावर कुणीही न सुटता ,तीन महिन्यांमध्ये केसचा निकाल लागला .कमीत कमी पाच वर्षे ते जास्तीत जास्त वीस वर्षे अशा अनेकांना शिक्षा झाल्या .पकडलेल्या पंचवीस पैकी दोन चार लोकच सुटू शकले .
त्या वेळच्या ब्रिटिश गोर्या न्यायाधीशाने जजमेंट देताना त्यामध्ये पुढील उल्लेख केला ."एकूण सर्व साक्षी पुरावे पाहता असे दिसून येते की काही काळासाठी या गावात ब्रिटिशांचे राज्य नव्हते ."
गावच्या पोलीस पाटलाने झालेल्या हकीगतीचा रिपोर्ट सरकारला पाठविणे आवश्यक होते.पोलीस पाटलाने रिपोर्ट लिहून तो पोस्टाच्या पेटीमध्ये टाकला होता .पोस्टमनने तो काढून बरोबर घेतला असता त्याला दमदाटी देऊन सदूभाऊनी तो रिपोर्ट काढून घेतला होता .पोलीस पाटलाने प्रत्यक्ष रत्नागिरीला जाऊन रिपोर्ट देणे आवश्यक होते .पोलीस पाटलांची पाटीलकी गेली आणि त्याला एक वर्षांची शिक्षा झाली .पोस्टमनने त्याची नोकरी गमावली त्याला सहा महिन्यांची शिक्षा झाली .सदाभाऊंची खोतकी खोताचे अधिकार अर्थातच गेले.ते पंधरा वर्षे शिक्षा भोगून नंतर सुटून आले . गावात दुसरा खोत न नेमता तलाठय़ाची नेमणूक झाली .खोतांना खोतीसाठी दिलेली जमीन काढून घेण्यात आली .खोत नुसते आडनावापुरते राहिले .
राजाभाऊ मानकर एवढ्या मोठ्या रक्तस्रावानंतर एवढ्या मोठ्या जीवघेण्या हल्ल्यातून आश्चर्यकारकरीत्या बचावले. हॉस्पिटलमध्ये त्यांना सहा महिने रहावे लागले .त्यांची जबानी हॉस्पिटलमध्येच हॉस्पिटल बेडवरून घेण्यात आली. घर बांधून उजळ माथ्याने ते गावात राहू लागले .गावकीमध्येही ते भाग घेऊ लागले .खोत व ते गावात समोरासमोर आल्यानंतर तोंड चुकवून जाऊ लागले .गाव सुधारले. गावापर्यंत रस्ता झाला.गावात एसटीची बस येऊ लागली.गावात इंग्लिश शाळाही झाली .पुढच्या पिढीमध्ये वैर राहिले नाही .मागची पिढी अस्तंगत झाली .आता तर खोतांची मुलगी आणि मानकरांचा मुलगा यांचे लग्न झाले आहे.ही चौथी पिढी आहे .हा तर प्रेम विवाह आहे .खोत व मानकर आता व्याही व्याही आहेत .
(ऐकीव सत्य घटनेवर आधारित )
१७/२/२०१९©प्रभाकर पटवर्धन