Get it on Google Play
Download on the App Store

नाशाची खरी कारणे

इंग्रजांना आपल्या राज्यांत व्यापार करण्याची परवानगी दिल्याने किंवा केवळ प्रसंगविशेषी त्यांची मदत घेतल्यानेच मराठ्यांचे राज्य गेले असें म्हणवत नाही. या दोन गोष्टी करून देखील राज्य राहिले असते; पण राज्य जाण्याची खरी कारणे आमच्या मतें मुख्य अशी दोनच आहेत, पहिले, मराठ्यांमधील सवत्या सुभ्याची आवड आणि जुटीचा, शिस्तीचा व राष्ट्राभिमानाचा अभाव आणि दुसरें, कवाइती लष्कर आणि सुधारलेली युद्धसामग्री यांचा अभाव.

 

पहिल्या कारणासंबंधाने इतकेंच सांगितले असतां पुरे होईल की, रघुनाथराव किंवा गाइकवाड यांनी घरच्या भांडणांत इंग्रजांचा हात शिरूं दिल्यानंतरहि जरी मराठे उमजते व एक होते तरी इंग्रजांचे काही चालले नसते; पण एकजुटीने व एकदिलाने काम करण्याची मराठयांना संवयच नव्हती असे म्हटले तरी चालेल. इंग्रजांशी लढला नाही असा वास्तविक एकहि मराठा सरदार नाही; पण ते सर्व मराठे सरदार मिळून-फार काय? दोघे दोघे तिघे तिघे असे मिळून देखील एकदम इंग्रजांविरुद्ध लढले नाहीत; व याच गोष्टीचा इंग्रजांस सर्वांत फायदा झाला.

 

राघोबाच्या कलहाच्या वेळी पेशवे, शिंदे, होळकर हे सर्व एकजुटीने वागले म्हणून इंग्रजांचे त्यांच्याविरुद्ध कांहीं चालले नाही. वडगांवास त्यांना मराठ्यांस शरण येऊन अपमानास्पद तह करावा लागला; व तो तह अपमानास्पद म्हणून मोडून फिरून जरी त्यांनी युद्धाला आरंभ केला तरी शेवटी त्यांना हार खावी लागलीच. आणि 'जो इंग्रजांना शरण येऊन पाठीस पडला त्याला अभय देणे हेच इंग्रजांचे ब्रीद' अशी जी अभिमानाची भाषा प्रथम ते बोलत होते ती सोडून देऊन रघुनाथरावाला त्यांना अखेर नाना फडणविसाच्या स्वाधीन करावेच लागले.

 

तसेच ज्या निजामाचे मराठ्यांपासून संरक्षण करण्याचा विडा इंग्रजांनी उचलला होता व ज्याच्या साहाय्यामुळे त्यांना टिपूचा पाडाव करितां आला, त्या निजामावर मराठयांनी १७९६ त स्वारी केली तेव्हां इंग्रजांना हालचाल न करितां निमूटपणे बसावे लागले. याचे कारण, सर्व मराठे तेव्हां एक होते, त्यांच्यांत फाटाफूट झाली नव्हती हेच होय !

 

पुढे बाजीराव गादीवर बसण्याचा प्रश्न निघाला तेव्हांहि शिंदे व होळकर एकविचाराने वागते तर बाजीरावाची इंग्रजांकडे जाण्याची छाती झाली नसती. ते म्हणतील त्याला ते गादीवर बसविते. कारण, नाना फडणविसाजवळ शहाणपण असले तरी लष्करी सामर्थ्य नव्हते; आणि बाजीरावास पदच्युत केल्याने तो जरी इंग्रजांकडे गेला असता तरी वसईचा तह होताना. इंग्रजांना रघुनाथरावाचा पक्ष धरल्याचा परिणाम माहीत होता, म्हणून त्यांनी बाजीरावास पाठीशी घातलाच नसता व घातला असता तरी शिंदे होळकरांच्या एकजुटीपुढे त्यांचे काही एक चालले नसते.

 

बरें, वसईचा तह नापसंत पडून, व आपल्या हातचा पेशवा इंग्रजांनी स्वतःच्या हाताखाली घातला या रागावर शिंदे होळकर हे दोघेहि इंग्रजांशी लढले. त्यांचे इतर भांडण काहीहि असो, पण वसईचा तह फिरवून पेशवा मराठयांच्या हाती ठेवावयाचा इतक्यापुरती तरी त्यांची एकवाक्यता होती. अर्थात् दोघेहि मिळून इंग्राजांशी लढते तर वसईचा तह दुरुस्त झाला असता; पण आधीं शिंदे लढून पुरा पराभूत झाल्यावर मग होळकरास लढण्याची हौस आली. अर्थात् एकेकट्याशी निरनिराळे लढायला सांपडल्याने इंग्रजांची सोयच झाली शिंद्याचा पराभव कसा होतो ही मौज पहात होळकर बसला होता. बरें, शिंद्याचा पराभव झालेला पाहून बोध घेऊन गप्प बसावें, तेंहि नाही ! एकट्यानेच लढाईस सुरवात करून त्याने विनाकारण आपला नाश मात्र करून घेतला.

 

हीच संधि फिरून १८१७-१८ साली आली होती. इंग्रजांनी आपल्यावर इतके उपकार केले, सर्वांनी आपला पक्ष सोडला असतांहि त्यांनी आपणास पाठीशी घालून राज्यावर बसविले, आपल्या बापाला न कां मिळेना पण आपणाला तरी इंग्रजांनी गादी दिली, व अशा ना अशा रीतीने आपला पूर्वीचा शब्द खरा केला, ही गोष्ट लक्षात ठेवून बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध लढण्यास तयार होऊँ नव्हते; पण वसईच्या तहाची लाज किंवा इंग्रजांचा जाच वाटून तो लढाईस तयार झाला.

 

तेव्हां शिंदे होळकरांच्या दृष्टीने फिरून १८०२ ची स्थिति प्राप्त झाली. तेव्हां तरी त्यांनी पुढे जोडीने येऊन बाजीरावास सहाय्य करावयाचे होते; पण तेंहि केले नाही व बाजीराव शरण आल्यावर होळकराने एकट्यानेच फिरून हातपाय हलवून ते अधिक जखडून मात्र घेतले !

 

पण इंग्रजांचें वर्चस्व मराठी राज्यांतून कमी व्हावे अशी शिंदे, होळकर व भोसले यांच्या मनांतून इच्छा असली तरी तीत बरीचशी भेसळ होती. इंग्रजांबरोबरच आपणांखेरीज इतर मराठे सरदारांचे वर्चस्व कमी झाले तर हवे  इंग्रजांच्या हातून ते घडून आल्याने इंग्रज मधल्यामध्ये प्रबळ झाले तरी ते चालेल अशी प्रत्येकाच्या मनांत गुप्त भावना असल्याने कोणाचें कांहींच साधले नाही. इतरांचा तर नाश झालाच; पण अखेर त्यांचा स्वतःचाहि नाश झाल्याशिवाय राहिला नाही!

 

मराठ्यांतील दूरदर्शी मुत्सद्दयांना इंग्रजांचे धोरण दिसत नव्हते किंवा त्यांच्या मुत्सद्दीगिरचे डावपेंच कळत नव्हते असे नाही; पण त्यांना त्यांच्याशी टक्कर देतां आली नाही हीच गोष्ट खरी.

 

मोगलांची पातशाही औरंगजेबाच्या मरणाबरोबरच ढासळली आणि साम्राज्यसत्तेच्या बुद्धिबळाचा डाव हिंदुस्थानच्या प्रचंड पटावर एका बाजूने इंग्रज व दुसऱ्या बाजूने मराठे खेळावयास बसले होते. दोघांशी मोहरी प्रथम सारखीच व त्या मोहऱ्यांची पगेंहि सारखीच होती. दोघांनाहि आपल्या मोहाराकडून सर्व पट आक्रमावयाचा होता व दुसऱ्याची मोहरी होतील तितकी निकामी करून डावांतून काढून टाकावयाची होती.

 

डावांत कोण कोणते मोहरे कोणत्या हेतूने पुढे टाकतो याची कल्पना एकमेकांस अगदीच नसते असे नाही; पण सुरवातीस उभयपक्षी खेळणारे गडी समबल असतांहि दुसरा पाहत असतां त्याच्या बुद्धीस आकलन न होणारे, किंवा आकलन करितां येत असूनहि प्रतिकार करितां न येण्यासारखे, डाव टाकणे यांतच काय ते ' बुद्धिबल ' असते.

 

जेथे हे बुद्धिबल एकापेक्षा दुसऱ्यास अधिक असते तेथेच काहीतरी प्यादी मातेसारखा डाव होतो. साम्राज्यपटावरचा डाव मराठ्यांना खेळावयास मुळीच येत नव्हता असे नाही.

 

इंग्रज दक्षिण हिंदुस्थानांत जितके घुसले त्यापेक्षां पुष्कळच अधिक मराठे उत्तर हिंदुस्थानांत घुसले होते. पण नाक्यार्ची घरे घेऊन बसण्यांत इंग्रजांनी अधिक शहाणपणा दाखविला; व शेवटीं मोहन्यांच्या गर्दी- मारामारीची वेळ आली तेव्हां मराठ्यांची मोठमोठी मोहोरी बिनजोरी सांपडून मारली गेली!

 

इंग्रज व्यापारांतून निघून राजकारणांत पडले ही गोष्ट मराठ्यांना १७६५ च्या सुमारासच दिसून आली होती. तसेच त्यांचा प्रयत्न हिंदी राजेरजवाड्यांच्या भांडणांत पडून आपला फायदा करून घ्यावयाचा आहे हेहि त्यांना लवकरच दिसून आले. पण उतरणीवर उभे असतां भरला गाडा अंगावर आलेला जसा सांवरून धरतां येत नाही, तसेच मराठ्यांचे इंग्रजांसंबंधी झाले.

 

इंग्रजांना इमानी असे कोणीच मानले नाही. सर्व मराठे त्यांना मनांत बेमान समजत. “इंग्रजांचे मानस आहे की, हैदर- खान, श्रीमंत व नबाब तिघांच्याहि दौलता घ्याव्या. त्यांस कोणेहि प्रकारें एकाशी शकटभेद करून एकास खाली पाडावे, असे करतां एक राहील त्यास आपण शेवटी गुंडाळावें." असले हे इंग्रजांचे धोरण पुण्याच्या दरबारास विदित होते; पण असे असतांहि पेशव्यांनी टिपूविरुद्ध इंग्रजांस मदत दिलीच की नाही? बळी तो कान पिळी हीच दृष्टि ठेवली तर मराठेशाहीचा शेवट इंग्रजांचे हातून झाला याबद्दल त्यांना दोष लावितां येत नाही.

 

इंग्रज हिंदु: स्थानांत कांहीं मोक्षसाधनाकरता आले नव्हते. त्यांना व्यापार करून संपत्ति मिळवावयाची होती, आणि व्यापार करता करता त्यांना जर राज्यहि मिळाले तर ते त्यांनी कां घेऊं नये? राजसत्तेच्या बळावर व्यापार वृद्धिंगत करता येतो हा नियमच आहे. शिवाय राज्य म्हणून मिळालेल्या मुलखापासून प्रत्यक्ष वसूल मिळतो तो वेगळाच. या दृष्टीने पहातां ज्यांनी आपला हात चालवून नवें राज्य मिळविलें त्यांना दोष न देतां, ज्यांनी हाती असलेले राज्य गमावले त्यांनाच दोष दिला पाहिजे.

 

एकदां राज्य मिळविण्याच्या मागें मनुष्य लागला म्हणजे मग न्यायान्यायाचा सूक्ष्म विवेक तो करीत बसत नाही. मराठ्यांना तरी उत्तर हिंदुस्थानांत राज्य संपादण्याचा काय हक्क होता ? त्यांनी दक्षिणेत मोंगलांच्या हातून जुनें स्वराज्य परत मिळविले येथपर्यंत न्यायाची बाजू ठीक होती. पण साम्राज्यसत्ता स्थापण्याच्या नादी लागून जेव्हां त्यांनी उत्तर हिंदुस्थानांत धुमाकूळ माजविला तेव्हां न्याय कोठे राहिला होता?

 

मोंगलाकडून सनद मिळाल्याने मराठ्यांना रजपुतांवर तरवार चालविण्यास जितका न्याय्य हक्क प्राप्त झाला असेल तितकाच मोगलांचे दिवाण म्हणून साधेल त्या प्रयत्नाने दक्षिणेतील मराठी राज्ये जिंकण्याचे मोंगलांचे उरलेले काम पुरे करण्याचा हक्क इंग्रजांनाहि मिळाला होता, असा युक्तिवाद कोणी लढविला तर त्याला उत्तर देणे कठिण जाईल.

 

केवळ सामर्थ्य व महत्त्वाकांक्षा यांच्या दृष्टीने बोलावयाचे तर मराठ्यांचे राज्य इंग्रजांनी घेतल्याबद्दल त्यांचा राग न येतां हातचे राज्य गमावण्याचा जो नादानपणा मराठ्यांनी दाखविला त्याचा मात्र राग येतो खरा.

 

मराठ्यांच्या मानाने इंग्रजांना राज्य मिळविण्याला किती तरी अधिक अडचणी होत्या हे कोणीही कबूल करील. इंग्रज सहा हजार मैलांवरून हिंदुस्थानांत आले; मराठे आपल्या देशांत आपल्या घरीच होते. इंग्रजांना सर्व मुलुख परका होता; त्यांना मुद्दाम प्रत्यक्ष प्रवास करून माहिती मिळवून नकाशे काढल्याशिवाय त्या मुलखाचा परिचय होणे शक्य नव्हते; मराठ्यांना सर्व मुलुख खडान्खडा माहीत होता. ज्या अवघड वाटा, दऱ्या, खोरी, जंगले मराठ्यांच्या नित्य पायाखालची ती हुडकून काढणे व त्यांतून फिरणे हे इंग्रजांना जवळ जवळ अशक्य होते.

 

इंग्रजांचा पायच मराठी मुलखाला लावू देऊ नये असा मराठ्यांनी प्रथम निर्धार केला असता तर इंग्रजांच्या सत्तेचे बीज इकडे रुजले नसते; मग त्याचा एवढा मोठा प्रचंड वृक्ष होण्याचे तर दूरच! विलायती मालच मुळी आपणास नको असें मराठ्यांनी प्रथमपासून ठरविले असते म्हणजे इंग्रज व्यापार कसचा करिते? निदान त्यांच्या व्यापारावर जबरदस्त जकाती बसविल्या असत्या तरी व्यापार किफायतशीर होत नाही असे पाहून त्यांनी लवकरच गाशा गुंडाळला असता.

 

इंग्रज व्यापारी पदरी फौज ठेवू लागले असे आढळून येतांच तरी मराठे सावध कां झाले नाहीत? इंग्रजी सत्तेच्या उंटाचे पिल्लू त्यांच्या डोळ्यांसमोर वाढत हो ते त्यांना कां दिसूं नये? आणि दिसल्याबरोबर त्यांनी त्याला घरांतून घालवून देण्याचा का प्रयत्न करूं नये? इंग्रजांच्या जवळ बंदुकी, तोफा वगैरे लष्करी सरंजाम जमत चाललेला पाहून मराठ्यांनीहि ताबडतोब असा सरंजाम आपला आपण तयार करण्याचे कारखाने का काढू नये? हत्यारांचा कायदा तेव्हां खचित नव्हता!

 

युरोपियन राष्ट्र हिंदी लोकांस हत्यारे विकण्याच एका पायावर तयार होती, व इंग्रजांशिवाय इतर अनेक युरोपियन लोक मराठ्यांच्या पदरी नोकर म्हणून राहून त्यांचे सैन्य कवाईत शिकवून तयार करण्यास व तोफा बंदुकांचे कारखाने काढून चालविण्यास तयार होते.

 

इंग्रज सहा हजार मैलांवरून हिंदुस्थानास आले तसे त्यांचे उदाहरण पाहून धाडस करून मराठ्यांना युरोपास जाऊन हिंदुस्थानांत उपलब्ध नसणाऱ्या विद्या शिकण्यास, स्नेही मिळविण्यास व व्यापार संपादण्यास नको कोणी म्हटले होतें?

 

इंग्रजांच्या मनांत राज्यलोभ कितीहि प्रबळ असता तरी त्यांच्या पदरी लष्करभरतीला हिंदी. लोकच मिळाले नसते तर ते काय करणार होते? इंग्रज जर इंग्रजांविरुद्ध लढण्याला मराठ्यांना मिळाले नाहीत तर मराठे तरी मराठयांविरुद्ध लढाण्याला इंग्रजांना कां मिळावे?

 

इंग्रजांच्या फौजेंत शेकडा विसांहून अधिक इंग्रज शिपाई केव्हांहि नव्हते; शेकडा ऐशी हिंदीच होते. इंग्रजांना एकमेकांविषयी आपलेपणा वाटत होता तसा हिंदी लोकांविषयी हिंदी लोकांना, निदान हिंदूंविषयी हिंदूंना, त्यांतूनहि निदान मराठ्यांविषयीं तरी मराठ्यांना, कां वाटू नये?

 

पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, मराठ्यांच्या भांडणांत जर मराठ्यांनी आपण होऊन इंग्रजांना घेतले नसते तर नसते भांडण उकरून काढून, किंवा विनाकारण म्हणजे केवळ विजिगीषीने मराठ्यांच्या राज्यावर स्वारी करून त्यांचे राज्य जिंकण्यास इंग्रजांना आणखी तीनचारशे वर्षोंहि कदाचित् पुरली नसती !

 

उत्तरहिंदुस्थान मोंगलांनी वेडेपणामुळे इंग्रजांना दिले असे जरी घेऊन चालले तरी अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत यमुना नदीच्या दक्षिणेस इंग्रजांचा एक वीतभर देखील मुलुख नव्हता. येऊन जाऊन पश्चिमकिनाऱ्यावर एक मुंबई सुरत वगैरे ठाणी आणि पूर्वकिनाऱ्यावर थोडासा मुलुख इतकाच काय तो त्यांच्या हाती होता.

 

असे असतां टिपूविरुद्ध मदत करून इंग्रजांना शेंकडों मैलांचा मुलुख कोणी मिळवून दिला ? मराठ्यांनीच ना? निजाम व मद्रास इलाख्यांतील मुसलमान यांनी इंग्रजांस घरांत घेतल्याचे आपण एक वेळ सोडून देऊ; पण उत्तरेस यमुना नदी, ईशान्येस कटक संबळपूर, पूर्वेस पूर्वसमुद्र, आमेयीस कावेरी नदी, दक्षिणेस म्हैसूर, नैर्ऋत्येस मलबार, पश्चिमेस पश्चिमसमुद्र, व वायव्येस राजपुताना एवढ्या प्रचंड क्षेत्रांत अगदी अठराव्या शतकाच्या मध्यभागापर्यंत इंग्रजांना पाय ठेवण्यास तरी जागा काय होती?

 

अशी स्थिति असतां त्यांना आपल्या भांडणांत न्यायाधीश किंवा मदतनीस म्हणून मराठ्यांनी कां घेतले?  या प्रचंड मुलखांत सर्व मराठ्यांचे राज्य होते. सर्व मुलुख एकाच छत्रपतीखाली होता असे म्हणण्यास हरकत नाही. पेशवे, शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले आणि पटवर्धन वगैरे मराठे ब्राह्मण सरदार औप- चारिकरीत्या का होईना पण एकाच राजाचा अम्मल मानीत होते. ते सर्व एकाच दौलतीचे आधारस्तंभ असून दौलत एकदां का ढांसळली तर ती सर्वांच्याच अंगावर कोसळून पडणार अशी भीति असतां व ती सांवरून धरली तर त्यांत सर्वांचेच. कल्याण व सर्वांचीच कीर्ति हे माहीत असतां, मराठ्यांनी आपल्या राज्यांत इंग्रजांचा प्रवेश कां होऊ दिला? एखादा इंग्रजांकडे गेला असतां बाकीचे सर्व जरी मिळून वागते तरी सर्व बंदोबस्त झाला असता.

 

इंग्रजांना मुंबई, मद्रास, कलकत्ता अशा दूरदूरच्या तीन ठिकाणांहून कारस्थान करावे लागे. मराठे सरदार यापेक्षां एकमेकांच्या पुष्कळच जवळ होते. मराठे जर एकमताने वागते तर इंग्रजांचे नुसते टपालहि या मुलखांतून फिरूं शकले नसते. ते एकमताने वागते तर इंग्रजांना मुळी सैन्यच मिळाले नसते; त्यांनी परक्या लोकांचे सैन्य जमविलें असते तरी त्याचा प्रवेश मराठी मुलखांत झाला नसता; प्रवेश झाला असता तरी त्याला रसद मिळाली नसती व छापे पडून सैन्य कापून निघाले असते! कलकत्त्याहून मुंबईकडे किंवा मद्रासेहून मुंबईकडे इंग्रजांचे सैन्य यावयाचे तें समुद्र मार्गाने फारसे कधी आले नाही. जहाजांचा एवढा मोठा काफिला त्यांच्याजवळ कधीच नव्हता. त्यांच्या सैन्याच्या सर्व हालचाली मराठ्याच्या मुलखांतून खुशाल होत व मराठे त्या होऊ देत! पण तेच सर्व मराठे एकविचाराने वागते तर इंग्रजांचे सैन्य काय पण चिटोरेंसुद्धां मराठ्याच्या मुलखांतून जाऊं शकले नसते.

 

असे झाले असते तर इंग्रज मराठयांचे राज्य घेण्याच्या भानगडीत न पडतां, राज्य मिळविण्याच्या भानगडीत आपण पडूं नये असे म्हणणारा ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरांत जो एक पक्ष होता त्याचाच विजय झालेला दिसला असता.

 

पण इंग्रजांनी मराठ्यांच्याच साहाय्याने मराठयांस जिंकले ! त्यांनी थोडासा विलायती माल व पुष्कळशी अक्कल यांच्या भांडवलावर हिंदुस्थानचा व्यापार व हिंदुस्थानचे सर्व राज्य मिळविले! त्यांनी मोगलासारख्या जीर्ण झालेल्या राज्यावरच घाला घातला असें नाहीं; तर तरतरीत, नव्या दमाच्या, महत्वाकांक्षी व उदयोन्मुख अशा मराठ्यांचेंहि राज्य जिंकून घेतले ते फक्त दोन गोष्टींच्या जोरावर; एक स्वतःची अक्कल व हिंमत, आणि दुसरी, मराठयांची अदूरदृष्टि व आपापसांतली फूट!