Get it on Google Play
Download on the App Store

७ अज्ञात गुहा १-२

(ही कथा काल्पनिक आहे. गुहेचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये !!प्रयत्न केल्यास एखादी गुहा सापडू शकते .परंतु कथेतील गुहा ती असेल असे सांगता येत नाही )

डोंगराकडे पहात वसंता उभा होता.त्याच्या शेजारी त्याचा मित्र हेमंत होता. वसंताने आजोबांनी  सांगितलेली कहाणी त्याला सांगितली होती.खजिन्याचा आपण शोध लावणार म्हणून दोघानाही  थ्रील वाटत होते.  या डोंगरात तो खजिना कुठे लपलेला असेल याचा तो विचार करीत होता . आसपास सर्वत्र पाहून आपण निश्चित त्याच ठिकाणी आलो आहोत ना याची तो खात्री करून घेत होता .त्याच्या पाठीवर नेहमीची प्रवासी पिशवी होती .त्यात दोन दिवसांसाठी लागणारे सर्व सामान होते .जरी रानात राहावे लागले तरी तंबू उभारून राहता येईल  असा छोटासा तंबू,त्याचबरोबर अन्न पाणी यांची व्यवस्था, सर्व काही त्या पिशवीत होते.पिशवी जरा जड व मोठी झाली होती परंतु तेवढे सामान वाहून नेण्याची त्याला सवय होती . एक स्लीपिंग बॅगही त्यामध्ये होती .त्याच्या पायात स्पोर्ट्स ट्रेकिंग शूज होते . उन्हापासून बचाव करणारी टोपी होती.हेमंतचाही पोषाख साधारणपणे तसाच होता. 

विकेंडला सुटी असेल तेव्हा, किंवा मुद्दाम सुटी काढून,रानावनात  फिरण्याची त्याला आवड होती.त्याच्या वडिलांना फिरण्याची आवड होती. पण ते मोटारीतून व प्रेक्षणीय स्थळे पहात फिरत . रानावनात जंगलात डोंगरदऱ्यात फिरण्याची अावड त्याला त्याच्या आजोबांकडून मिळाली होती असे त्याची आई म्हणत असे .आजोबा म्हणजे आईचे वडील .त्यांना म्हणजे गंगाधरपंतांना अशी फिरण्याची आवड होती .आलेत तर तुमच्या बरोबर नाही आलेत तर तुमच्याशिवाय पण डोंगरदऱ्यांत फिरणारच असा त्यांचा बाणा असे .बरोबर तशीच वसंताची स्टाइल होती .त्याच्यासारखीच रानोमाळ फिरण्याची आवड असणारे त्याचे दोनचार मित्र होते .डोंगर किल्ले दऱ्याखोऱ्यातून ते वेळ मिळेल तेव्हा संधी सापडेल तेव्हा भटकत असत .आज त्याच्याबरोबर हेमंत आला होता .

काही दिवसांपूर्वी तो त्याच्या आजोळी गेला होता .त्याचे आजोबा आता वृद्ध होते .पूर्वीचे भटकंतीचे दिवस ते आठवीत असत .त्यावेळी लिहिलेल्या डायऱ्या, त्यावेळी काढलेले फोटो,त्यावेळी बरोबर आणलेल्या निरनिराळ्या वस्तू, यांचा एक संग्रह त्यांनी केला होता .भिंतीवरील काचेच्या शोकेसमध्ये त्या वस्तू मांडलेल्या असत . शेजारील कपाटात डायर्‍या व फोटो तारीखवार लावलेले होते.त्या वस्तूंकडे पाहणे, त्या डायऱ्या वाचणे व त्या काळच्या आठवणीत रमणे, हा आजोबांचा विरंगुळा असे.आजोबांबरोबर त्याच्या भटकंतीच्या गप्पा नेहमी रंगत असत.आजोबांची प्रकृती बरी असली आणि ते रंगात आले  तर त्यांच्या भटकंतीच्या कहाण्या ते सांगत.वसंतने कुठे कुठे भटकंती केली तेही ते आवर्जून विचारीत. वसंतही कौतुकाने त्यांना फोटो व बरोबर आणलेल्या वस्तू दाखवीत असे.यावेळी आंबोलीच्या घाटातील भटकंतीच्या  गप्पा निघाल्या होत्या .

अंबोलीचा घाट असे म्हटल्याबरोबर आजोबांना स्फुरण चढले  होते.काही वेळ ते त्यावेळच्या आठवणींमध्ये गुंगून गेले होते .वसंता आजोबांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील बदलते भाव निरखीत होता . जरावेळाने  आंबोलीच्या घाटातील त्यांचा अनुभव सांगण्याला त्यांनी सुरुवात केली  .~अंबोलीचा घाट उतरताना पाचव्या वळणावर उजवीकडे मोठी दरी आहे.त्या दरीत एक पायवाट जाते .मी पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती सांगत आहे .अजूनही तो घाट तसाच व ती पायवाट तशीच असेल असे मला वाटते .(बदल झाला असल्यास सगळीच गणिते बिघडतील .)तिथून चढ उतार करीत लहान मोठे तीन डोंगर पार केल्यावर उजव्या हाताला एक डोंगर आहे.त्या डोंगरात एक गुहा होती.त्या गुहेच्या तोंडावर एक मोठा दगड होता .त्यामुळे त्या गुहेत जाताना अतिशय कौशल्याने जावे लागे. या गुहेचा शोध आम्हाला तसा अपघातानेच लागला होता .आम्ही मित्रमंडळी भटकत भटकत तिथे पन्नास वर्षांपूर्वी गेलो होतो .एक मोठा प्रचंड दगड व त्याच्या शेजारी एक लहानशी फट आम्हाला आढळली.त्या फटीतून विजेरीचा प्रकाश पाडून आत काय असावे ते पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला .विजेरीचा प्रकाश दूरवर काळोखात जाऊन  लुप्त होत होता.आत दगडी रांजण असावेत असे आम्हाला वाटले . गुहेत गेल्याशिवाय नक्की तिथे काय आहे ते कळणे शक्य नव्हते.

ती लहानशी फट जमिनीबरोबर होती.त्या फटीतून आत कौशल्याने रांगत जाणे शक्य होते.मी सडपातळ असल्यामुळे आत जाण्याचे ठरविले .माझ्या मित्रांनी उगीच नको ते साहस करू नकोस म्हणून मला अडविण्याचा प्रयत्न केला  .आत जाताना मध्येच अडकलास तर?आत पुरेसा ऑक्सिजन नसला तर?आत काही धोका असला तर ?  इत्यादी  गोष्टी सांगून मला अडविण्याचा प्रयत्न केला .परंतु मी त्यांचे काहीही न ऐकता  आत जाण्याचे व जिज्ञासा पुरी करून  घेण्याचे ठरविले.   मी एकटाच सडपातळ असल्यामुळे त्या फटीतून आत जाणे मलाच शक्य होते .मी तसा धाडसी होतो .माझ्या जवळ बॅटरी अर्थातच होती .हात सुटे राहावेत म्हणून बॅटरी नेहमी कपाळावर बांधलेली असे.गुहेत काळोख असल्यामुळे मी बॅटरी सुरू केली.बॅटरीच्या प्रकाशात मी जे काही पाहिले त्याने थक्क होऊन गेलो .

त्या गुहेमध्ये दहा दगडी रांजण होते.ते रांजण मूल्यवान रत्नांनी व सुवर्ण मोहरांनी भरलेले होते. मी अलिबाबाच्या गुहेत तर नाही ना असा संभ्रम मला पडला .रांजणावर लाकडी झाकणे होती.ते लाकूड अत्यंत टिकावू स्वरूपाचे होते .शेकडो वर्षानंतर सुद्धा त्याला काहीही झाले नव्हते.मी माझ्या जवळील कॅमेराने त्या रांजणांचे फोटो काढले.तो मूल्यवान खजिना कोणी लपविला होता ?केव्हा लपविला होता? इतक्या दूर अरण्यात तो  लपविण्याचे कारण कोणते ?काहीच उलगडा होत नव्हता .भिंतींवर कोणत्याही लिपीतील काहीही मजकूर लिहिलेला नव्हता.मी माझ्या जवळील कॅमेराने त्या रांजणांचे दोन तीन अँगलने फोटो काढले. त्या गुहेमधून कसाबसा बाहेर पडलो.बाहेर आल्यावर गुहेकडे तोंड करून त्या दगडाच्या पुढ्यात उभा राहून मी खुल जा  सिम सिम असे ओरडलो. बाहेरूनही मी त्या गुहेचे निरनिराळया  कोनातून फोटो घेतले .

बाहेर माझे मित्र उत्सुकतेने माझ्या येण्याची वाट पाहत होते .त्यांना आत काय पाहिले त्याचे सविस्तर वर्णन मी केले.प्रथम माझ्या मित्रांना मी त्यांना थापा मारीत आहे असे वाटले .खिशातून सुवर्ण मोहरा काढून दाखविल्यावर त्यांची खात्री पटली .आम्हा सर्वांनाच त्या धनाची लालसा निर्माण झाली.हे धन आपल्याला प्राप्त करून कसे घेता येईल याबद्दल आमची आपसात चर्चा सुरू झाली . 

गुहेच्या तोंडावरील एवढा मोठा दगड दूर कसा करायचा हा मोठा प्रश्न होता .त्या प्रचंड  दगडाच्या बाजूने जागा तयार करून आत जाणे  शक्य नव्हते.  तो प्रचंड दगड दूर केल्यावर ते रांजण रिकामे करून वाहून कसे न्यायचे हा पुढचा प्रश्न होता .तो दगड गुहेच्या तोंडावर जवळजवळ एखाद्या दरवाज्यासारखा घट्ट बसला होता .तो दगड एवढा मोठा होता की चार हत्ती लावून सुद्धा तो ओढणे कठीण होते .जरी ओढायचा म्हटला तरी त्याला साखळदंड बांधणे अशक्य प्राय होते.आणि तो दगड दूर केल्याशिवाय त्यातील संपत्ती बाहेर काढणे अन्य कोणत्याही उपायाने शक्य नव्हते.तो दगड फोडून वाट करायची म्हटले तरी त्यासाठी बराच वेळ लागला असता .छिन्नी हातोड्याला सहजासहजी दाद देणारा तो दगड नव्हता .अलिबाबा व चाळीस चोर ही कथा आम्हाला आठवली .

(क्रमशः)

२८/७/२०१९@प्रभाकर  पटवर्धन